landon scotland  esakal
साप्ताहिक

London-Scotland ऐतिहासिक आणि जागतिक वारसा लाभलेलं टुमदार शहर!

लंडन-स्कॉटलंडची स्वप्नभूमी

साप्ताहिक टीम

श्रीपाद टेंबे

स्कॉटलंडमध्ये उन्हाळ्यात सूर्यास्त उशिरा होतो, साहजिकच अंधार पडायला मध्यरात्रच होते. परत पहाटे अगदी चार वाजता सूर्यदेव ड्युटीवर हजर असतात.

नॉर्वे, स्वीडन आणि उत्तर दक्षिण ध्रुवावर काय मजा येत असेल, याची एक झलक आपल्याला स्कॉटलंडमध्ये बघायला मिळते.

पर्यटनाचा आनंद अवर्णनीय असतो, असे माझे मत आहे. माझा मुलगा सौरभ एडिनबर्गला राहत असल्यामुळे आणि त्याच्या आग्रहामुळे यावेळेस आम्ही लंडन आणि मुख्यत्वेकरून स्कॉटलंडला जाण्याचे ठरविले.

सौरभने अगोदरच टूरमधल्या बाकीच्या सर्व ठिकाणी राहण्याचे बुकिंग केले होते. प्रेक्षणीय स्थळे बघण्यासाठी लागणारी तिकिटे अगोदरच ठरलेल्या कार्यक्रमानुसार आम्हाला ईमेलद्वारे पाठवली असल्याने आमची सहल वक्तशीर आणि कोणताही गोंधळ न होता पार पडणार याची आम्हाला खात्री होती.

पुणे-मुंबई-लंडन असा जवळपास वीस तास विमान प्रवास झाल्यावर साहेबाच्या देशात आयुष्यात प्रथमच पाऊल टाकले.

लंडनमध्ये थोडेफार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्थिरस्थावर झाल्यावर, आमची पावले लंडन शहर बघण्यासाठी बाहेर पडली.

बाहेर पडल्यावर एक गोष्ट लक्षात आली आणि ती म्हणजे इंग्लंडचे नागरिक वाहतूक व्यवस्था आणि शिस्त याबाबतीत एकदम सजग आहेत. तितकेच सहकार्य करणारे आहेत. त्यामुळे भाषेची अडचण जाणवत नाही, आणि कुठेही जाताना टेन्शन येत नाही.

आम्ही ऑयस्टर कार्ड रिचार्ज करून घेतले. त्या कार्डमुळे लंडनच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा म्हणजे बस किंवा रेल्वेचा उपयोग करता येतो. महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक ठिकाणी तिकीट काढायची गरज राहत नाही.

लंडन थेम्स नदीच्या काठावर वसलेले शहर आणि या शहराला प्रचंड जुना इतिहास आहे. अर्थ, कला, क्रीडा, उद्योग, साहित्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये आघाडीवर असलेले हे जगातील एक प्रमुख शहर आहे. आज जगातील सर्वाधिक पर्यटक लंडनमध्ये येतात. लंडनच्या समाजरचनेमध्ये कमालीचे वैविध्य जाणवले.

एका आकडेवारीनुसार लंडन शहराच्या परिसरात साधारणपणे तिनशे भाषा बोलल्या जातात. वाहतूक आणि दळणवळणाच्या बाबतीत लंडन शहर जगातील बहुतेक सर्व महत्त्वाच्या शहरांशी हवाई, रेल्वे, रस्ते मार्गाने जोडलेले आहे.

युरोस्टार ही चॅनेल टनेलमधून जाणारी अतिजलद रेल्वेसेवा लंडन-पॅरिस-ब्रुसेल्स या शहरांना जोडते. पाश्चिमात्य शास्त्रीय आणि रॉक संगीताच्या इतिहासात लंडनला मानाचे स्थान आहे. बीटल्स, रोलिंग स्टोन्स, पिंक फ्लोइद, क्वीन हे जगातील सर्वात लोकप्रिय बॅंड लंडनमध्येच उदयाला आले.

याच शहरात चाळीसएक विद्यापीठे कार्यरत आहेत. हासुद्धा एक विक्रम आहे, कारण युरोपियन राष्ट्रांतदेखील एवढी विद्यापीठे नाहीत. अशी नवनवीन माहिती या भेटीच्या निमित्ताने आम्हाला मिळत होती.

या सर्व गोष्टींशिवाय लंडनमध्ये एकदा तरी भेट देऊन बघावे अशी अनेक ठिकाणे आहेत. रॉयल अल्बर्ट हॉल, हाईड पार्क, वेस्टमिनिस्टर अॅबी, बिगबेन, पार्लमेंट हाउस, बकिंगहॅम पॅलेस, ऑक्सफर्ड स्ट्रीट, लॉर्डस क्रिकेट मैदान, ‌ट्रॅफलगार स्क्वेअर, टॉवर ब्रिज, लंडन आय, मादाम तुसासह अनेक विविध संग्रहालये... अशी कितीतरी.

ही सर्व ठिकाणे बघायला दिवस काय महिनेही पुरणार नाहीत. शब्दमर्यादेमुळे प्रत्येक ठिकाणचे वर्णन करणे शक्य नाही, पण सगळे कसे आत्ताही नजरेसमोर आहे.

बकिंगहॅम पॅलेससमोर सकाळी होणारी इंग्लंडच्या राणीच्या गार्डची परेड तर खरेच अप्रतिम आहे. पण कधीना कधी एक वेळ अशी येतेच की आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी सोडाव्या लागतात. आता ती वेळ आमच्यावर आली होती, म्हणजे लंडनवरून स्कॉटलंडकडे प्रयाण करण्याची वेळ आली होती.

आम्ही ठरल्याप्रमाणे लंडनच्या व्हिक्टोरिया क्रॉस या बस स्थानकावरून स्कॉटलंडची राजधानी एडिनबर्गकडे प्रयाण केले. एक दिवस सौरभकडे विश्रांती करून स्कॉटलंड दर्शनसाठी निघालो. ‘मिनी स्वित्झर्लंड’ असे सामान्यपणे स्कॉटलंडला म्हटले जाते.

इंग्लंडच्या उत्तरेला असलेला निसर्ग सौंदर्याने भरलेला देश म्हणजे स्कॉटलंड. आमच्या टूरच्या कार्यक्रमानुसार फोर्ट विल्यमकडे प्रस्थान केले. फोर्ट विल्यमला ‘द आउटडोअर कॅपिटल ऑफ यूके’ असेही म्हणतात.

इंग्लंडच्या बऱ्याच उत्तरेला स्कॉटलंड आणि त्यात फोर्ट विल्यम आणखीन उत्तरेला त्यामुळे ऐन उन्हाळ्यातही बऱ्यापैकी थंडी होती.

निळेशार शांत पाणी, तळ्यात शांतपणे पोहणारी बदके, नेत्रांमध्ये न सामावणारे सृष्टी सौंदर्य या सर्व गोष्टी नक्कीच वेड लावणाऱ्या होत्या.

स्कॉटलंडमध्ये उन्हाळ्यात सूर्यास्त उशिरा होतो, साहजिकच अंधार पडायला मध्यरात्रच होते. परत पहाटे अगदी चार वाजता आपले सूर्यदेव ड्युटीवर हजर असतात.

नॉर्वे, स्वीडन आणि उत्तर दक्षिण ध्रुवावर काय मजा येत असेल याची एक झलक आपल्यला स्कॉटलंडमध्ये बघायला मिळते.

स्कॉटलंडमध्ये प्रवेश केल्यावर काही महत्त्वाचे शब्द कळले. लॉक म्हणजे तळे, बेन म्हणजे पर्वत, ग्लेन म्हणजे दरी वगैरे. या शब्दांचा वापर स्कॉटलंडमध्ये अगदी भरपूर आहे.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण इंग्लंडमध्ये चलन पौंड असले तरी ते इथे सरसकट वापरले जात नाही. स्कॉटिश पौंड हे त्यांचे दैनंदिन व्यवहाराचे चलन. स्कॉटलंडमधील सर्व रहिवाशांना आपण स्कॉटिश असल्याचा प्रचंड अभिमान आहे.

उत्तर व पश्चिमेस अटलांटिक महासागर, तर पूर्वेस नॉर्थ सी आहे. स्कॉटलंडमध्ये ग्लास्गो हे सर्वात मोठे शहर म्हणून ओळखले जाते, तर एडिनबर्ग स्कॉटलंडची आर्थिक राजधानीदेखील आहे. स्कॉटिश शिक्षणव्यवस्था इंग्लंडपेक्षा वेगळी आहे.

स्कॉटलंडमध्ये विस्तृत शिक्षणावर भर दिला जातो, असे कळले. स्कॉटलंडमध्ये भरपूर प्रमाणात खनिज तेल आढळून येते. खऱ्या अर्थाने समृद्ध प्रदेश म्हणजे स्कॉटलंड असे म्हटले जाते ते उगाचच नाही.

स्कॉटलंडमध्ये निसर्ग सौंदर्याची भरमार आहे. पावलापावलावर निसर्ग स्वागत करण्यासाठी सज्ज असतो. लॉक लीन्हे, लॉक नेस, लॉक लोकी यांसारखे मोठे तलाव आणि अत्यंत रमणीय आणि शांत वातावरण यांमुळे आपण एका वेगळ्याच विश्वात जातो.

बेन नवीस हा इंग्लंडमधील सगळ्यात उंच पर्वत आहे. याची उंची अंदाजे ४,४०० फूट आहे. स्कॉटलंडमधली आणखीन एक प्रेक्षणीय गोष्ट म्हणजे स्विंग ब्रिज.

एखादी बोट किंवा जहाज कालव्यातून जाणार असेल तर थोड्यावेळासाठी रस्ता बंद करतात. स्विंग ब्रिज उजवीकडे फिरवतात.

बोट किंवा जहाज त्या ब्रिजला ओलांडून पलीकडे गेले की ब्रिज परत मूळ ठिकाणी आणून वाहतूक सरू करतात. स्कॉटलंडमध्ये पुष्कळ ठिकाणी असे स्विंग ब्रिज दिसतात.

लेक नेस म्हणजे क्षितिजापर्यंत पसरलेला गोड पाण्याचा समुद्रच म्हणायला हवा. हा तलाव आणि परिसर बघण्यासाठी बोटीमधून दोन-दोन तासाच्या टूर असतात.

लॉक नेस प्रसिद्ध आहे तो आपल्या निसर्ग सौंदर्यासाठी आणि केव्हातरी कोणालातरी दिसलेल्या ‘लॉक नेस मॉन्स्टर’साठी. याबाबत अनेक दंतकथा प्रचलित आहेत, असे ऐकायला मिळाले. स्कॉटलंडचे निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवून आम्ही आता ग्लास्गोला आलो.

जहाज बांधणी उद्योगामुळे ग्लास्गो व्यापाराचे केंद्र आहे. याशिवाय या शहरातील जॉर्ज स्क्वेअर, गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, चर्च, सायन्स सेंटर, केल्विनग्रोव पार्क म्युझियम ही प्रमुख ठिकाणे अगदी बघायलाच हवीत अशी आहेत. आता आमच्या सहलीचा शेवटचा टप्पा होता एडिनबर्ग.

एडिनबर्ग हे राजधानीचे शहर असूनदेखील लंडनच्या तुलनेमध्ये अगदी वेगळे आहे. कुठलीही धावपळ गडबड नाही. सगळे कसे एकदम निवांत.

एडिनबर्ग आणि परिसरात पुष्कळ प्रेक्षणीय स्थळे आहेत. ती सर्व ठिकाणे बघायला एक आठवडादेखील अपुरा ठरला. एडिनबर्गचे जुने शहर आणि नवे शहर असे दोन भाग आहेत.

जुन्या भागात ग्रास मार्केट, एडिनबर्ग कॅसल, नॅशनल म्युझियम ऑफ स्कॉटलंड, पॅलेस ऑफ हॉलीरूड हाऊस, कालटन हिल, अवर डायनामिक अर्थ, अशेर हॉल, नॅशनल पोर्ट्रेट गॅलरी, म्युझियम ऑफ चाइल्डहुड बघितले.

तर, शहराच्या नवीन भागात रॉयल बोटॅनिक गार्डन, रॉयल ब्रिटानिका, क्रेमंड आयलंड, क्रेगक्रुक कॅसल, सेंट मेरीज् कॅथेड्रल इत्यादी खूप आवर्जून बघण्यासारखी ठिकाणे आहेत. आणखीन एक विशेष म्हणजे स्कॉटलंडमध्ये बहुसंख्य इमारती ऐतिहासिक आणि जागतिक वारसा असलेल्या आहेत.

संस्कृती जन्माला येते आणि वाढते ती निसर्गाच्या सान्निध्यात. विविध भाषा, संस्कृती यांचा सुंदर संगम आपल्याला ब्रिटन व स्कॉटलंडमध्ये बघायला मिळतो. अजूनही आपले वेगळे अस्तित्व जपून आहेत. यामुळेच ब्रिटन-स्कॉटलंड आहे खास!

-------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

मतदान कर्मचाऱ्यांना यंदा भत्ता मिळणार ऑनलाईन! ट्रायल पेमेंटसाठी आज 1 रुपया पाठवला जाईल; बॅंक खात्यांची होईल खात्री अन्‌ बुधवारपासून उर्वरित रक्कम मिळणार

SCROLL FOR NEXT