Family History  esakal
साप्ताहिक

तुमचे जीन्स (जनुकं) तुमचं व्यक्तिमत्व घडवतात का?

सकाळ डिजिटल टीम

अमुक तमुक वागणं त्याच्या रक्तातच आहे असे आपण सहज म्हणून जातो. पण रक्तातल्या म्हणजेच जनुकातल्या या गुणाला जोवर तुम्ही खतपाणी घालत नाही तोवर तो तुमचा रक्तातला गुण डोकं वर काढणार नाही. त्यामुळे तुमच्या आजूबाजूचं वातावरण नेमकं तुम्हाला काय सांगतंय, काय शिकवतं आहे हे महत्वाचं. व्यक्तीच्या जडणघडणीत जेवढा त्याच्या जनुकांचा वाटा तेवढाच वाटा त्यांच्या वाढीदरम्यानच्या वातावरणाचाही आहे, हे विज्ञानाने सिद्ध केलंय.

डॉ. बाळ फोंडके

परवा आमच्या कॉलनीत पोलिस आले. एका सदनिकेत शिरले आणि तिथून एका वीस-बावीस वर्षांच्या तरुणाला कैद करून घेऊन गेले. या घटनेनं खळबळ माजवली. त्या तरुणानं असा काय गुन्हा केला यावर चर्वितचर्वण सुरू झालं.

कोणीतरी पोलिस ठाण्यावरून बातमी आणली, की त्या मुलाकडे अमली पदार्थ होते आणि तो ते इतरांना विकत होता. सीसीटीव्हीच्या मदतीनं त्याला रंगे हात पकडण्यात आलं. हे आक्रीत कसं घडलं यावर अर्थात टिप्पणी सुरू झाली.

ज्या कुटुंबाचा तो सदस्य होता ते विस्कळित झालेलं, डिसफन्क्शनल म्हणतात तसं, होतं. बाप दारूच्या आहारी गेला होता. दररोज तो झिंगूनच घरी येत असे. तशी त्याला चांगली नोकरी होती. पण तिथंही त्यानं दारूच्या नशेत प्रताप केले होते. त्यावरून त्याला वॉर्नही केलं गेलं होतं. त्या नशेत तो बायकोला मारहाण करत असे. मुलांकडे त्याचं काहीच लक्ष नव्हतं.

आई बिचारी एकटी कुठंवर पुरी पडणार. साहजिकच मुलगा वाईट संगतीत लागला. अमली पदार्थ विकू लागला. स्वतःही त्यांचं सेवन करायला लागला. साहजिकच अशा पर्यावरणात झालेल्या त्याच्या वाढीच्या माथी त्याच्या गुन्हेगारी वृत्तीचं खापर फोडण्यात आलं. पालनपोषणातील दुर्व्यवस्थेपायी तो या मार्गाला लागल्याचा सर्वांचंच मत पडलं.

पण त्याचा भाऊ त्याच वातावरणात राहूनही अभ्यासू असल्याकडे, कॉलेजमध्ये एक हुशार विद्यार्थी गणला गेल्याकडे, कोणी लक्षच दिलं नाही. जर पर्यावरणच वागणूक निर्धारित करण्याला सर्वस्वी जबाबदार असेल तर त्याच वातावरणात वाढलेल्या दोन सख्ख्या भावांच्या वर्तणुकीत असा टोकाचा फरक कसा, असा सवाल कोणीच विचारला नाही.

‘खानदान’ की ‘परवरिश’? या द्विधेचं हे बोलकं उदाहरण आहे. त्यातूनच मग या दोन पर्यायांपैकी कोणताच वागणुकीला शंभर टक्के जबाबदार नसतो, हेच स्पष्ट होतं. खास करून आपली जनुकं केवळ आपल्या शारीरिक आणि शरीरक्रियाविषयक गुणधर्मच निर्धारित करत नाहीत तर आपली मानसिक जडणघडण करण्यातही ती महत्त्वाची भूमिका वठवतात.

याचे अनेक प्रयोगजन्य पुरावे वैज्ञानिकांच्या हाती आल्यावर तर या निष्कर्षाला बळकटीच मिळाली. त्या दोन सख्या भावांना जनुकांचा वारसा त्यांच्या आई-वडिलांकडूनच मिळाला होता. तो पन्नास टक्केच समान होता. पर्यावरण मात्र दोघांच्या बाबतीत एकसमानच होतं.

सच्छील भावाला बहुधा दुष्ट प्रवृत्तीला कारक असणाऱ्या जनुकाचा वारसा मिळाला नव्हता. त्यामुळं पालनपोषण अनिष्ट असूनही त्यानं वाईट मार्गाची कास धरली नव्हती. दुसऱ्या भावाला बहुधा त्या दुष्ट प्रवृत्तीला कारक असणाऱ्या जनुकाची देणगी मिळाली होती.

त्या जनुकाला आपली करामत दाखवण्यासाठी पोषक वातावरण लाभलं होतं. साहजिकच त्यानं आपला प्रभाव दाखवत त्या भावाला गुन्हेगारीकडे वळवलं होतं.

आपल्या वागणुकीवर जर जनुकं आणि लालनपालन या दोन्हींचा प्रभाव पडत असेल, तर त्यांची टक्केवारी काय? असा प्रश्न साहजिकच तुमच्या आमच्या मनात फणा काढून उभा राहीलच. ती ठरवणं कठीणच नाही, तर जवळजवळ अशक्यच असल्याचं वैज्ञानिकांचं मत आहे. दोन्ही घटक आपल्या परीनं हातभार लावतच असतात.

नुसतं जनुक अंगी असलं तरी त्याला कार्यान्वित करणारं पर्यावरण नसेल तर त्याला डोकं वर काढायला जागा मिळत नाही. उलटपक्षी मुळातच एक प्रकारची वागणूक निर्धारित करणारं जनुक नसेल तर केवळ पर्यावरणापायी विशिष्ट मनोवृत्ती तयार होण्याची शक्यता मावळते.

यावरून जनुकं केवळ उंची किंवा लठ्ठपणा यांसारख्या शारीरिक गुणधर्मांची रुजवात करत नाहीत तर अनेक मानसिक, भावनिक गुणधर्मांचंही नियंत्रण करतात हे स्पष्ट होतं. या शारीरिक गुणधर्मांवरच्या प्रभावांची आकडेवारीही संख्याशास्त्रीय विश्लेषणाच्या मदतीनं निर्धारित करता येते. ते टक्केवारी किंवा दशांश अपूर्णांकांमध्ये व्यक्त केले जातात. पण त्यांचं नीटसं आकलन झालं नाही, तर ते अनेक गैरसमजांना जन्म देतात हेही दिसून आलं आहे.

समजा जर या विश्लेषणातून साहसी खेळांची आवड निर्माण करण्याची क्षमता ६० टक्के आहे, तर त्याचा अर्थ असा होत नाही, की कोणत्याही एका व्यक्तीच्या आवडीतला ६० टक्के वाटा जनुकांचा आणि ४० टक्के पालनपोषणाचा आहे.

असंही नाही, की जर एखाद्या समुदायात १०० व्यक्ती आहेत, तर त्यापैकी ६० जणांमध्ये असं वेडगळ साहस करण्याची प्रवृत्ती उपजतच असते आणि उर्वरित ४० जणांमध्ये त्यांची वाढ ज्या पर्यावरणात झाली त्यानं त्यांच्यामध्ये तसं साहस करण्याचा ध्यास निर्माण केलेला असतो. त्याचा अर्थ अधिक व्यामिश्र आहे.

दोन भावंडांच्या वागणुकीत जर नोंद घेण्याजोगा फरक दिसला, तर त्याचं साठ टक्के उत्तरदायित्व जनुकांना द्यावं लागेल. तेही तितक्या काटेकोरपणे निर्धारित करणं योग्य होणार नाही. एवढंच म्हणता येईल की जनुकांचा प्रभाव अधिक जोमदार आहे. खरं तर एखादा गुणधर्म आनुवंशिक आहे, असं म्हणणं व्यक्तिसंगत नसून ते समष्टीसंगत असतं.

एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व जनुकांकरवी किती निर्धारित होतं हे सांगणं कठीण आहे. हा तिढा नैतिक निकषांपायी अधिकच गुंतागुंतीचा होतो. १९९१मध्ये स्टीफन मॉबली यानं अमेरिकेतल्या ओकवुड शहरातलं एक पिझ्झाचं दुकान लुटलं. त्याला प्रतिबंध करणाऱ्या तिथल्या मॅनेजरला तर त्यानं पिस्तूल झाडून ठार केलं. तो अर्थात पकडला गेला आणि त्याच्यावर रीतसर खटला चालवून त्याला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.

त्यावर अपील करताना त्याच्या वकिलानं अनोखा बचाव केला. तो म्हणाला की त्याच्या अशीलाचा जन्मच मुळी एका समाजविरोधी कामात गुंतलेल्या आणि हिंसक प्रवृत्तीच्या कुटुंबात झाला. त्याच्या आज्या, पणज्यांनाही अशा गुन्ह्यांपायी शिक्षा झाल्या होत्या.

याचं कारण त्यांच्या शरीरात वसलेल्या एका जनुकीय उत्परिवर्तनात, जेनेटिक म्युटेशनमध्ये, असल्याचं दिसलं आहे. त्या जनुकीय वारशापायी स्टीफनलाही तो गुन्हा करण्यास प्रवृत्त केलं आहे. त्यामुळं त्याला माफी जरी दिली नाही तरी त्याची शिक्षा सौम्य करावी. त्यांचा हा युक्तिवाद अमान्य करून ते अपील अर्थात फेटाळलं गेलं आणि मॉबलीला २००५मध्ये मृत्युदंड दिला गेला.

तसं करताना न्यायाधीशांना त्याच्या अंगची जनुकं आणि त्याची हिंसक वागणूक यांच्यातलं नातं तेवढंसं घनिष्ठ असल्याचा पुरावा मिळाला नाही. पण आक्रमकता किंवा मनोविकृती यांचं उत्तरदायित्व अनेक जनुकांमध्ये असल्याचा निर्विवाद पुरावा मिळू लागला, तर भविष्यात अशा युक्तिवादाचा अव्हेर करणं तितकंसं सोपं राहणार नाही.

त्यासाठी केलेल्या जनुकीय चाचण्या निःसंदिग्ध पुरावा म्हणून मानण्यात अडचण अशी आहे, की त्या दूषित जनुकांपायी एखाद्याला वाममार्गाकडे वळण्याची इच्छा होईलही, पण त्या इच्छेला खतपाणी घालणारं पालनपोषण झालं नसेल तर ती वृत्ती डोकं वर काढणार नाही.

ते जनुक अंगी असूनही ती व्यक्ती समाजाचे नियम पाळणंच पसंत करेल. म्हणूनच शारीरिक असोत वा भावनिक, कोणताही गुणधर्म हा खानदान आणि परवरिश यांची संयुक्त जबाबदारी असल्याचंच वैज्ञानिक ठामपणे सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT