वाढप
८ लवंग लता
साहित्य
सारणासाठी
अर्धी वाटी ओला नारळ चव, अर्धी वाटी भाजलेला खवा, १ वाटी पिठीसाखर किंवा गूळ पावडर, १ टेबलस्पून ड्रायफ्रुट्ची पावडर, २ ते ३ थेंब व्हॅनिला इसेन्स.
आवरणासाठी
दोन वाट्या मैदा, २ टेबलस्पून गाईचे तूप, पाणी, चिमूटभर सोडा.
पाकासाठी
एक वाटी साखर, पाणी आवश्यकतेप्रमाणे, ४ ते ५ केशरतंतू, १५ ते २० लवंगा, तळण्यासाठी तेल.
कृती
सर्वप्रथम स्टीलच्या भांड्यात नारळाचा चव, खवा, पिठीसाखर, ड्रायफ्रुट्सची पावडर व व्हॅनिला इसेन्स हे सर्व साहित्य एकजीव करून सारण तयार करावे. नंतर स्टीलच्या परातीत मैदा घ्यावा. त्यात तुपाचे मोहन, गरजेप्रमाणे पाणी, सोडा घालून घट्टसर पीठ मळून ठेवावे. नंतर समान आकाराचे गोळे करावेत.
साखरेचा घट्टसर पाक करावा व त्यात दुधात खवलेले केशरतंतू घालावेत. तयार पिठाचा एक गोळा घ्यावा. त्याची पातळसर पुरी लाटावी. मधे सारण भरून चारी बाजूंनी दुमडून चौकोनी आकार द्यावा व वरून लवंग टोचावी. ही लता तयार झाली. अशा बाकीच्या सर्व लता कराव्यात व तेलात गुलाबीसर रंगावर तळून घ्याव्यात. साखरेच्या पाकात बुडवून ठेवाव्यात. पाक मुरल्यावर चाळणीत निथळून नंतर खावयास द्याव्यात. नवरात्रात देवीला नैवेद्यदेखील दाखवावा.
**
वाढप
६ करंज्या
साहित्य
एक वाटी बारीक रवा, अर्धी वाटी मैदा, ४ टेबलस्पून गाईचे तूप, १ वाटी पाणी व दूध, मीठ.
सारणासाठी
दोन वाट्या भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचा कीस, ४ टेबलस्पून भाजलेली खसखस, दीड वाटी खडीसाखरेची पूड, अर्धा टीस्पून वेलची पूड, ५ ते ६ दुधात खवलेले केशरतंतू, ४ टेबलस्पून गुलकंद, सुंठ पावडर, १ टेबलस्पून भाजलेला रवा, काजू, बेदाणे, चारोळ्या, तळण्यासाठी तूप.
कृती
स्टीलच्या परातीत रवा, मैदा, मीठ घेऊन त्यात तुपाचे कडकडीत मोहन घालून मिश्रण एकजीव करावे. थोडे थोडे दूध व पाणी घालून पीठ घट्ट मळावे व ओल्या फडक्याने झाकून ठेवावे. नंतर पुरणयंत्रातून फेटून पिठाचा मऊसर गोळा करावा व त्याचे समान आकाराचे गोळे करावेत.
सारणासाठी स्टीलच्या भांड्यात खोबरे किसून हाताने चुरडून घ्यावे. त्यात खसखस, खडीसाखरेची पूड इत्यादी जिन्नस घालून व्यवस्थित एकजीव मिश्रण करावे. तयार पिठाचा एक गोळा घेऊन तो पुरीसारखा लाटावा. मध्यभागी सारण भरून कडा घट्ट दाबून कातण्याने कापून करंजी तयार करावी. अशा करंज्या करून तुपात मंद आचेवर तळून प्लेटमध्ये पेपरवर काढाव्यात. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात. आठ दिवस तरी टिकतात.
(टीप : करंज्या न तळता प्रीहिट केलेल्या ओव्हनमध्ये दोन्ही बाजूंनी गुलाबी रंग येईपर्यंत बेक करू शकता.)
**
वाढप
८ चंद्रकोरी
साहित्य
दोन वाट्या बारीक रवा, १ कप दूध, १ टेबलस्पून भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचा कीस व भाजलेली खसखस, पिठीसाखर आवडीप्रमाणे, पाव कप खवा किंवा दूध पावडर, २ टीस्पून ड्रायफ्रुट्स पावडर, कणभर मीठ, तळण्यासाठी तेल, २ टेबलस्पून तेल.
कृती
सर्वप्रथम स्टीलच्या परातीत रवा घेऊन त्यात २ टेबलस्पून तेल घालून मिश्रण एकजीव करावे. नंतर त्यात वरील सर्व जिन्नस घालून थोडे थोडे दूध घालून थोडी सैलसर कणीक मळावी. कणीक अर्धा तास झाकून ठेवावी. नंतर तेलाच्या हाताने कणीक चांगली मळून समान आकाराचे गोळे करावेत. एक गोळा घेऊन नेहमीसारखी पुरी लाटावी व कटरने तिला चंद्रकोरीचा आकार द्यावा. अशा सर्व चंद्रकोरी कराव्यात व गुलाबीसर रंगावर तळाव्यात. बेकही करू शकता.
**
वाढप
मालपुवा
साहित्य
अर्धी वाटी बारीक रवा, अर्धी वाटी मैदा, पाव वाटी म्हशीचे घट्ट दूध, पाव वाटी खवा, १ वाटी साखर, १ वाटी पाणी, चिमटीभर बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून वेलची व बडीशेप पूड, तळण्यासाठी तूप किंवा तेल, सजावटीसाठी बदाम-पिस्ते काप.
कृती
प्रथम मिक्सरमध्ये मैदा, दूध व रवा एकत्र करून मिश्रण तयार करावे. त्यात वेलची व बडीशेप पूड घालून धिरड्यांना करतो तसे सैलसर मिश्रण करावे. हे मिश्रण अर्धा तास ठेवावे. साखरेचा एकतारी पाक तयार करावा. त्यात चिमटीभर केशर पूड घालावी. आयत्यावेळी मिश्रणात बेकिंग पावडर घालून चांगले फेटावे. गॅसवर कढईत तूप किंवा तेल घालून छोटी धिरडी करून सोनेरी रंगावर तळावीत व कोमटसर पाकात घालावीत. धिरडी चांगली मुरल्यावर निथळून प्लेटमध्ये काढावीत व बदाम-पिस्ते कापांनी सजवावीत.
**
वाढप
१२ पिस
साहित्य
चार पिकलेली केळी, १ वाटी ओल्या नारळाचा चव, अर्धी वाटी गूळ पावडर, अर्धी वाटी नारळाचे दूध, १ टेबलस्पून तूप, पाव टीस्पून वेलची पूड, २ लवंगा, आवडीचे ड्रायफ्रुट्सचे तुकडे, ४ थेंब व्हॅनिला इसेन्स.
कृती
गॅसवर नॉनस्टिक कढईत नारळाचा चव, गूळ पावडर घालून मंद आचेवर मिश्रण शिजवावे. नंतर त्यात वेलची पूड, ड्रायफ्रुट्सचे तुकडे, व्हॅनिला इसेन्स घालून मिश्रण एकजीव करून सारण करावे. केळ्यांची साले काढून प्रत्येकाचे तीन तुकडे करून मधोमध चीर द्यावी. त्यात सारण भरावे. गॅसवर त्याच कढईत तूप तापवावे व लवंगा घालाव्यात. त्यात वरून हलक्या हाताने केळी ठेवावीत व नारळाचे दूध शिंपडून मंद आचेवर केळी शिजवावीत.
**
वाढप
८ पेढे
साहित्य
एक वाटी नारळाचा चव, अर्धी वाटी तयार रबडी, ६ गुलाब पाकळ्यांचा चुरा, ४ थेंब रोझ इसेन्स, अर्धा टीस्पून वेलची पूड, बदाम किंवा काजू आवडीप्रमाणे.
कृती
गॅसवर नॉनस्टिक कढईत मंद आचेवर नारळाचा चव गुलाबीसर परतून, त्यात तयार रबडी घालून मिश्रण एकजीव करावे. सारखे हलवत राहत मिश्रणाचा गोळा होत आला, की त्यात सुकलेल्या गुलाब पाकळ्यांचा चुरा, रोझ इसेन्स, वेलची पूड घालावी. मिनिटभराने गॅस बंद करावा. मिश्रण थाळीमध्ये काढून थंड होऊ द्यावे. थंड झाले की तयार मिश्रणाचे समान भाग करावेत. एक भाग घ्यावा व गोलाकार चेंडू बनवावा. नंतर गोलाकार भाग तळव्याने दाबून चपटा करावा. मधोमध लहानसा खळगा करून एक बदाम किंवा काजू दाबून घट्ट बसवावा. हा पेढा तयार झाला. असे बाकीचे पेढे करावेत. गोलाकार सर्व्हिंग प्लेटमध्ये गुलाब पाकळ्या पसराव्यात व त्यावर पेढे ठेवून नवरात्रात देवीला नैवेद्य दाखवावा.
**
१० ते १२ घारगे
साहित्य
अर्धी वाटी बारीक रवा, २ टेबलस्पून खवा, ४ गाजरे, गव्हाचे पीठ गरजेप्रमाणे, १ वाटी गूळ पावडर, कणभर मीठ, १ टेबलस्पून ड्रायफ्रुट्स पावडर, पाव टीस्पून वेलची पूड, तेल तळण्यासाठी.
कृती
सर्वप्रथम गाजरे स्वच्छ धुऊन साले काढावीत. गाजराचे तुकडे करून कुकरमध्ये उकडून घ्यावेत. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये प्युरी करून नंतर त्यात रवा, मीठ व गूळ पावडर घालून झाकून ठेवावे. गूळ विरघळला की त्यात मावेल एवढे गव्हाचे पीठ व इतर जिन्नस घालून चांगले मळून गोळा करावा. नंतर समान आकाराचे गोळे करावेत व पोळपाटावर कपडा ठेवून त्यावर एक गोळा थापून गोलाकार घारगा तयार करावा. मधे बोटाने भोक पाडावे. असे सर्व घारगे करावेत व नंतर तळावेत.
साहित्य
एक लिटर दूध, १ वाटी साखर, वेलची पूड, ४ ते ५ दुधात खवलेले केशरतंतू, गुलाबपाणी, गरजेप्रमाणे तयार रसगुल्ले, सजावटीसाठी बदाम-पिस्ते काप.
कृती
सर्वप्रथम गॅसवर नॉनस्टिक कढईमध्ये मंद आचेवर दूध उकळत ठेवून, सारखे ढवळत आटवून घ्यावे. नंतर त्यात साखर घालावी. साखर विरघळली की त्यात केशराचे दूध, वेलची पूड घालून गुलाबपाणी शिंपडावे व गॅस बंद करावा. तयार रबडी फ्रीजमध्ये ठेवून गार करावी. आयत्यावेळी काचेच्या बाऊलमध्ये २ तयार रसगुल्ले घालावेत व त्यावर थंडगार मलईयुक्त रबडी घालावी. बदाम-पिस्ते काप वरून घालावेत.
--------------------------