Mehandi and marriage  esakal
साप्ताहिक

Mehandi Love : सजले रे क्षण माझे...

Marriage and Mehandi : मेंदी आणि लग्नाचं इतकं अतूट नातं आहे, की ती नववधू, हळद आणि मेंदी उतरेपर्यंत नवी नवरी मानली जाते

साप्ताहिक टीम

ऋचा थत्ते

मंगलप्रसंगीच नाही तर एरवीही मेंदीच्या रंगात आणि गंधात आपले क्षण कायमच सजतात. मेंदीची आठवणही सुखद असते. आपलं आयुष्य रंगवणं आणि प्रत्येक क्षण गंधाळणं आपल्याच ‘हातात’ आहे, असंच काहीसं सांगत असावी ही मेंदी...

स्वराची समजूत घालून घालून नेहा पार थकली होती. स्वरा ऐकायलाच तयार नव्हती. सुट्टीच्या दिवसात मुलीचा स्क्रीन टाइम कमी व्हावा, म्हणून नेहाने बाहुलीच्या लग्नाचा घाट घातला होता. मुंडावळ्या, अक्षता, अंतरपाट, रांगोळी, रुखवत, वरात, बच्चेकंपनीला स्नॅक्स सगळी सगळी तयारी झाली होती.

नेहा होतीच हौशी आणि क्रिएटिव्ह! तिलाच लेकीसाठी काय करू नि काय नको असं व्हायचं. छोट्या स्वरावर छान संस्कार व्हावेत, तिला आणि तिच्या निमित्ताने आजूबाजूच्या मुलांना आपली संस्कृती कळावी म्हणून तिची नेहमीच धडपड असायची. आता हीच हौस अंगाशी आली होती. स्वरा हटून बसली होती. नेमकं कुठे अडलं होतं तिचं घोडं?

त्याचं झालं असं, बाहुलीचं लग्न म्हणून नेहाने आदल्या दिवशी खास मेंदीचा कार्यक्रम आयोजित केला होता. स्वराच्या मैत्रिणी आपापल्या आयांसोबत आल्या होत्या. मेंदी रंगवण्यासाठी जमलेली गप्पांची मैफलही रंगली होती. नेहा तर एक्सपर्टच होती मेंदी काढण्यात. कटलेट आणि ज्यूस अशी पेटपूजा करून सगळ्या मेंदी काढत होत्या.

इतक्यात कुणीतरी बोलून गेलं, अरे जिचं लग्न त्या बाहुली नवरीलाच मेंदी नाही? झालं...! स्वरानं तेवढंच ऐकलं आणि बसली हट्ट धरून. माझ्या बाहुलीला मेंदी काढायचीच, काढायची म्हणजे काढायची! बरं, तिला ती रंगायलाही हवी होती.

चार वर्षांच्या स्वराचा हा बालहट्ट पुरवणं केवळ आणि केवळ अशक्य होतं. अगं बाहुलीचा हात केवढा, तिचा ड्रेस खराब होईल, पानाची नक्षी काढूया, बाहुलीची मेंदी रंगेलच कशी? पण तिला काहीच पटणार नव्हतं. शेवटी आजोबा आले मदतीला धावून आणि स्वराला फिरायला गेले घेऊन...

मेंदीचं हे असं असतं. का माहीत नाही, पण मुलींना अगदी लहानपणापासून मेंदीचं आकर्षण असतं.

मला आठवतंय, मलाही अशीच तिसऱ्या-चौथ्या वर्षापासून मेंदी काढायची कमालीची हौस होती. बरं, तेव्हा मेंदीचे कोन सगळीकडे सर्रास मिळायचे नाहीत आणि असा थोडा वेगळा खर्च करतानासुद्धा जरा विचारच केला जायचा. पण त्यामुळेच मेंदीची साग्रसंगीत तयारी असते तरी कशी हेही बघायला मिळायचं.

शिवाय ॲलर्जीचीही भीती नव्हती. नागपंचमी किंवा एखादं जवळचं लग्न असलं, की आई कोरडी मेंदी विकत आणायची, ती मलमलच्या कापडातून गाळायची, भिजवून ठेवताना रंगण्यासाठी निलगिरी टाकायची. मेंदी तशी थंड असते, निलगिरी टाकण्याचा तोही फायदा असावा. लगेच फटाफट शिंका येत नाहीत. मेंदीचे कोनही घरीच करायची आई.

