डॉ. कांचनगंगा गंधे (पुणे), अशोक कुमार सिंग (लखनौ)
भारतात अनेक ठिकाणी मेंदीची झाडं असली, तरी राजस्थानमध्ये तयार झालेली मेंदी जास्त चांगली रंगते. कारण लॉसोनचे स्रोत तयार होण्यासाठी लागणारं तापमान तिथं असतं. मेंदीचं झाड सदाहरीत आहे, पण पानगळीच्या दिवसांत म्हणजे थंडीत जून झालेली पानं गोळी केली तर त्यात रंगद्रव्य स्रोताचं प्रमाण जास्त वाढलेलं असतं.
मेंदी आणि स्त्री, मेंदी आणि नववधू यांचं नातं, प्रेम कधीही न संपणारं, अतूट आहे. नववधूचं मन बराच काळ मेंदीच्या हिरव्या पानावर झुलत राहतं! बालपणीच्या आठवणीतली मेंदी, यौवनामध्ये स्वप्नातल्या राजकुमाराबरोबरचं रंगवलेलं भावविश्व आणि तेच विश्व आता प्रत्यक्षात हातावरच्या मेंदीत ‘मेहेंदी की रात’च्या दिवशी उतरत असलेलं पाहताना ती इतकी रंगून जाते, की सभोवतालच्या विश्वाचा तिला विसर पडतो.
ती स्वतःच्या विश्वात हरवून जाते. रंगलेल्या मेंदीतलं तिचं तेज, चैतन्य, उत्साह म्हणजे नानाविध रत्नांचे जणू अलंकारच! हिंदू धर्मातल्या सोळा अलंकारांपैकी लाल-भगव्या रंगाची मेंदी म्हणजे अखंड सौभाग्याचं प्रतीक! मेंदी हाताला लावण्याच्या विधीला धार्मिक आणि सामाजिक महत्त्व तर आहेच, शिवाय तो शुभशकुनाचा मंगलाचार मानला आहे.
सौंदर्य, स्वच्छता आणि शीतलता या गुणांमुळे फार प्राचीन काळापासून मेंदीचा वापर करत असल्याचे उल्लेख अनेक साहित्यांमध्ये आहेत. त्यावरूनच हे समजतं, की मेंदीचं आणि माणसाचं नातं बरंच जुनं आहे. जवळपास पाच हजार वर्षांपूर्वीचं! इजिप्तमध्ये इसवी सन पूर्व २१६० ते १७८८ या कालखंडात दफन केल्या गेलेल्या ममीजची वस्त्रं आणि नखं मेंदीनं रंगवली आहेत, असं काही संशोधनं सांगतात.
नित्यनाथ सिद्ध यांनी (इ. स. ११००) लिहिलेल्या रसरत्नाकर या ग्रंथामध्ये मेंदीचा ‘महिंदी’ असा उल्लेख केलेला आढळतो. संस्कृत भाषेत मेंदीला ‘मेंधीका’ असा शब्द आहे. तसंच वनस्पतिशास्त्रात लॉसोनिया इनरमिस हे मेंदीचं नाव आहे. याशिवाय मेंदीला मदरंबी, मेहेंदी, हीना, अकान्, नखरंजक, रगंगी, मेदिकका, रक्तगर्भ, बरकाह (आशीर्वाद) अशी अनेक नावं आहेत.
मेंदीचं झाड तीन-चार वर्षांचं झालं, की त्याच्या अंतरंगात, विशेषतः पानांमध्ये बरेच बदल घडतात. पानांमधल्या पेशीद्रवात रंगद्रव्याचे स्रोत तयार व्हायला लागतात. त्यांना शास्त्रीय परिभाषेत हिनोसाइड्स असं म्हणतात. ही पानं वाळवली, की ती जास्त कार्यक्षम होतात. पेशींची आवरणं शिथिल झाल्यामुळे पानांचं चूर्ण पाण्यात मिसळलं, की या स्रोतांचा पाण्याशी संयोग होऊन काही अस्थिर स्वरूपाचे कण तयार होतात.
हवेतल्या प्राणवायूशी संयोग होऊन लॉसोन (Lawsone), म्हणजेच हिनोटॅनिक ॲसिड हे कार्यक्षम रंगद्रव्य तयार होते. ही क्रिया अतिशय मंद गतीनं होते. म्हणून मेंदी कमीत कमी ४-५ तास पाण्यात भिजवावी लागते.
