- राजेन्द्र खेर
तत्त्वस्वरूप गणेश हा जसा संपूर्ण सृष्टीचा मूळ आधार आहे तसाच तो जिवांचाही मूळ आधार आहे. गणेशाचं पूजन करणं म्हणजे थेट परमात्म्यापासून निघालेल्या ॐकारस्वरूपाचंच पूजन असतं.
गणपतीला ऋग्वेदातील ब्रह्मणस्पति सूक्तात ‘ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे’ म्हणून अग्रमान दिलेला आहे. यावरून त्या गणेशरूपी तत्त्वाची महत्तता आणि प्राचीनत्व समजून येतं. जेव्हा परमात्म्यापासून परा आणि अपरा या प्रकृती निर्माण झाल्या तेव्हा ब्रह्मा-विष्णू-महेश या त्रिदेवांच्या कार्याचा आरंभ झाला. म्हणूनच परमात्म्याचं दृश्य प्राकृतिक स्वरूप म्हणजे गणेश. या गणेश स्वरूपाचे ज्ञान तीन प्रकारांनी होतं. पहिला प्रकार म्हणजे त्याचं तत्त्वस्वरूप, दुसरा प्रकार म्हणजे पौराणिक स्वरूप आणि तिसरा म्हणजे त्याचं सामाजिक स्वरूप.
तत्त्वस्वरूप -
तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात,
‘ॐकार प्रधान रूप गणेशाचे ।
ते तिन्ही देवांचे जन्मस्थान ।।
अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू ।
मकार महेश जाणियेला।।’
म्हणजे ब्रह्मा-विष्णू-महेश या त्रिदेवांचं हेच जन्मस्थान आहे. अर्थात उत्पत्ती स्थिती आणि लय हे ॐकारातून प्रसवलेल्या प्रकृतीचं स्वरूप आहे. त्यामुळे गणेश हे सृष्टिसर्जनाचं आद्य स्वरूप मानावं लागतं. अथर्वशीर्षातही म्हटलं आहे, ‘त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि...’ अर्थात त्या ॐकारस्वरूप ईशतत्त्वाचं दृश्य स्वरूप म्हणजे गणेश. म्हणूनच गणेशाच्या रूपात ॐकाराचंच दर्शन होतं.
अनेक चित्रकारांनी गणपतीच्या रूपात दडलेला ॐकाराचा
आकार स्पष्टपणे दाखवून दिलेला आहे. ॐ ही भगवंताची महान
शक्ती आहे. त्या अक्षरब्रह्माचं वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,
ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ।।
जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ।।
ईश्वराचंच हे आद्यस्वरूप आहे. वेदांनी त्याचं प्रतिपादन केलं आहे. म्हणूनच ते जणू आत्मरूप आहे. छांदोग्य उपनिषदात ॐकाराविषयीची एक रूपकात्मक आख्यायिका सांगितलेली आहे. मृत्यूच्या पाशातून सुटण्यासाठी देवांनी वेदत्रयींचा आश्रय घेतला. परंतु तिथेही मृत्यूनं देवांचा पिच्छा पुरवला. तेव्हा मग देवांनी ॐकाराचा आश्रय घेतला. ॐकाररूपी दुर्गम आणि अभेद्य अशा किल्ल्यामध्ये मृत्यूला जाता आलं नाही म्हणून देव अमर झाले.
निकोला टेस्ला या जगद्विख्यात शास्त्रज्ञानं एका मुलाखतीत म्हटलं होतं, ‘If you only knew the magnificence of the 3, 6, and 9, then you would have a key to the universe.’ म्हणजे, ३, ६, ९मधील अलौकिकता समजली तर विश्वाची किल्ली तुमच्या हातात येईल! या गणिती संख्येच्या आधारानं निकोला टेस्ला हा दार्शनिक शास्त्रज्ञ तत्त्वरूपाजवळ पोहोचला होता, असे नक्कीच म्हणता येईल. ३, ६, ९ मधील गूढ त्याला तत्त्वतः उकललं होतं. पुढे अनेक अभ्यासकांनी या संदर्भात असंख्य गणिती सूत्र मांडून या अंकांमधलं गूढ उकलण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यातून फार मोठं काही हाती लागलेलं दिसत नाही. कारण अंक तर बरोबर सापडले होते; पण अंकगणित म्हणजे परमज्ञान नाही. परंतु ते अंक हे गणेशाचंच व्यक्त तत्त्वस्वरूप मानलं तर मात्र खूप मोठा ज्ञानाचा खजिना हाती लागू शकतो.
अशा या गणेशाविषयी अथर्वशीर्षात म्हटलं आहे. ‘त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यं.’ गणेश हा ॐकारस्वरूप असल्यामुळे तो संपूर्ण ‘परा’ आणि ‘अपरा’ या प्राकृतिक सृष्टीचा मूलाधार आहे. एका नादामधून (Humming) सृष्टी अस्तित्वात आली ही गोष्ट आता विज्ञानही मान्य करतं. हा नाद ॐकाराचा होता, असं सनातन भारतीय तत्त्वज्ञान सांगतं. या ॐकारातूनच सृष्टी कशी आणि का प्रसवली याचं विश्लेषण अनेक ज्ञानीयांनी केलेलं आहे. अर्थातच त्यात खूप मोठा गूढ अर्थ दडलेला आहे. म्हणून तत्त्वस्वरूप गणेश हा जसा संपूर्ण सृष्टीचा मूळ आधार आहे तसाच तो जिवांचाही मूळ आधार आहे. मनुष्यदेहाच्या संदर्भात विचार करायचा झाल्यास हे बौद्धिक तत्त्व मूलाधाराशी स्थित असतं.
पौराणिक स्वरूप-
गणपतीच्या संदर्भात अनेक पौराणिक कथा आहेत. त्यातल्या त्यात शिवपुराणातील कथा अधिक प्रचलित आहे. एकदा शिव बाहेर गेले होते. पार्वतीला तेव्हा स्नान करायचं होतं. कुणीतरी घराचं रक्षण केलं पाहिजे या हेतूनं तिनं अंगच्या मळापासून एक मुलगा तयार केला. त्यात प्राण भरला. मग त्या मुलाला रखवाली करण्यासाठी दाराशी उभं करून ती आत स्नानासाठी गेली. काही वेळानं शिव आले. त्या द्वारपाल मुलानं शिवांना अडवलं. तो त्यांना त्यांच्या स्वतःच्याच घरात प्रवेश करू देईना. त्यामुळे स्वाभाविकच शिव संतापले. मग दोघांमध्ये घनघोर युद्ध सुरू झालं. अखेर शिवानं त्या द्वारपाल मुलाचं मस्तक धडावेगळं केलं. त्याचवेळी पार्वती स्नान करून बाहेर आली. घडलेल्या युद्धाचा प्रकार तिला समजला. तिला खूप वाईट वाटलं. ती आक्रोश करू लागली. तिनं शिवांना आपल्या पुत्राला जिवंत करायला सांगितलं. अखेर शिवांनी एका हत्तीला मारून त्याचं मस्तक त्या मुलाच्या मानेवर बसवलं आणि तो पार्वतीपुत्र जिवंत झाला तोच हा गणपती!
अनेकांना ही पौराणिक कथा माहीत असते. अनेकांचा अशा कथांवर विश्वास नसतो. परंतु, या कथानकात खूप मोठा गूढ अर्थ लपला आहे. वेदवामयानंतर खूप पुढच्या काळात पुराणं लिहिली गेली. देवदेवतांच्या गोष्टी, त्यांचं पूजन करण्याचे विधी किंवा इतर अनेक उपचार सांगता सांगता पुराणकर्ते त्यामध्ये तत्त्वज्ञान अथवा इतिहासही गुंफून टाकतात. पद्मपुराणात सृष्टीची उत्पत्ती सांगताना एक विशाल सोन्याचं अंडं फुटून सृष्टी तयार झाली, असं म्हटलं आहे. या कथेत ‘बिग बँग थिअरी’ दिसून येत नाही? म्हणून कथांमधे लपलेलं पण ऋषींना अपेक्षित असलेलं त्यातलं तत्त्वज्ञान उमजलं पाहिजे. अन्यथा अशा कथा भाकड कथा वाटू शकतात. गणेश जन्माच्या या कथेत लपलेला मूळ तात्त्विक अर्थ समजून घेतला तर गणेशस्वरूपाचा स्पष्ट उलगडा होतो. गणेश ही बुद्धीची देवता मानली गेली आहे.
