गणपती पूजा पत्री सकाळ
साप्ताहिक

गणपती विशेष : गणेशपत्री माहात्म्य

सकाळ डिजिटल टीम

डॉ. कांचनगंगा गंधे / अशोक कुमार सिंग

विश्वाच्या उत्पत्तीच्या वेळेपर्यंत सारे निराकार होते. त्यातली प्रचंड ऊर्मी (ऊर्जा) एका क्षणी एकमेकांत मिसळून त्यातून काहीतरी ‘साकार’ झाले, आकाराला आले, नाद निर्माण झाला तोच ॐ! ॐकारानेच त्यात प्राण ओतला, ‘जीव’ निर्माण करून त्यात चैतन्य, ऊर्जा निर्माण करून, पालनपोषण आणि नवनिर्मितीचीही प्रेरणा दिली, विविधता निर्माण केली अशा या पवित्र ॐकाराला - श्रीगणेशाला ‘विघ्नहर्ता’ मानले आहे.

श्रीगणेशाची मातीची, विशेषतः नैसर्गिक पांढरट-करड्या रंगाच्या शाडूच्या मातीची मूर्ती करून भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशाची प्राणप्रतिष्ठा करतात.

षोडषोपचार पूजेनंतर ‘पुष्प-पत्री’ या पूजा उपचारात लाल रंगाची व सुवासिक फुले आणि २१ प्रकारच्या वनस्पतींची पत्री अर्पण करण्याचा प्रघात आहे. या सर्व वनस्पतींमधली औषधी गुणवत्ता वर्षाऋतूच्या काळात अधिक असते.

याच काळात उद्‌भवणाऱ्या अनेक विकारांवर त्या उपयुक्तही आहेत. त्यांच्या सान्निध्यात आपण राहावे, त्या वनस्पतींचे योग्यरितीने जतन, संगोपन करावे हा त्यामागचा शास्त्रीय दृष्टिकोन आपल्या पूर्वसूरींना नक्कीच ज्ञात असावा.

वनस्पतींमधील वैविध्य, विविधता जपली तर सृष्टीतल्या अनेक उपयुक्त घटकांचे चक्र नैसर्गिकरित्या अव्याहतपणे चालू राहते आणि सृष्टीचा तालही सांभाळला जातो.

गणेशाला अर्पण करण्यात येणाऱ्या २१ वनस्पतींमध्ये जमिनीलगत वाढणाऱ्या, झुडपांपेक्षाही लहान झुडपं, मध्यम व मोठ्या उंचीचे वृक्ष, लता व वेली आहेत.

पत्रीपूजेत पहिला मान दूर्वांचा! श्रीगणेश आणि जमिनीलगत पसरत वाढणाऱ्या, गवत प्रकारातल्या दूर्वांचे त्रिदल यांचे नाते हिंदू धर्मात पवित्र मानतात. शरीरातल्या अतिरिक्त कडकीमुळे उद्‍भवणाऱ्या अनेक विकारांवर दूर्वा उपयुक्त आहेत.

त्यांना प्रजोत्पादक आणि आयुष्यवर्धक मानले आहे. दूर्वांची मुळे माती आणि जमिनीतले पाणी घट्ट धरून ठेवतात, जमिनीत ओलावा टिकून राहतो. मातीतल्या सजीव सृष्टीला जीवनदान मिळते!

वांग्याच्या कुळातली, कमी पाण्यातही वाढणारी, जमिनीच्या थोडी वर उंच वाढणारी, काटेरी औषधी डोरली ही वनस्पती; पानांमधल्या इसेन्शियल ऑईलमुळे सुंदर सुगंध येणारा पांढरा व हिरवा मारवा; श्रावण-भाद्रपदात उगवणारा छोट्या उंचीचा आघाडा; विष्णूला प्रिय असलेली तुळस या झुडपांपेक्षाही कमी उंचीच्या औषधी वनस्पतीही जमिनीतला, मातीतला ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मोलाची मदत करतात.