लॉसोनचा संपर्क शरीरातल्या विशेषतः हाताच्या आणि पायाच्या तळव्यांवरच्या आणि केसांमधल्या केराटीन या तंतूमय प्रथिनांशी आला, की कार्यक्षम लॉसोन लाल भगवा होतो, म्हणजेच मेंदी रंगते! ही प्रथिनं हाता-पायांच्या, केसांच्या फक्त वरच्या थरात असल्यामुळे लॉसोन त्वचेच्या किंवा केसांच्या आतल्या थरापर्यंत जात नाही. सहा-सात दिवसात हा रंग फिका होतो.
तळहातावर मेंदीचे डिझाईन आठ प्रकारात काढले जाते.
अरेबिक मेंदी,
पाकिस्तानी मेंदी,
इंडो अरेबिक मेंदी,
मोरोक्कन मेंदी,
वेस्टर्न मेंदी,
इंडो- वेस्टर्न मेंदी आणि
आफ्रिकन मेंदी.
प्रत्येक प्रकारचं वैशिष्ट्य आणि मेंदी भिजवताना घालण्यात येणारे घटक वेगवेगळे असतात.
मेंदी हाताला, केसांना लावून २-३ तासांत धुतली तर लाल-भगवा रंग येतो. पण जास्त वेळ ठेवली, तर गडद तपकिरी रंग येतो. मेंदी लवकर रंगण्यासाठी त्यात लिंबाचा रस, साखर, पाणी घालून भिजवतात. लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड म्हणजे आम्ल असल्यामुळे लॉसोन पेशींमधून लवकर बाहेर येऊन कार्यक्षम होतं.
साखरेमुळे मेंदी चिकटून राहते. मेंदी वाळली, की ५-६ लवंगा तव्यावर तापवून मेंदीचा हात थोडा वेळ त्यावर धरला, तर लवंगेतल्या युजेनॉल या तेलामुळे आणि फेनॉलिक कम्पाऊंडमुळे रंग बराच काळ टिकतो. लिंबाचा रस आणि दही एकत्र करून त्यात मेंदीची पूड भिजवली, की लाल-तपकिरी रंग येतो.
लिंबामधील सायट्रिक ॲसिड, दह्यातलं लॅक्टिक ॲसिड आणि मेंदीतलं नॅपथोक्विनोन यांच्यात रासायनिक क्रिया घडून तपकिरी रंग येतो. चहाच्या पाण्यातल्या टॅनिनमुळे आणि कॉफीतल्या कॅफिनमुळेही मेंदीला वेगळ्या प्रकारच्या रंगछटा येतात. मेंदी भिजवताना बिटाचा रस घातला तर ॲन्थोसायनिन या रंगीत द्रव्यामुळे मेंदीला मरून किंवा बर्गंडी रंग येतो.
मेंदी पूड शुद्ध असेल, तर ती तळहात, तळपाय किंवा केसांच्या वरच्या भागापर्यंतच, म्हणजेच पृष्ठभागांपर्यंतच राहते. म्हणूनच मेंदी पूर्ण वाळली, की प्रथम चोळून काढावी आणि मग पाण्यानं हळुवारपणे धुवावी. हाता-पायाची, केसांची मेंदी वाळल्यानंतर ती काढण्यासाठी प्रथम खोबरेल किंवा कोणतंही खाण्याचं तेल हळूहळू पृष्ठभागावर लावून मग ती पाण्यानं धुवावी.
पाण्यानं मेंदी धुतल्यास लॉसोनचं प्रमाण कमी होईल, कारण हे रंगद्रव्य पाण्यात विरघळतं आणि परिणामी रंग फिकट दिसतो. मेंदीचा रंग जास्त खुलण्यासाठी कात किंवा चुन्याच्या पाण्यानं हात धुवावेत. कात घातलेलं पाणी, मेंदीतलं रंगद्रव्य आणि पृष्ठभागातली प्रथिनं एकमेकांना धरून राहतात.
चुना अल्कधर्मीय आणि लॉसोन आम्लधर्मीय असल्यानं त्यांच्यात रासायनिक प्रक्रिया घडून मेंदीचा रंग जास्त काळ टिकतो. हा रंग अजून टिकवायचा असेल, तर उकळत्या पाण्यात बाम घालून त्याच्या वाफांवर मेंदी काढलेला हात धरावा. बाममधला कापूर हाताची खाज कमी करून रंगद्रव्य तळहातावर टिकवण्यास मदत करतो.
बाममध्ये मेन्थॉल असतं. ते आम्लधर्मीय तर आहेच, पण त्यात सुगंधी तेल आणि ते जंतुनाशक गुणधर्म असल्यानं मेंदी ओलसर राहिली, तर त्वचेला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. याशिवाय त्यात निलगिरी तेल, मिंट तेल, लवंग तेल असल्यामुळे रंग टिकतो आणि मेंदीचा मन शांत करणारा आल्हाददायक सुवासही येतो.
