हा अँकर जर निसटला तर गिर्यारोहक खोल दरीत कोसळलाच म्हणून समजा. इथे तर ७०-८० अंश कोनातील खडी चढण होती, एक छोटी चूक आणि काही हजार मीटर खाली कोसळण्याची भीती. म्हणूनच शिखरमाथा अगदी जवळ आला असला तरी कोणतीही रिस्क आम्हाला घ्यायची नव्हती.
हिमाने वेढलेल्या तंबूत, हिमवर्षावाच्या सान्निध्यात गिर्यारोहक नेटाने बसून होते, एकदा कुठेतरी सूर्यदर्शन होईल, उष्णता येईल, वातावरण निवळेल आणि चढाईची संधी मिळेल या आशेत. शेवटच्या दिवशी दिवसभर हवामान चांगले होते, आकाश निरभ्र होते, त्यामुळे शिखर चढाई सत्यात उतरेल असे वाटले. आम्ही बेस कॅम्पवर पुण्यातून हवामान अहवाल मागवला होता. आजची रात्र आशेचा किरण घेऊन येईल असे वाटले. मात्र, झाले भलतेच...
उमेश झिरपे
गेल्या महिन्याच्या सुरुवातीला गिरिप्रेमीचे गणेश मोरे, विवेक शिवदे, वरुण भागवत, मिंग्मा शेर्पा व नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंगचे वरिष्ठ प्रशिक्षक विनोद गुसैन यांनी माउंट मेरू शिखरावर भारतीय तिरंगा फडकावून इतिहास घडवला. माउंट मेरूच्या दक्षिण शिखरावर चढाई करणारा गिरिप्रेमीचा संघ हा भारतातील पहिला संघ ठरला अन् पश्चिम बाजूने मेरू शिखर चढाई करणारा जगातील पहिला संघ ठरला.
माउंट मेरू शिखरावर आतापर्यंत हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच गिर्यारोहकांनी चढाई केली आहे. गिरिप्रेमीच्या संघाचा हा दुसरा प्रयत्न होता. याच वर्षी मे- जून महिन्यात आयोजित मोहिमेत शिखरमाथा अवघ्या ४०० मीटरवर असताना खराब हवामानामुळे परतावे लागले होते. अवघ्या ५० दिवसांच्या आत गिरिप्रेमीने पुन्हा प्रयत्न करून ‘मेरू’चे आवाहन यशस्वीपणे पेलले.
हिमालयातील गिर्यारोहणाच्या इतिहासात पहिल्यांदाच मेरू शिखराच्या पश्चिम बाजूने चढाई करत भारतीय गिर्यारोहकांनी इतिहास घडवला. त्याचप्रमाणे मेरू दक्षिण शिखरावर चढाई करणारे पहिले भारतीय गिर्यारोहक होण्याचा मानही गिरिप्रेमीच्या गिर्यारोहकांनी मिळविला.
शनिवार, २ सप्टेंबर २०२३. विस्तीर्ण पसरलेल्या गढवाल हिमालयाच्या एका दुर्गम कोपऱ्यात कीर्ती बमक नावाच्या ग्लेशियर परिसरात सकाळी उन्हं येण्याच्या वेळेला वातावरण अगदी प्रसन्न होते. पण त्या प्रसन्न वातावरणात मी मात्र अस्वस्थ होतो. आदल्या रात्रीपासून, गेले आठ-दहा तास, आमचा संघ माउंट मेरू शिखराच्या पश्चिम कड्यावर झुंजत होता.
तुफान वाहणारं वारं, त्यामुळे वाढलेली थंडी आणि टणक अशा ब्लू आईसवर नेटाने चढाई करणारा आमचा संघ. माझं लक्ष सॅटेलाईट फोन व वॉकीटॉकीकडे होतं. माझ्या अंदाजानुसार व आमच्या नियोजनानुसार सकाळी सहा-साडेसहाच्या दरम्यान शिखरमाथा गाठायला हवा होता. मात्र, साडेसात नंतरही संघाकडून ‘समिट’ची न्यूज येत नव्हती.
हे काही क्षण खूप तणावपूर्ण असतात. मात्र, अशा वेळीही सकारात्मक राहण्याची, सकारात्मकच विचार करण्याची ऊर्जा आम्ही ब्रह्मविद्या व इतर मानसिक कणखरतेच्या तयारीतून घेत असतो. मेरूच्या शिखरमाथ्याविषयी विचार करत असतानाच वॉकीटॉकी वाजला व मेरू शिखरावरून गणेश मोरेने आनंदाच्या सुरात सांगितले, “मामा, टीम गिरिप्रेमी ऑन माउंट मेरू. समिट झाले. सगळे जण समिटला आहोत. एकदम फिट आहोत.
खाली निघालो की अपडेट देतो. भारत माता की जय!” गणेशने एका दमात शिखर चढाईची बातमी आणि सगळ्यांची ख्यालीखुशाली कळविली. मी समिटच्या बातमीसाठी आसुसलेलो होतो. गणेशचे बोलणे ऐकून माझा कंठ दाटून आला, मी फक्त ‘ओके ओके, अभिनंदन, काळजी घ्या’ असं म्हणून, ‘भारत माता की जय!’ म्हणत फोन ठेवला आणि डोळ्यासमोर आलं सप्टेंबर २०२१चं माझं व मिंग्मा शेर्पाचं संभाषण.
२०२१च्या सप्टेंबरमध्ये गिरिप्रेमीच्या संघाने माउंट मंदा-१ या शिखरावर यशस्वी चढाई केली. १९८९ व १९९१च्या दोन अयशस्वी प्रयत्नानंतर गिरिप्रेमीने तीस वर्षं उराशी बाळगलेलं स्वप्न शेवटी पूर्ण झालं होतं. आम्ही एव्हरेस्टपासून अन्नपूर्णापर्यंत जगातील १४ सर्वोच्च शिखरांच्या यादीतील आठ शिखरांवर भारतीय तिरंगा फडकवला होता, गिर्यारोहणातील सर्वोच्च आव्हानं आम्ही यशस्वीपणे पेलली होती.
मात्र, भारतीय हिमालयातील उंचीने तुलनेने कमी, मात्र चढाईच्या दृष्टीने अवघड अशा शिखरांवर भारतीय तिरंगा फडकविण्याचे स्वप्न मात्र सर्वार्थाने पूर्ण झाले नव्हते. या आधी सुदर्शन, शिवलिंग अशा शिखरांना आम्ही गवसणी घातली होती. माउंट मंदा-१ च्या यशाने आमच्या गिर्यारोहण कामगिरीचा कळसाध्याय गाठला होता. या मोहिमेत आमचा नेहमीचा साथीदार मिंग्मा शेर्पा खांद्याला खांदा लावून उभा होता.
आजच्या घडीला भारतातील सर्वात निष्णात व तगडा गिर्यारोहक म्हणजे हा मिंग्मा शेर्पा. त्याची गिर्यारोहण कामगिरी म्हणजे एक पुस्तक होईल. त्याच्या सहकार्यामुळे, सहभागामुळे आमच्या गिर्यारोहण मोहिमा यशस्वी होण्यात मोठा हातभार लागला, हे मी अभिमानाने सांगू इच्छितो. सुदैवाची बाब म्हणजे मिंग्मा शेर्पा आज गिरिप्रेमीचा अधिकृत सदस्य आहे, आमच्या परिवाराचा एक अविभाज्य भाग आहे.
तर या मिंग्मा शेर्पाने आम्हाला माउंट मंदा मोहिमेत मदत केलीच, मात्र सोबतीला एक आशावाददेखील दिला, आणखी मोठ्या कामगिरीचा. मंदा मोहीम झाल्यावर मी मिंग्मा शेर्पाला म्हटलं, “आगे कौनसा चॅलेंज लेना है, मेरू करते है क्या?” मी म्हणायचा अवकाश आणि मिंग्मा शेर्पा म्हणाला, “मामाजी, मेरू करना है, तो आपकेही साथ।” मिंग्माचे हे शब्द म्हणजे त्याचा गिरिप्रेमीवर असलेला विश्वास होता.
२००६ साली ऑस्ट्रेलियन साहसवीर जोडपे डॉ. ग्लेन सिंगलमन व हिथर स्वान यांनी माउंट मेरूच्या पश्चिम बाजूने ६ हजार मीटर चढाई करत बेस जम्प केली होती; मिंग्मा त्या मोहिमेत होता. त्यामुळे मिंग्माचा सहभाग आणि आमच्या सोबत मोहीम करण्याची इच्छा आमचा उत्साह दुणावणारी होती. आणि येथूनच सुरू झाली मेरू मोहिमेची तयारी.
कसलेल्या व अनुभवी गिर्यारोहकांचा संघ जोमाने शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीच्या तयारीला लागला होता. मात्र, खरे आव्हान होते सामानाची जुळवाजुळव आणि हलवाहलव. आम्ही मेरू शिखराच्या मागच्या बाजूने, म्हणजे पश्चिम बाजूने चढाई करणार होतो. कीर्ती बमक ग्लेशियरच्या बाजूने, अतिशय दुर्गम भागांतून, ही चढाई होणार होती.
या बाजूला मानवाचा पदस्पर्श तसा कमीच आहे, गेली अनेक वर्षे अगदी बोटावर मोजण्याइतक्या व्यक्तींशिवाय कुणी इकडे फिरकलेदेखील नसेल, याची प्रचिती येत होती. अशा ठिकाणी सामान पोहोचवणे म्हणजे दिव्यच होते. बरं, हा आमच्या मोहिमेचा अर्धाच भाग होता. पश्चिम बाजूने चढाई झाल्यावर आम्ही पूर्व बाजूने शांग्रीला मार्गाच्या डावीकडील मार्गाने मेरू शिखर समूहापैकी दक्षिण शिखर गाठणार होतो.
त्यामुळे आम्हाला मोठी तयारी करावी लागणार होती. गिर्यारोहणाचे उत्तम दर्जाचे साहित्य विदेशातून आणण्याची हालचाल चालू होती. सोबतीला अन्नधान्य व इतर सामग्रीचीदेखील सोय करावी लागणार होती. यासाठी लागणारा निधी लाखोंच्या घरात होता.
यावेळी गिरिप्रेमीचे पाठीराखे व हितचिंतक तर धावून आलेच, सोबतीला पी क्यूब एंटरप्राइजेस, परिमल व प्रमोद चौधरी फाउंडेशन, वर्ल्ड ऑइलफिल्ड मशीन, मुंबईचे हावरे बिल्डर्स यांनी आर्थिक डोलारा सांभाळला. आम्ही यावेळी भारतीय बनावटीचे दोरखंड मोठ्या प्रमाणात वापरले.
नमः रोप्स यांनी बनविलेले हे दोरखंड आंतरराष्ट्रीय प्रतीच्या दोरखंडाइतकेच मजबूत व टिकाऊ होते, हे मला विशेष नमूद करावेसे वाटते. तब्बल ७ हजार मीटर लांबीचा दोरखंड आम्हाला लागणार होता. हे सर्व सामान आम्ही पुण्यातून उत्तरकाशी- गंगोत्रीला पाठवले. मोहिमेत आम्हाला सपोर्ट करणाऱ्या व्हाइट मॅजिक अॅडव्हेंचर्स या संस्थेने तब्बल १७०० किलो सामान पश्चिम व पूर्व बाजूच्या बेस कॅम्पवर पोहोचविण्यात मदत केली.
यात आमच्या सगळ्या पोर्टर मंडळींनी घेतलेले कष्ट शब्दातीत आहेत. चाळीसहून अधिक पोर्टरनी हे सामान बेस कॅम्पवर पोहोचवण्यात मदत केली. आम्ही मोहिमेवर असतानादेखील गंगोत्रीपासून बेस कॅम्पपर्यंत सामानाची ने-आण नियमित चालू होती.
कीर्ती बमक ग्लेशियर, जिथे आमचा बेस कॅम्प होता ती जागा अत्यंत दुर्गम आहे. या ठिकाणी सामानाची ने-आण करणे म्हणजे मोठे दिव्यच आहे. बेस कॅम्पला पोहोचण्यासाठी लागणारे कष्ट बघता सुरुवातीला पोर्टर मंडळींचा सूर नकारात्मक होता. आम्ही त्यांची भावना समजू शकत होतो, कारण पाठीवर सामान घेऊन दुर्गम भागात ट्रेक करणे तसे अवघडच होते.
मात्र मी त्यांना भावनात्मक साद घातली. “मेरूच्या पश्चिम बाजूने होणारी चढाई ही भारतातूनच नव्हे तर जगातून होणारी पहिली चढाई आहे. हे शिवधनुष्य पेलण्यासाठी तुमचाही सहभाग महत्त्वाचा आहे,” असं म्हटल्यावर पोर्टरदेखील मनात कुठलीही द्विधा न ठेवता मोहिमेत सहभागी झाले.
आम्ही जवळपास ३५ दिवस डोंगरामध्ये होतो. आमचा कुक हुकूम सिंह, जेवणाच्या कामात मदत करणारे विकी, हरी व इतर सर्वच जण मोठ्या आनंदाने एकत्र राहत होतो. आम्ही जेव्हा कीर्ती बमक हिमनदीवर पोहोचलो, तेव्हा बेस कॅम्प नेमका कुठे लावता येईल, याची चाचपणी करावी लागली, कारण सर्वत्र फक्त ‘हिम एके हिम’च होते. जवळचा पाण्याचा स्रोत शोधून, खडकाळ व हिमाचा भाग यांचा अंदाज घेत आम्ही बेस कॅम्प उभारला.
जेव्हा आपण अतिउंचीवर जातो, तेव्हा पचनशक्ती कमी होते. तसेच सतत कोमट पाणी प्यावे लागते, जेणेकरून डिहायड्रेशन होणार नाही व घसादेखील कोरडा पडून त्रास होणार नाही. या सगळ्या कामात आमच्या सर्व मदतनिसांनी आपुलकीने मदत केली. त्याच्यासोबत साथ दिली ती पुण्यातील दीक्षित फूड्स यांनी करून दिलेल्या रेडी टू इट फूड पाकिटांनी. जेव्हा संघ ५,५०० मीटर वरील कॅम्प-१वर मुक्कामाला होता, तेव्हा तिथे आपले जेवण स्वतः करावे लागत असे.
इतक्या उंचीवर साधं लिटरभर पाणी गरम करायला दोन तास लागतात. इथे इंधन म्हणून ब्युटेन गॅस वापरावा लागतो, तोही अतिशय काटकसरीने. अशा वेळी कमी वेळेत होणारे, जीवनसत्त्वयुक्त व चविष्ट जेवण मिळणे कठीणच. मात्र, रेडी टू इट फूड उपमा, डाळ-खिचडी, शेवयाची खीर वगैरेंनी अतिउंचीवरदेखील जेवणात रंगत आणली. त्यामुळे संघाने अधिक जोमाने चढाई केली.
आम्ही उत्तमप्रकारे अक्लमटाईज होऊन बेस कॅम्पला पोहोचलो होतो. आमचा बेस कॅम्प ४,४०० मीटर उंचीवर होता. अॅडव्हान्स बेस कॅम्प ५ हजार मीटर उंचीवर, पुढे ५,५०० मीटरवर कॅम्प-१ व जवळपास ६ हजार मीटरवर समिट कॅम्प लावण्याचे आमचे नियोजन होते. आमचा संघ शेर्पांच्या साथीने रूट ओपन करणार होता.
म्हणजे टप्प्याटप्प्याने शिखरमाथ्यापर्यंत दोरखंड लावणार होता व चढाई करणार होता. मेरूसारख्या दुर्गम शिखरांवर, त्यात पुन्हा संपूर्णपणे नवीन मार्गाने चढाई करताना चढाई मार्ग निश्चित करण्याची जबाबदारी गिर्यारोहकांनाच घ्यावी लागते. एव्हरेस्ट किंवा इतर अष्टहजारी शिखरांवर हा दोरखंड शेर्पांचा संघ मोसमाच्या सुरुवातीलाच लावतो व मार्ग निश्चित करतो.
गिर्यारोहकांना या दोरखंडाच्या आधाराने चढाई करायची असते. इथे मात्र मार्ग निश्चितीची जबाबदारी आम्हा गिर्यारोहकांवरच होती. तब्बल २ हजार मीटरपेक्षा अधिक लांबीचा मार्ग आम्हाला निश्चित करावा लागणार होता. त्यासाठी आवश्यक सामान यामध्ये दोरखंड, रॉक पिटॉन, आईस पिटॉन आणि इतर अनेक तांत्रिक साधने टप्प्याटप्प्याने आम्हाला वरच्या कॅम्पवर पोहोचवायची होते. यासाठी हाय अल्टिट्यूड पोर्टरसोबत आमच्या संघातील सदस्य बेस कॅम्पपासून एक-एक फेऱ्या करत होते.
आम्ही पूर्ण तयारी करून आलो होतो, नियोजनही काटेकोर होते, मात्र निसर्गाची साथ नव्हती. यावर्षी संपूर्ण हिमालयातच अत्यंत लहरी हवामान बघायला मिळाले. अगदी काश्मीरपासून अरुणाचलपर्यंत हिमालयात सर्वत्र सतत हिमवृष्टी होत आहे. खरंतर मे- जून महिन्यात हिमालयात तुलनेने कमी हिमवृष्टी होते, ढगाळ वातावरण कमी प्रमाणात असते व सूर्याचे दर्शन नियमित घडते.
यावर्षी हे चक्र जरा बिघडले होते. दुपार झाली की ढग जमून यायचे व त्यानंतर येणारा पाऊस व हिमवृष्टी नकोशी वाटायची. यातून बेस कॅम्पदेखील सुटला नाही. तंबूभोवती हिमवृष्टीमुळे हिमाचा ४-४ फुटांचा थर उभा राहत असे. एकदा तर पहाटे पाचला सुरू झालेली जोरदार हिमवृष्टी रात्री दहापर्यंत चालूच होती. दिवसभर अंगाला झोंबणारे हिमकण थांबण्याचे नाव घेत नव्हते. आम्हाला अक्षरशः तंबू धरून दिवसभर बसावे लागले.
एका तंबूतून दुसऱ्या तंबूत जाताना जीव अक्षरशः मुठीत धरून जावं लागलं. आमचा जेवणाचा तंबू फडफडताना बघून आमच्या चिंता वाढत होत्या. हिमवृष्टीचा व वाऱ्याचा जोर इतका होता की आमच्या एका तंबूचे पूर्ण नुकसान झाले. तो दिवस अक्षरशः परीक्षा पाहणारा होता. बेस कॅम्पवरच ही अवस्था असेल तर कॅम्प-१ व त्याच्यावर काय झाले असेल, या विचाराने मनात चिंतांचे काहूर माजत असे. हिमवर्षाव शांत झाल्यावर आमचा संघ जेव्हा पुन्हा एकदा
कॅम्प-१च्या वर पोहोचला तेव्हा आमच्या या चिंता किती खऱ्या होत्या ते उमगले.
संघाने मार्ग निश्चित करताना मोठा दोरखंड ब्लॅक डायमंड या विख्यात कंपनीचे ट्युब्यूलर पिटॉन वापरून बसवला होता. मात्र, हिमवृष्टी इतकी जोरदार होती की मजबूत व टणक म्हणून गणले जाणारे पिटॉन अक्षरशः वाकले अन् दोरखंड तर हिमाच्या जोरामुळे वाहून गेला. दणकट साहित्याची ही अवस्था असेल तर माणसांचे काय झाले असते, याची कल्पनाही करवत नाही. दैव बलवत्तर होते म्हणून आमचा संघ या हिमवर्षावात अडकला नाही. संपूर्ण मोहिमेदरम्यान हवामानाची तीव्रता याच प्रमाणात अनुभवली.
जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव होतो तेव्हा ५-६ फूट हिम सहज साचते. या साचलेल्या हिमामुळे हिमप्रपात होण्याची शक्यता खूप असते. त्यामुळे अशा हिमवर्षावानंतरचे ४८ तास महत्त्वाचे असतात. यात जर सूर्यदर्शन झाले, जराशी उष्णता मिळाली तर हा हिम आहे त्या जागेवर सेटल होतो व हिमप्रपाताची शक्यता कमी होते. त्यामुळे संपूर्ण मोहिमेत अशा सलग ४८ तास चांगल्या हवामानासाठी आम्ही देवाचा अक्षरशः धावा केला, मात्र आमचा संघ जेव्हा अतिउंचीवर होता तेव्हा असे ४८ तास कधीच लाभले नाहीत.
आमच्या चढाईचे नियोजन दोन टप्प्यात होते. संघातील विवेक शिवदे, पवन हडोळे, वरुण भागवत, आशिष माने व सोबतीला मिंग्मा शेर्पा अशी तुकडी पुढे जाऊन दोरखंड लावत असे व त्यांच्या पाठोपाठ कृष्णा ढोकले, हिमालयन माउंटनियरिंग इन्स्टिट्यूट, दार्जिलिंगचे माजी उपप्राचार्य विंग कमांडर देविदत्त पंडा व नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंग येथील वरिष्ठ प्रशिक्षक विनोद गुसैन इतर रसद या सदस्यांना पुरवत असत.
पुढे जाऊन या दोन्ही तुकड्या आलटून पालटून मार्ग निश्चित करण्याचे काम करणार होत्या, जेणेकरून सर्व गिर्यारोहकांची योग्य ऊर्जा न थकता खर्ची पडेल. आम्हाला २ हजार मीटरहून जास्त लांबीचा दोरखंड लावायचा होता. शंभर मीटरच्या दोरखंडाचे वजन पाच-सात किलो होत असे. हिमवृष्टीमुळे दोरखंड ओला झाला तर हेच वजन १०-१२ किलोच्या घरात जात असे. दोरखंडासोबतच पिटॉन व इतर साहित्याचे वजन तर वेगळेच.
या वजनासह ३-४ फूट हिमातून मार्ग काढणे अगदी थकवणारे होते. मात्र, आमचा संघ चांगल्या तयारीचा होता. थकवा आला आहे, म्हणून कुणी एकानेही तक्रार केली नाही. एकवेळ तर अशी होती, की हा संघ सलग चार रात्री ५५०० मीटर उंचीवरील कॅम्प-१ वर होता, कारण हिमवर्षाव थांबण्याचे नाव घेत नव्हता. हिमप्रपाताची भीती तर होतीच मात्र सोबतीला ब्लूआईसवर साठलेला चार फूट हिमाचा थर आमची भीती वाढवत होता.
जेव्हा जेव्हा आम्ही शिखरमाथ्याच्या मार्गावर दोरखंड बसविण्यासाठी व अँकर लावण्यासाठी टणक भाग शोधत असून तेव्हा कमीतकमी २-३ फूट हिमातून मार्ग काढावा लागत असे. त्यातूनही पिटॉन टॅन्क बर्फावर बसतील की नाही याची शाश्वती नसे. हे पिटॉन मजबूत बसणे व त्यावर अँकर लावता येणे फार महत्त्वाचे असते. कारण त्या जोरावरच गिर्यारोहक चढाई करू शकतो. हा अँकर जर निसटला तर गिर्यारोहक खोल दरीत कोसळलाच म्हणून समजा.
इथे तर ७०-८० अंश कोनातील खडी चढण होती, एक छोटी चूक आणि काही हजार मीटर खाली कोसळण्याची भीती. म्हणूनच शिखरमाथा अगदी जवळ आला असला तरी कोणतीही रिस्क आम्हाला घ्यायची नव्हती. हिमाने वेढलेल्या तंबूत, हिमवर्षावाच्या सान्निध्यात गिर्यारोहक नेटाने बसून होते, एकदा कुठेतरी सूर्यदर्शन होईल, उष्णता येईल, वातावरण निवळेल आणि चढाईची संधी मिळेल या आशेत. शेवटच्या दिवशी दिवसभर हवामान चांगले होते, आकाश निरभ्र होते, त्यामुळे शिखर चढाई सत्यात उतरेल असे वाटले.
आम्ही बेस कॅम्पवर पुण्यातून हवामान अहवाल मागवला होता. आजची रात्र आशेचा किरण घेऊन येईल असे वाटले. मात्र, झाले भलतेच. कोणतीही शक्यता नसताना रात्री ८ ते पहाटे ३ कॅम्प-१ वर इतका हिमवर्षाव झाला की संघाला तंबूत हालचाल करणे अवघड झाले. आम्ही इकडे बेस कॅम्पवर नेमकं काय घडतेय, याच विचारात रात्रभर जागे होतो. संघ वर गेला का, त्यांनी शिखर चढाई केली का, किती जोरात हिमवर्षाव असेल, यातून मार्ग सापडेल का या नानाविध विचारांचे काहूर डोक्यात माजले होते.
शेवटी पहाटे विवेक शिवदेचा सॅटेलाईट फोनवर संपर्क झाला. हिमवर्षाव थांबायचे नाव घेत नाहीये, म्हणून आम्ही तंबूतच बसून आहोत, असे त्याच्याकडून ऐकल्यावर माझ्या जिवात जीव आला. शिखर चढाईपेक्षा सुरक्षितता महत्त्वाची. पाचवा दिवस उजाडला तरी हवामान साथ देण्याचे नाव घेत नव्हते.
पुढील हवामान अंदाजदेखील फारसा अनुकूल नव्हता. आम्ही सगळ्यांनी एकत्र चर्चा केली आणि खाली परतण्याचा निर्णय घेतला. शिखरमाथा अवघ्या ४०० मीटरवर असताना संघाला खाली यावे लागले. आमच्या अनुभवी संघातील गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट, कांचनजुंगासारख्या कठीण अष्टहजारी शिखरांवर चढाई केली होती. त्यामुळे अनुभव व कौशल्ये यांचा उत्तम संगम त्यांच्याकडे होता.
तरीही नैसर्गिक परिस्थितीमुळे मेरूचा शिखरमाथा गाठता आला नाही. तरीदेखील मोहीम यशस्वी झाली असेच मी म्हणेन. ज्या मार्गाने शिखर चढाई करण्याचा विचारदेखील गिर्यारोहक करत नाहीत, तेथे येऊन मार्ग निश्चिती करून ६,२०० मीटर चढाई करणे, म्हणजे एव्हरेस्ट शिखर चढाईइतके यश आहे. म्हणूनच आजपर्यंत अंदाजे ८ हजार वेळा यशस्वी चढाई झालेल्या एव्हरेस्टच्या तुलनेत मेरूवर फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या कमी चढाया झाल्या आहेत.
विरळ हवामान हे एव्हरेस्ट व इतर शिखरांचे आव्हान आहे, तर मेरूसाठी कौशल्ये व जिद्द यांचा संगम लागतोच आणि सोबत हवामानाचीही साथ हवी, नाहीतर शिखर चढाईचे निर्भेळ यश हुलकावणी देऊ शकते.
शिखरमाथा कितीही जवळ असला तरी ‘सुरक्षितता प्रथम’ हे तत्त्व आम्ही नेहमी पाळत आलो आहोत. म्हणूनच शिखराच्या अवघ्या ४०० मीटर खालून आम्ही परत फिरलो. बेस कॅम्पहून माउंट मेरूचा निरोप घेताना आम्हा सर्वांचे कंठ दाटून आले होते, मात्र सर्वानी भावनांना आवर घातला व तपोवनच्या दिशेने मार्गस्थ झालो.
दुसरीकडे मोहिमेचा दुसरा अध्याय आमची वाट बघत होता. पश्चिम बाजूने शिखर चढाईचा प्रयत्न चालू असताना गिरिप्रेमीचा डॉ. सुमित मांदळे हा नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंग येथील वरिष्ठ प्रशिक्षक लाले पुन यांच्या साथीने पूर्व बाजूकडील शिखर मोहिमेचा किल्ला लढवत होता.
तपोवनपासून ५०० मीटर उंचीवर पूर्व बाजूकडील अॅडव्हान्स बेस कॅम्प वसविण्यात येणार होता. डॉ. सुमित, लाले पुन, अभय खेडकर, निकुंज शाह यांनी अवघ्या एका दिवसात तब्बल ५०० मीटर दोरखंड लावून मार्ग निश्चित केला होता. हे सगळे तपोवन येथे आमची वाट बघत होते. पश्चिम बाजूचा बेस कॅम्प आवरून आम्ही तपोवनला आलो.
पूर्व बाजूकडील हवामान अतिशय निरभ्र होते. पश्चिम बाजूला येत असलेली आव्हाने येथे नव्हती, म्हणून आम्ही शिखर चढाई करण्यासाठी पुढे सरसावलो. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. पूर्व बाजूकडील हिम उष्णतेमुळे वितळण्यास सुरुवात झाली होती. याची परिणती म्हणून चढाई मार्गातील छोटे दगड व हिमकड्यांचे भाग सैल होऊन खाली येण्यास सुरुवात झाली होती. चढाई करण्यासाठी हे बिलकूल अनुकूल नव्हते.
त्यात एक छोटा दगड बंदुकीतून गोळी सुटावी अशा वेगाने खाली आला व विवेकच्या पायाला लागला. दगड छोटा होता, मात्र त्याचा वेग बराच होता. दैव बलवत्तर म्हणून तो दगड पायाला लागला, डोक्याला व इतर ठिकाणी लागला असता तर मोठी दुखापत झाली असती. पायावर लागल्याने तीव्रता त्यामानाने कमी होती व थोडक्यात भागले. २०१२ सालीदेखील असाच एक छोटा दगड भूषण हर्षे या आमच्या गिर्यारोहकाचे हेल्मेट भेदून डोक्याला दुखापत करून गेला.
त्यावेळी आलेल्या अनुभवातून आम्ही हे शिकलो होतो, की असे छोटे दगड सैल होऊन सुटतात म्हणजे चढाई करणे कठीण होते. यातून काहीही अनर्थ घडू शकतो. पहिले प्राधान्य सुरक्षिततेला असल्याने पश्चिमेप्रमाणे पूर्वेकडील शिखर चढाई आहे तिथे थांबविण्याचे आम्ही सर्वानुमते ठरविले व गिर्यारोहकांनी तपोवन गाठून परतीचा प्रवास सुरू केला.
सर्व योग जुळून आल्याशिवाय गोष्टी घडत नाहीत, यावर माझा ठाम विश्वास आहे. या मोहिमेतून पुन्हा एकदा हे अधोरेखित झाले. मात्र, मेरूसारख्या अभेद्य पर्वताच्या पश्चिम बाजूने चढाई करण्याचा विचार करणे, हा विचार सत्यात उतरविणे व जगातील पहिलावहिला प्रयत्न करणे ही कृतीच मुळात धाडसी आहे. त्यामुळे गंगोत्रीला परतल्यावर गंगामैय्याचे दर्शन घेताना मी मनोमन प्रार्थना केली, की मेरूचे आव्हान पेलण्यासाठी आम्ही पुन्हा येऊ, तू अशीच कृपादृष्टी ठेव!
आम्ही पुण्यात परतलो, मात्र मन मेरू मोहिमेतच होते. पुन्हा एकदा या शिखराचे आव्हान आपण पेलायला हवे असे मनोमन वाटत होते. मी पुन्हा एकदा माझ्या संघाला विचारले. अर्थात आमचे तगडे गिर्यारोहक तयारच होते. यावेळी संघ तसा छोटा असणार होता. पहिल्या प्रयत्नाच्या वेळी सहभागी झालेले विवेक शिवदे, वरुण भागवत, एनआयएमचे प्रशिक्षक विनोद गुसाई यांच्याबरोबर मोहिमेत यावेळी आणखी एका निष्णात गिर्यारोहकाची भर पडली, गणेश मोरे.
आमच्या गिरिप्रेमीचा शेर्पाच तो. अतिउंचीवर इतक्या सहज वावरणारा गणेश मोहिमेसाठी तयार झाला ही आमच्यासाठी आनंदाची बाब होती. एव्हरेस्ट, च्यो ओयू सारख्या कठीण शिखरांवर चढाई करणारा गणेश मोहिमेत येणार म्हटल्यावर इतर गिर्यारोहकांचादेखील हुरूप वाढला आणि आम्ही पुन्हा एकदा ‘मेरूदंड’ पेलण्यासाठी सज्ज झालो.
२० ऑगस्ट २०२३. अवघ्या पन्नास दिवसांच्या आत तो दिवस उजाडला. आम्ही पुन्हा एकदा सर्व तयारीनिशी गंगामैय्याचे दर्शन घेऊन माउंट मेरूच्या दिशेने निघालो. यावेळी उद्दिष्ट होते, योग्य हवामान मिळविण्यासाठी एकही तास वाया घालवायचा नाही. गंगोत्री, भोजबासा, चिडबासा, तपोवन असे एक एक टप्पे करत आम्ही पुन्हा एकदा बेस कॅम्पला पोहोचलो. जून महिन्यात परत येताना आम्ही १७ किट बॅग तपोवनला मौनी बाबांच्या गुहेत ठेवून आलो होतो.
त्यामुळे सामान वाहून नेण्यासाठी खूप मदत झाली. यावेळी आम्हाला पुन्हा एकदा हिमालयाचे वेगळेच रूप पाहायला मिळाले. मे महिन्यातला हिमाच्छादित मार्ग यावेळी अक्षरशः उघडा पडला होता. त्यामुळे खडकाळ भागातून चालताना जास्त ऊर्जा खर्ची पडत होती.
त्यात आम्ही जेव्हा बेस कॅम्पला पोहोचलो तेव्हा एक लक्षात आले की कॅम्प-१ च्या मार्गावर जो नाला लागत होता तेथे हिम तुलनेने कमी झाले आहे. त्यामुळे सूर्य डोक्यावर आला की येथे रॉकफॉलचे प्रमाण वाढत जाते. त्यामुळे सकाळी उठून चढाई करावी लागत असे. संघाने अगदी कसोशीने या आव्हानांना तोंड दिलं.
मी बेसकॅम्पला येताना जुनीफर नावाच्या झाडांचा पाला सोबत आणला होता. आमच्या बेस कॅम्पवरील मंदिरात धूप सतत धुमसता ठेवण्यासाठी ही सुगंधी फुले अन् पाला उपयोगी पडतो. मागच्या वेळी आम्हाला निसर्गाने म्हणावी तशी साथ दिली नव्हती.
निसर्ग देवतेपुढे खरंतर कुणाचं चालत नाही, त्यामुळे निसर्गासमोर नतमस्तक होऊन आपले काम करत राहणे, हा एकमेव मार्ग आपल्या समोर असतो. आम्हीदेखील निसर्ग देवतेच्या विरोधात जाऊन काहीही करायचे नाही, हे तत्त्व नेहमीच पाळतो. त्यामुळे सर्वंकष तयारीसोबतच निसर्ग देवतेचे आशीर्वाद नेहमीच आवश्यक असतात.
आमचे अक्लमटायझेशन उत्तम झाले होते. आता वेळ होती अंतिम शिखर चढाईची. १ सप्टेंबर २०२३च्या रात्री आमचा संघ कॅम्प-१हून शिखरमाथ्याकडे निघाला. वातावरण निरभ्र होतं. त्यामुळे आमचा आत्मविश्वास अधिकच दुणावला. मात्र, रात्रीतून अचानक जोराचे वारे वाहू लागले आणि थंडीत भर पडली.
त्यात आम्ही पश्चिम बाजूने चढाई करत होतो, त्यामुळे सकाळचे ऊनही विरुद्ध बाजूने होते. याचा परिणाम थंडी वाढण्यात झाला. मात्र, संघाकडे अनुभव होता, जिद्द होती. अंगावर येणाऱ्या खड्या हिमाच्छादित भिंतीवर नेटाने चढाई करत एक एक टप्पा संघ पार करत होता. ब्लू आईस व खडकाळ भागातून चढाई करताना पृष्ठभागावरची पकड तुलनेने सैल असे, त्यामुळे अतिशय लक्षपूर्वक चढाई करावी लागत असे.
दुसऱ्या दिवशी (२ सप्टेंबर) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गिरिप्रेमीच्या गणेश मोरे, विवेक शिवदे, वरुण भागवत, मिंग्मा शेर्पा व नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंगचे वरिष्ठ प्रशिक्षक विनोद गुसाई व त्यांचे सहकारी बिहारी राणा व अजित रावत यांनी शिखरावर भारतीय तिरंगा फडकावून इतिहास घडवला.
माउंट मेरूच्या दक्षिण शिखरावर चढाई करणारा गिरिप्रेमी व एनआयएमचा संघ हा भारतातील पहिला संघ ठरला अन पश्चिम बाजूने मेरू शिखर चढाई करणारा जगातील पहिला संघ ठरला. यात दावा शेर्पा, फुर्रतेनसिंग शेर्पा या शेर्पा साहाय्यकांनीदेखील मेरू शिखरावर चढाई केली. या मोहिमेत उत्तरकाशी येथील नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंगने केलेली मदत महत्त्वाची ठरली.
इन्स्टिट्यूटचे प्रिन्सिपल कर्नल अंशुमन भदोरिया व व्हाईस प्रिन्सिपल डॉ. मेजर देवल वाजपेयी यांच्या अनमोल सहकार्याने मोहिमेच्या तयारीत व यशस्वीतेत मोलाची मदत झाली. मेरू मोहिमेत चढाई जरी काही गिर्यारोहकांनी केली असली तरी त्यामागे अनेकांचे सहकार्य लाभले आहे. एव्हरेस्ट, कांचनजुंगा, अन्नपूर्णा अशी विविध शिखरांवर चढाई करणारा भूषण हर्षे याने आम्हाला हवामानाचा अचूक अंदाज सांगण्यासाठी खूप मदत केली.
मी आणि भूषण सातत्याने फोनवरून संपर्कात होतो. भूषण शरीराने जरी पुण्यात असला तरी मनाने मात्र मेरू मोहिमेतच होता. पहिल्या प्रयत्नाच्या वेळी बेस कॅम्पवर माझ्या सोबतीने कार्यरत असणारा अखिल काटकर, पूर्व बाजूने मोहिमेत सहभागी झालेले अभय खेडकर, निकुंज शाह, एनआयएमचे वरिष्ठ प्रशिक्षक हवालदार लाले पुन, आमचे सगळे शेर्पा साथीदार, आम्हाला मार्गदर्शनासाठी नेहमीच पाठीशी असणारे गिरिप्रेमीचे वरिष्ठ पदाधिकारी ते आमच्या यशासाठी प्रार्थना करणारे हजारो हितचिंतक, या सर्वांनीच मेरू मोहीम यशस्वी होण्यात मदत केली.
अवघ्या पन्नास दिवसांत दुसरा प्रयत्न करण्यासाठी पुन्हा एकदा मोठ्या निधीची गरज होती. मात्र, पी क्यूबचे पार्थ चौधरी, प्राजचे प्रमोद चौधरी, नमः रोप्सचे भारत अग्रवाल, वर्ल्ड ऑइलफिल्ड मशीनचे पदाधिकारी सर्वांनी भक्कमपणे आम्हाला साथ दिली, म्हणूनच मोहीम सर्वार्थाने यशस्वी होऊ शकली.
मी आधी म्हटलं तसं, निसर्ग देवतेची साथ अशा मोहिमांमध्ये फार आवश्यक असते. पहिल्या प्रयत्नात आम्हाला निसर्ग देवतेने अनुभवाची शिकवणी दिली तर दुसऱ्या वेळी निर्विघ्न साथ दिली. मोहीम फत्ते करून येताना ऋषिकेशजवळ रस्त्यावर मोठी दरड कोसळली, आम्ही जर वीसएक मिनिटे उशिरा निघालो असतो तर त्या दरडीखाली सापडलो असतो. आमची श्रद्धा येथे कामाला आली, असेच म्हणू शकतो.
ही मोहीम सर्वांसाठीच भावनिक होती. शिखरवीर विवेक शिवदे हा वर्षांतील अर्धावेळ तरी डोंगरांमध्ये असतो. त्याला नुकतीच मुलगी झाली आहे. या मोहिमेच्यावेळी तिचं वय दीड वर्ष होतं, ज्यावेळी ती विवेकचे छायाचित्र वर्तमानपत्रात बघत असे, तेव्हा ‘बाबा- बाबा’ एवढेच म्हणे. हे जेव्हा विवेकला कळाले, तेव्हा त्याच्या डोळ्यात आलेल्या आनंदाश्रूंमुळे मलाही भरून आले.
मोहीम यशस्वी करून ‘नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंग’ येथे परतल्यावर तेथे झालेले आमचे जंगी स्वागत ही आमच्या यशस्वी कामगिरीची पावती होती. जगविख्यात गिर्यारोहण प्रशिक्षण संस्था आमच्या मोहिमेत सहभागी होते, येथील सर्वच अधिकारी सर्वार्थाने मोहिमेत लक्ष घालतात अन् यशाबद्दल आमची पाठ थोपटतात, कौतुक करतात ही एखाद्या गिर्यारोहकासाठी अफाट अशी ‘अचिव्हमेंट’ आहे.
यात भर पडली आर्मीच्या ‘सदर्न कमांड’च्या खास कौतुकाने. गिरिप्रेमीच्या कामगिरीविषयी वर्तमानपत्रात वाचल्यानंतर सदर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजय कुमार यांनी आम्हाला त्यांच्या कार्यालयात बोलावून मानाच्या ‘स्वोर्ड ऑफ रिगालिया’ने सन्मानित केले. माउंट मेरूच्या यशाची दखल जगभरातून घेण्यात आली. गिर्यारोहण क्षेत्रातील विविध देशांतील दिग्गजांनी मोठ्या उत्साहाने गिरीप्रेमीचे कौतुक केले.
मेरूसोबत दुग्धशर्करा योग जुळून आणला आमच्या सुदर्शन मोहिमेने. मेरूच्या जवळच असलेल्या सुदर्शन या तांत्रिकदृष्ट्या अतिशय कठीण शिखरावर गिरिप्रेमीच्या महिला गिर्यारोहकाचा संघ चढाई करत होता. मेरूच्या यशानंतर अवघ्या चारच दिवसात (६ सप्टेंबर) मोहीम नेता स्मिता करीवडेकरने माउंट सुदर्शन या ६,५२९ मीटर उंच शिखरावर भारताचा तिरंगा व महाराष्ट्राचा भगवा झेंडा फडकविला व ही कामगिरी करणारा महाराष्ट्रातील पहिला महिला संघ असा मान मिळविला.
या दोन्ही मोहिमांचे यश म्हणजे गिरिप्रेमीच्या गिर्यारोहण प्रवासातील सुवर्णाक्षरांनी नोंदवावे असे क्षण आहेत. या क्षणांचा मी साक्षीदार आहे, याचा मला एक गिर्यारोहक म्हणून सार्थ अभिमान आहे. हा प्रवास असाच उत्तरोत्तर बहरत जावो, हीच श्रींचरणी प्रार्थना!
___________________________________
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.