MF Husain esakal
साप्ताहिक

M.F. Husain : कलाकाराचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हेच अंतिम मूल्य मानणाऱ्या एम.एफ. हुसेन यांनी आपली तत्त्वं मात्र सोडली नाहीत..

पंचतारांकित हॉटेलपासून बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कार्यालयांपर्यंत सगळीकडे पादत्राणे न घालता हिंडणारे हुसेन कायमच चर्चेचा विषय व्हायचे.

सकाळ डिजिटल टीम

छातीवर रुळणारी पांढरीशुभ्र दाढी. मस्तकी तसेच शुभ्र पांढरे विपुल केस. अंगात खादीचा डगला आणि चुडीदार घालून, अनवाणी पायांनी सर्वत्र हिंडणारे उंचनिंच हुसेन यांचं व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रभावी होते.

पंचतारांकित हॉटेलपासून बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कार्यालयांपर्यंत सगळीकडे पादत्राणे न घालता हिंडणारे हुसेन कायमच चर्चेचा विषय व्हायचे. कधी याचं स्पष्टीकरण देत, तर कधी न देता कलंदर हुसेन मजेत सगळीकडे हिंडत असायचे.

डॉ. सुहास भास्कर जोशी

पुढच्या काळात आपलं एकेक पेंटिंग कोट्यवधी रुपयांना विकणाऱ्या हुसेन यांचं पहिलं पेंटिंग वयाच्या एकोणिसाव्या वर्षी रस्त्यावर अवघ्या दहा रुपयांना विकलं गेलं होतं!

भाषाप्रभू साहित्यिक ऑस्कर वाइल्ड याने त्याच्या द पिक्चर ऑफ डोरियन ग्रे या कादंबरीत एके ठिकाणी म्हटले आहे, “देअर इज ओन्ली वन थिंग इन द वर्ल्ड वर्स्ट दॅन बिइंग टॉकड् अबाऊट, अॅण्ड दॅट इज नॉट बिइंग टॉकड् अबाऊट.”

विसाव्या शतकातील महान भारतीय चित्रकार एम.एफ. हुसेन यांनी या वाक्याचा मथितार्थ अगदी उत्तम रीतीने जाणला होता.

पंचाण्णव वर्षांच्या आयुष्यात आपल्या जबरदस्त चित्रकौशल्यामुळे आणि वादग्रस्त चित्रकृतींमुळेच नव्हे, तर चित्रपट दिग्दर्शनसारख्या इतर क्षेत्रातील कर्तृत्वामुळे, आपल्या वागण्या-बोलण्यामुळे, फार काय तर पोशाख-पादत्राणांमुळे (खरं तर पायात काही न घालण्यामुळे) हुसेन अखेरपर्यंत लोकांच्या कायम चर्चेचा विषय होत राहिले.

अफाट ऊर्जा आणि विलक्षण प्रतिभा यांच्या जोरावर या भारतीय कलावंताने लोकप्रियता, अमाप संपत्ती आणि अनेक मानसन्मान प्राप्त केले.

त्याचवेळी समाजाच्या एका घटकाकडून त्यांना पराकोटीचा विरोध-टीका इतकेच नव्हे तर जीवे मारण्याची धमकीही मिळाली. परिणामी आयुष्याच्या अखेरीस त्यांना भारताबाहेर वास्तव्य करावे लागले. कलाकाराचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हेच अंतिम मूल्य मानणाऱ्या हुसेन यांनी आपली तत्त्वं मात्र सोडली नाहीत.

भडक रंगात, आक्रमक पद्धतीत आणि सुधारित क्युबिस्ट शैलीत चित्रं काढणाऱ्या एम.एफ. -मकबूल फिदा हुसेन (१९१५-२०११) यांना ‘भारतीय पिकासो’ असं नामाभिधान मिळालं होतं. हुसेन यांनी त्याबद्दल कमीपणा मानला नाही, आणि अवास्तवरीतीनं त्यांनी ते मिरवलंही नाही.

पंढरपूर इथं जन्मलेल्या आणि आयुष्याचा नऊ दशकांपेक्षा जास्त काळ भारतात व्यतीत करणाऱ्या हुसेन यांनी अस्सल भारतीय समाजमन दर्शविणाऱ्या (हिंदू) पुराणकथा व सामाजिक समस्यांशी संबंधित चित्रं आपल्या शैलीत रंगवली.

विसाव्या शतकातील भारतीय कलाविश्वावर आपली अमिट नाममुद्रा उमटवणाऱ्या हुसेन यांना पद्मश्री (१९६६), पद्मभूषण (१९७३) आणि पद्मविभूषण (१९८१) या सन्मानांनी गौरवण्यात आलं. १९८६ ते ९२ या काळात ते राज्यसभेचे सन्माननीय सदस्य होते.

बनारस हिंदू युनिव्हर्सिटी तसेच युनिव्हर्सिटी ऑफ म्हैसूर यांनी त्यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली. पेंटिंगशिवाय फोटोग्राफी, प्रिंटमेकिंग, लघुपट आणि चित्रपट निर्मिती-दिग्दर्शन या क्षेत्रातही हुसेन यांनी स्वतःचा ठसा उमटवला.

राजस्थानवरील त्यांच्या १९६७ सालच्या लघुपटाला ‘नॅशनल फिल्म अवॉर्ड फॉर बेस्ट एक्सपरिमेन्टल फिल्म’ हा पुरस्कार तर मिळालाच, परंतु बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘गोल्डन बेअर शॉर्ट फिल्म अवॉर्ड’ही मिळाले.

गजगामिनी हा २००० साली आलेला, त्यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट माधुरी दीक्षित, नसिरुद्दीन शहा, शबाना आझमी, आणि शाहरुख खान अशी आघाडीच्या कलाकारांची मोठी फौज असलेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर पडला.

परंतु गूढ-धूसर विषय आणि बोल्ड रंगसंगती असणारा हा चित्रपट कलाजगतात चर्चेचा विषय झाला होता. २००४ साली आलेल्या हुसेन यांच्या मीनाक्षी: ए टेल ऑफ थ्री सिटीज या चित्रपटाचे स्क्रिनिंग कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Film Festival) झाले, परंतु सर्वसामान्य रसिकांसाठी दुर्बोध वाटल्याने, हा चित्रपट उपेक्षेचा आणि टीकेचा धनी झाला.

छातीवर रुळणारी पांढरीशुभ्र दाढी. मस्तकी तसेच शुभ्र पांढरे विपुल केस. अंगात खादीचा डगला आणि चुडीदार घालून, अनवाणी पायांनी सर्वत्र हिंडणारे उंचनिंच हुसेन यांचं व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रभावी होते.

पंचतारांकित हॉटेलपासून बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कार्यालयांपर्यंत सगळीकडे पादत्राणे न घालता हिंडणारे हुसेन कायमच चर्चेचा विषय व्हायचे. कधी याचं स्पष्टीकरण देत, तर कधी न देता कलंदर हुसेन मजेत सगळीकडे हिंडत असायचे.

हुसेन यांची पेंटिंग नेहमीच प्रदर्शनांमध्ये कलारसिकांच्या कुतूहलाचा विषय झालेली असत. आणि धनिकांच्या दिवाणखान्यात ‘स्टेटस सिंबॉल’ म्हणून कौतुकानं विराजमान झालेली असत.

पेंटिंगना एवढी अफाट रक्कम मिळू शकते, हे भारतीयांना हुसेन यांच्या चित्रकृतींना मिळणाऱ्या लिलावातील विक्रीच्या किमतींवरूनच कळले होते. हुसेन यांच्या द पपेट डान्सर्स या पेंटिंगला दीड कोटी रुपये, बॅटल ऑफ गंगा-जमुनाला नऊ कोटी रुपये मिळाले होते.

तीन वर्षांपूर्वी म्हणजे सप्टेंबर २०२०मध्ये त्यांच्या व्हॉईसेस (Voices) या १९५८ साली काढलेल्या पेंटिंगला विक्रमी १८.४७ कोटी रुपये मिळाले होते.

हुसेन यांचा जन्म १७ सप्टेंबर,१९१५ रोजी पंढरपूर इथे सुलेमानी बोहरा कुटुंबात झाला. त्यांचे वडील फिदा हुसेन, तर आई झैनब. त्यांचं बालपण बडोद्याला एका नातेवाइकाकडे गेलं. तिथं मदरशात शिक्षण घेताना त्यांना कॅलिग्राफीत रस निर्माण झाला.

नंतर त्यांनी मुंबईच्या जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये (J.J. School of Art ) प्रवेश घेतला. पण त्यांनी ते शिक्षण पूर्ण केलं नाही. या काळात ते हिंदी सिनेमांची अवाढव्य आकाराची पोस्टर्स रंगविण्याचे काम करत होते. काही काळ त्यांनी खेळणी तयार करण्याच्या कारखान्यातही काम केले.

गुजराथमध्ये निसर्गदृश्ये रंगवायला जायला त्यांना आवडे. पुढं आपलं एकेक पेंटिंग कोट्यवधी रुपयांना विकणाऱ्या हुसेन यांचं पहिलं पेंटिंग वयाच्या एकोणिसाव्या वर्षी दहा रुपयांना रस्त्यावर विकलं गेलं होतं!

HF Husain Painting

१९४७ साली बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात हुसेन यांच्या चित्राला सुवर्णपदक प्राप्त झालं. याच वर्षी त्यांनी फ्रान्सिस न्यूटन सूझा, रझा, आरा, हरी गाडे वगैरेंच्या साथीने ‘प्रोग्रेसिव्ह आर्ट ग्रुप, बॉम्बे’ची स्थापना केली. एका अर्थाने या ग्रुपने भारतात आधुनिक चित्रकलेची मुहूर्तमेढ रोवली.

१९५२ साली हुसेन यांचं पहिलं स्वतंत्र चित्रप्रदर्शन झुरीच इथे आयोजिण्यात आलं. १९५५ साली नवी दिल्ली येथील ललित कला अकादमीने आयोजित केलेल्या प्रदर्शनात हुसेन यांच्या पेंटिंगला प्रथम पुरस्कार लाभला.

१९६४ साली न्यू यॉर्क इथे आयोजित केलेल्या हुसेन यांच्या सोलो एक्झिबिशनला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

जागतिक कलाक्षेत्रात आता हुसेन यांचं नाव आदरानं घेतलं जाऊ लागलं होतं. १९७१च्या ब्राझीलमधील साओ पावलो बिनाले या द्वैवार्षिक कला प्रदर्शनात हुसेन यांना पिकासोच्या जोडीने सन्माननीय पाहुणे म्हणून निमंत्रित केले होते.

संपत्ती, मानमरातब, प्रतिष्ठा आणि सुखी संसार सर्वच हुसेन यांना लाभलं होतं. पत्नी फाझिला बिबी, आणि शमशाद, रईसा, मुस्तफा, ओवेस, शफाअत व अकिला या संततीबरोबर त्यांना उत्तम कौटुंबिक सुख लाभले.

भारत सरकारने १९८१ साली पद्मविभूषण हा सन्मान तर त्यांना दिलाच, शिवाय १९८६ ते १९९२ या कालावधीसाठी राज्यसभेत खासदार म्हणून त्यांची नियुक्ती करून,त्यांच्या प्रदीर्घ आणि देदीप्यमान चित्रकारकीर्दीचा गौरव करण्यात आला.

एम.एफ. हुसेन म्हणजे अस्सल भारतीय आशय आणि क्युबिस्ट शैलीशी जवळीक साधणारी पण तरीही स्वतंत्र असणारी अभिव्यक्ती यांचं जबरदस्त मिश्रण असणारा विलक्षण प्रतिभावंत होय.

रामायण-महाभारतातील प्रसंग, हिंदू देव-देवता, ब्रिटिश राज, मदर टेरेसा, सफदर हाशमी आणि अर्थातच चौखूर उधळणारे घोडे अशा विषयांवर हुसेन यांनी अनेक चित्रं आणि चित्रमालिका केल्या.

अर्थात हुसेन यांची पेंटिंग म्हटली की वेगवेगळ्या रंगातले, खिंकाळणारे, उधळणारे घोडेच आधी आठवतात. भारतीय पुराणकथांनुसार पौरुषत्वाचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या घोड्यांविषयी वाटणाऱ्या आकर्षणातून हुसेन यांनी घोड्यांची असंख्य पेंटिंग बनवली.

व्यक्तिरेखांना नाक-डोळे न काढता, आपल्या स्वतंत्र शैलीत रामायण- महाभारतातील अनेक प्रसंग रंगवून हुसेन यांनी खेड्यापाड्यातून या पेंटिंगची प्रदर्शने भरवली. हुसेन यांनी कोलकात्यात मदर तेरेसा यांना पाहिलं आणि त्यांना आपल्या आईचीच आठवण आली.

वात्सल्यपूर्ण देहबोली आणि निळ्या बॉर्डरची पांढरी साडी यामधून मदर तेरेसा यांचं अचूक व्यक्तिमत्त्व उभं करणाऱ्या हुसेन यांनी त्यांची अनेक पेंटिंग केली. एका पेंटिंगमध्ये मदर तेरेसा यांनी असहाय्य वृद्धाला मांडीवर घेतले आहे, तर त्रिमूर्ती या शीर्षकाच्या आणखी एका पेंटिंगमध्ये लहान मुलं, वृद्ध, असहाय्य व्यक्ती आणि प्राणी यांच्याविषयी अपार प्रेम असणाऱ्या मदर तेरेसा दर्शविल्या आहेत.

यातील काही पेंटिंग नवी दिल्ली येथील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे आहेत. १९७१ साली काढलेलं आणि १८९ X २७३ सेंमी या आकाराचं बॅटल ऑफ गंगा-जमुना हे योग्य आणि अयोग्य यातील संघर्ष दर्शविणारे गडद व उजळ रंगातील त्यांचं पेंटिंग अतिशय गाजलं.

काही वर्षांपूर्वी ख्रिस्ती या संस्थेने आयोजित केलेल्या लिलावात याला तब्बल नऊ कोटी रुपये किंमत मिळाली होती. अभिनेत्री माधुरी दीक्षितविषयी वाटणाऱ्या प्रेमातून त्यांनी तिला घेऊन गजगामिनी हा चित्रपट तर काढला होताच, पण तिची काही उत्तम पेंटिंगदेखील त्यांनी केली.

(H.M.Husain Paiting)

भारतीय कलाविश्वात अनभिषिक्त सम्राटपद मिरवणाऱ्या हुसेन यांना वादग्रस्त ठरलेल्या काही चित्रांमुळे १९९० ते २००५ या काळात मनस्ताप सहन करावा लागला. न्यायालयाने कलाकाराचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य ग्राह्य मानले.

पण तरीही हुसेन यांच्या घरावर हल्ला केला गेला, आणि त्यांची चित्रप्रदर्शनं बंद पाडली गेली. हे वादळ शमतंय, असं वाटत असतानाच २००६मध्ये त्यांच्या आणखी एका चित्रामुळे वाद उद्‍भवला. हुसेन यांनी प्रदर्शनातून पेंटिंग मागं घेण्याची व क्षमायाचनेची घोषणा केली.

पण लोकांचा संताप वाढतच चालला होता. याच दरम्यान वयाच्या ९१व्या वर्षी त्यांना केरळ सरकारतर्फे अत्यंत प्रतिष्ठेचे राजा रवी वर्मा ॲवॉर्ड देण्यात आले.

अखेरीस भारतीय समाजातील विरोध जाणून हुसेन यांनी भारत सोडून कतार येथील दोहा इथे स्थलांतर केले.

कतार येथील वास्तव्यात ३२ पेंटिंगच्या माध्यमातून भारतीय इतिहास दर्शवण्याचे मोठे काम त्यांनी स्वीकारले. शेवटपर्यंत प्रचंड ऊर्जा असणाऱ्या हुसेन यांनी यातील आठ पेंटिंग पूर्ण केली होती.

९ जून, २०११ रोजी वयाच्या ९५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा लंडनमध्ये मृत्यू झाला.

एम.एफ. हुसेन म्हणजे समर्थ रेषा, प्रभावी रंगसंगती आणि आक्रमक विचार याद्वारे कलाजगताला आणि समस्त भारतीय समाजमनाला जबरदस्त धक्के देत, दृष्यानुभवाविषयी विचार करायला भाग पाडणारा सर्जनशील विचारवंत-कलाकार होय.

हुसेन यांचे विचार, त्यांची वादग्रस्त चित्रं हे क्षणभर बाजूला ठेवून देऊया. पण नैतिक शिस्तीसाठी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी त्यांनी जबरदस्त मोठी किंमत मोजली, हे मात्र खरं.

--------------------

(Latest Marathi article about indian artist M.F.Husain )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT