Ganesh Festival  
साप्ताहिक

Ganesh Festival : देशोदेशीचे गणपती : अबुधाबीचा गणेशोत्सव

प्रशांत कुलकर्णी

सत्तरच्या दशकात अबुधाबी विमानतळ बांधण्याचे काम लार्सन ॲण्ड टुब्रोला मिळाले. भारतात एल ॲण्ड टीमध्ये काम करणाऱ्या मराठी माणसांना डेप्युटशनवर अबुधाबीला यायची संधी मिळाली. इथेच त्यांना नोकरीनिमित्त आलेली आणखी चार मराठी माणसे भेटली. नोकरीनंतरच्या वेळात भेटीगाठी होऊ लागल्या आणि अनौपचारिकदृष्ट्या मंडळाची स्थापना झाली. मग गणेशोत्सव साजरा करण्याची करण्याची कल्पना काहींच्या डोक्यात आली. पण सर्वात मोठा प्रश्न होता तो गणेशाची मूर्ती आणायची कशी? तेव्हा एअर इंडियातील अधिकाऱ्याने भारतातून मूर्ती आणायला मदत केली. एअर इंडियाची ही साथ पुढची २०-२५ वर्षे दुबईत मंदिराजवळच्या दुकानात गणपतीच्या मूर्ती मिळेपर्यंत कायम होती.

दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की मूर्तीचा प्रश्न यायचा आणि त्यावेळी जुलै-ऑगस्टमध्ये भारतात सुट्टीवर गेलेल्या कुटुंबाकडे ही जबाबदारी दिली जायची. मुंबईहून निघताना एका आंब्याच्या वा तत्सम पेटीत थर्माकोलचे तुकडे वा कुरमुरे मूर्तीच्या आसपास भरून ती मूर्ती सुरक्षितपणे पॅक करायची आणि इथे एअरपोर्टवरून बाहेर काढायची ही मोठी कसरतच होती. मुंबईहून ती मूर्ती लगेजच्या ऐवजी ‘हॅण्ड बॅगेज’ म्हणून जवळ ठेवायला परवानगी मिळायची, पण अबुधाबीत स्क्रिनिंगच्यावेळी टेंशन यायचे. अशावेळी एअर इंडियाचे कर्मचारी मदतीला धावायचे. विमानतळाबाहेर मूर्ती येईपर्यंत चिंतेत उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांच्या जिवात जीव नसायचा. एकदा का ती मूर्तीची पेटी हातात आली की जीव भांड्यात पडायचा.

मूर्तीचे आगमन झाल्यावर दुसरा प्रश्न स्थापना कुठे करायची हा असायचा. सुरुवातीच्या काळात इंडिया सोशल सेंटरमध्ये (आयएससी) स्थापना होत होती, पण एकेवर्षी काही कारणांमुळे आयएससीने गणपती स्थापनेसाठी असमर्थता व्यक्त केली. त्यानंतर बाप्पाला आयएससीमध्ये पुनरागमनासाठी तब्बल तीन दशके वाट पाहावी लागली. पण त्यावर्षी आयएससीने अगदी शेवटच्या क्षणी नकार दिल्यावर सर्वांची धावपळ झाली आणि एका कार्यकर्त्याच्या घरीच गणपतीची स्थापना झाली. त्यानंतर २०१०पर्यंत गणपती बाप्पा अनेकांच्या घरी विराजमान झाले. त्यावेळेस गणपती स्थापनेसाठी जागेची फक्त एकच अट असायची, ती म्हणजे ज्या सदस्याच्या घरी स्थापना करायची तो जास्तीत जास्त पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर राहणारा असावा. ही अट अशासाठी, की दर्शनाला येणारा भक्तगण हा सहजपणे जिन्यातून ये-जा करू शकेल. जेणेकरून त्या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना त्रास होऊन त्यांनी पुढे तक्रार करू नये. दर्शनासाठी येणारे भक्तगण हे नुसते मराठी समुदायापुरते मर्यादित नव्हते तर गुजराती, सिंधी, तमीळ, कानडी असे सर्व प्रकारचे गणेशावर श्रद्धा असलेले लोक असायचे. फारशी पब्लिसिटी न करताही त्यांना यावेळेस गणपती कुठे आहेत याचा पत्ता लागायचा आणि संध्याकाळी गर्दी व्हायची.

सुरुवातीच्या काळात मंडळात पूजा सांगायला गुरुजींचा शोध घ्यावा लागे. अशावेळी काही हिंदी भाषिक गुरुजीदेखील पूजा सांगायला यायचे. पण नव्वदच्या दशकात गुरुदत्त जोशी नावाचे शास्त्रशुद्ध पूजा सांगणारे गुरुजी मंडळाला लाभले आणि पुढील दहा वर्षे निर्विघ्नपणे गणपतीची पूजा पार पडली. पुढे ‘आडीया’मध्ये नोकरी करणारे जोशी नव्याकोऱ्या मर्सिडीजमधून पूजा सांगायला दुबई, शारजाला जाऊ लागले आणि आमची कॉलर ताठ झाली. त्यानंतर आजतागायत धनंजय मोकाशी आणि नरेंद्र कुलकर्णी यांनी ही जबाबदारी यथोचित पार पाडली आहे. एकेवर्षी गणपतीची मूर्ती भारतातून आणणे शक्य झाले नाही, तेव्हा मंडळाच्या गायडोळेंनी त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या फिलिपीनो सहकाऱ्याला गणपतीचा फोटो दाखवून हुबेहूब तशीच मूर्ती करवून घेऊन मोठा प्रश्न सोडवला होता.सन २०१०नंतर बी.आर. शेट्टींच्या साहाय्याने बाप्पाची स्थापना परत आयएससीच्या मोठ्या सभागृहात व्हायला सुरुवात झाली, आणि ती प्रथा आजतागायत सुरू आहे.

अबुधाबी मंडळाच्या गणेशोत्सवाचे वर्णन करताना सजावटीचा, मखराचा उल्लेख झाला नाही तर ते वर्णन अधुरे राहील. नव्वदच्या दशकात गजाभाऊ वऱ्हाडकर नावाचा अतुलनीय कलाकार मंडळाला लाभला आणि दरवर्षी गणपतीबरोबरच गणपतीचा देखावा पाहण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली. गजाभाऊंच्या अफाट कल्पनाशक्तीतून मुंबई-पुण्यासारखे वेगवेगळ्या प्रकारचे देखावे लोकांच्या डोळ्यांची पारणे फेडू लागले. गणशोत्सव जवळ आला की दोन-तीन महिने आधी गजाभाऊंच्या घरी मदतीला जाणाऱ्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू होई. गजाभाऊंचा मोठेपणा असा की एवढ्या वर्षात डेकोरेशनच्या खर्चाव्यतिरिक्त एकही पैसा न घेता तीन महिने आपले घर त्यांनी या कार्यासाठी दिलेले असायचे. गजाभाऊंनंतर अनिल आणि अनुजा सावंत यांनी असेच दिमाखदार देखावे उभारून मंडळाची परंपरा जपली आणि मंडळाची शान वाढवली.

दीड दिवसाच्या गणपतीनंतर वेध लागायचे ते गणपती विसर्जनाचे. अधिकृतरित्या वा परवानगीने काही होत नसल्याने विसर्जनही तसे सांभाळूनच करावे लागे. अशावेळी मंडळातले वरिष्ठ आपले कॉन्टॅक्ट वापरून दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी जागा बदलत साहाय्य करायचे.

विसर्जनानंतर लगेच आवराआवरीला लागायचे आणि त्यानंतर मनोज धुतांकडे मंजूभाभींनी सर्व कार्यकर्त्यांसाठी आग्रहाने केलेल्या श्रम परिहाराला हजर राहायचे, हा वर्षानुवर्षांचा जणू शिरस्ताच बनला होता. मनोज धुतांच्या आधी ही जिम्मेदारी अग्निहोत्रीकाकांनी सांभाळली होती. स्थापनेच्या दिवशी दुपारच्या भोजनप्रसादासाठी काका-काकूंचे सर्वांना अगत्याचे आमंत्रण असे. तिथे भारतीय राजदूतापासून ते छोटेमोठे उद्योगपती, मंडळाचे कार्यकर्ते हजर असत.

आता गेली दहा वर्षे आयएससीमध्ये न चुकता बाप्पाचे आगमन होत आहे. काळाप्रमाणे आता उत्सवात खूप स्वागतार्ह बदल झाले आहेत. जागा मोठी असल्याने मोठमोठ्या रांगोळ्या घातल्या जातात, स्टेजवर लेझीम, ढोल-ताशांच्या साथीने नृत्यसंगीताचे कार्यक्रम होतात. मंडळाचे सभासद त्यात उत्साहाने भाग घेतात. भारतात साजऱ्या केलेल्या गणपतीच्या आठवणी त्यानिमित्ताने जाग्या होतात. सासर-माहेरच्या गणपतीची आठवण, हुरहूर काही प्रमाणात दूर होते. परदेशातील माहेरघर म्हणून मंडळाबद्दल एक आपलेपणा, आपुलकीचा भाव निर्माण होतो. दीड दिवसाचा गणपती वर्षभराचा आनंद पदरात देऊन जातो. विसर्जनाला जाताना घरातल्या गणपतीच्या आठवणीने मन व्याकूळ होते. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणताना आवाज कातरतो, डोळे पाणावतात आणि जड पावलांनी सर्व घरी परततात ते पुढच्या वर्षीच्या गणपतीची वाट पाहत.

यावर्षीची कमिटी भूषण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली सजावटीच्या कामाला लागली आहे. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी अबुधाबीमध्ये बाप्सच्या मंदिराचे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या राजधानीमध्ये उभ्या राहत असलेल्या या मंदिरामुळे भारत आणि यूएईचे असलेले पूर्वसंबंध अधिक दृढ होणार आहेत. याच मंदिराची प्रतिकृती यावर्षी मंडळात देखाव्याच्या स्वरूपात उभी होणार आहे. मंडळाच्या शानदार परंपरेला साजेसे असेच हे नेपथ्य असणार आहे. ते बघायची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT