isro contribution for ram mandiar  esakal
साप्ताहिक

Ayodhya Ram Mandir : राम मंदिराच्या तंत्रज्ञानात इस्रोचाही हातभार?

सूर्यतिलक हे राम मंदिराचं एक खास वैशिष्ट्य आहे. रामनवमीच्या दिवशी सूर्यकिरण थेट बालकरामाच्या मूर्तीवर पडतील ही यापाठची भूमिका आहे.

साप्ताहिक टीम

डॉ. बाळ फोंडके

राम मंदिराच्या निर्माणात अनेक संस्थांचा हातभार लागलेला आहे. त्यात काही राष्ट्रीय विज्ञान तंत्रज्ञान संशोधन संस्थांचाही मोलाचा सहभाग आहे. अगदी सुरुवातीपासूनच या संस्था मंदिराच्या उभारणीत सहभागी होत्या.

सर्वोच्च न्यायालयाने २०१९मध्ये दिलेल्या निवाड्यानुसार राम मंदिराची उभारणी पावणेतीन एकराच्या ज्या भूखंडावर करायची होती, तेथे नेमक्या कोणत्या ठिकाणी मंदिराची स्थापना करायची याचा निर्णय करण्यासाठी केवळ इतिहासातील किंवा पुराणातील दाखल्यांवर विसंबून न राहाता आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली गेली.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (कौन्सिल ऑफ सायंटिफिक अॅण्ड इंडस्ट्रिअल रिसर्च -सीएसआयआर) सेन्ट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूटवर (सीबीआरआय) ही जबाबदारी सोपवली गेली होती.

त्यासाठी प्रथम जमिनीची तपासणी करणं आवश्यक होतं. या स्थाननिश्‍चितीसाठी संपूर्ण भूखंडात आठ ते अकरा सेंटीमीटर खोदून तिथल्या मातीचं परीक्षण केलं गेलं. शरयू नदी तिथून केवळ एक किलोमीटर दूरवर आहे.

त्यापायी इथल्या जमिनीत वाळूचा मोठा भाग आहे. त्यावर भक्कम बांधकाम करणं अशक्यप्राय होतं. त्यावर मात करणं ही प्राथमिक गरज झाली होती. त्यावर सीबीआरआयनं अनोख्या तंत्रज्ञानाचा वापर केला.

हे मोठं आव्हान होतं. संपूर्ण बांधकामासाठी पोलादाचा वापर न करण्याचं धोरण आखलं गेलं होतं, कारण पोलादाची आयुर्मर्यादा ८० ते ९० वर्षं एवढीच असते. मंदिर किमान हजार वर्षं टिकून राहावं असं लक्ष्य होतं.

सिमेंट काँक्रीटही फक्त पायाच्या खालच्या स्तरावरच वापरलं गेलं, प्रथम जमीन बारा ते चौदा मीटर खोलीपर्यंत खणून काढली गेली. त्यावर इंजिनियर्ड मातीचे तब्बल ४७ थर देण्यात आले.

प्रत्येक थरावर दाब देऊन त्याची घनता वाढवण्यात आली. त्याच्यावर दीड मीटर जाडीच्या धातूविरहित काँक्रीटची भर घालण्यात आली.

त्यालाही अधिक भक्कम करण्यासाठी दक्षिण भारतातून आणलेल्या खास कातळाचं, साडेसहा मीटर जाडीचं जोतं बांधण्यात आलं.

अशा तऱ्हेनं तो पाया खचणार नाही याची खात्री झाल्यावर पुढील बांधकामाची तयारी करण्यात आली.

परत एकदा सीबीआरआयचे वैज्ञानिक पुढं सरसावले आणि त्यांनी खासगी क्षेत्रातील काही नामवंत संस्थांच्या सहकार्यानं ५७ हजार चौरस फुटांच्या बांधकामास हात घातला.

हा परिसर हिमालयाच्या पायथ्याजवळचा आहे. तिथं वारंवार भूकंप होत असतात. त्यामुळं या जागांची भूकंपप्रवणता मोजणंही गरजेचं होतं.

ती कामगिरी हैदराबादच्या नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटनं (एनजीआरआय) पार पाडली.

त्याच्या आधारे ८ रिख्टर मात्रेच्या भूकंपालाही दाद न देणाऱ्या वास्तूचं बांधकाम करण्यासाठीचा स्थापत्य आराखडा तयार करण्यात आला. हे काम वरील दोन्ही संस्थांच्या सहकार्यातून पार पडलं.

पुरातत्त्व विभागाच्या वैज्ञानिकांनी बाराव्या शतकापूर्वीच्या मंदिरांच्या बांधकामासाठी कोणत्याही धातूचा वापर केला गेला नसल्याची माहिती दिली होती.

पोलाद किंवा सिमेंट काँक्रीटचा वापर करावयाचा नसल्यामुळं प्राचीन नागर शैली आणि आधुनिक वास्तुविज्ञान यांचा मिलाफ केला गेला. त्यासाठी तब्बल पन्नास निरनिराळी संगणक प्रारूपं तयार केली गेली.

त्यांचा सखोल अभ्यास झाल्यावरच अंतिम वास्तुशास्त्रीय रचनाबंध ठरवला गेला. संपूर्ण बांधकामासाठी केवळ फिकट गुलाबी रंगाच्या वालुकामय दगडाचाच वापर केला गेला आहे. हा दगड राजस्थानातील बन्सी पहाडपूर येथून आणण्यात आला. तो दणकट तर आहेच, पण त्यात पाणी झिरपू शकत नाही.

त्यामुळं वादळ-पावसाला तोंड देण्यास तो समर्थ आहे. शिवाय त्याची ताण सहन करण्याची शक्तीही जास्ती आहे. संपूर्ण तीन मजली आणि तब्बल १६० फूट उंचीच्या वास्तूत केवळ या दगडाचाच वापर झाला आहे.

प्रत्यक्ष बांधकाम होत असताना क्षणोक्षणी सीबीआरआयबरोबर अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) बांधकामाच्या स्थापत्य स्वास्थ्यावर नजर ठेवून होती.

त्या दगडांच्या तसंच इतर बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या ग्रॅनाईट आणि संगमरवर यांच्या ठोकळ्यांची बारकाईनं तपासणी करण्यात आली. त्यांचा टणकपणा सिद्ध करण्यासाठी श्मिड हॅमर टेस्ट ही प्रमाण पद्धत वापरली गेली.

त्यातून तावून सुलाखून बाहेर पडलेल्या दगडांचाच वापर करण्यात आला. जे त्या कसोटीला उतरले नाहीत त्यांची खाणीजवळच विल्हेवाट लावण्यात आली.

या दगडांची संख्याही छाती दडपणारी आहे. ग्रॅनाईटचे २१ हजार, वालुकामय दगडाचे ३३ हजार आणि संगमरवराचे ७ हजार ठोकळे वापरले गेले. टाकून देण्यात आलेल्या ठोकळ्यांची भर त्यात घातली तर संख्या त्याहूनही अधिक होईल.

मंदिराच्या तळमजल्यावर १६०, पहिल्या मजल्यावर १३२ आणि दुसऱ्या मजल्यावर ७४ दगडी स्तंभ आहेत.

प्रत्येक स्तंभ अखंड दगडातून कोरून काढण्यात आला आहे आणि त्याला थोडाफार पिरॅमिडचा आकार देण्यात आला आहे. त्यामुळं तो त्याच्यावरचा भार सहज पेलेल याची खात्री करून घेण्यात आली आहे.

त्यासाठी एकेका स्तंभाची स्थापत्य परीक्षा म्हैसूरच्या कोलार सोन्याच्या खाणीजवळ असलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रॉक मेकॅनिक्सकडून (एनएमआरआय) करण्यात आली आहे.

त्यावरच्या शिल्पांसाठी कोरीव काम करणं सोपं नव्हतं. कारण तो दगड टणक असल्यामुळं त्याच्यावर ओरखडा काढणंही कसोटी पाहणारं होतं. गर्भगृहासाठी मात्र सगळीकडे मकराना संगमरवराचाच वापर केला गेला आहे.

सिमेंटचाही वापर करावयाचा नसल्यामुळं एकावर एक दगड रचूनच सारी इमारत बांधली गेली आहे. त्यासाठी ते दगड जागच्या जागीच राहतील याची व्यवस्था करावयाची होती.

ती पार पाडण्यासाठी खालच्या दगडाला थोडाफार अंतर्गोलाकार दिला गेला तर त्यावरच्या दगडाला बहिर्गोलाकार. त्यामुळं ते एकमेकांवर चपखल बसले. तसंच त्यांच्यामधील घर्षणाचं बल त्यांना जागीच बांधून ठेवण्याचं काम चोख बजावत आहे.

बालकरामाची ५१ इंच उंचीची मूर्तीही खास कर्नाटकातून आणलेल्या काळ्या ग्रॅनाईटच्या एकसंध अखंड दगडातून साकारली गेली आहे. त्या दगडाच्याही नॉन इन्व्हेझिव्ह अशा अल्ट्रासाऊन्ड आणि थर्मोग्राफिक चाचण्या घेण्यात आल्या.

त्याच्या कॉम्प्रेसिव्ह, टेन्साईल, बेंडिंग अशा अनेक प्रकारच्या ताकदीची तपासणी करण्यात आली. शिवाय त्याच्या आत कुठं भेगा किंवा काही मोड नाहीत याचीही खात्री करून घेण्यात आली आहे.

मूर्तीला पाणी आणि दूध यांचा अभिषेक होण्याची शक्यता लक्षात घेऊन तो दगड पाणी शोषून घेत नाही; तसंच त्याची कार्बनयुक्त पदार्थांशी काही विक्रिया होण्याचीही शक्यता नाही याचीही खातरजमा करून घेण्यात आली.

त्यानंतरच दगड शिल्पकाराच्या स्वाधीन करण्यात आला. त्या ग्रॅनाईटचं वयही एनआयआरएमनं तपासलं आहे. ते किमान अडीच अब्ज वर्षं असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे.

सूर्यतिलक हे राम मंदिराचं एक खास वैशिष्ट्य आहे. रामनवमीच्या दिवशी सूर्यकिरण थेट बालकरामाच्या मूर्तीवर पडतील ही यापाठची भूमिका आहे. पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या गिरकीमुळं त्या परिप्रेक्ष्यात सूर्याचं स्थान दर दिवशी बदलत असतं.

त्यामुळं कोणत्याही एका ठिकाणी सूर्याचे किरण दिवसागणिक वेगवेगळ्या कोनातून येतात. याचं प्रत्यंतर आपल्यालाही नेहमीच मिळत असतं. घरात दरदिवशी सूर्यप्रकाश नेमका कुठं पडतो हे पाहत राहिल्यास हे सहज समजून येतं.

त्यामुळं रामनवमीच्या दिवशी मंदिराजवळ सूर्याचे किरण कुठं येणार आहेत, याची अचूक माहिती मिळवणं आवश्यक होतं. ती नाजूक कामगिरी बंगळूरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्सनं पार पाडली.

इस्रोनं गेल्या वर्षी सूर्याच्या अभ्यासासाठी जे आदित्य यान अंतराळात धाडलं आहे त्यावरील काही प्रयोगांची उपकरणं याच संस्थेनं तयार केली होती. त्यामुळं संस्थेकडे सूर्याविषयीच्या तंत्रज्ञानाचं भांडारच आहे. त्याच्याच आधारावर वर्षभराच्या सूर्यकिरणांच्या दिशेचा अभ्यास करून, सरासरी काढून त्यांनी ती दिशा निश्चित केली.

त्यानंतर कळसाजवळ पडणाऱ्या त्या किरणांना योग्य दिशेनं वळण देऊन ते मूर्तीवर पडतील याची खातरजमा करण्यासाठी निरनिराळे आरसे आणि भिंगं यांचा गुंतागुंतीचा रचनाबंध तयार केला गेला.

दरवर्षी रामनवमी निरनिराळ्या तारखांना येत असते. त्याची सोय करण्यासाठी या रचनाबंधाला योग्य त्या गिअरची जोडणीही देण्यात आली आहे.

त्यामुळं रामनवमीच्या दिवशी माध्यान्ही ठीक बारा वाजता सूर्यदेव जणू बालकरामाच्या भाळी प्रकाशाचा टिळाच लावणार आहेत. हाच आहे सूर्यतिलक.

सीएसआयआरच्या आणखी एका संस्थेचंही आगळं वेगळं योगदान राहिलेलं आहे. पालमपूरस्थित इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन बायोटेक्नॉलॉजी (आयएचबीटी) या संस्थेनं प्राणप्रतिष्ठेच्या पूजेसाठी खास अशा ट्यूलिप फुलांचा पर्याप्त पुरवठा केला आहे.

ही फुलं अतिशय देखणी असतात आणि ती फक्त हिमालय प्रदेशातच फुलतात. तीही केवळ वसंत ऋतूत.

पण या संस्थेनं वर्षभर ती फुलत राहण्याचं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. त्याच्याच मदतीनं सध्याच्या हेमंत ऋतूतही या संस्थेनं या फुलांचा सढळ पुरवठा पूजेसाठी केला.

याखेरीज छोट्या मोठ्या कामांसाठी आयआयटी चेन्नई, मुंबई आणि अन्य काही संस्थांचांही सहभाग राहिलेला आहे. विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रानंही या राष्ट्रीय अभियानात कळीची भूमिका बजावलेली आहे.

--------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT