sant Kabir esakal
साप्ताहिक

राम अथवा रहीम ह्या परमेश्वराच्या नावांपेक्षा त्याच्यातील भाव जाणणे या संतांनी महत्वाचे मानले; असे संतश्रेष्ठ कोण होते?

राम रहीम जपत सुधि गई, उनि माला उनि तसवी लइ । कहै कबीर चेत रे भोंदू, बोलनिहारा तुरुक न हिंदू ।

साप्ताहिक टीम

डॉ. राहुल हांडे

माणसापासून माणसापर्यंतचा केलेला प्रवास म्हणजे कबीर साहेब. कबीर साहेबांची सीमा माणसापासून सुरू होते आणि माणसाजवळ येऊन संपते. त्यांचे साधुत्व अथवा संतत्व बेहद्द म्हणजे सीमा नसलेले आहे.

हमन है इश्क मस्ताना हमन को होशियारी क्या?

रहें आज़ाद या जग से हमन दुनिया से यारी क्या?

जो बिछुड़े हैं पियारे से भटकते दर-ब-दर फिरते,

हमारा यार है हम में हमन को इंतज़ारी क्या?

ख़लक़ सब नाम अपने को बहुत कर सिर पटकता है,

हमन गुरनाम साँचा है हमन दुनिया से यारी क्या?

न पल बिछुड़े पिया हमसे न हम बिछड़े पियारे से,

उन्हीं से नेह लागी है हमन को बेक़रारी क्या?

कबीरा इश्क़ का माता, दुई को दूर कर दिल से,

जो चलना राह नाज़ुक है, हमन सिर बोझ भारी क्या ?

आम्ही आणि आमचे प्रेम ‘मस्ताना’ आहे. स्वतःच्याच

मस्तीत आकंठ बुडालेले आहे. आम्हाला व्यवहारी शहाणपण

अथवा हुशारीशी काही मतलब नाही. जगापासून ‘आझाद’

म्हणजे स्वतंत्र राहणाऱ्या आम्हाला ह्या जगाशी ‘यारी’ नाही

अथवा काही देणे घेणे नाही. जे लोक आपल्या प्रिय परमेश्वरापासून दुरावले आहेत अथवा ज्यांना अंतरीच्या परमेश्वराची जाणीव

नाही ते लोक जगात त्याचा शोध घेत भरकटताना दिसतात.

आमचा ‘यार’ परमेश्वर आमच्यातच आहे. त्यामुळे आम्हाला

वाट पाहण्याची आवश्यकता नाही. ‘खलक’ म्हणजे हे जग

अथवा सर्व लोक स्वतःचे नाव होण्यासाठी डोके आपटत

फिरताना अथवा धडपड करताना दिसतात. आम्हाला एक गुरुनाम माहीत आहे, त्यामुळे आम्हाला स्वतःचे नाव प्रसिद्ध करण्यात कोणताही रस नाही.

आमचा प्रिय परमेश्वर आमच्यापासून आणि आम्ही त्याच्यापासून एका क्षणासाठीदेखील विलग झालेलो नाहीत. सदैव त्याच्याशी स्नेह (नह) जुळलेला असल्यामुळे आम्हाला त्याच्या भेटीची अस्वस्थता कधीच जाणवली नाही.

प्रेमात आकंठ बुडालेला कबीर परमेश्वराशी एकरूप झालेला आहे. त्यामुळे त्याच्या मनातील द्वैतभाव दूर झालेला आहे. ही परमेश्वर प्रेमाची वाट इतरांसाठी अत्यंत कठीण व नाजूक असली तरी आमच्यासारख्या मस्तान्यांना अथवा त्याच्या प्रेमात बुडालेल्यांना याचे काहीही ओझं वाटत नाही.

कबीर साहेब अशाप्रकारे खरी भक्ती आणि खरा भक्त यांची अत्यंत सहज-सुलभ-सुगम व्याख्या करतात. कबीर साहेबांच्या जीवनात आणि तत्त्वज्ञानात कोणत्याही बाह्य अवडंबरांना व आवरणांना स्थान नसल्याची प्रचिती सदैव येत राहते.

धर्म, त्याच्यात परमेश्वराचे केलेले नामकरण, धर्मात निर्माण केलेल्या जाती, त्यांच्यात निर्माण करण्यात आलेला उच्च-निच भाव, धर्माच्या नावावर उदरभरण करणारे प्रत्येक धर्मातील पाखंडी अशा सगळ्यांना उत्तर म्हणजे कबीर साहेब.

फलकट तो संसार । येथें सार भगवंत ।। ऐसें जागवितों मना । सरसें जनासहित ।। अवघें निरसूनि काम । घ्यावें नाम विठोबाचें ।। तुका म्हणे देवाविण । केला सीण तो मिथ्थ्या ।। असे म्हणणारे तुकोबा सतराव्या शतकात मराठीत कबीर साहेब सांगताना दिसतात.

अखिल विश्वात अद्वैत शोधणारे कबीर साहेब धर्मानुसार परमेश्वराच्या नावात, संकल्पनेत व स्वरूपात करण्यात आलेले भेददेखील अमान्य करतात.

ह्या भेदांच्या पलीकडे गेलेला आणि सर्वत्र परमेश्वराचे अस्तित्व जाणवणारा माणूस खरा धार्मिक, ही त्यांची साधी सरळ व्याख्या त्यांनी कायम मांडलेली आहे. असे असले तरी धर्मपंडितांच्या एकेश्वरवाद आणि अद्वैतवाद या वादात कबीर साहेबांना रस नाही.

अभ्यासक म्हणवणाऱ्या अनेकांनी कबीर साहेब त्यांच्या दोह्यांमधून हिंदू तत्त्वज्ञानाजवळ जातात की इस्लामी तत्त्वज्ञानाचे प्रतिपादन करतात याचा व्यर्थ शोध घेण्याचा प्रयत्न केला. केवळ ग्रांथिक ज्ञानानी रूक्ष झालेले लोक परमेश्वर या तरल व संवेदनशील संकल्पनेला कदापि स्पर्श करू शकत नाहीत; कारण ही संकल्पना मनाने जाणण्याची आहे न की बुद्धीने.

तसेच परमेश्वराशी एकरूप होणे महत्त्वाचे असते, त्याची व्याख्या करणे महत्त्वाचे नसते. कबीर साहेबांसाठी माणसाने माणूस होणे म्हणजे परमेश्वराची प्राप्ती होणे. त्यामुळे राम अथवा रहीम ह्या परमेश्वराच्या नावांपेक्षा त्याच्यातील भाव जाणणे कबीर साहेबांसाठी महत्त्वाचे आहे. नावांच्या भिन्नतेवरून परमेश्वर दोन होत नाहीत. हा द्वैत भाव व्यर्थ आहे.

प्रत्येक धर्म परमेश्वराला संपूर्ण ब्रह्मांडाचा रचनाकार मानत असेल तर त्याच्यात धर्मावरून आणि नावावरून बदल कसा होऊ शकतो, हा साधा-सरळ प्रश्न कबीर साहेब करतात. त्यांच्याकडे शास्त्रार्थाच्या नावाखालील वांझोट्या सिद्धांतांना आणि वादविवादाला स्थान नाही.

कबीर साहेबांची परमेश्वर आणि धर्म ही संकल्पना समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणारी, त्याला समजणारी आणि त्याला सामावून घेणारी आहे. कोणत्याही धर्मातील भोंदूंच्या परमेश्वर, त्याला प्राप्त करण्याचे मार्ग आणि धर्माचरण यासंदर्भातील तर्कटांना कबीर साहेब नाकारतात.

त्यामुळे ते भोंदूंना विचारतात, ‘मला सांगा परमेश्वर दोन कसे झाले? विनाकारण भ्रम निर्माण करू नका. परमेश्वरानं दोन धरित्री निर्माण केलेल्या नाहीत. धर्माच्या नावाखाली धरणीची विभागणी करण्यात आलेली आहे.

राम-रहीम जपण्यात तुम्हाला शुद्ध राहिलेली नाही. माळ जपणाऱ्या अथवा चित्र पूजणाऱ्या भोंदूनो जागे व्हा! शुद्धीवर या! केवळ हा मुसलमान (तुरुक), हा हिंदू असा भेद करू नका अथवा त्याचा उच्चार करू नका.

अरे भाइ दोइ कहाँ से मोहि बतावो ।

विचिही भरम का भेद लगावो ।

जोनि उपाइ रेची द्वै धरनीं, दीन एक बीच भई करनीं ।

राम रहीम जपत सुधि गई, उनि माला उनि तसवी लइ ।

कहै कबीर चेत रे भोंदू, बोलनिहारा तुरुक न हिंदू ।

कबीर साहेब यावर थांबत नाहीत तर आपला परमेश्वर कसा आहे, याचेदेखील उत्तर देतात. आमच्या परमेश्वराला राम, रहीम, करीम, केशव, अल्ला, बिसमिल, विश्वंभर इत्यादी सर्व परमेश्वराची नावं आहेत. येथे भेद करण्यास जागा नाही.

हमारे राम रहीम करीमा, कैसो अलह राम सति सोई ।

बिसमिल मेटि बिसंभर एकै, और न दूजा कोई ।।

कबीर साहेबांचे राम -रहीम घटा-घटात अर्थात माणसा-माणसात सामावलेले आहेत. त्यांच्या ह्या विचारांना काही लोक एकेश्वरवाद, अद्वैतवाद, विशिष्टाद्वैतवाद इत्यादी वादावादीत कोंबण्याचा प्रयत्न करतात. अनेकजण कबीर साहेबांना धर्मनिरपेक्षतेच्या पारंपरिक व्याख्येत बसवण्याचा प्रयत्न करतात.

ते मात्र ह्या सर्व भेदांच्या पल्याड उभे असलेले दिसतात. त्यांना मानवनिर्मित धर्मच अमान्य असलेले दिसतात. परमेश्वराने सकल सृष्टी निर्माण केली आहे. तो प्रत्येकात वसलेला आहे, अशावेळी धर्माच्या नावाखाली त्याच्यामध्ये तुम्ही द्वैत निर्माणच करू शकत नाहीत.

थोडक्यात कबीर साहेबांचा धर्म हा मानवधर्म ठरतो. त्यांना धर्मनिरपेक्ष संबोधणेदेखील त्यांना संकुचित करण्यासारखे आहे. अंतरातील रामापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्याच धर्माची आवश्यकता त्यांना वाटत नाही.

यासाठी संतांनी मार्गदर्शकाची भूमिका करावी, अशी अपेक्षा कबीर साहेब करतात. संतांमध्ये ज्ञानाचे वादळ निर्माण होणे अपेक्षित आहे. ह्या वादळात बुद्धीवरील भ्रमरूपी पडदा उडून गेला पाहिजे.

मोह-मायेच्या बंधनांनी त्याला बांधून ठेवता कामा नये. ज्ञानाच्या वादळात मनरूपी घरावर पडलेले तृष्णारूपी छप्पर आणि त्याला आधार देणारे द्विधा व अनिश्चयाचे दोन खांबदेखील उडून गेले पाहिजेत. ह्या खांबावर विसावलेली मोहरूपी तुळईदेखील (बल्ली) कोलमडून पडावी. कुबुद्धीचे भांडे फुटावे.

संतौ भाई आई ग्यान की आँधी रे ।

भ्रम की टाटी सबै उडाणी,माया रहै न बाँधी रे ।।

हितचित की दोउ थुनी गिरानी, मोह बलींडा टूटा ।

त्रिस्न छाँनि परी घर उपर, कुबुधि का भांडा फूटा ।।

हिंदू असो वा मुस्लिम दोन्ही धर्मातील बाह्याचार अथवा बाह्य अवडंबरांवर कबीर साहेबांनी कायमच कठोर प्रहार केलेला आहे. पंडित आणि काजी कायमच त्यांच्या टीकेचे लक्ष्य ठरलेले आहेत.

स्वामी रामनंद यांच्याकडून रामरूपी धनाची प्राप्ती झाल्यानंतर कोणत्याही धर्मातील बाह्य आचरणाला कबीर साहेबांनी महत्त्व दिले नाही.

स्वामी रामनंद यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी म्हटले आहे, की रामनंद यांच्यासारखा सद्‍गुरु मिळाल्यामुळे माझ्या मनातील सर्व दुःख, द्वंद आणि समस्या यांचे निरसन झाले आहे.

सद्गुरु के परताप तें मिटि गयौ सब दुख-दंद ।

कह कबीर दुबिधा मिटी, गुरु मिलिया रामनंद ।।

लौकिकार्थाने रामनंद यांचे ब्राह्मण असणे आणि कबीर साहेब यांचे जुलाहा असणे, तसेच रामनंद काशीचे आचार्य तर कबीर साहेब शुद्र असणे यामुळे त्यांच्या प्रेमात अंतर पडू शकले नाही. प्रेम जात, धर्म, वर्ण यांच्यासारख्या थोतांडांच्या पलीकडे असते हेच स्वामी रामनंद आणि कबीर साहेबांच्या संबंधावरून दिसून येते.

याला कारण ह्या दोघांनीही आपल्यातील राम-रहीम खऱ्या अर्थाने ओळखले होते. राम म्हणा की रहीम म्हणा त्यामुळे परमेश्वरात अंतर पडत नाही, हे त्यांना समजले होते. कबीर साहेब म्हणजे महासागर आहे, माणूस जेवढा आत जाण्याचा प्रयत्न करतो तेवढी त्यांच्या सखोलतेची जाणीव पुढे-पुढे जाण्यासाठी अस्वस्थ करते.

वेदांपासून कुराणापर्यंत सगळ्यांना बाजूला ठेवून माणसापासून माणसापर्यंतचा केलेला प्रवास म्हणजे कबीर साहेब. कबीर साहेबांची सीमा माणसापासून सुरू होते आणि माणसाजवळ येऊन संपते. त्यांचे साधुत्व अथवा संतत्व बेहद्द म्हणजे सीमा नसलेले आहे. सीमेत राहतो तो सामान्य माणूस आणि सीमातीत असतो तो साधू.

कबीर साहेबांनी कायमच सर्वप्रकारच्या मानवी सीमांना कःपदार्थ मानले. आयुष्यभर मानवी सीमांच्या बाहेर माणसाचा आणि त्याच्यातील सीमातीत अतीताचा म्हणजे परमेश्वराचा शोध घेणारा शोधयात्री म्हणजे कबीर साहेब.

लाओत्सेच्या भाषेत शब्दातीत तोओला शब्दात पकडण्यासाठी धडपडणारा माणूस. अशा कबीर साहेबांच्या संतत्वाच्या सीमांचा शोध संपत नसला तरी माणसाला स्वतःच्या माणूसपणाचा शोध यामुळे नक्कीच लागतो.

हद में रहै सो मानवी, बेहद रहै सो साधु ।

हद-बेहद दोनों तजै, तिनका मता अगाधु ।।

हद-बेहद दोनों तजी, अवरन किया मिलान ।

कहै कबीर ता दास पर, बारौं सकल जहान ।।

-----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT