Ganesh Festival 
साप्ताहिक

Ganesh Festival: देशोदेशीचे गणपती : गणेशोत्सव इंग्लंडचा!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- आता गणेशोत्सव सांस्कृतिक सीमा ओलांडून एक जागतिक उत्सव बनला आहे. जागतिक स्तरावर मोठ्या उत्साहाने साजऱ्या होणाऱ्या या सणाचे एक उल्लेखनीय उदाहरण म्हणजे युनायटेड किंग्डममधील (यूके) लंडनमध्ये अतिशय मंगलमय, पवित्र आणि प्रसन्न वातावरणात पूर्ण दहा दिवस साजरा होणारा गणेशोत्सव!

यूकेमध्ये साजरा केला जाणारा गणेशोत्सव हा येथील भारतीयांच्या सांस्कृतिक जडणघडणीची साक्ष आहे. सुरुवातीला प्रामुख्याने महाराष्ट्रीय समुदायाने गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. मात्र दरवर्षी फक्त मराठी बांधवच नव्हे तर गुजराती, पंजाबी, दाक्षिणात्य अशा विविध प्रांतांतील भारतीय बांधवांबरोबरच ब्रिटिश नागरिकांच्या वाढत्या सहभागाने या उत्सवाचे स्वरूप व्यापक झाले आहे.

सर्वसमावेशकतेमुळे उत्सवाचे रूपांतर आता सांस्कृतिक अंतर भरून काढणाऱ्या आणि एकतेची भावना वाढणाऱ्या कार्यक्रमात झालेले दिसून येते. आज केवळ लंडनच नव्हे तर साऊथहॅम्पटन, बोर्नमथ यांसारख्या शहरातही गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. २०२०-२१साली कोविडने जगभरातले व्यवहार ठप्प केले होते, तेव्हा आरोग्यविषयक सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून भक्तांना ऑनलाइन दर्शन व पूजनाची सोय उपलब्ध करून देऊन गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता.

अगदी सुरुवातीच्या काळात ‘लंडनच्या आजीबाई’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आजीबाई वनारसे यांच्या घरी दरवर्षी बसवण्यात येणाऱ्या गणपतीचे दर्शन महाराष्ट्रीय मंडळी घेत असत. महाराष्ट्र मंडळाच्या स्थापनेनंतर साधारण १९९० साली महाराष्ट्र मंडळाची आपली स्वतःची अशी वास्तू झाल्यावर काही ज्येष्ठांनी मातृभूमीशी जोडलेली नाळ तशीच राहावी व पुढील पिढीलाही आपल्या संस्कृतीचे ओळख असावी या हेतूने पुढाकार घेऊन लंडनमधील महाराष्ट्र मंडळात गणेशमूर्ती स्थापना व पूजाअर्चा या स्वरूपात गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.

गणेश चतुर्थीच्या आठवडाभर आधी लंडनमधील महाराष्ट्र मंडळाच्या वास्तूमध्ये लगबग सुरू होते. भव्य मंडप उभारला जातो. आबालवृद्ध वैविध्यपूर्ण कल्पना, रंगसंगतीने सजावट करण्यात रमून जातात. गणेश चतुर्थीला शिस्तबद्ध मिरवणुकीतून वाजतगाजत गणरायांचे आगमन होते. वैदिक मंत्रांच्या घोषात यथासांग पूजापाठ, धूप, कापूर, उदबत्त्यांच्या सुवासात श्रींची प्राणप्रतिष्ठापना होते. भक्तिमय वातावरणात मनोभावे केलेल्या आरतीने गणेशोत्सवाची सुरुवात होते.

दहा दिवस विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. गणरायासमोर अथर्वशीर्षाचे सहस्रायन होते. भक्तिगीते सादर केली जातात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या कलागुणांना वाव देणारा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. विविध विषयांवर चर्चासत्र आयोजित केली जातात. आजवर भारतातील बऱ्याच कलाकारांनी येथे येऊन आपली कला सादर केली आहे. गणेशोत्सव केवळ सण म्हणून साजरा केला जात नाही, तर समाजात अवयवदान, नेत्रदान यांसारख्या महत्त्वाच्या विषयांबद्दल जागृती निर्माण करण्याचे कामही केले जाते.

गणेश चतुर्थीच्या महिनाभर आधीच भारतातून गणेश मूर्तींचे इंग्लंडमध्ये आगमन होते. गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या पूजा, पाट, ताट व सजावटीच्या विविध साहित्याने सजलेल्या भारतीय बाजारपेठांमध्ये लोक आपापल्या सवडीने व आवडीने उत्साहाने शॉपिंग करतात.

सन २०१५मध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने ब्रिटिश म्युझियममधील १,३०० वर्षे पूर्वीच्या प्राचीन काळातील काळ्या पाषाणात घडविलेली सुबक, कोरीव गणेशमूर्ती संपूर्ण इंग्लंडभर प्रदर्शित करण्यात आली. गणेश चतुर्थीच्या दरम्यान ही मूर्ती साऊथ इंग्लंडमध्ये समुद्रकिनारी वसलेल्या बोर्नमथ या गावी वास्तव्यास होती.

बोर्नमथमध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या संख्येत असलेल्या भारतीयांनी त्या वर्षी प्रथमच गणेशोत्सवाच्या प्रथेला सुरुवात केली. आजमितीला बोर्नमथमध्ये भारतीयांची संख्या दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलेली असल्याने गणेशोत्सवाचे स्वरूप आणि उत्साहही विस्तारलेला दिसून येतो. केवळ गणेशोत्सवच नव्हे, तर इतरही अनेक भारतीय सणवार संपूर्ण यूकेमध्ये सामूहिकरित्या साजरे केले जातात.

स्वातंत्र्यपूर्वकाळात ब्रिटिशांविरुद्ध जनजागृती, क्रांतिकारी विचारांचे आदान प्रदान व भारतीय तरुणांमध्ये स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग पेटविण्याच्या ध्येयाने सुरू करण्यात आलेला सार्वजनिक गणेशोत्सव स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ७५ वर्षांनंतर आज इंग्लंडमध्येच ब्रिटिश नागरिकांच्या सहकार्याने व उत्साही सहभागाने एक आध्यात्मिक, सांस्कृतिक, वैचारिक व एकमेकांप्रती बंधुभावाचा संदेश जगभरात पोहोचवतानाच ‘वसुधैव कुटुंबकम्’ या उक्तीचे आदर्श उदाहरण ठरत आहे. (Latest Marathi News)

डॉ. अशोक वसंतराव रोकडे / वृषाली गिरीश हरिहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Islamic Country: 'या' मुस्लिम देशात भारतीय लोक खरेदी करत आहेत मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी; जाणून घ्या कारण

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Astro Tips : नव्या जोडप्याची बेडरूम कोणत्या दिशेला असावी? दोघांमध्ये कलह होत असतील तर...

SCROLL FOR NEXT