निनाद परुळेकर
यंदाच्या वर्षी ताडोबा अभयारण्य नाही जमले, तरी महाराष्ट्राच्या उत्तर सरहद्दीला आणि मध्य प्रदेशाच्या दक्षिण भागात वसलेल्या पेंच व्याघ्रप्रकल्पाला नक्की भेट द्यायचीच असे ठरवून आम्ही तयारीला लागलो. एक छोटीशी फोटो सफारीच करायची हे ठरले होते.
प्रवासात वैशाख वणव्याची धग टाळण्याकरिता आणि कमीत कमी वेळेत पोहोचण्यासाठी मुंबईहून भल्या पहाटे साडेपाचला सुटणाऱ्या विमानाने निघालो. दीड तासात म्हणजे सकाळी सातच्या आसपास नागपूरला पोहोचलोसुद्धा. तेथून आधी ठरवून ठेवलेल्या इनोव्हा गाडीत बसून दोन तासांत आम्ही पेंच टायगर होम ह्या तुरीया नामक भागात असलेल्या रिसॉर्टमध्ये दाखल झालो.
आमच्या रिसॉर्टच्या शेजारीच तुरीया गेट होते. अभयारण्यात जाणारी पहिली सफारी बॅच म्हणजे मारुती-जिप्सी आणि फोर्स-जीप यांचा १५ वाहनांचा तांडा पहाटे साडेपाच वाजताच जंगलात निघून गेला होता. एक कळत नव्हते, एवढ्या धगधगत्या वैशाख-वणव्याच्या काळात सुखद शीतलता का जाणवतेय?
नंतर कळाले, तिथे आधीचे दोन दिवस सर्वत्र बराच पाऊस पडला होता. त्यापूर्वीसुद्धा गेल्या आठ-पंधरा दिवसांत मधून मधून पाऊस पडतच होता. तो सुखद थंडावा जाणवत होता ना, त्याचे कारण होते हा अवकाळी पाऊस!
त्या सकाळीही गुबगुबीत आणि विशालकाय आकाराचे ढग आकाशात तरंगत होते. सुमारे साडेबाराला धबाधबा पाऊस कोसळायला सुरुवात झाली. तासभर तो प्रकार चालला. सर्वत्र पाणी साचले, चिखल झाला. पण अर्ध्या तासातच सूर्य तळपायला लागला.
सकाळी जंगलात गेलेली सफारीची बॅच परतायला लागली. हिरव्या जिप्सींमधून हिरवे कॅमोफ्लाज कपडे घातलेले तरुण-तरुणी, डोक्यावर कॅप अथवा हॅट, गळ्यात दुर्बिणी तर अनेकांच्या खांद्यांवर ५०० अथवा ६०० एमएमचे झूम लेन्स असलेले दणकट कॅमेरे, अशा दिमाखात ते सफारी-वीर रिसॉर्टकडे परतू लागले होते.
त्यांच्या चेहऱ्यांवरचे भाव आणि एकूणच बॉडीलँग्वेज पाहून ह्यांना नक्कीच काहीतरी गवसले आहे याची खात्री झाली. पैकी दोन छायाचित्रकारांना वाघ टिपता आला; एकीला रानडुकरे टिपता आली. बाकीच्यांना त्यांच्या दुर्बिणींतून अनेक पक्षी दिसले होते. या उलट आम्ही त्या दिवशी संध्याकाळी केलेल्या नाईट सफारीमध्ये मला फक्त एक हिरवा सरडा मिळाला. बाकी शून्य!
वन्यजीवनामध्ये हेच तर आशा-निराशेचे खेळ असतात. त्यामुळे आनंदातिरेक होत नाही किंवा फार वाईटही वाटत नाही.
नवा दिवस उजाडला! हा दिवस आमचा होता.
सकाळी साडेपाचला सर्वांबरोबर मीही फ्रेश होऊन आणि कॅमेरादी साधने सुसज्ज करून जिप्सीच्या शेवटच्या, आणि जरा उंच असलेल्या सीटवर बसलो. कॅनन ९०-डी कॅमेरा बॉडीला ७०-२०० एमएमची एल सिरीज झूम लेन्स, तिला 2x कन्व्हर्टर असे सेटिंग करून अगदी तयार झालो.
यात गंमत अशी, की २०० एमएम लेन्स कॅमेऱ्याला लावून मला ६०० एमएम लांब असलेले दृश्य/ पक्षी/ प्राणी टिपण्याचा फायदा मिळणार होता! कारण त्या कॅमेऱ्याची अंतर्गत रचनाच तशी होती.
अन् झालेही तसेच!
गेटवरचे प्रवेशादि सोपस्कार पूर्ण होताच ड्रायव्हरने जिप्सी जंगलातल्या एका उप-रस्त्यावर नेली. झाडांवर मस्त ऊन पडलेले होते. तेवढ्यात एक नीलपंख पक्षी (Indian Roller किंवा Blue Jay) अचानक समोरच्या झाडाच्या फांदीवर येऊन बसला. ड्रायव्हरच्याही ते लक्षात आले आणि त्याने गाडी थांबवली.
माझा कॅमेरा तयार होताच. झटकन मी कॅमेरा बटण ऑन करून क्लिक केले. नीलपंखानेही इकडे-तिकडे मान केली. त्याच्या काही छान पोझ मिळाल्या अन तो उडून गेला. सकाळीच याचे दर्शन होणे भाग्याचे असते, असा एक समज आहे. हा पक्षी तसा देखणाच आहे, पण तो पंख पसरून जेव्हा उडतो तेव्हा त्याचे सौंदर्य कित्येक पटीने वाढते.
त्यानंतर आम्ही मैलभर पुढे गेलो असू-नसू , इतक्यात डावीकडे असलेल्या झाडाच्या एका आडव्या फांदीवरील मोकळ्या जागेत एक मोठा गरुड (Spotted Eagle) त्याच्या भक्ष्यासहित कॅमेऱ्यात टिपायला मिळाला.
त्याचे उंच दणकट पाय, पायाच्या तळाला अणकुचीदार खिळ्यासारखी वलयांकित अन् तेवढीच दणकट नखे (जी तो भक्ष्याच्या शरीरात कचकन् घुसवून भक्ष्याला ठार करतो) आणि त्याचे पिवळेजर्द अन् भेदक डोळे आमच्याकडे रोखून पाहत होते. पण आमची जीप तेथे थांबताच तो आपले भक्ष्य सोडून उडून गेला.
गेल्या पंधरा दिवसांत भरपूर पाऊस पडून गेल्यामुळे अनेक ठिकाणी खड्डेमय भागांत पाणी साठले होते. त्याचप्रमाणे रस्त्यावरची मातीही ओली झाल्याने दबली होती त्यामुळे धूळ उडत नव्हती आणि त्याचा परिणाम म्हणून दृश्यमानता उत्तम होती. पण जंगलातील खड्ड्यांत आयते पाणी मिळाल्यामुळे एकूणच वन्यप्राणी उघड्यावर येतायत कशाला?
आमची जीप तशीच पुढे दोन-तीन किलोमीटर गेली असेल, एवढ्यात झाडाच्या एका उंच फांदीवर खंड्या (Kingfisher) मोठ्या ऐटीत कुकाऱ्या देत इकडे-तिकडे मान आणि चोच वळवीत होता. वास्तविक तो आपले भक्ष्य, म्हणजे मासा किंवा खेकडा अथवा सरडा शोधत होता. मी त्याला कॅमेऱ्यात अनेक अँगलने टिपले अन् तो निघून गेला. जणू काही तो फोटो काढून घ्यायलाच आला होता!
किंगफिशर उडाला अन् त्याच जागेवर एक तांबट पक्षी (Coppersmith barbet) येऊन स्थिरावला. ‘आता माझा फोटो काढ’ असेच जणू काही तो सुचवित होता! त्याचेही विविध पोझमधले फोटो काढायला मिळाले.
आता संपलंय, पुरे झालंय असे वाटते ना वाटते, इतक्यात दोन शिपाई बुलबुल पक्ष्यांची जोडी, बहुधा ते नर-मादी असावेत, बरोबर त्याच ठिकाणी पण वेगवेगळ्या फांद्यांवर उतरली. एक वर, तर एक खाली. त्यांचाही एक एकत्रितपणे फोटो टिपला.
थोडक्यात काय, तर काल ‘डाव’ लागला नव्हता, पण आज मात्र मी ‘जिंकलो’ होतो! अन् आमचे एकूणच सकाळचे फोटो सफारी सेशन बऱ्यापैकी यशस्वी झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.