झुडूप प्रकारातला पांढरा व काळा धोत्रा आणि पांढऱ्या फुलांचा मंदार व जांभळ्या फुलांची रुई ह्या विषारी पण कमी मात्रेत औषधी असलेल्या वनस्पती; केवड्याची केतकी (पिवळी सोनेरी पाने) ह्या जातीची सुगंधी वनस्पती वातावरणातील बाष्प थोड्या प्रमाणात शोषूनही घेतात. जमिनीतल्या पाण्याची बाष्पीभवनामुळे वातावरणात मिसळणारी वाफही ह्या वनस्पती शोषून घेतात.

कण्हेर, डाळिंब, बोर या मध्यम उंचीच्या झाडांची पानगळ होत नाही, पण पावसाळ्यात पर्णसंभार वाढल्यामुळे झाडे वाकण्याचीही शक्यता अधिक असते. त्यांचा पर्णसंभार पत्रींच्या रूपाने कमी झाला, तर झाडाचे जतन व्यवस्थित आणि योग्य होते!

कण्हेर विषारी आहे पण योग्य मात्रेत औषधी आहे. डाळिंबाची पाने केसातल्या उवा मारण्याच्या औषधात वापरतात आणि फळांत ‘क’ जीवनसत्त्व असल्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बोराची झाडे काटेरी, कमी पाण्याच्या प्रदेशातही चांगली वाढतात. या झाडाचे सर्वच अवयव औषधी आहेत.

संयुक्त पानांचा अगस्ती व काटेरी शमी आणि बेल या मध्यम उंचीच्या वृक्षांची पाने पुष्प-पत्री उपचारात गणेशाला वाहतात. हे सर्व वृक्ष देवळाच्या आवारात लावतात.

आयुर्वेदिक भस्म करताना त्याला तांबडा रंग येण्यासाठी अगस्तीच्या पानाच्या रसाची पुटे देतात. शमी व बेल हे कमी पाण्याच्या जागेतही वाढतात. बेलाचे त्रिदल आणि शंकराचे नाते अनेक प्राचीन साहित्यांत दिसून येते!

अर्जुनसादडा, पिंपळ आणि देवदार या मोठ्या वृक्षांची विविध वैशिष्ट्ये आहेत. अर्जुनसादडा हा रानात, देवरहाट्यात आढळतो. हृदयरोगावरच्या अनेक औषधांमध्ये साल वापरतात.

मनःशांती आणि ध्यानधारणेसाठी पिंपळ वृक्षाला सांस्कृतिक महत्त्व आहेच, पण पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीनेही पिंपळ महत्त्वाचा आहे.

वातावरणातील बाष्प धरून ठेवण्याची क्षमता पानांमध्ये असल्यामुळे पिंपळाची सावली थंडगार असते. धुळीचे कण, वातावरणातले घातक वायू शोषून घेण्याची क्षमता असल्यामुळे आजूबाजूची हवा शुद्ध असते. पानांमधील आयसोप्रिन हे सेंद्रिय संयुग प्राणवायूचा साठा असलेल्या ओझोन थराचे गुणधर्म कमी होऊ देत नाही.

फळे आणि पानांवरचे बारीक किडे खायला अनेक लहान-मोठे पक्षी, मुंग्या, मुंगळे येतात आणि सृष्टीतली अन्नसाखळी चालू राहते.

देवदार हा वृक्ष हिमालयात, त्याच्या पायथ्याशी वाढतो. वृक्षाचे आयुष्य दोन-तीनशे वर्षे असते. तेल्यादेवदार, काष्ठदेवदार आणि सरळ देवदार हे तीनही प्रकार औषधी आहेत. त्याची पाने सुईसारखी, बारीक पण कडक असतात.

देवदार वृक्षाची पाने महाराष्ट्रात मिळत नाहीत, म्हणून पुष्प-पत्री उपचारात त्याऐवजी दूर्वा वाहतात.

विष्णुक्रांता ही निळसर-जांभळट फुलांची नाजूक केसाळ वेल पावसाळ्यात जमिनीवर किंवा इतर झाडांच्या खोडाच्या आधाराने वाढते. ह्या वनस्पतीचे, विशेषतः पानांचे चूर्ण मज्जातंतूंची व मेंदूची शक्ती वाढविणाऱ्या औषधात वापरतात.

जाईचे वेल पावसाळ्यात सुगंधी फुलांनी बहरलेले असतात. सुवासिक फुलांचा आणि पावसाळ्यात भरघोस गुलबट-पांढऱ्या फुलांचा मधुमालतीचा वेल कुंपणावर खूप दाट वाढतो. पाने गुणकारी असतात.

सृष्टीला सतत हलता ठेवणारा, सजीवांना चैतन्य देणारा आणि निर्जीव वस्तूंनाही उजळून टाकणारा सूर्य हा पंचमहाभूतांपैकी एक. सूर्यापासून मिळणारी ही ऊर्जा, हे चैतन्य वनस्पती आपल्या हरितद्रव्यात शोषून घेऊन नवीन ऊर्जा म्हणजेच अन्न तयार करतात.

ह्या ऊर्जेचा उपयोग त्यांच्या स्वतःसाठी आणि सृष्टीतल्या इतर सजीवांसाठी करतात आणि दुसऱ्‍यांनाही देतात, फक्त ती ऊर्जा वेगवेगळ्या स्वरूपात असते. सर्व सजीवांमधली ही ऊर्जा इतकी प्रचंड असते, की निर्मिती, संगोपन, स्थित्यंतर, नवनिर्मिती या अवस्थेतून गेल्यानंतरही उरते.

त्यातले ‘सजीवत्व’ संपते! ते ‘निर्जीव’ होते, तरीही त्यात ऊर्जा अडकलेली असते; ती मोकळी (पोषक घटक वेगळे करण्याची क्रिया) करण्याचे काम मातीतले सूक्ष्म जीवाणू आणि काही सूक्ष्म कवके, किडे करतात. त्यासाठी त्यांना जो ओलावा आणि आश्रय लागतो तो वनस्पतींमुळे मिळतो, सेंद्रिय (निर्जीव) पदार्थांचे विघटन होते, परत ते मातीत मिसळते!

पाऊस, वारा यामुळे मातीची धूप होऊ शकते पण लहान-मोठ्या पानांच्या वनस्पती, वृक्ष, झाडे, झुडपे, वेली यामुळे जमिनीची धूप काही प्रमाणात रोखली जाते. जमीन-माती यात असलेले सूक्ष्म जीवाणू संयुक्त घटकांचे साध्या, पोषक घटकांमध्ये रूपांतर करून मातीला समृद्ध करतात. वनस्पती मुळांद्वारे ती पुन्हा शोषून घेतात, चक्र चालूच राहते!

त्यासाठी पाणी, हवा, तेज (सूर्य), आकाश, भूमी (माती व इतर घटक) ह्या पाच प्रकृती तत्त्वांची आवश्यकता असतेच. सजीवांमधली राहिलेली ऊर्जा आणि तिचे रूपांतर दुसऱ्या ऊर्जेत करण्याची क्षमता हे सर्व मातीत मिसळते!

म्हणूनच प्रकृतीचे चक्र आणि सृष्टीतल्या ऊर्मीची योग्य सरमिसळ करून ती पुन्हा मातीतच मिसळून प्रकृतीचा ताल सांभाळणाऱ्या ॐकाराची म्हणजेच श्रीगणेशाची मूर्ती मातीची असावी असा संकेत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijaya Rahatkar: विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती; अर्चना मुजुमदार असतील नव्या सदस्य

Ajit Pawar: "लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, आम्ही केंद्रातून निधी आणू"; अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं

Bigg Boss 18 Eviction : नो गेम नो फेम, दुसऱ्याच आठवड्यात 'बिग बॉस १८'च्या घरातून बाहेर झाला 'हा' सदस्य

Latest Maharashtra News Updates Live : लाडकी बहीण योजना बंद होणार नाही- अजित पवार

Pune Traffic: धायरी फाटा चौकाला वाली कोण? सततच्या वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त!

SCROLL FOR NEXT