marathi poem esakal
साप्ताहिक

सीसीटीव्हींच्या गर्द छायेत: कवितासंग्रहातून झाकोळलेल्या वर्तमानाची अर्थवाही अनुभूती

जगण्यातील विसंगती, परात्मता अधिक ठळक होण्याचा हा सध्याचा काळ आहे. या काळातील संवेदन टिपणारी, चिंतनशील प्रवृत्तीची व वर्तमान युगातील भाषा व्यक्त करणारी कविता

साप्ताहिक टीम

प्रा. सुजाता राऊत

सीसीटीव्हींच्या गर्द छायेत या कवितासंग्रहातील कवितांना महानगरीय, सामाजिक, उत्तरआधुनिक अशा कोणत्याही वर्गीकरणात बसवण्यापेक्षा मनाच्या आतल्या स्तराला भिडणाऱ्या कविता म्हणून त्याकडे पाहता येईल.

विषयवैविध्य व प्रतिमांचे वेगळे सूचन, कथनबीज घेऊन विकसित झालेली कविता या दृष्टीनेही पाहता येईल.

प्रत्येक काळाचा एक युगधर्म असतो. मानवी आयुष्यावर व अर्थात साहित्यावर त्याचे मूलगामी परिणाम घडत असतात. साठोत्तरी कविता चळवळींशी, विचारधारांशी निगडित होती. नव्वदोत्तरी कविता जागतिकीकरणातून येणारी परात्मता व्यक्त करणारी होती.

जगण्यातील विसंगती, परात्मता अधिक ठळक होण्याचा हा सध्याचा काळ आहे. या काळातील संवेदन टिपणारी, चिंतनशील प्रवृत्तीची व वर्तमान युगातील भाषा व्यक्त करणारी कविता सीसीटीव्हींच्या गर्द छायेत या कवी गीतेश गजानन शिंदे यांच्या संग्रहामध्ये भेटते.

शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलेला हा त्यांचा कवितासंग्रह दीर्घ काळाने आलेला आहे. वर्तमान युगाचे प्रतिबिंब त्यात पडलेले दिसते; हे वर्तमान काहीसे झाकोळलेले आहे.

ते सद्यःस्थितीतील मानवी जगण्यातील वाढलेले ताण, निसर्गाप्रती हरवलेले आपले भान, तुटक होणारे नातेसंबंध आणि मूल्य व्यवस्थेची घसरण अशा अनेक कारणांमुळे. या वर्तमानावर एक अनिश्चिततेची गर्द छाया पसरलेली आहे.

साहित्यात दोन प्रकारच्या निर्मिती आढळून येतात. एक मानसप्रधान निर्मिती असते तर दुसरी साक्षातकारात्मक निर्मिती असते.

या कवितासंग्रहात या दोन्ही प्रकारच्या कविता पाहायला मिळतात. विषयातील वैविध्य, वर्तमान युगाची भाषा व नित्य जगण्यातील प्रतिमांचा सहज वापर ही या कवितांची ठळक वैशिष्ट्ये म्हणता येतील.

‘अक्षरांच्या गंजलेल्या खिळ्यांनी’ या कवितेमध्ये माणसांचा संवाद कसा पोकळ निर्जीव होत चालला आहे ते समोर येते.

“आदळतात कानांवर नोटिफिकेशनच्या ध्वनी लहरी/ फिरतायत अंगठे सराईतपणे मोबाईल स्क्रीनवर/ जसं फिरायचं पूर्वी शब्दांचं मोरपीस हृदयाच्या कॅनव्हॉसवर/ नजर होते नुसती स्क्रोल...” अशा शब्दांतून तंत्रज्ञानाच्या भडिमाराने संवाद हरवलेला माणूस एक दिवस हृदयाची भाषाही विसरणार आहे, अशी जाणीव करून देणारी ही कविता आहे.

‘झाडांच्या शापाने’, ‘कारण’, ‘कशासाठी’ अशा अनेक कविता हे माणसांच्या जगातलं हरवलेपण टिपताना दिसतात. पण या कविता फक्त महानगरीय संवेदन टिपण्याच्या परिघात मर्यादित नाहीत.

या कवितांमध्ये एक तटस्थ स्तर जाणवत असला तरी त्याला आतून एक दुःखाचे अस्तर आहे. जमिनीखाली झरा वाहत असावा अशा प्रकारचे एक संवेदन या कवितांमधून आढळते.

त्याच वेळी नवीन तंत्र युगातील अनेक प्रतिमाही सामोऱ्या येतात. तटस्थपणे पण वास्तवाला थेट भिडण्याचा स्वरही दिसतो.

कवितासंग्रहाच्या अर्पणपत्रिकेत म्हटले आहे, “नजरेस पडूनही कुठलीच दखल न घेतलेल्या कष्टकऱ्यांना वंचितांना अर्पण.”

आणि रूमीच्या एका वचनापासून कवितासंग्रहाची सुरुवात होते. मोबाईलच्या स्क्रीनमध्ये हरवलेल्या, कानांमध्ये इयरफोन घालून मान खाली घालून बसलेल्या माणसांच्या रेखाचित्राने अतिशय सूचक पद्धतीने कवितासंग्रहाची सुरुवात झालेली आहे.

‘नवरा वारल्यावर’ या कवितेत जोडीदार गमावलेल्या स्त्रीचे मन उलगडून दाखवताना यात अनाठायी भावुकता येत नाही तर सरळपणे तिच्या जगण्याला भिडलेल्या प्रश्नांचा अतिशय ठळक पण संवेदनशील असा उच्चार आहे.

‘मुलाऐवजी असावी मुलगी’ या कवितेतही आजच्या युगात मुलगी असण्याचा ताण व मनावर असलेलं भीतीच सावट स्पष्ट केलं आहे.

‘इच्छा असूनही’, ‘पितृमुखी’, ‘विभक्त तर...’, ‘कुटुंब व्यवस्था’ या कवितांमधून मुलापासून दुरावलेल्या पितृहृदयाचे दर्शन तर घडतेच पण त्याबरोबरच सद्यःस्थितीत बिघडत चाललेले, तुटत चाललेले नातेसंबंध, त्यातून होणारी कुटुंब संस्थेची पडझड आणि मनात साचत राहिलेले एकटेपण याचे पडसाद सामोरे येतात.

विषयांतील वैविध्य हे या संग्रहातील कवितांचे वैशिष्ट्य आहे, तसेच काव्याशयात एकरूप झालेल्या प्रतिमा हेदेखील आहे. या प्रतिमा फक्त संवेदनाचित्र नाहीत, बोधनेत उमटणाऱ्या मानसिक प्रतिमा आहेत; पण त्या सध्याच्या जगण्याशी निगडित आहेत.

उदाहरणार्थ “सूर्याची किरणं डोळे चोळत आत येताना बॅलन्सशीटमधून एक दिवस वजा करतात”, “उतारवयात पडावा एकेक दात तसे गळून पडतात शब्द भाषेच्या जबड्यातून”,” झडलेल्या पानातून झाड चरित्र सांगते”, “प्रत्येकाने लावलाय बोनसाय आपापल्या नावाने पोडियम गार्डनवर”, “दोरीवर वाळत घातलेल्या कपड्यातील पाण्यासारखे निथळतात विचार आयुष्य संपवण्याचे” अशा प्रतिमांमधूनच काव्याशय पुढे जाताना दिसतो.

‘पत्र’ ही छोटीशी संवेदनशील कविता मनाला स्पर्श करणारी आहे, तर ‘परीक्षण’, ‘ब्रह्मांडाच्या पोकळीतून’, ‘बहुधा’, ‘गळ’ अशा कविता खोल अर्थाच्या विवरात घेऊन जाणाऱ्या आहेत.

वर्षानुवर्षे धूळ खात पडलेल्या गाडीला पाहून मनात येणाऱ्या नाना विचार तरंगातून एक कविता समोर येते. ‘छत्री’, ‘बासऱ्यांचं झाड’, ‘तपशिलासाठी’, ‘स्वप्न’ अशा अनेक कवितांतून वेगळे अनुभव विश्व प्रत्ययाला येतं. ‘वैदेही’, ‘सरोवर’, ‘कळ’ या तरल संवेदनाभूती देणाऱ्या कविता आहेत, तर ‘संचित’, ‘लोकलची वारी’ या कवितांत अभंगाचा फॉर्म वापरला आहे.

यातील काही कवितांच्या शेवटी प्रश्नार्थक ओळ येते किंवा प्रश्नाचे सूचन आहे. उदाहरणार्थ, ‘प्रतिनिधित्व’ या कवितेत “पुस्तकं केव्हापासून करू लागली जाती धर्माचं प्रतिनिधित्व ?” किंवा “केव्हा आलं जख्ख म्हातारपण भाषाईला?”, “माझ्या प्रिय स्वप्नांनो नका ना वागू माणसांसारखं”...

‘मोहाचे सरकते जिने’ किंवा ‘सीसीटीव्हींच्या गर्द छायेत’ ही शीर्षक कविता आजच्या जगण्यावर पडलेले भौतिक सुखाच्या लालसेचे सावट अधोरेखित करतात. प्रत्येक कवीची शैली असते. त्यातून त्या कवितेतले मर्म समोर येत असते.

या कवीकडे भवतालातील सजीव व निर्जीव गोष्टींकडे सजगतेने पाहण्याची दृष्टी आहे. त्यातून प्रकट होणारे दृश्य -अदृश्य अर्थाचे कंगोरे तो पकडू पाहतो. कवीची भाषा ही समकालातली भाषा आहे व काही ठिकाणी इंग्रजी भाषेचाही वापर आहे जो अपरिहार्यतेतून आलेला आहे.

‘नोटिफिकेशन’, ‘सबस्क्रिप्शन’ अशासारख्या कवितांमधून ते दिसतं. पण तरीही कविता या वाङ्‍मयप्रकाराला आवश्यक असणारी काव्यभाषाही काही कवितांमधून सरसपणे समोर येते. उदाहरणार्थ...

“ठणकावे अंग अंग

अशी नसावी आसक्ती

दुखे पाखरांचे पंख

होता रंग जरा जास्ती”

काही कवितांमध्ये एक कथनबीजही दडलेले दिसते. हा नवीन युगधर्माचा ठळक उच्चार आहे. यात मनाच्या सीसीटीव्हींद्वारे जणू मानवी संवेदनाचा वेध घेण्याचा प्रयत्न कवीने केलेला आहे.

या कवितांना महानगरीय, सामाजिक, उत्तरआधुनिक अशा कोणत्याही वर्गीकरणात बसवण्यापेक्षा मनाच्या आतल्या स्तराला भिडणाऱ्या कविता म्हणून त्याकडे पाहता येईल.

विषयवैविध्य व प्रतिमांचे वेगळे सूचन, कथनबीज घेऊन विकसित झालेली कविता या दृष्टीनेही पाहता येईल.

या पुस्तकाचे मुखपृष्ठ चित्रकार अन्वर हुसैन यांचे आहे. ते शीर्षकाला पुरेपूर न्याय देणारे, अन्वर्थक असे आहे.

ही कविता संवेदनशील माणसाच्या मनाचे आकाश समृद्ध करेल व त्याला विचार प्रवृत्तही करेल.

------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT