shikhar dhawan  esakal
साप्ताहिक

Shikhar Dhawan: ‘गब्बर’ची निवृत्ती!

Cricket : घटस्फोटानंतर जिवलग मुलाचा ताबा शिखरच्या पत्नीकडे गेला, त्यावेळी मुलाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या शिखरने सोशल मीडियाद्वारे भावना व्यक्त करून मन मोकळे केले होते

साप्ताहिक टीम

किशोर पेटकर

आंतरराष्ट्रीय-देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर शिखर धवन आता आता निवृत्त खेळाडूंच्या लिजंड्स लीगमध्ये खेळणार असून त्याच्यासाठी ही नवी सुरुवात आहे. आगामी लिजंड्स लीगमध्ये तो गुजरातच्या संघातून खेळताना दिसेल.

भारतीय क्रिकेटसंघाचा ‘गब्बर’ अर्थात शिखर धवन आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून नुकताच निवृत्त झाला. शिखर धवन म्हणजे भारतीय क्रिकेटमधील आगळेवेगळे रसायन. शांत, संयमी, निर्भय आणि सदा हसतमुख व्यक्तिमत्त्व. त्याची तऱ्हाच हटके.

लवकर बाद झाला तरीही न चिडता स्वतःशीच हसत पॅव्हेलियनमध्ये परतणारा हा धडाकेबाज डावखुरा फलंदाज. त्याचा आत्मविश्वास प्रबळ, त्यामुळेच निवृत्तीसाठी तो वयाच्या ३८व्या वर्षापर्यंत थांबला. भारताकडून पुन्हा खेळण्याबाबत तो आशावादी होता, पण तंदुरुस्तीत मागे पडला. देशासाठी पुन्हा खेळायला मिळणार नाही याचे दुःख करण्यापेक्षा, देशासाठी खेळलोय याचा फार मोठा आनंद असल्याचे त्याने सांगितले.

हा आक्रमक शैलीचा फलंदाज क्रिकेटमधील ‘गब्बर’ याच टोपणनावाने जगप्रसिद्ध झाला. शिखरची केशरचनाही भन्नाट. मिशांना पीळ देण्याची त्याची खास पद्धत, प्रतिस्पर्धी फलंदाजाचा झेल पकडल्यावर आपल्या मांडीवर थाप देत केलेला जल्लोष, शतक नोंदविल्यानंतरची अदाकारी साऱ्यांनाच भावली.

उत्तुंग फटक्यांसह क्षेत्ररक्षकांमधून अचूक जागा हेरणारी त्याची शैलीदार फलंदाजीही नयनरम्य ठरली. फलंदाजीप्रमाणेच त्याचा स्वभावही बिनधास्त आणि दिलदार. त्याच्या वैवाहिक जीवनात वादळे आली, ती पचवताना तो पूर्णतः खचला नाही.

२०१९ नंतर त्याची फलंदाजी कोमेजत गेली, पण चेहऱ्यावरील हास्य फुललेलेच राहिले. हीच त्याची खासियत. डिसेंबर २०२२मध्ये तो भारतातर्फे शेवटचा खेळला. घटस्फोटानंतर जिवलग मुलाचा ताबा शिखरच्या पत्नीकडे गेला, त्यावेळी मुलाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या शिखरने सोशल मीडियाद्वारे भावना व्यक्त करून मन मोकळे केले होते.

संस्मरणीय कामगिरी

शिखरने कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेट मिळून आंतरराष्ट्रीय मैदानावर २६९ सामने खेळताना १०,८६७ धावा केल्या. त्यात २४ शतके आहेत, त्यापैकी १७ एकदिवसीय क्रिकेटमधील. ऑक्टोबर २०१०मध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर तीन वर्षांनी त्याला कसोटी क्रिकेटची प्रतिष्ठित कॅप मिळाली आणि त्याने संधीचे सोने केले.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहाली येथे मार्च २०१३मध्ये तो पहिली कसोटी खेळला. कसोटीतील पहिलाच डाव, पण त्याने आपल्या आक्रमक शैलीला मुरड घातली नाही.

पदार्पण दणकेबाज ठरविताना ८५ चेंडूत शतकाला गवसणी घातली आणि नंतर १७४ चेंडूत झंझावाती १८७ धावा करून बाद झाला. त्याच्या कारकिर्दीत २०१३ हे वर्ष खास ठरले. त्यावर्षी भारताने चँपियन्स ट्रॉफी जिंकली, त्यात शिखरचा वाटा मोलाचा होता. या स्पर्धेत त्याने दोन शतकांसह ३६३ धावा केल्या. रोहित शर्मासमवेत त्याची सलामीला जोडी चांगलीच जमली.

उशिराच संधी मिळाली

सन २००४चा १९ वर्षांखालील विश्वकरंडक खेळून शिखर प्रकाशझोतात आला. त्यावेळी त्याने तीन शतके व ८४.१६च्या सरासरीने ५०५ धावा केल्या. परंतु, भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी त्याला सहा वर्षे प्रतीक्षा करावी लागली. तोपर्यंत तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगलाच रुळला होता आणि या पातळीवर धावांचे सातत्य राखलेले असताना त्याला आयपीएल स्पर्धेने साथ दिली. जबरदस्त आत्मविश्वासाच्या बळावर त्याने निवड समितीला प्रभावित केले आणि उशिरा सुरू झालेली आंतरराष्ट्रीय कारकीर्द तब्बल बारा वर्षे प्रकाशमान राहिली.

लिजंड्स लीग क्रिकेट (LLC)

आंतरराष्ट्रीय-देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर शिखर धवन आता मुक्त क्रिकेटपटू आहे आणि जगभरात विखुरलेल्या विविध लीग क्रिकेट स्पर्धांत बीसीसीआयच्या परवानगीशिवाय खेळू शकेल. तो आता निवृत्त खेळाडूंच्या लिजंड्स लीगमध्ये खेळणार असून त्याच्यासाठी ही नवी सुरुवात आहे. आगामी लिजंड्स लीगमध्ये तो गुजरातच्या संघातून खेळताना दिसेल.

(किशोर पेटकर सकाळ माध्यम समूहाच्या दै. गोमन्तकचे क्रीडा वार्ताहर आहेत. )

----------------------------

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT