global warming  esakal
साप्ताहिक

Global Warming : संशोधकांनी व्यक्त केली भीती; हवामानाचे संतुलन बिघडत राहिले तर..

गेलेलं वर्ष सर्वाधिक उष्णतेचं वर्ष होतं ही माहिती पचवेपर्यंत २०२४ही त्याच मार्गानं जात असल्याचं कानावर येऊ लागलं

साप्ताहिक टीम

मावळणारा प्रत्येक दिवस तापमानवाढीचं संकट गहिरं करत मावळतो आहे. गेलेलं वर्ष सर्वाधिक उष्णतेचं वर्ष होतं ही माहिती पचवेपर्यंत २०२४ही त्याच मार्गानं जात असल्याचं कानावर येऊ लागलं.

तापमानवाढीचा विचार करता २०२४मध्ये जगासमोर काय वाढून ठेवलं असेल हे समजावून घेईपर्यंत युरोपियन युनियनच्या अंतराळ कार्यक्रमाचा भाग असणाऱ्या कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसकडून आलेली ताजी माहिती तापमानवाढीच्या संकटाचं गहिरेपण वाढवणारी आहे.

गेल्या जानेवारीत संपलेल्या बारा महिन्यांच्या काळात, म्हणजे फेब्रुवारी २०२३ ते जानेवारी २०२४ या बारा महिन्यांच्या काळात, पृथ्वीच्या सरासरी तापमानाची वाढ दीड अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होती, असं कोपर्निकस सांगत आहे.

जागतिक तापमानातील वाढ दीड अंश सेल्सिअसखाली ठेवण्यात जगाला अपयश आलं आहे, असा याचा अर्थ.

तज्ज्ञांच्या मते गेल्या वर्षभरात जगभरात अनेक ठिकाणी आधीपेक्षा जास्त तापमान नोंदवले गेलेच, पण सर्वसाधारण परिस्थितीत तापमानात होणाऱ्या वाढीच्या तुलनेत गेल्या वर्षात नोंदवले गेलेले तापमानातील फरक आश्चर्यकारकरित्या मोठे होते.

सकाळ साप्ताहिकचे सदर लेखक, भूविज्ञान अभ्यासक डॉ. श्रीकांत कार्लेकर यांनी नुकतेच या विषयी सविस्तर लिहिल्याचे आपल्याला आठवत असेलच. (सर्वाधिक उष्णतेचे वर्ष –प्रसिद्धीः ३ फेब्रुवारी).

जग या होरपळीचे परिणाम वणव्यांच्या, महासागरांचे तापमान वाढण्याच्या, ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळण्याच्या, तीव्र हिवाळ्यांच्या, अवेळी पडणाऱ्या पावसाच्या, गारपिटीच्या, वादळांच्या रूपांत अनुभवत आहेच.

गेल्या काही वर्षांपासून भाजून काढणाऱ्या फुफाट्यातून वाट काढत असताना अवचित कुठूनशी वाऱ्याची एखादी झुळूक हवाहवासा थंडावा घेऊन यावी अशी इच्छा बाळगणाऱ्या जगाला गेल्या बारा महिन्यांच्या काळात सातत्याने नोंदवल्या गेलेल्या तापमानातील वाढीने एक गंभीर इशारा दिला आहे.

ही पर्यावरणीय स्थिती भविष्यातही अशीच राहिली तर -आणि २०२४मध्ये तरी ती तशीच राहील असं संशोधक सांगत आहेतच –हवामानाचे संतुलन बिघडत जाईल आणि त्याचे लोकांच्या जगण्यावर आणि जगाच्या अर्थकारणावरही अवांछित परिणाम होत जातील, अशी साधार भीती संशोधक व्यक्त करत आहेत.

खरंतर ही भीतीही आजची नाही. साठीच्या दशकापासून पृथ्वीच्या वाढत्या सरासरी तापमानाबद्दल संशोधक जगाला सांगत आहेत.

ऐंशीच्या दशकात या सांगण्याला धोक्याच्या बावट्यांचे स्वरूप आले. संयुक्त राष्ट्रांनी १९९२मध्ये पहिल्यांदा ‘पर्यावरण आणि विकास’ या विषयावर रिओ-डि -जानिरोमध्ये एक परिषद भरवली.

युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज (यूएनएफसीसी) नावाचा वातावरण बदलावर काम करणारा संयुक्त राष्ट्रांच्या सदस्यांचा एक गट ही या परिषदेची फलश्रुती.

यातूनच पुढे इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) या गटाची आणि कॉन्फरन्स ऑफ पार्टीज किंवा ‘कॉप’ बैठकांची निर्मिती झाली.

जपानमधल्या क्योटो शहरात १९९७मध्ये झालेल्या पर्यावरण परिषदेत संपूर्णतः मानवनिर्मित असणाऱ्या हवामान बदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करण्याची गरज मान्य करण्यात आली.

यातून त्यावेळी तरी फारसे काही साध्य झाले नसले तरी ‘हवामान बदल’, ‘तापमानवाढ’, ‘ओझोनच्या थराला पडणारी खिंडारं’, ‘वितळणारा बर्फ’, ‘समुद्राच्या पाण्याची वाढती पातळी’, ‘क्योटो प्रोटोकॉल’, ‘कार्बन ट्रेडिंग’ वगैरे शब्द रोजच्या जगण्यात हवामानातले बदल अनुभवणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या रोजच्या व्यवहारातही रुळत गेले.

पुढे मग पॅरिसमध्ये झालेल्या परिषदेत पृथ्वीची वार्षिक सरासरी तापमानवाढ दीड अंश सेल्सिअसपेक्षा कमी ठेवण्याच्या प्रयत्नांवर एकमत झाले.

पॅरिस करारानंतर तापमानवाढ रोखण्याच्या दिशेने होणाऱ्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश मिळालेही.

मात्र गेल्या दशकामध्ये जगाने सातत्याने अनुभवलेल्या उष्ण वर्षांनी गेल्या वर्षी दुबईमध्ये झालेल्या अठ्ठाविसाव्या कॉप बैठकीच्या जाहीरनाम्यातील खनिज इंधन वापर कमी करण्यासंदर्भातील आणि अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवण्यासंदर्भातील मुद्द्यांना वास्तवाच्या पातळीवर आणण्यासाठीच्या प्रयत्नांचा वेग वाढवण्याची गरज अधोरेखित केली आहे.

सलग वर्षभर पृथ्वीच्या सरासरी तापमानाची वाढ दीड अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होती असे कोपर्निकसची ताजी निरीक्षणे सांगत असली, तरी कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी तातडीने पावले उचलल्यास तापमानवाढ अजूनही कमी करता करू शकते, असे शास्त्रज्ञांचे सांगणे आहे.

मानवी हस्तक्षेपासह असंख्य छोट्या-मोठ्या कारणांनी घडणाऱ्या बदलांच्या परिणामांचे पडसाद आपल्या भवतालावर उमटत असताना पायाभूत सुविधांच्या मजबुतीकरणापासून ते वैयक्तिक जीवनशैलीकडे पुन्हा नव्याने पाहण्याची निकडही अधोरेखित होते आहे.

पर्यावरणपूरक जीवनशैलीविषयी आजवर खूप चर्चा झडल्या आहेत. जगभरातले संशोधक, धोरणकर्ते आपले काम करत राहतीलच, मात्र रोजचे जगणे पर्यावरणपूरक करण्यासाठी अगदी वैयक्तिक पातळीवरही काही बदल स्वीकारावे लागतील, याचा पुन्हा नव्याने विचार करण्याची वेळ आली आहे याची खूणगाठ आपणही बांधायला हवी.

-------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : 'परिवर्तन महाशक्ती'च्या आणखी २८ जागांची निश्चिती; स्वराज्य पक्ष, प्रहार पक्ष आजच आपल्या उमेदवारांच्या नावाची करणार घोषणा

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT