अटलांटिक महासागरातील पर्वतरांग  esakal
साप्ताहिक

अटलांटिक महासागरातील आश्चर्यकारक पर्वतरांग

समुद्रतळावरच्या कवचावरही ते अस्थिर असल्याच्या अनेक खुणा आढळतात.

सकाळ डिजिटल टीम

डॉ. श्रीकांत कार्लेकर    

अस्थिर भूकवचात जमिनीवर भेगा पडून खचदऱ्या कशा तयार होतात ते आपण या आधीच्या लेखात (सकाळ साप्ताहिक- प्रसिद्धीः १७ जून) पाहिले. समुद्रतळावरच्या कवचावरही ते अस्थिर असल्याच्या अनेक खुणा आढळतात. अटलांटिक महासागराच्या मध्यवर्ती भागातून उत्तर दक्षिण जाणारी पर्वतरांग हीसुद्धा पृथ्वीवरचा असाच एक आश्चर्यकारक आविष्कार आहे!

अटलांटिक महासागराच्या तळाशी मध्य-अटलांटिक पर्वतरांग या नावाने ओळखली जाणारी एक पर्वतरांग आहे. ही एक मध्य महासागर पर्वतरांग (Mid Oceanic Ridge) आहे आणि जगातील सर्वात लांब पर्वतश्रेणीचा भाग आहे. उत्तर अटलांटिकमध्ये ही पर्वतरांग उत्तर अमेरिका भूतबकाला युरेशियन आणि आफ्रिकन भूतबकांपासून वेगळे करते. दक्षिण अटलांटिकमध्ये, ती आफ्रिकन आणि दक्षिण अमेरिकन भूतबकांना एकमेकांपासून अलग करते. या मध्य-महासागर पर्वतरांगेचा विस्तार ग्रीनलँडच्या ईशान्येकडील गॅकेल पर्वतरांगेच्या (किंवा मध्य-आर्क्टिक पर्वतरांग) जंक्शनपासून दक्षिण अटलांटिकमधील बुवेट ट्रिपल जंक्शनपर्यंत आहे.

उत्तर अटलांटिक महासागराच्या तळभागावर असलेल्या या पर्वतरांगेचा प्राथमिक अंदाज १८५३मध्ये मॅथ्यू फॉन्टेन मौरी यांनी ‘यूएसएस डॉल्फिन’ या पाणबुडीच्या आवाजाच्या आधारे लावला होता. १८७२मध्ये ‘एचएमएस चॅलेंजर’ या नौदल जहाजाच्या साहाय्याने राबविलेल्या मोहिमेदरम्यान या पर्वतरांगेचे अस्तित्व आणि दक्षिण अटलांटिकमध्ये असलेला तिचा विस्तार याची पुष्टी झाली. पर्वतरांगेच्या अस्तित्वाची पुनर्पुष्टी ‘सोनार’ या समुद्रतळ मोजणाऱ्या उपकरणाने १९२५मध्ये केली आणि जर्मन ‘उल्का’ मोहिमेतून ती दक्षिण आफ्रिकेच्या अगुल्हास भूशिराच्या (Cape) आसपास हिंदी महासागरात पसरल्याचेही आढळले.

अटलांटिक मध्य-पर्वतरांग ही मुख्यतः पाण्याखालील भूरूप असले, तरी तिचा काही भाग आइसलँडमध्ये समुद्राच्या वरही आलेला आहे. त्यामुळे आइसलँड बेट या पर्वतरांगेतील असाधारण ठिकाणांपैकी एक आहे. आइसलँड देशाच्या या स्थानामुळे, आइसलँडला नेहमीच भूकंप, भूकंपने (Tremors ) हादरे आणि ज्वालामुखीचे उद्रेक यांचा धोका असतो. सर्वात अलीकडे म्हणजे वर्ष २०१०मध्ये एका प्रचंड विध्वंसक ज्वालामुखीचा या बेटावर उद्रेक झाला होता.सुमारे २४ दशलक्ष वर्षांपूर्वी मध्य-अटलांटिक पर्वतरांगेवर ज्वालामुखीच्या उद्रेकापासून तयार झालेले

आइसलँड हे अशा काही ठिकाणांपैकी आहे, जिथे आपण समुद्रात बुडालेल्या या पर्वतरांगेच्या समुद्राच्या वर आलेल्या भागावरील कोरड्या जमिनीवर उभे राहू शकतो.या मध्य-अटलांटिक पर्वतरांगेत अनेक दऱ्या आणि उंच डोंगर रांगा असलेली विचित्र समुद्रतळ रचना आहे. तिच्या मध्यवर्ती भागातील दरी भूकंपशास्त्रीयदृष्ट्या सक्रिय आणि अनेक भूकंपांचा केंद्रबिंदू आहे. ही रांग हा पृथ्वीवरील सर्व महासागरांच्या तळांवर असलेल्या ४० हजार किलोमीटर लांबीच्या मध्य-महासागर पर्वतरांगेचाच छोटासा भाग आहे.

जगभरातील सगळ्या समुद्रात असलेल्या पर्वतरांगेच्या शोधामुळे समुद्रतळ विस्तार (Seafloor Spreading ) सिद्धांत आणि वेगेनरच्या भूखंड वहन (Continental Drift) सिद्धांताला मान्यता मिळाली. सुमारे १८० दशलक्ष वर्षांपूर्वी सुरू झालेल्या अखिलभूमी (Pangea) या काल्पनिक महाखंडाच्या विघटनाच्या संकल्पनेत ही पर्वतरांग मध्यवर्ती आहे.या पर्वतरांगेला लागून तिच्या जवळजवळ संपूर्ण लांबीपर्यंत जाणारी एक खोल दरी या पर्वतरांगेत समाविष्ट आहे. ही एक खचदरी आहे आणि ती दोन भूतबकांतील वास्तविक सीमा दर्शवते. या खचदरीतून पृथ्वीच्या अंतरंगातील लाव्हा बाहेर पडतो आणि दोन्ही दिशांनी पसरत जातो.

विषुववृत्ताजवळ समुद्रातील ही पर्वतरांग उत्तर अटलांटिक पर्वतरांग आणि दक्षिण अटलांटिक पर्वतरांग अशा दोन भागांत रोमांचे (Romanche) या ७,७५८ मीटर खोलीच्या अरुंद सागरी गर्तेमुळे (Trench) विभागली गेली आहे. अटलांटिक महासागरातील सर्वात खोल ठिकाणांपैकी ही गर्ता आहे.‘मध्य-अटलांटिकमधील उंचवटा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगर धारेवर या पर्वतरांगेचे स्थान आहे. हा उंचवटा पृथ्वीच्या अंतरंगातील ऊर्ध्वगामी अभिसरण प्रवाहामुळे एकमेकांपासून दूर ढकलल्या जाणाऱ्या भूतबक सीमेजवळ तयार होतो. ही सीमा प्रथम २० ते २५ कोटी वर्षांपूर्वीच्या ट्रायासिक या भूशास्त्रीय कालखंडात तयार झाली.

ती तयार होताना ज्या भेगा किंवा खचदऱ्या बनल्या, त्यातील काही निष्क्रीय (Inactive) झाल्या. त्यांनी मिसिसिपी नदी, अॅमेझॉन नदी आणि नायजर नदीसह अमेरिका आणि आफ्रिकेमधील अनेक मोठ्या नद्यांची खोरी निर्माण केली. कॅनडातील न्यू ब्रुन्सविक आणि नोव्हा स्कॉशिया दरम्यान उत्तर अमेरिकेच्या अटलांटिक किनाऱ्यावर असलेले फंडी खोरे हादेखील याच प्रक्रियेचा पुरावा आहे.

आर्क्टिक महासागरापासून आफ्रिकेच्या दक्षिणेकडील टोकापर्यंत सुमारे १६ हजार किलोमीटरपर्यंत पसरलेली ही पर्वतरांग एक लांबलचक पर्वत-साखळी आहे. ती तिच्या दोन्ही बाजूंच्या खंडांपासून समान अंतरावर आहे. ही रांग तयार होताना जे पर्वत तयार झाले ते काही ठिकाणी समुद्रसपाटीपासून वर आले आहेत. अझोर्स, एसेन्शन, सेंट हेलेना आणि ट्रिस्टन दा कुन्हा ही बेटे किंवा बेट समूह ही अशा वर आलेल्या भूभागाची उदाहरणे आहेत. या वर आलेल्या भूभागांच्या भूगोलावरून बरेच वेळा मध्य-अटलांटिक पर्वतरांगेच्या स्वरूपाची चांगली कल्पना येते.

अझोर्स ही मध्य-अटलांटिक पर्वतरांगेच्या समुद्रातून उंचावलेली एक प्रमुख पर्वतश्रेणी आहे. यावरील बेटे, खडक आणि दगडधोंड्यांच्या ढिगाऱ्यांनी बनलेल्या किनाऱ्यापासून, समुद्रसपाटीपासून २,३५० मीटर उंच आहेत. यावर एकूण नऊ बेटे आहेत. त्यांचे अस्थिर भूगर्भीय स्वरूप, असंख्य भूकंप आणि ज्वालामुखीच्या उद्रेकांतून लक्षात येते. अनेक खोल विवरे आणि तलाव हे या बेटांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

मध्य-अटलांटिक पर्वतरांग हा एक सतत विस्तार पावणारा (Spreading) प्रदेश असून त्यातून वितळलेला लाव्हा रस सतत बाहेर पडत असतो. या पर्वतरांगेवरील अतिरिक्त चुंबकत्वाच्या क्षेत्रांना तप्तस्थळे (Hot Spots) म्हटले जाते. अझोर्स हे असे तप्त स्थळ आहे. या भागात भूकवचाची जाडी भूकवचाच्या सामान्य जाडीपेक्षा ६० टक्के जास्त आहे आणि पर्वताचा पसरत जाणारा भाग उंचावला आहे, असे या ठिकाणाच्या अभ्यासातून दिसून आले आहे. उत्तर आणि दक्षिण दिशेत हे तप्त स्थळ असमान (Asymmetric) आहे. इथल्या मुख्य ज्वालामुखीच्या धारेची निर्मिती मध्य-अटलांटिक पर्वतरांगेच्या पसरणाऱ्या अक्षावर झाली होती, असे दिसते.

सेंट हेलेना हा खडबडीत, ज्वालामुखीचा भूभाग आहे, ज्यामध्ये अनेक लहान विखुरलेली पठारे आणि मैदाने आहेत. बेटावरील सपाट जमिनीचे सर्वात मोठे क्षेत्र पूर्वेकडील शुष्क अशा बे प्लेन भागात आहे. इथल्या बेट समूहातील इतर बेटांचा उगम ज्वालामुखीय आहे. बेटावरील सर्वात उंच बिंदू ७७३ मीटर उंचीवरील डायनाचे शिखर आहे. याच्या नैऋत्येस २,४०० किलोमीटर अंतरावर असलेल्या ट्रिस्टन दा कुन्हावरील क्वीन मेरीचे शिखर २,०१५ मीटर उंचीवर आहे. याच बेटावर एक धोकादायक सक्रिय ज्वालामुखीही आहे.

सेंट हेलेना बेट हे सेंट हेलेना तप्त स्थळामुळे (Hotspot) अस्तित्वात आले. यातून सुमारे १४५ दशलक्ष वर्षांपूर्वी बेसाल्टिक लाव्हा बाहेर पडू लागला होता. कारण त्यावेळी ते बेट मध्य-अटलांटिक पर्वतरांगेच्या निर्माण होत असलेल्या भूतबकाच्या सीमेजवळ होते.महासागराच्या तळापासून वर येणाऱ्या अशा मोठ्या पर्वतश्रेणीपासून सागरतळ दोन्ही बाजूला विस्तारत जातो आणि त्यामुळे भूतबकेही एकमेकांपासून दूर जातात. समुद्रतळ विस्तार पावणे ही घटना सर्व समुद्रांच्या तळावर घडतेच असे नाही.

जिथे ही प्रक्रिया संथ गतीने होते तिथे अनेक उंच आणि अरुंद कडे (Cliffs) आणि पर्वत आढळतात. झपाट्याने विस्तार पावणाऱ्या सागरतळावर सौम्य उतार प्रदेश तयार होतात. मध्य-अटलांटिक पर्वतरांग हे एक संथ गतीने समुद्रतळ विस्तार होणारे ठिकाण आहे. ही पर्वतरांग दर वर्षी सरासरी २.५ सेंटीमीटर या वेगाने पूर्व पश्चिम दिशेत पसरत असल्याचे दिसून आले आहे. ती ग्रँड कॅनियनच्या आकाराप्रमाणे एक सागरी गर्ता तयार करते.

पृथ्वीवरील सर्वात नवीन आणि सर्वात पातळ भूकवच मध्य-महासागराच्या अशा पर्वतरांगांच्या मध्यभागी आढळते. महासागराच्या कवचाचे वय, घनता आणि जाडी ही मध्य महासागरातील पर्वतरांगेपासूनच्या अंतराप्रमाणे वाढते. समुद्राच्या मध्यभागातील चुंबकत्वामुळे शास्त्रज्ञांना २०व्या शतकाच्या सुरुवातीला समुद्रतळ पसरण्याची प्रक्रिया ओळखण्यात मदत झाली. बेसॉल्ट हा वितळलेल्या लाव्हा खडकापासून बनलेला खडक असून तो नेहमी नवीन सागरी कवच बनवतो.

हा खडक चुंबकीय आहे. १९५०च्या दशकात समुद्राच्या तळाचे चुंबकत्व मोजण्यासाठी मॅग्नेटोमीटर वापरण्यास सुरुवात केल्यावर, समुद्राच्या मध्यभागी असलेल्या महासागराच्या तळाचे चुंबकत्व मध्यवर्ती पर्वतरांगेच्या दोन्ही बाजूला सारख्याच दिसणाऱ्या ‘पट्टया’मध्ये (Belts) विभागले गेले आहे, असे शास्त्रज्ञांना आढळले. जेव्हा लाव्हा थंड होत असतो तेव्हा बेसॉल्ट खडकातील विशिष्ट चुंबकत्व पृथ्वीच्या त्यावेळच्या चुंबकीय क्षेत्रानुसार त्यात बंदिस्त होते आणि असे पट्टे बनतात. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा अनोखा आविष्कार असलेले प्रदेश समुद्राच्या मध्यभागी असलेल्या अशा पर्वतरांगांत आहेत जेथे समुद्राचा तळ आजही विस्तारतो आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे शिवाजी कर्डिले १४९८४ मतांनी आघाडीवर.

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT