senior citizen jobs in india  esakal
साप्ताहिक

Second Inning : निवृत्त झाल्यानंतरही सक्रिय राहणे ही मानसिक गरज?

Job to senior citizen : आजमितीला भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ११ टक्के लोकांनी वयाची साठी ओलांडली आहे

साप्ताहिक टीम

काही वर्षांपूर्वी आलेला इंटर्न नावाचा एक चित्रपट आठवतोय? सत्तर वर्षांचा ‘तरुण’ बेन व्हिटॅकर एका फॅशन इ-कॉमर्स स्टार्टअपमध्ये सिनियर इंटर्न म्हणून दाखल झालाय. ज्या इमारतीत बेन आता नव्या भूमिकेत वावरतो आहे, त्याच इमारतीत त्यानं आधीही नोकरी केली आहे. त्यावेळी ती इमारत दुसऱ्या कोणाच्या तरी मालकीची होती. पण बेन तिथं वावरला आहे– थोडीथोडकी नव्हे, जवळजवळ चाळीस वर्षं.

जगाचा काही थोडा अनुभव गाठीशी असणाऱ्या बेनची नवी भूमिका आहे अबाउट द फिट नावाच्या त्या फॅशन वेबसाइटच्या तरुण सीईओच्या साहाय्यकाची. ही सीईओ, ज्यूल्स ऑस्टीन तिचं नाव; बेनच्या निम्म्या वयाची. वर्कोहोलीक. तिच्या स्टार्टअपला यश मिळावं म्हणून ती प्रचंड धडपडते आहे. व्यवसायाबद्दल तिची काही स्वप्नं आहेत. तरीही सर्व आलबेल आहे, असं नाही. सिनियर इंटर्न बेन सुरुवातीला ज्यूल्सच्या खिजगणतीतही नाहीये. पण गोष्टी अशा घडत जातात, की बेनचं असणं ज्यूल्ससाठी खूप महत्त्वाचं ठरतं. अशी काहीशी ही कथा आहे. रॉबर्ट डी निरो आणि अॅना हॅथवे या अभिनयसंपन्न कलाकारांनी इंटर्नमध्ये बेन आणि ज्यूल्स साकारले आहेत.

इंटर्नची आठवण झाली, कारण गेल्या आठवड्यात बंगळूरहून आलेली एक बातमी. बंगळुरात नुकताच एक नोकरी मेळावा झाला. आपल्याकडे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांची संख्या लक्षात घेता जॉब फेअर ही काही बातमी असू शकत नाही. पण हा नोकरी मेळावा थोडा वेगळा होता. या मेळाव्यात तीस कंपन्या सहभागी झाल्या होत्या. अभियंते, तंत्रज्ञ, प्रशासक, प्रशिक्षक अशा जागा होत्या आणि या कंपन्यांना अपेक्षित उमेदवार होते ते वयाच्या साठीपलीकडले. जवळजवळ पाचएकशे ज्येष्ठांनी या मेळाव्याला हजेरी लावली होती आणि त्यातल्या काहींना ऑफर लेटर्सही मिळाली, असं त्या बातमीत म्हटलं होतं.

वृद्धत्व म्हणजे आरोग्याच्या कुरबुरी, शारीरिक मर्यादा, वाढते खर्च, दुर्लक्ष, एकांत, परावलंबित्व या समजांवर मात करत वयाच्या साठीनंतरचे आयुष्य म्हणजे दुसरी इनिंग खेळण्याची संधी असा जो एक दृष्टिकोन रुजू पाहतो आहे; त्याचाच बंगळूरचा नोकरी मेळावा हा एक इंडिकेटर.

एका अंदाजानुसार आजमितीला भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ११ टक्के लोकांनी वयाची साठी ओलांडली आहे. म्हणजे साधारण १६ कोटी लोक साठीच्या पलीकडचे आहेत. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडाने मध्यंतरी मांडलेल्या एका गणितानुसार २०४७मध्ये भारताची लोकसंख्या १६४ कोटींवर पोहोचलेली असेल, आणि त्यापैकी २०.८ टक्के म्हणजे सुमारे ३४ कोटी नागरिकांनी वयाची साठी ओलांडलेली असेल.

वय हा केवळ एक आकडा असतो, अशा अर्थाचं एक उद्धृत आहे. आणि असंख्यांच्या बाबतीत ते खरंही आहे. स्वतःचा व्यवसाय असणाऱ्यांसाठी निवृत्ती हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असला, तरी नोकरदार मंडळींना नोकरीच्या नियमांनुसार ठरावीक वेळी निवृत्ती स्वीकारावीच लागत असते.

निवृत्तीचा उंबरा ओलांडलेला प्रत्येकच जण मनानी निवृत्त होतच असतो, असं अजिबातच नाही. काही जणांसाठी तर निवृत्त झाल्यानंतरही सक्रिय राहणे ही मानसिक गरज असू शकते आणि यातल्या अनेकांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहण्याचीही इच्छा असते.

मात्र वैयक्तिक गरजांइतकाच महत्त्वाचा भाग म्हणजे वयपरत्वे निवृत्त होणाऱ्या प्रत्येकाने आपापल्या प्रवासात कमावलेला अनुभव आणि त्या अनुभवाचा वर्तमानातल्या आणि येणाऱ्याही पिढ्यांना होणारा फायदा. बंगळुरातला नोकरी मेळावा आणि त्यामुळे आठवलेल्या इंटर्नबरोबरच याविषयावर आणखी वाचताना; अगदी लिंक्डइनसारख्या व्यवसाय, नोकऱ्या आणि करिअरशी जोडलेल्या साइट्सवरदेखील सेकंड इनिंगच्या चर्चा वाचायला मिळाल्या. टीममध्ये वेगवेगळ्या वयांतले आणि अनुभव असणारे लोक असतील तर त्याचा टीमच्या एकूण क्षमतेवर बरा परिणाम होतो, असा एक सूर यातल्या काही चर्चांमध्ये जाणवला.

या जगामध्ये निरुपयोगी असं काहीच नसतं, अशा अर्थाचं एक सुभाषित आहे. उपयोगी असण्याच्या या कल्पनेमध्ये प्रत्येकाची स्वतःची कौशल्यं आणि परिश्रमपूर्वक मिळवलेला अनुभव या गोष्टीही असतातच. ‘जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे’, या समर्थोक्तीला अनुसरत सेकंड इनिंगमध्ये स्वार्थ आणि परमार्थ साधण्याच्या प्रयत्नाकडे नेणारी मानसिकता, आणि त्यासाठी योग्य वेळेत केलेली तयारी, ज्येष्ठांना आणि भविष्यात ज्येष्ठत्वाचा उंबरा ओलांडण्याच्या बेतात असणाऱ्यांना निवृत्त्युत्तर प्रवासात सर्वार्थाने हात देण्याच्या शक्यता अजमावून पाहायला हरकत नसावी.

--------------------------

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

SCROLL FOR NEXT