मेंदी डिझाईन जास्त चमकण्यासाठी हात-पाय शिकेकाईनं धुवावेत. शिकेकाईत सॅपोनिन हा फेस येणारा घटक असल्यामुळे हातावरचं डिझाईन स्वच्छ होतं. कारण निर्जीव झालेल्या पेशींचे पातळ पापुद्रे होऊन पडून जातात. सॅपोनिन आर्द्रताविरोधी असल्यामुळे रंग लवकर वाळण्यासही मदत होते आणि डिझाईन एकाच टोनमध्ये रंगतं.
मोहरीचं तेल, चुना किंवा लिंबाची पूड हातावर लावली तर मेंदीचा रंग उजळतो, चमक येते. मोहरीच्या तेलात आर्द्रता असल्यामुळे रंगातला कोरडेपणा राहत नाही, तो जास्त टवटवीत दिसतो.
भारतात अनेक ठिकाणी मेंदीची झाडं असली, तरी राजस्थानमध्ये तयार झालेली मेंदी जास्त चांगली रंगते. कारण लॉसोनचे स्रोत तयार होण्यासाठी लागणारं तापमान तिथं असतं. मेंदीचं झाड सदाहरीत आहे, पण पानगळीच्या दिवसांत म्हणजे थंडीत जून झालेली पानं गोळी केली तर त्यात रंगद्रव्य स्रोताचं प्रमाण जास्त वाढलेलं असतं.
मेंदी शरीराला थंडावा देते, शरीरातली अतिरिक्त कडकी कमी करण्यासाठी मेंदी तळहात, तळपायावर लावतात. हाताच्या आणि पायांच्या बोटांच्या अग्रभागात आपल्या शरीरातल्या शिरांची टोकं असल्यामुळे शरीरातली अतिरिक्त कडकी त्यातून बाहेर पडते.
ही कडकी घालवण्यासाठी हाता-पायांच्या नखांनाही मेंदी लावण्याची प्रथा आहे. मेंदी शरीरावर आलेला ताणही कमी करते. लग्नकार्याच्या वेळेस होणारी धावपळ, आलेला ताण कमी करण्याचं सामर्थ्य मेंदीच्या पानात असल्यामुळेच की काय नववधूचं मन भावी आयुष्याचं स्वप्न रंगवत मेंदीच्या पानावर झुलत असतं!
मेंदीपासून निघणाऱ्या लाल-भगव्या रंगासाठी मेंदीची लागवड जरी होत असली, तरी नैसर्गिकरित्या वाढणारी मेंदीची झाडं खूप कमी झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय निसर्ग संघटनेने मेंदीचा समावेश रेड लिस्टमध्ये केला आहे. सदाहरीत, मध्यम उंचीची, भरपूर फांद्या आणि पर्णसंभार असलेली ही झाडं पूर्वी घराच्या कुंपणासाठी आणि शेतीच्या बांधावर लावली जायची.
शरीरावर खरचटल्यामुळे, भाजल्यामुळे होणाऱ्या जखमा भरून काढण्यासाठी ही पानं वाटून त्याचा लेप लावण्याचा उल्लेख चरक आणि सुश्रुत संहितेमध्ये आढळतो. याशिवाय या ग्रंथांमध्ये मेंदीच्या पानांत अनेक औषधी गुणधर्म असल्याचे उल्लेखही आहेत.
आंध्र प्रदेशातले आदिवासी मेंदीची पानं, जास्वंदाची फुलं-पानं, माका (भृंगराज), गुंजेच्या बिया यांची समप्रमाणात पूड करून ती तिळाच्या तेलात पाच दिवस भिजत घालून डोक्याला लावतात. कोंडा आणि केसगळती थांबवण्यासाठी याचा उपयोग होतो.
पाऊस सुरू झाला, की साधारण जुलै ते सप्टेंबरदरम्यान येणाऱ्या पांढऱ्या, गुलाबी फुलांमधून निघणारं टी-रोझसारखं तेल, हिना अत्तर मंद सुगंध आणि थंडावा देतं. तसंच ते जीवाणू आणि कवक (बुरशी) विरोधी आहे. मेंदीची फळं गोड असतात. त्यांना इसबंद म्हणतात.
आजही खेडेगावांत ही फळं लहान मुलांना दृष्ट लागू नये म्हणून पाळण्याला बांधतात. मेंदीपासून निघणारा रंग अजिंठा लेण्यांमध्ये वापरला असल्याचीही माहिती मिळते.
भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या व्रतांवेळी, उपवासाच्या दिवशी, श्रावणातल्या नागपंचमीसारख्या सणांना, लग्नकार्यात नववधूच्या हाता-पायांवर मेंदीने डिझाईन काढायची प्रथा आहे. देव-देवतांच्या मूर्ती रंगवताना, चित्र काढताना देव-देवतांच्या हातांवर मेंदीचे विशिष्ट प्रकारचे, पण साधे डिझाईन काढण्याची प्रथा आहे. गणपती आणि लक्ष्मीच्या तळहातावर मध्यभागी एक मोठा ठिपका आणि चार बाजूंना चार लहान ठिपके काढतात.
भारतीय पेंटिंग्जमधल्या वेगवेगळ्या शैलीतही हा रंग वापरला आहे. राजघराण्यांतील नववधूंची तसेच चांदबिबीच्या घोड्याचे पाय मेंदीनं रंगले आहेत अशी सोळाव्या शतकातल्या दख्खनी शैलीतील पेंटिंग्ज आजही पाहायला मिळतात.
राजस्थानी शैलीमधली निसर्गचित्रं, व्यक्तिचित्रांमधल्या स्त्रियांची नखं, बोटं आणि श्रीकृष्ण-राधा यांच्या चित्रात मेंदीचा वापर केला आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी शैलीमध्ये लँडस्केप, भारतीय सण, भारतीय नृत्यप्रकार अशा अनेक प्रकारच्या चित्रांमध्ये मेंदी वापरली आहे.
तर ब्रिटिश म्युझियममध्ये जलरंगातल्या चित्रांमध्ये रावण सीतेला पळवून नेण्याच्या प्रसंगात सीतामाईच्या हातावर मेंदी काढलेली आहे. तर एका चित्रात कमळावर बसलेल्या गंगामातेचं देवीरूप दाखवताना तिचा उजवा हात मेंदीनं रंगवला आहे.
काळी मेंदी, न्यूट्रल मेंदी, हिना मेंदी आणि टॅटू
काळी हर्बल मेंदी- ही मेंदी इंडिगोफेरा टिंक्टोरिया या वनस्पतीच्या पानांपासून तयार करतात. या वनस्पतीच्या पानांमध्ये असलेलं ॲनिलिन त्वचेला खूप घातक असतं. शिवाय त्यात काही प्रमाणात पॅराफेनिलिन डायअमाईन (पीपीडी) असतं. बरेचदा लवकरात लवकर काळा रंग यावा यासाठी मेंदीत कृत्रिम पीपीडी मिसळतात. हा रंग टॅटू काढण्यासाठीच्या शाईत मिसळतात.
पीपीडीमध्ये वेगळे रंग मिसळून टॅटूसाठी वेगवेगळ्या रंगांची शाई तयार करतात. टॅटूमुळे पीपीडी त्वचेच्या अगदी आतल्या भागापर्यंत पोहोचतं आणि ते घातक ठरतं. त्यात असलेल्या पारा, शिसं, कॅडमियम, क्रोमियम या धातूंमुळे त्वचेचा कॅन्सरही होऊ शकतो. म्हणूनच काळी हर्बल मेंदी शक्यतो डाय म्हणून केसांना लावू नये आणि टॅटूसाठीही वापरू नये.
न्यूट्रल हर्बल मेंदी - या प्रकारच्या मेंदीला ब्लॉन्ड हर्बल मेंदी असंही नाव आहे. ती सेन्ना इटालिका - कॅशिया ऑबोव्हॅटा या झाडांच्या पानांपासून करतात. ही मेंदी अजिबात रंगत नाही. कारण या मेंदीला स्वतःचा रंग नसतो. पानांच्या पुडीमध्ये झेंडूच्या पाकळ्या, चहाचा चोथा वाळवून घालतात. त्यामुळे त्याचा थोडा रंग येतो. पण काहीजण न्यूट्रल मेंदी लवकर रंगावी यासाठी त्यात पीपीडी रसायन मिसळतात आणि होणारी मेंदी केसांना डाय लावण्यासाठी किंवा टॅटू काढण्यासाठी वापरतात.
हिना मेंदी - ही मेंदी लॉसोनिया इनरमिस या झाडांच्या पानांपासून करतात. तीच मेंदी त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी सर्वात चांगली मानली जाते. हिना मेंदी हा डाय जास्त दिवस टिकतो.
(डॉ. कांचनगंगा गंधे वनस्पतिशास्त्राच्या निवृत्त प्राध्यापिका व अशोक कुमार सिंग उत्तर प्रदेश राज्याच्या गृहखात्यातील रामजन्मभूमी विभागाचे विशेष अधिकारी आहेत.)
-----------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.