Indian Toys  esakal
साप्ताहिक

संपादकीय : भारतीय खेळणी उद्योगाची कोटीच्या कोटी उड्डाणे..! इतक्या पटीनी वाढला उद्योग..

सर्वाधिक उलाढाल पाच ते दहा वर्षांच्या मुलांसाठीच्या खेळण्यांची...

साप्ताहिक टीम

खेळण्यांच्या दुनियेत शिरल्यानंतर भान हरपत नसेल तर आपल्या अगदी आतलं काहीतरी हरवलंय की काय याची चाचपणी करायला हरकत नाही. आर्थिक स्तर, सामाजिक प्रतिष्ठा, लौकिक यश अशा गोष्टींशी या विधानाचा फारसा संबंध नाही.

हवं असलेलं खेळणं हातात आल्यानंतर एखाद्या लहानग्याच्या चेहऱ्यावर फुलणारा आनंद असो, बुद्धीला आव्हान देणाऱ्या एखाद्या खेळात बुडून जाऊन आजूबाजूच्या जगाचं अस्तित्व तेवढ्यापुरतं विसरून जाणं असो, उन्हाळ्याच्या, दिवाळीच्या सुट्टीत भावंडांना, मित्र-मैत्रिणींना जमवून मांडलेले खेळ असोत किंवा वयाच्या, प्रतिष्ठेच्या, यशाच्या शिड्या चढल्यानंतर अवचित सामोऱ्या येणाऱ्या एखाद्या खेळण्याने जागवलेल्या आठवणींतून मनावर हलकेच फिरणारं मायेचं, आनंदाचं मोरपीस असो.

नकळत्या या शब्दाच्याही आधीच्या वयात आपल्या भवतालात प्रवेश केलेल्या खेळण्यांशी आपलं नातं नेहमीच बहुपेडी असतं.

संस्कारक्षम वयातल्या मुलांची मानसिक जडणघडण, त्यांचे वर्तनशास्त्र आदींचा अभ्यास करणारे बव्हंशी तज्ज्ञ मुलांच्या वाढीतला खेळ आणि खेळण्यांचा वाटा मान्य करतात.

आपल्या शिकण्याची सुरुवात आपल्या भवतालातून होत असेल तर त्या भवतालाला अर्थ देणाऱ्या रंग, आकार वगैरेंचा पहिला परिचय आपल्याला झालेला असतो तो खेळण्यांमधूनच.

खेळण्यांचा इतिहास अगदी अश्मयुगापर्यंत मागे जातो, असा उल्लेख विश्वकोशात आहे. प्रत्येक देशातल्या खेळणी निर्मात्यांनी त्या त्या काळातला त्यांचा भवताल दगड, माती, लाकूड, प्राण्यांची हाडे, शिंगे, कागद, कापड, तांब्या-सोन्यासारखे धातू, मौल्यवान रत्ने, अलीकडच्या शतकात प्लॅस्टिक अशा अनेकविध वस्तूंपासून तयार केलेल्या खेळण्यांमध्ये प्रतिबिंबित केल्याचे दिसून येते.

बाहुल्या, भातुकलीचे खेळ, चेंडू, छोट्या बैलगाड्या, ट्रक, ट्रॅक्टर, बसगाड्या, आगगाड्यांपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रॅण्ड झालेले मेकॅनो, रूबिक क्युबसारखी कोडी आणि बार्बीसारख्या बाहुल्यांच्या भोवती एक मोठी अर्थव्यवस्था उभी आहे, याचा बऱ्याचदा आपल्याला अंदाज नसतो.

आणि खेळण्यांमधली ही उलाढाल म्हणजे मोठा खेळ आहे हे २०२३वर्षातला १८,३०० कोटी अमेरिकी डॉलरचा आकडा ऐकल्यावर लक्षात येते. आणि यातही सर्वाधिक उलाढाल आहे ती पाच ते दहा वर्षांच्या मुलांसाठीच्या खेळण्यांची, असं ह्या उद्योगाविषयीचे अहवाल सांगतात.

खेळण्यांच्या या जागतिक उलाढालीतली अलीकडची आपल्या दृष्टीने महत्त्वाची घटना म्हणजे या उलाढालीतला भारतीय खेळणी उत्पादकांचा वाढलेला वाटा.

लखनौच्या आयआयएमने केंद्र सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागासाठी केलेल्या एका अभ्यासानुसार भारतीय खेळणी उद्योगाने आर्थिक वर्ष २०१४-१५च्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२२-२४मध्ये निर्यातीत २३९ टक्के म्हणजे दुपटीहून अधिक वाढ नोंदवली आहे. याच काळात खेळण्यांची आयात ५२ टक्क्यांनी घटली आहे.

भारतीय खेळणी उद्योगात लाकडी खेळण्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सावंतवाडीच्या खेळणी उद्योगातही या निर्यातवाढीचे प्रतिबिंब पडल्याचे सावंतवाडीतील उद्योजकांचा कानोसा घेताना जाणवते.

देशातील खेळणी उत्पादकांसाठी केंद्र सरकारने उत्पादनवाढीबरोबरच आयात शुल्कासारख्या मुद्द्यांविषयी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाचे हे दृष्य परिणाम आहेत, असे या उद्योजकांचे म्हणणे आहे.

मुलांच्या वाढीमध्ये काही एक भूमिका असणाऱ्या खेळणी उद्योगाला मिळालेले हे बळ अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहे.

खेळणी उद्योगाचे सध्याचे केंद्र असणाऱ्या चीन आणि व्हिएतनामसारख्या देशांच्या स्पर्धेत एक व्यवहार्य पर्याय म्हणून भारताचे स्थान दृढ करण्यासाठी तंत्रज्ञानातील प्रगती, ई-वाणिज्य प्रणालींचा वापर, भागीदारी आणि निर्यातीला प्रोत्साहन, ब्रँड-उभारणीमध्ये गुंतवणूक याबरोबर शिक्षक आणि पालकांचा मुलांशी संवाद, सांस्कृतिक विविधतेचे जतन आणि प्रादेशिक कारागिरांचा सहयोग यांसारखे सातत्यपूर्ण प्रयत्न खेळणी उद्योग आणि सरकारकडून व्हायला हवेत, अशी अपेक्षा आयआयएम लखनौच्या अहवालात व्यक्त झाली आहे.

एका अर्थाने हे उद्योजकांबरोबरच मुलांच्या निकोप वाढीचा विचार करणाऱ्या प्रत्येकासाठी एक संधी जशी आहे तसे आव्हानही आहे.

आता जागतिक पातळीवर भारतीय खेळण्यांचा ठसा उमटवण्यासाठी सर्जनशील नवकल्पना जशा मांडायला लागतील, तसेच उत्पादन प्रक्रियांपर्यंत नव्याने विचार करावे लागतील. टॉयकेथॉनसारख्या कल्पनांमधूनही कदाचित ह्या वाटचालीला आणखी काही पैलू जोडले जातील.

तंत्रज्ञानाच्या अतिवापरापासून ते बदलत्या जीवनशैलीपर्यंत अनेक कारणांमुळे संस्कारक्षम वयातल्या मुलांच्या बौद्धिक वाढीविषयी अनेकविध प्रश्न उभे राहिलेले दिसत असताना, मुलांच्या सौंदर्यदृष्टीत आणि मानसिक विकासात भर घालणाऱ्या खेळणी उद्योगाला मिळणारी संजीवनी कदाचित त्यातल्या काही प्रश्नांना उत्तरंही देऊ शकेल.

-----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT