'रविंद्र मिश्रण' Sakal
साप्ताहिक

Ganpati Utsav 2023 : गणपती विशेष : रविंद्र मिश्रण! जाणून घ्या मिश्रणाला पेटंट मिळवणाऱ्या शिल्पकाराविषयी

असे पेटंट मिळवणारे ते पहिलेच शिल्पकार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

- निकिता कातकाडे

रवींद्र मिश्रणाचा विचार अभिजित धोंडफळे यांच्या मनात अनेक वर्षांपासून घोळत होता. त्यांच्या मते ह्या कल्पनेची बीजंही कुठेतरी धोंडफळे कुटुंबाच्या कलापरंपरेतच आहेत. कलेबरोबरच पर्यावरणपूरकतेचा संस्कारही वारसा म्हणूनच त्यांना मिळाला आहे.

पुण्यातल्या रास्ता पेठेतला मुख्य चौक. मालधक्क्याच्या बाजूने येऊन मार्केट यार्डाकडे जाणारा अखंड वाहता रस्ता. एका बाजूला केईएम रुग्णालय आणि समोरच्या बाजूला पुण्यातलं प्रसिद्ध रास्ता पेठ पॉवर हाऊस. रुग्णवाहिका, बस, टेम्पो आणि इतर छोट्या-मोठ्या वाहनांच्या गर्दीत, हॉर्नच्या आवाजात चौकातल्या कारंजात उभा असणारा मासेवालीचा अत्यंत सुंदर पुतळा लक्ष वेधून घेतो खरं, पण चौकात थोडं थांबून त्या पुतळ्याचं कौतुक करू म्हणाल तर तसं अवघडच.

सकाळपासून रात्री उशिरापर्यंत जाग्या असणाऱ्या या चौकाच्या एका वळणावर एक तीन मजली इमारत आहे. धोंडफळे कलानिकेतन. चौकातल्या वर्दळीतून वाट काढत मी धोंडफळे कलानिकेतनाच्या आडवं सरकवता येणाऱ्या लोखंडी गेटपाशी पोहोचले. गेट सरकवलं गेलं, मी त्या गेटाच्या बाहेरून गेटाच्या आत पाऊल टाकलं आणि चौकातील सगळी वर्दळ मागे पडून माझ्यासमोर उभं राहिलं शिल्पकार अभिजित धोंडफळे यांचं कलाविश्व.

अभिजित यांच्याबरोबर तिथून आधी चार पायऱ्या मग एक जिना चढून जाताना तिथल्या प्रत्येक शिल्पकृतीचा परिचय होत गेला. खालच्या हॉलमध्ये काही भित्तीचित्रांच्या प्रतिकृती होत्या, पुण्याचे ग्रामदैवत असणाऱ्या कसबा गणपतीच्या उत्सवासाठी तयार होणाऱ्या मूर्तीसह काही गणेशमूर्ती घडत होत्या. वरच्या हॉलमध्ये मूर्तिकार अभिजित धोंडफळे यांच्या मातोश्री विजयालक्ष्मी गणपतीबाप्पाच्या एका मूर्तीला आकार देत होत्या आणि त्यांच्या चारही बाजूला फक्त बाप्पाच्या मूर्ती होत्या. समोरच्या बाजूला अभिजित यांच्या पत्नी उमा व चुलत बहीण राजेश्वरी जोहारलेदेखील गणेशमूर्तींवर काम करत होत्या.

काही माणसांच्या अंगावर नेहमीच सुखी माणसाचा सदरा असतो. चेहऱ्यावर असंच आनंदी हसू असणारे अभिजित मला तसेच वाटले. अभिजित तिसऱ्या पिढीतले शिल्पकार. मातीच्या गोळ्याला आकार देणं किंवा एखाद्या दगडाचा नको असलेला भाग काढून टाकून त्यात लपलेले शिल्प सामोरं आणणं ही एक किमयाच! धोंडफळे कला निकेतनमध्ये ही किमया १९४० सालापासून घडते आहे. सुरुवात झाली अभिजित यांच्या आजोबांपासून, त्यानंतर त्यांचे वडील रविंद्र, काका अनिल तसेच बंधू अरविंद यांनी परंपरा जपली, आणि आता अभिजित यांच्याबरोबर कला निकेतनच्या चौथ्या पिढीची प्रतिनिधी असणारी त्यांची कन्या दीप्तीही कला निकेतनची परंपरा पुढे नेते आहे.

शिल्पकार अभिजित धोंडफळे हे नाव पुण्याच्या कलाविश्वाला नवे नाही. पण यावर्षी शिल्पकार अभिजित यांना एक नवी ओळख मिळाली -श्रीगणेशाच्या आणि अन्यही मूर्ती तयार करण्यासाठी त्यांनी संशोधन करून एक नवे पर्यावरणपूरक मिश्रण निर्माण केले आहे, विविध परीक्षा झाल्यावर त्या मिश्रणाचे पेटंट त्यांना मिळाले आहे, आणि असे पेटंट मिळवणारे ते पहिलेच शिल्पकार आहेत.

अभिजित यांनी या मिश्रणाला त्यांच्या वडिलांचे नाव दिले आहे. हे ‘रवींद्र मिश्रण’ वापरून केलेल्या मूर्ती शाडू मातीच्या मूर्तींपेक्षाही वजनाला हलक्या आणि मजबूत असतील आणि हे मिश्रण शाडू मातीच्या तुलनेत पाण्यात लवकर विरघळेल, असे अभिजित सांगतात.

रवींद्र मिश्रण किंवा तांत्रिक भाषेत ‘इको-फ्रेंडली वॉटर डिझॉल्व्हेबवल अॅण्ड स्ट्राँग मीडिया फॉर स्कल्प्चर्स अॅण्ड आयडॉल्स’चा (ECO-FRIENDLY WATER DISSOLVABLE AND STRONG MEDIA MIXTURE FOR SCULPTURES AND IDOLS) विचार मनात अनेक वर्षांपासून घोळत होता, अभिजित सांगत होते. त्यांच्या मते ह्या कल्पनेची बीजंही कुठेतरी कुटुंबाच्या कलापरंपरेतच आहेत. अडुसष्ट वर्षांपूर्वी, १९५५मध्ये, त्यांच्या आजोबांनी पुण्यातल्या पांगुळ आळी गणेशोत्सवासाठी कागदाचा लगदा वापरून गणेशमूर्ती घडवली होती. ही मूर्ती अजूनही सुस्थितीत आहे.

वडील रवींद्रही कागदाच्या लगद्याच्या मूर्ती करीत असत. कलेबरोबरच पर्यावरणपूरकतेचा संस्कार हा असा वारसा म्हणून मिळाला, आणि त्यातूनच जन्म झाला पर्यावरणपूरक गणेशोत्सवावरील कार्यशाळांचा. तेवीस-चोवीस वर्षे या कार्यशाळा सुरू आहेत. दरम्यान, मूर्ती घडविण्यासाठी वेगळे काही पर्यावरणपूरक पदार्थ वापरता येतील का? असा विचार सुरू होताच. या विचाराला खऱ्या अर्थाने चालना मिळाली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ ऑगस्ट २०१६ या दिवशीच्या त्यांच्या मन की बात कार्यक्रमामध्ये अभिजित यांच्या प्रयत्नांचा उल्लेख केल्यानंतर. खुद्द पंतप्रधानांकडून पाठीवर कौतुकाची थाप पडली आणि त्यातून अभिजित त्यांच्या मनातल्या पर्यावरणपूरक मिश्रणाच्या कल्पनेकडे वळले.

हा प्रवास त्यांच्याकडूनच ऐकण्यासारखा आहे. विज्ञान शाखेच्या शिक्षणाचा इथे उपयोग झाला. खूप वेगळेवेगळे प्रयोग केले. अनेक वेगळीवेगळी माध्यमे हाताळली. जे काही वापरू ते पर्यावरणपूरक असायला हवे, ही मुख्य अट होतीच, पण ते शाडूच्या मातीपेक्षा वेगळे असायला हवे होते आणि शाडू मातीच्या तुलनेत त्याची स्ट्रेंथही चांगली असायला हवी होती. शाडूची माती पूर्णपणे टाळता येणार नव्हती, म्हणून अल्युव्हियल सॉईल म्हणजे गाळाच्या मातीवर प्रयोग केले. त्यात सॉफ्ट राइस ब्रान म्हणजे भाताचे मऊसूत तूस आणि लाकडाचा भुसा विशिष्ट प्रमाणात मिसळला. भाताच्या तुसात तेलाचा अंश असतो.

तेलाच्या या अंशामुळे या मिश्रणापासून तयार होणाऱ्या मूर्तींना अधिक चांगले फिनिशिंग येईल तसेच तुसाच्या फायबर कटेंटमुळे हे मिश्रण वापरून तयार केलेल्या मूर्ती अधिक मजबूत होतील, आणि वाहतुकीदरम्यान होणारे मूर्तिकारांचे नुकसानही टळू शकेल. इतर माध्यमांच्या तुलनेत या मिश्रणातील मूर्तींवर रेखीव काम अधिक चांगल्या पद्धतीने करता येते, आणि शाडू मातीच्या मूर्तींपेक्षा या मूर्ती अधिक लवकर सुकतात, आणि यात कोणतेही रसायन नसल्याने त्यापासून माती किंवा पाण्याच्या प्रदूषणाचा धोकाही नाही, असेही अभिजित सांगतात.

जुलै २०१९मध्ये अभिजित यांनी आयपीआर ॲटर्नी, ॲडव्होकेट गौरी भावे यांच्या मदतीने या नव्या मिश्रणाला पेटंट मिळावे यासाठी नोंदणी केली. ही नोंदणी केल्यानंतर दोन महत्त्वाच्या चाचण्या करून त्याचे अहवालही संबंधित यंत्रणेला सादर केले. एक चाचणी होती मिश्रणाच्या स्ट्रेंथची. ती शाडू माती आणि पीओपीपेक्षा अधिक असणे आवश्यक होते आणि दुसरी चाचणी होती मिश्रण पाण्यात विरघळण्यासाठी लागणाऱ्या वेळेची. तो शाडू माती आणि पीओपीपेक्षा कमी असायला हवा होता. काहीशा क्लिष्ट अशा या चाचण्यांसाठी अभिजित यांना डॉ. सतीश साठे आणि इंजिनिअरिंग टेस्ट क्षेत्रातील तज्ज्ञ रवी रानडे यांची खूप मदत झाली.

सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर यंदा ६ जूनला ‘रविंद्र मिश्रणाला’ पेटंट मिळाले.

गेल्या काही वर्षांपासून अभिजित काही अगदी थोड्या मूर्तींसाठी हे मिश्रण वापरत आहेत. आता पेटंट मिळाल्यावर कोणी या मिश्रणाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यास तयार असेल तर त्यासाठी आवश्यक तो सल्ला देण्याचीही त्यांची तयारी आहे. म्हणूनच हे पेटंट त्यांनी देशाला अर्पण केले आहे.

रविंद्र मिश्रणाची वैशिष्ट्ये

  • वजनाने शाडू मातीपेक्षा हलके, लवकर वाळते

  • सुबक रेखीव काम आणि रंगकाम करणे सोपे

  • विसर्जनानंतर मिश्रण झाडांसाठी वापरायोग्य

  • पाण्यात लवकर विरघळते

  • मिश्रणात खालील घटकांचा वापर

  • गाळाची माती

  • शाडू माती

  • सॉफ्ट राइस ब्रान म्हणजेच भाताचे मऊ तूस किंवा लाकडाचा बारीक भुसा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT