health  sakal
साप्ताहिक

आधुनिक सवयींची व्यसने...

कोणतेही व्यसन म्हणजे दीर्घकाळ टिकणारी, पुन्हा पुन्हा उद्‌भवणारी एक मनोशारीरिक व्याधी असते.

सकाळ साप्ताहिक

आरोग्यभान

डॉ. अविनाश भोंडवे

मादक पदार्थांसारखेच आजच्या युगात व्यसन म्हणून परिवर्तित झालेल्या नॉन-सबस्टन्स अॅडिक्शन किंवा पदार्थविहीन सवयींच्या आहारी गेल्याने आयुष्यातली मुख्य गोष्ट गमवावी लागते, ती म्हणजे कुटुंबाचा आणि मित्राचा सहवास. ही व्यसने दूर हटवून कुटुंबीयांना; मित्रांना जास्त वेळ दिल्यास, एखाद्या छंदात रमल्यास शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळींवरील आरोग्य सुधारणे सहज शक्य होईल.

कोणतेही व्यसन म्हणजे दीर्घकाळ टिकणारी, पुन्हा पुन्हा उद्‌भवणारी एक मनोशारीरिक व्याधी असते. तो पदार्थ वापरल्याशिवाय किंवा ती कृती केल्याशिवाय त्या पदार्थाचे अथवा कृतीचे व्यसन लागलेल्या व्यक्तीला स्वस्थ वाटत नाही. आपल्या व्यसनांचे हानिकारक परिणाम माहिती असूनही ती गोष्ट सतत केली जाते, त्याचबरोबर व्यसनांमधून निर्माण होणारे बदल मेंदूमध्ये दीर्घकाळ टिकतात. व्यसन म्हणजे मेंदूचा एक जटिल शारीरिक विकार असतो, तसाच तो पक्का मानसिक आजारही असतो.

आजच्या युगाचा विचार केला, तर व्यसने दोन प्रकारची असतात.

तंबाखू, मद्य, ड्रग्ज अशा घन किंवा द्रव पदार्थांचे व्यसन, ज्याला सबस्टन्स अॅडिक्शन म्हणतात

पोर्नोग्राफी, जुगार, इंटरनेट, मोबाईल, सोशल मीडिया अशा आधुनिक जीवनात करमणुकीखातर सुरू झालेल्या, पण व्यसन म्हणून परिवर्तित झालेल्या नॉन-सबस्टन्स अॅडिक्शन किंवा पदार्थविहीन सवयी

या दुसऱ्या प्रकारच्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यसनाधीन व्यक्तींचे वर्तन, आरोग्याच्या बाबतीत रासायनिक पदार्थांसारखेच विनाशकारी असू शकते. आजमितीला सर्वांचेच जीवन संगणक आणि मोबाईलने काबीज केल्यामुळे या व्यसनांनी साऱ्या जगालाच एकप्रकारे घेरले आहे.

नॉन-सबस्टन्स अॅडिक्शन ः ‘अमेरिकन सोसायटी ऑफ अॅडिक्शन मेडिसीन’च्या मते, हे व्यसन मेंदूला मिळणारे बक्षीस, कोणतीही एखादी कृती करण्याची प्रेरणा, त्या कृतीतून आलेल्या अनुभवांची स्मृती आणि या तिन्हींना जोडणाऱ्या मज्जातंतूंचे जाळे; यांचा दीर्घकालीन आजार असतो.

वर्तणुकीतून व्यसन ः जेव्हा एखादी व्यक्ती कोणत्याही मादक पदार्थांशी संबंध नसलेल्या, पण त्याला खूप आवडणाऱ्या आणि समाधान देणाऱ्या वर्तनामध्ये, ‘ते तू करच’ अशी त्याच्यावर सक्ती केल्यासारखा गुंतून जातो; त्या वर्तनामुळे त्याच्या आर्थिक, शारीरिक, भावनिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत असला तरी त्याची तो पर्वा करत नाही; अशा वर्तनाला नॉन-सबस्टन्स अॅडिक्शन म्हणतात.

खूप सुख, आनंद, रुचकर अन्न, शरीरसुख असे अनुभव येण्याची शक्यता असल्यास मानवी मेंदूमध्ये डोपामाइन नावाचे न्यूरोट्रान्समीटर रसायन स्रवते. मेंदूमधील डी-२ रीसेप्टरद्वारे डोपामाइनला रोखले जाते, असे याबाबतच्या संशोधनामध्ये दिसून आले आहे.

अन्न आणि लैंगिक संबंध अशा गोष्टींमध्ये मेंदूला एखादे बक्षीस मिळाल्यासारखा आनंद मिळणे समजू शकते. त्याशिवाय मानवी प्रजाती वाढू शकली नसती. मानवामध्ये हा आनंद परत परत घेण्याचा मोह आवरणारी डी-२ रिसेप्टरची यंत्रणा असते. परंतु व्यसनाधीन व्यक्तींमध्ये ही यंत्रणा ‘बंद’ होते आणि ‘झाले हे पुरेसे आहे’ असा विचार नोंदवला जाण्याऐवजी, ‘हा आनंद आणखीन पाहिजे’ अशी गरज नोंदवली जाते.

पदार्थ नसलेल्या व्यसनांचे (नॉन-सबस्टन्स अॅडिक्शनचे) प्रकार

मादक पदार्थ नसलेल्या, पण सवयीतून निर्माण झालेल्या व्यसनांमध्ये; जुगार, इंटरनेट गेमिंग, सेक्स, शॉपिंग, पोर्नोग्राफी आणि खाद्यपदार्थ यांचा समावेश होतो. संयमितपणे केल्यास, यातील काही गोष्टी जीवनातील आनंदाचा भाग बनू शकतात. परंतु जेव्हा एखादी व्यक्ती व्यसनास बळी पडते तेव्हा या प्रकारच्या क्रियाकलापांमध्ये गुंतण्याबाबत होणारी वर्तणूक-सक्ती ती व्यक्ती नियंत्रित करू शकत नाही.

जुगाराचे व्यसन ः अमेरिकेतील ‘नॅशनल कौन्सिल ऑफ प्रॉब्लेम गॅम्बलिंग’ या जुगारावर संशोधन करणाऱ्या राष्ट्रीय संस्थेच्या अहवालानुसार,

जुगाराचे व्यसन असलेल्या दर पाचांपैकी एक व्यक्ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते

इतर व्यसनांच्या तुलनेत या व्यसनामध्ये आत्महत्यांचे प्रमाण दुप्पट आहे

सर्व मोकळा वेळ कॅसिनोमध्ये घालवणारे किंवा ऑनलाइन जुगाराची वेबसाइट वापरणाऱ्यांना जुगाराचे व्यसन नक्कीच लागते

सट्टेबाजीमध्ये मिळवलेले किंवा गमावलेले पैसे, मादक पदार्थांच्या व्यसनाप्रमाणेच मेंदूवर परिणाम करतात

मादक पदार्थांच्या व्यसनाचे शारीरिक परिणाम त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना आणि प्रियजनांना लगेच दिसून येतात. त्यामुळे त्यांना त्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न वेळीच होऊ शकतात. परंतु जुगारामध्ये व्यसनाधीन झालेल्या व्यक्तींना अशी मदत मिळण्याची संधी मिळण्याआधीच ते रसातळाला जातात आणि सर्वस्व गमावू शकतात

आजमितीला भारतातही इंटरनेटवरून पत्त्यांचे काही खेळ, काही तथाकथित रचनात्मक कोडी अशांद्वारे ऑनलाइन जुगार मोठ्या प्रमाणात दृष्टीस पडत आहेत. याशिवाय मोठ्या शहरातील द्युतगृहे आणि छोट्या गावातील जुगार सुरूच आहेत. आणि यात गुंतलेल्या लाखो लोकांमध्ये या व्यसनाची जोखीम नक्कीच आहे.

लैंगिक व्यसन ः मादक पदार्थाचे व्यसन करणाऱ्या व्यक्ती, नेहमीच स्वतःला किंवा इतरांना इजा पोचवणारे धोकादायक वर्तन करतात. नशेत चूर झाल्यावर केल्या जाणाऱ्या त्याच्या वर्तनाकडे आणि परिणामांकडे ते स्वतः दुर्लक्ष करतात. लैंगिक व्यसनाधीनतेबाबत, सदानकदा लैंगिक संबंध ठेवण्याच्या इच्छेमुळे होणाऱ्या वर्तनात त्यांना आणि इतरांना धोका असतोच, पण लैंगिक संबंधातून उद्‌भवणाऱ्या इतर गोष्टींचाही धोका सर्वांना असतो. उदाहरणार्थ-

अनोळखी व्यक्तींसोबत सार्वजनिक ठिकाणी लैंगिक कृत्ये करणे

मादक द्रव्यांच्या प्रभावाखाली लैंगिक संबंध ठेवणे

लैंगिक संबंधातून संक्रमित होणाऱ्या आजारांपासून किंवा गर्भधारणेपासून संरक्षण करू शकणाऱ्या कॉन्डोमचा वापर न करणे

लैंगिक संबंध लपवून ठेवण्यासाठी आसपासच्या लोकांशी खोटे बोलणे

एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली असंख्य शहरातील अगणित सेक्स सर्व्हिस, इंटरनेटवर सहज उपलब्ध असलेल्या पॉर्नसाइट अशा व्यसनांच्या परिघात असंख्य तरुण, मध्यमवयीन अगदी उच्च पदाधिष्ठित व्यक्तीही अडकलेल्या आढळतात.

लैंगिक सुखाच्या मागे अनाठायी लागणे, हे व्यसन म्हणून वैद्यकीय उपचारात औपचारिकपणे वर्गीकृत केलेले नसले, तरी संज्ञानात्मक वर्तणूक थेरपी (कॉग्निटिव्ह बिहेविअरल थेरपी) आणि ‘सेक्स अॅण्ड लव्ह अॅडिक्ट्स अॅनॉनिमस’ ह्या याबाबत जागतिक पातळीवर कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या १२ टप्प्यांच्या कार्यक्रमाचा या व्यक्तींना उपयोग होऊ शकतो.

इंटरनेटचे व्यसन ः जे समाजात मिसळायला नाखूष असतात, लोकांना प्रत्यक्ष भेटायला ज्यांना जमत नाही, किंवा जे भावनिक समस्यांनी त्रस्त आहेत अशांसाठी इंटरनेट हे सुख आणि समाधान मिळवण्याचे ठिकाण असते. अशा व्यक्ती त्यांच्या जागृत अवस्थेतील जास्तीत जास्त काळ जेव्हा संगणकावरील गेम खेळण्यात किंवा सोशल मीडियावर आभासी जग तयार करण्यात घालवतात असे लक्षात येते, तेव्हा त्यांना इंटरनेट अॅडिक्शन हे ‘वर्तणुकीचे व्यसन’ लागले आहे, असे म्हणायला हरकत नसते.

इंटरनेटच्या व्यसनामुळे नातेसंबंध तुटणे, कौटुंबिक संवाद खुंटणे, नैराश्य यासारख्या मानसिक आरोग्याबाबतच्या मूलभूत समस्या वाढू लागतात. प्रत्यक्षात त्या व्यक्तीच्या एकूण तंदुरुस्तीला आणि आरोग्यालाही उतरती कळा लागते. इंटरनेटचा वापरकर्ता त्याच्या आभासी जगामध्ये कितीतरी वेळ आणि पैसा खर्च करत जातो, आणि त्यामुळे त्याला आर्थिक समस्या निर्माण होणे, नोकरी जाणे, शाळा-कॉलेजातल्या अभ्यासात मागे पडणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते.

ऑनलाइन शॉपिंगचे व्यसन ः सक्ती असल्याप्रमाणे कम्पल्सिव्ह शॉपिंग किंवा सतत काही तरी अनावश्यक चीजा खरेदी करण्याच्या व्यसनाने ग्रस्त व्यक्तींची संख्या खूप जास्त आहे. या व्यक्तींची घरे तळमजल्यापासून छतापर्यंत, ऑनलाइन खरेदी केलेल्या वस्तूंनी भरलेले असते. शूज, हँडबॅग, कपडे, सौंदर्य उत्पादने आणि उपकरणे यांच्या ढिगाऱ्याने त्यांची घरे अस्ताव्यस्त भरलेली असतात. परिणामी त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक नुकसान होत राहते. ज्या व्यक्तींना भौतिक वस्तूंवर पैसे खर्च करण्याबाबत सतत एकप्रकारची बळजबरी अंतर्मनात सतत जाणवत असेल, खरेदी करताना ज्यांना रोमांचित झाल्याचे वाटत असेल अशांना हे शॉपिंगचे जबरदस्त व्यसन असते. त्यासाठी उपचारांची गरज असते.

सोशल मीडियाचे व्यसन ः सोशल मीडियावर सातत्याने ‘ऑनलाइन’ राहणे हे आजच्या पिढीचे व्यसनच झाले आहे. पालकांच्या आणि मित्र-मैत्रिणींच्या डोळ्यात खुपले, तरी दिवसरात्र फोन, लॅपटॉपवर इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या विश्वात ही पिढी वावरतेय हे नक्कीच. स्मार्टफोनमुळे फक्त युवकच नाही, तर गृहिणी, प्रौढ नागरिक आणि ज्येष्ठांनाही सोशल मीडियाचे व्यसन लागले आहे. अनेक सार्वजनिक ठिकाणी, सगळे आबालवृद्ध माना खाली आणि डोके फोनमध्ये घातलेले असे चित्र ठळकपणे दिसते.

सोशल मीडिया सतत वापरणे हे व्यसनच आहे. यात किती तास निघून जातात याची त्यांना जाणीवही नसते. या व्यसनामुळे जगभरात कोट्यवधी व्यक्तींचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य धोक्यात आले आहे.

वर्तणूक व्यसनाची लक्षणे आणि चिन्हे

मादक पदार्थांच्या व्यसनाप्रमाणेच, पोर्नोग्राफी, जुगार आणि इंटरनेट यांसारख्या गोष्टींशी संबंधित व्यसनाधीन वर्तनाबाबत त्या व्यक्तीमध्ये अनेक सूचक चिन्हे आणि लक्षणे दिसतात. उदाहरणार्थ-

अपराधीपणाची जाणीव

स्वनियंत्रणाचा अभाव

कोसळल्यासारखे वाटणे

बेपर्वाई

सुखद भावना

गुप्तता

खोटे बोलणे

उपचार

ड्रग्ज आणि मद्यसेवनाच्या व्यसनांप्रमाणेच, वर्तणुकीशी संबंधित व्यसनाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींसाठी उपचारांचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तज्ज्ञ व्यावसायिकांच्या देखरेखीखाली हे उपचार घेतल्यास व्यसनातून १०० टक्के मुक्ती मिळू शकते आणि अधिक संतुलित, प्रामाणिक जीवन जगण्याची क्षमता परत लाभू शकते.

वैयक्तिक समुपदेशन

संज्ञानात्मक वर्तणूक थेरपी (कॉग्निटिव्ह बिहेविअरल थेरपी)

औषधोपचार

सपोर्ट ग्रुप- १२ टप्प्यांचा कार्यक्रम- हा १२ टप्प्यांचा कार्यक्रम लोकांसाठी व्यसनांतून मुक्त होऊन त्यानंतर कायमस्वरूपी व्यसनमुक्ती निर्माण करण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकतो. या कार्यक्रमांमध्ये सामूहिक कार्याचा समावेश असतो, जेथे एकसमान अन्य पीडित व्यसनाधीन साथीदारांचा पाठिंबा मिळतो. अधिक संतुलित जीवन जगण्याच्या दिशेने अन्य सदस्यांनी केलेली प्रगती आणि आरोग्यातील सुधारणा अनुभवणे शक्य असते.

उपचारांमधील पहिली पायरी सर्वात कठीण असते, ती म्हणजे, ‘मला उपचारांची आणि मदतीची गरज आहे’ हे मान्य करणे. या संस्थेतल्या समाजाभिमुख दृष्टी असलेल्या स्वयंसेवी व्यक्तींना मादक पदार्थ आणि वर्तणुकीतून निर्माण होणाऱ्या व्यसनांशी सामना करण्याचा स्वानुभव असतो. नंतर सहभागी होणाऱ्या व्यक्तींना त्याचा फायदा होतो.

मादक पदार्थांप्रमाणेच आजच्या युगातील सवयींच्या आहारी गेल्याने आयुष्यातली मुख्य गोष्ट गमवावी लाग जाते, ती म्हणजे कुटुंबाचा आणि मित्राचा सहवास. ही व्यसने दूर हटवून कुटुंबीयांना; मित्रांना जास्त वेळ दिल्यास, एखाद्या छंदात रमल्यास शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळींवरील आरोग्य सुधारणे सहज शक्य होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Electronic Voting Machine : EVM मशीनवर कशी मोजली जातात मते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra next CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? 'निकाला'नंतर तावडेंची बदलली भाषा, कोणाला दिलं विजयाचं क्रेडिट?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: उमरगा विधानसभा मतदार संघात कोणाचा गुलाल उधळणार?

Kagal Assembly Election Results 2024 : मुश्रीफांनी समरजित घाटगेंचा केला टप्प्यात कार्यक्रम; कागलमध्ये लगावला 'विजयी षटकार'

SCROLL FOR NEXT