मेंदूचा उभा छेद घेतला तर तो गणपतीच्या आकारासारखा दिसतो, असा काहींचा अभ्यास आहे. शिवतत्त्व हे मूलाधारापाशी असतं. त्याच्या द्वारापर्यंतच बुद्धी जाऊ शकते; पुढे नाही. कारण शिवतत्त्व जाणणं हे बौद्धिक काम नसून ते आत्मिक स्तरावर घडत असतं. आत्मिक स्तरावर जाताना बुद्धी विसर्जितच करावी लागते. भगवद्गीतेत भगवानही सांगतात, आत्मज्ञान होण्यासाठी इंद्रियांचं विसर्जन मनात, मनाचं बुद्धीत आणि बुद्धीचं आत्म्यात व्हावं लागतं. यादृष्टीनं मूलाधारापाशी गणेश स्थित आहे. याचा अर्थ दोन प्रकारे होऊ शकतो. पहिला अर्थ म्हणजे इंद्रिय-मन-बुद्धी आणि पुढे आत्मतत्त्व या प्रवासात आत्मतत्त्वाच्या द्वारापर्यंत बुद्धी शाबूत ठेवावी लागते, हा एक अर्थ आहे. दुसरा अर्थ म्हणजे, केवळ द्वारपालाच्या भूमिकेत भक्त राहू शकत नाही, शिवतत्त्वापर्यंत पोहोचल्यानंतर ते शिवतत्त्वच द्वारपालरूपी बुद्धीला आपल्याकडे खेचून घेत तिच्यावर अनुग्रह करतं. बुद्धी आपोआप आत्मतत्त्वात विसर्जित होते.
अर्थात, ज्या डोक्यात मेंदू असतो ते डोकंच (ज्ञानानं) उडवलं जातं आणि ज्ञानाचं विशाल मस्तक भक्ताला लाभतं. थोडक्यात, इंद्रियं आणि मनावर वासनांचा मळ साठलेला असतो. नाईलाजानं बुद्धी त्या मळाच्या अंकित होते. अशा मळरूपी देहाची जेव्हा आत्मरूपी शिवाशी गाठ पडते तेव्हा एकीकडे इंद्रिय आणि मन त्या मळरूपी जिवाला खेचू लागतात आणि दुसरीकडे शिवतत्त्व जिवाला खेचू लागतं. या युद्धात शिव विजयी होतात. हत्ती हे ज्ञानाचं प्रतीक आहे. तेच ज्ञानाचं मस्तक जिवाला देऊन शिव त्या मलरूपी जिवाचा उद्धार करतात. हीच क्रिया शिवपुराण या गोष्टीतून सांगतं!
सामाजिक स्वरूप -
भौतिक विश्वात मलिन झालेल्या प्राकृतिक इंद्रिय मनापासून विलग होऊन बुद्धी जेव्हा विशुद्ध होते तेव्हा ती शिवतत्त्वाच्या द्वाराशी पोहोचते. मग तिचा विलय शिवतत्त्वात होतो- अर्थात भक्ताला आत्मज्ञान होतं. या रूपकाप्रमाणेच गणनायकासंदर्भातसुद्धा ही रूपकात्मक कथा रचलेली दिसते. गणनायक कसा हवा याचं वर्णन पुराणकर्त्यांनी गणेशाच्या रूपातून दाखवून दिलं आहे. एखादा नेता अथवा तत्त्वचिंतक म्हणजेच गणनायक, गणांचा अधिपती. गणपतीच्या बाह्य स्वरूपातून गणनायकाकडे आवश्यक असणारे गुण पुराणकर्त्यांनी दाखवून दिले आहेत. पांडुरंगशास्त्रींनी त्याच्या रूपात दडलेल्या रूपकाचं सुंदर विश्लेषण केलं आहे. गणपतीचं मस्तक मोठं असतं. म्हणजेच त्याच्यामध्ये बुद्धीची अफाट क्षमता असते.
पृथ्वीवरच्या प्राण्यांमध्ये हत्तीचं डोकं सर्वात मोठं असतंं. हीच गोष्ट गणपतीच्या हत्तीस्वरूप मस्तकातून दाखवून दिली आहे. गणनायक असाच विशाल बुद्धीचा हवा. गणनायकाचे कानही विशाल हवेत हत्तीसारखे. म्हणजे, अनेक विषय अनेकजण त्याच्या कानावर घालतात; पण ते विषय आपल्या विशाल पोटात ठेवून योग्य वेळी योग्य तोच निर्णय गणनायक करतो; म्हणजे त्यानं तसं करायला हवं. अर्थात गणनायक हलक्या कानाचा असता कामा नये. त्यासाठी हत्तीच्या सुपासारख्या कानांचं रूपक आहे. कानांवर पडलेली माहिती साठवूनही ठेवता यायला हवी, म्हणूनच गणपतीचं पोट मोठं असतं.
गणपतीच्या मोठ्या पोटाच्या दर्शनातून हीच गोष्ट सांगितलेली आहे. हत्तीची दृष्टी सूक्ष्म असते. गणनायकाची दृष्टीही तशीच सूक्ष्म हवी, खाण्यापूर्वी हत्ती त्याचं खाणं- चारा इतस्ततः उडवतो आणि मग स्वतः खातो. गणनायकानं इतरांच्या अन्नपाण्याची सोय प्रथम केली पाहिजे; आणि मग स्वतः भोजन केलं पाहिजे, हीच गोष्ट हत्तीच्या स्वरूपातून पुराणकर्त्यांनी गणनायकासाठी आवर्जून सांगितलेली आहे. असं म्हणतात, हत्तीला भविष्य कळतं म्हणून प्राचीन काळी राज्याला वारस नसेल तर हत्तीच्या सोंडेत माळ द्यायची पद्धत होती. मग हत्ती ज्याच्या गळ्यात माळ घाली त्याला राजा केलं जाई. गणनायक असाच दूरदृष्टीचा हवा.
गणेश मूर्तीच्या हातात शस्त्र आहेत, मोदक आहे, कमळ आहे आणि दूर्वासुद्धा आहेत. त्यातून गणनायकाची संरक्षणासाठी तत्परता, विघातक शक्तीवर अंकुश, सामाजिक गोडवा राखण्याचं कौशल्य, चिखलात राहूनही फुलण्याचे गुण आणि निसर्गाशी राखलेलं नातं दिसून येतं. गणपतीचा एक दात तुटलेला आहे. ते ज्ञानाचं प्रतीक आहे. परंतु दुसरा दात अखंड आहे. म्हणजे ज्ञानोत्तर कर्म करण्याची प्रवृत्ती त्यातून दिसून येते. शिवाय भौतिक जीवन समृद्धीनं जगण्याची प्रेरणाही त्यातून मिळते. म्हणूनच गणपती आपल्या भक्ताला समृद्धी प्रदान करतो. परंतु रिद्धी-सिद्धींना दास्यत्वात ठेवण्याचाही तो संदेश देतो. म्हणजे समृद्धीचं गुलाम नाही तर समृद्धीवर आधिपत्य राखण्याचा त्यातून तो संदेश देतो.
गणपतीचं आवडतं खाद्य म्हणजे द्विदल नसलेल्या तांदळापासून केलेला आणि श्रीफलाचं म्हणजे नारळाचं सारण भरलेला मोदक! हे दोन्ही पदार्थ अतिशय पवित्र मानले गेले आहेत. हे मोदकाचं रूपक गणनायकाला पवित्र भोजनासाठी प्रवृत्त करतं. नेत्याची किंवा तत्त्वचिंतकाची वृत्ती पवित्र हवी. पवित्र वृत्तीच समाजाचं भलं करू शकते. अन्न हे वृत्ती बनवत असतं. नेता सात्त्विक वृत्तीचा असेल तर समाजही सात्त्विक वृत्तीचा होतो. ‘यथा राजा तथा प्रजा’ हा न्याय इथे लागू पडतो. म्हणून नेत्यानं सात्त्विक आहार ठेवला पाहिजे, हा संदेश गणेशाच्या मोदकरूपी प्रसादातून मिळतो.
गणेशाचं वाहन उंदीर आहे. फुंकर मारल्याशिवाय उंदीर काही खात नाही. प्राचीन काळापासून महनीय व्यक्तीच्या बाबतीत विषबाधा केल्याची अनेक उदाहरणं ऐकायला वाचायला मिळतात. नेता आणि तत्त्वचितकानं या संदर्भात नेहमी सतर्कच राहिलं पाहिजे. अन्न फुंकून खाण्याचा हा गुण उंदराकडे असल्यामुळे गणपतीचं वाहन उंदीर आहे. वाहन हे प्रवासासाठी असतं. प्रवासात तर विशेष सतर्क राहिलं पाहिजे. एलिस गेअटी यांनी मूषक आणि गणपती यांचा तात्त्विक अर्थ त्यांच्या श्री गणेश या ग्रंथात लिहिला आहे. दिवसा पृथ्वीच्या खाली लपलेला अंधार हाच उंदीर म्हणजे मूषक! सूर्य मावळल्यानंतर तो मूषक लपतछपत वर येतो; आणि पृथ्वीवर भ्रमण करतो. अर्थात गणेश म्हणजेच सूर्य, सूर्य वर येताच अंधाररूपी मूषक खाली दबतो, असा अर्थ त्यांनी सांगितला आहे. अर्थातच या साऱ्या गोष्टी रूपकात्मक असून हा सारा समग्र गुणसमुच्चय पुराणकर्त्यानी गणपतीच्या दृश्य स्वरूपातून दाखवून दिला आहे.
अशा तऱ्हेनं गणपतीच्या संदर्भात अनेक मतमतांतरं आहेत. त्याचे ‘महोत्कट’ ‘विनायक’ ‘गुणेश गणेश’ आणि ‘धूम्रकेतू’ असे चार अवतार मानले गेले आहेत. गणपतीच्या संदर्भात अनेक ऐतिहासिक गोष्टीही प्रचलित आहेत. त्याच्या जन्मासंबंधीही अनेक पौराणिक कथा लिखित आहेत. परंतु हजारो वर्षांपूर्वी ऋग्वेदातच गणपतीला अग्रमान दिल्यामुळे ही गणेश देवता आराधनेसाठी आणि त्वरित फलप्राप्तीसाठी ऋषींना निःसंशय पूजनीय वाटते. आजही अनेक गणेशभक्त त्याचा अनुभव घेत असतात. गणेशभक्ती-संदर्भातही दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे तांत्रिक उपासना आणि दुसरा म्हणजे भावभक्तीस्वरूप उपासना, तांत्रिक लोक बहुधा उजव्या सोंडेच्या गणपतीची उपासना करतात. त्यांचे रीतिरिवाजही भिन्न आहेत. विघ्नेशमंत्र, शक्तिविनायकमंत्र, लक्ष्मीगणेशमंत्र आदी मंत्रही गणेश आराधनेत सिद्ध केले जातात आणि लाभ मिळवला जातो. पण सामान्य भक्त मात्र गणपती अथर्वशीर्ष किंवा ‘ॐ गं गणपतये नमः’ या एकाक्षरी मंत्राचं विधिपूर्वक पुरश्चरण करून गणेशाची कृपा संपादन करतात.
गणेशाचं पूजन करणं म्हणजे थेट परमात्म्यापासून निघालेल्या ॐकारस्वरूपाचंच पूजन असतं. अर्थातच तशीच फलप्राप्ती भक्ताला होत असते. चतुर्थी ही गणेशाची आवडीची तिथी आहे. विनायकी आणि संकष्टी चतुर्थीला उपवासादी व्रतं केली जातातच; पण भाद्रपद शुद्ध चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. चतुर्थी ही जागृती, स्वप्न आणि सुषुमीपलीकडील तुरिया अवस्थेचा निर्देश करते. ती अवस्था साध्य करणं हेच जिवाचं उद्दिष्ट असतं. म्हणून त्या दिवशी चंद्रदर्शन करायचं नसतं. कारण चंद्र ही मनाची संतती आहे. चंचल मनाला चंद्राचीच उपमा दिली जाते. ग्रहमालेत चंद्र चंचल मानला जातो; तसंच शरीरात मन चंचल असतं. मन चंचल राहिलं तर तुरिया अवस्थेपर्यंत जाण्यात विघ्न येतं. म्हणून भाद्रपद शुद्ध चतुर्थीला चंद्रदर्शन करायचं नसतं. एरवी केल्या जाणाऱ्या चतुर्थीलाही चंद्रोदय झाल्यानंतर उपवास सोडायचा असतो. म्हणजे चंद्रदर्शनापासून दूर जायचं असतं.
गणपतीच्या संदर्भातील अशा अनेक मतमतांतरे आहेतच. त्याशिवाय विघ्नकर्ता, विघ्नहर्ता, व्रातपतये वगैरे अनेक प्राग्- ऐतिहासिक किंवा ऐतिहासिक संदर्भ आहेत. तरीपण हजारो वर्षांपूर्वी ऋग्वेदानं त्याला पूजार्ह मानल्यामुळे गणेशाच्या साकार तत्त्वरूपाचं पूजन आणि आराधना करणं हे केव्हाही हितावह असतं. गणपतीच्या व्यक्त रूपामधलं हे रूपक जाणून घेऊन त्याची मग त्याची आराधना केली तर उपासकाला लवकर फल मिळू शकतं...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.