स्वच्छ धुऊन कोरड्या केलेल्या दुधाच्या पिशव्या कापून त्याचे कोन वळायचे. दुधाची पिशवी, कात्री आणि चिकटपट्टी एवढंच सामान. तयार झालेल्या कोनात भिजवलेली मेंदी चमच्याने नीट भरायची, कोन बाहेरून लडबडणार नाही याची काळजी घेत. आणि मग हा कोन नीट बंद करायचा पुन्हा चिकटपट्टी वापरून.

mehandi design

कोन करणं हेही तसं कौशल्याचंच काम. तो दाबून मेंदी काढताना ती नको तेवढी बाहेर आली की संपलंच! आणि हो भोकही नेमकं पडायला हवं, लहान-मोठं झालं तर बिनसलंच. मेंदी बारीक तर यायला हवी, पण त्यातही नेमकेपणा यायला हवा. मेंदी भिजवतानाही ती खूप पातळ किंवा खूप घट्टही नको, मधूनच मेंदी कोरडी राहायला नको आणि कुठे गुठळ्याही होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते.

कोनातून सहज बाहेर पडायला हवी, वक्त्याच्या ओघवत्या वाणीसारखी! बरं, तेव्हा कोन कसा करावा, मेंदी हॅक्स वगैरे व्हिडिओ कुठले असायला, किंवा अगदी डिझाईनचंही तेच! पण मला आठवतंय आई साप्ताहिक सकाळचे मेंदी विशेषांक संग्रही ठेवायची. तेच यायचे आधाराला. तेव्हा अरेबिक मेंदी, डोली वगैरे फार तुरळक दिसायचं.

फुलं, पानं, कोयरी किंवा मोर... हेच जास्त! मेंदीच्या बाबतीत माझाही एक हट्ट असायचाच! जराही मोकळी जागा नको. पूर्ण हातभर नक्षी आणि आईसारखीच पूर्ण नक्षी हवी माझ्या हातावर! आता मोठ्या हाताची नक्षी मावेलच कशी एवढ्याशा हातावर? पण पुन्हा तेच... बालहट्ट!

या निमित्ताने अजून एक गंमत आठवली, माझी एक भाची म्हणाली होती, अगं हातावर मोर काढलास; पण डोळा काढ ना! नाचताना दिसेल कसं त्याला? इतकं डिटेलिंग आणि वास्तवाचं भान!

तर असा हा रात्री जेवून झोपण्यापूर्वी मेंदीचा कार्यक्रम व्हायचा. लग्नघर असेल, तर गप्पा, भेंड्या विचारूच नका! जिची मेंदी काढण्यावर मास्टरी असेल, तिला मोठी डिमांड. बिचारीची पाठ, मान भरूनच यायची. हात दुखू लागायचा. पण कौतुकापायी सगळं सोसणारच ती! प्रोफेशनल मेंदी आर्टिस्ट जवळजवळ नव्हतेच!

पण घरी मेंदी काढली जायची ती विशेषतः नागपंचमीला. मेंदीचा ओलसर गार गार स्पर्श हवाहवासा वाटायचा. आजही वाटतो. मी म्हणाले तशी बारीक नक्षी काढून झाली, की साखरेचं पाणी लावायचं; रंगण्यासाठी, मग न फिस्कटण्याची काळजी घ्यायची. त्यासाठी कित्येकदा हातात प्लॅस्टिकच्या पिशव्या बांधूनही झोपले आहे लहान असताना.

मग सकाळी उठल्यावर खोबरेल तेलानं मेंदी काढायची आणि किती रंगली ते पाहायचं. मग आनंदून जायचं किंवा क्वचित हिरमुसायचं, मेंदी कमी रंगल्यास. रंगलेली ती मेंदी डोळे भरून पाहायची आणि मग हाताची ओंजळ नाकाजवळ नेऊन डोळे मिटून वास भरून घ्यायचा. मेंदीचा तो विशिष्ट गंध आजही आवडतो मला.

नंतर कमीत कमी दोन दिवस तरी हात कमीत कमी पाण्यात जायचा. मेंदी टिकावी म्हणून. मला आठवतंय, भिजवून थोडी वाटीत शिल्लक राहिलेली मेंदी बोटांच्या वरच्या पेरांसाठी असायची. तिथे लावून झाली, की नखांनाही लावायचे मी! कारण शाळेत नेलपेंटला बंदी! आणि हातावरची मेंदी पार दिसेनाशी झाली, तरी नखं अनेक दिवस केशरी असायची.

शाळेत नागपंचमीला मुली एकमेकींना मेंदी दाखवणार, एकमेकींचे हात निरखून पाहणार हे ठरलेलं असायचं. ज्यांची नक्षी सुंदर त्यांची कॉलर ताठ! मग कुणी नुसतंच मेंदी फासून यायचं. कुणी काडीने नक्षी काढलेली असायची.

कुणी मध्यभागी फक्त मोठा गोल आणि त्याच्याभोवती बारीक ठिपके. कुणी त्यातल्या त्यात शक्कल लढवून हातभर फासलेल्या मेंदीत काडी फिरवून डिझाईन करायचं. असे नानाविध प्रकारांनी रंगलेले आणि सजलेले हात!

मेंदीबद्दल असा विचार करताना सहज एक मनात आलं. म्हणजे अगदी असंच असेल असं नाही, पण प्रोफेशन किंवा व्यक्तिमत्त्वानुसार हातावर मेंदी दिसते. हे आपलं माझं सहज केलेलं निरीक्षण बरं... एखादी सुगरण गृहिणी म्हणजे उकडीचे मोदक किंवा चंपाकळी उत्तम करणारी, तिचं हे हस्तकौशल्य मेंदीतही दिसतं.

कामाचा उरका पाडणाऱ्या हातावर पटकन काहीतरी शास्त्र म्हणून काढतात. मेंदी लवकर धुवावी लागली आणि त्यामुळे कमी रंगली, तरी त्यांना फार फरक पडत नाही. नृत्यांगना, अभिनेत्री जरा बारीक लक्ष देतात.

mehandi design

मेंदी हातांबरोबरच केसांसाठीही फार उत्तम मानतात. मेंदी लावल्यावर केसांचा पोत आणि रंगही फार सुंदर दिसतो. ही मेंदी लोखंडी कढईत चहाच्या पाण्यात आवळकाठी वगैरे पावडरी मिसळून भिजवली की अधिक गुणकारी!

आपल्या परंपरांमधल्या बऱ्याच गोष्टी आता मागे पडल्याचं आपण पाहतो. पण मेंदीची क्रेझ मात्र वाढतेच आहे. आज ती मोठी इंडस्ट्री झाली आहे. ब्यूटी पार्लरमध्ये तर मेंदी काढून मिळतेच, तसे अनेक मॉलमध्ये मेंदीचे स्टॉल दिसतात. लग्नांमध्ये तर बरेचदा तो स्वतंत्र इव्हेंट असतो.

त्या खास कार्यक्रमाची स्वतंत्र निमंत्रण पत्रिका लग्नपत्रिकेसोबत जोडली जाते. या ‘मेंदी’च्या दिवशी अर्थातच प्रोफेशनल आर्टिस्टना निमंत्रण असतं. नवरी आणि करवलीच्याच नाही, तर आलेल्या सर्वच पाहुण्यांच्या हातावर मेंदी काढायला ते सज्ज असतात. नाच, गाणे, खाणे पिणे यांची अगदी रेलचेल असते.

मेंदी रंगेल जितकी गडद तितकं नवऱ्याचं प्रेम उत्कट असा एक गोड समज आहे. त्यातूनच मला सुचलेली ही चारोळी,

"बघ कसे हसू उमटले

माझ्या चेहऱ्यावर

तुझ्या प्रेमाचा पुरावाच मिळाला

मेंदी रंगल्यावर"

मेंदी आणि लग्नाचं इतकं अतूट नातं आहे, की ती नववधू, हळद आणि मेंदी उतरेपर्यंत नवी नवरी मानली जाते. अलीकडच्या गाण्यांमध्ये साहजिकच ओठावर येणारं गाणं म्हणजे ‘मेहंदी लगा के रखना...’ लग्नात, बॅन्डवर हमखास वाजतंच.

तसंच हे अतिशय लोकप्रिय असं मराठी भावगीत -

"फुलले रे क्षण माझे, फुलले रे..

मेंदीने शकुनाच्या, शकुनाच्या मेंदीने

सजले रे क्षण माझे ...:"

नितीन आखवे यांचे सुंदर शब्द, त्याला श्रीधरजींचं अप्रतिम संगीत आणि आशाताईंचा सदाबहार व भावस्पर्शी स्वर. कधीही आणि कितीही वेळा ऐकलं, तरी मन प्रसन्न करणारं असं हे गाणं.

मला तर वाटतं लग्नातच नाही तर एरवीही मेंदीच्या रंगात आणि गंधात आपले क्षण कायमच सजतात. मेंदीची आठवणही तशीच सुखद असते. आपला आयुष्याचा प्रत्येक क्षणही रंगून जावा आणि सजावा याच सदिच्छा!

हातावरच्या रेषा समजा काही एक भाकीत सांगत असतीलही, पण तरीही आपलं आयुष्य रंगवणं आणि प्रत्येक क्षण गंधाळणं आपल्याच ‘हातात’ आहे असंच काहीसं सांगत असावी ही मेंदी, नाही का ?

(ऋचा थत्ते निवेदिका व व्याख्यात्या आहेत.)

----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT