साप्ताहिक

Navratri: जाणून घ्या नवरात्रीचे नऊ रंग आणि त्याची महती

सकाळ डिजिटल टीम

सोनिया उपासनी

गणपती उत्सव उत्साहात पार पडला, आणि वेध लागले आहेत नवरात्रोत्सवाचे. देशभरात सर्वत्र हर्षोल्हासात हा उत्सव साजरा केला जातो. देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. नऊ रूपांसाठी नऊ रंग निवडले जातात. सारे वातावरण नऊ दिवस एकदम ‘कलरफुल’ होऊन जाते. नऊ रंगांच्या रंगसंगतीचे पोशाख आपापल्या कपाटांमधून बाहेर काढा आणि दांडिया खेळायला तयार व्हा!

भारतीय संस्कृतीत रंगांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच हा रंगांचा उत्सवही आपल्याच देशात साजरा केला जातो. नवरात्रीचे नऊ रंग हे ह्याच एकात्मतेचे प्रतीक आहे. लाल, निळा, पिवळा या तीन रंगांना एकत्रितपणे त्रिमूर्ती असे संबोधले जाते आणि याच मूळ रंगांच्या मिश्रणातून नारंगी, जांभळा, हिरवा यांच्यासह इतर सर्व रंग तयार होतात.

नवरात्रीत आजूबाजूला जरा लक्ष दिले, तर नऊ दिवस ठरावीक रंग परिधान केले जातात. देवीलाही त्याच ठरावीक रंगांचे वस्त्र नेसवले जाते.

नवरात्र वर्षातून चार वेळेस येते. पण त्यातील दोन नवरात्र उत्सव हे गुप्त नवरात्र असतात, त्यामुळे चैत्र नवरात्र व शारदीय नवरात्र हे दोनच नवरात्र उत्साहात साजरे केले जातात. ह्या वर्षीचे शारदीय नवरात्र हे आश्विन शुद्ध पक्ष, अर्थात १५ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.

ह्या वर्षीचे नऊ रंग आहेत - पहिला दिवस - नारंगी, दुसरा दिवस - पांढरा, तिसरा दिवस - लाल, चौथा दिवस - गडद निळा, पाचवा दिवस - पिवळा, सहावा दिवस - हिरवा, सातवा दिवस - राखाडी (ग्रे), आठवा दिवस - जांभळा व नववा दिवस - मोरपंखी.

पहिला दिवस : नारंगी रंग - या दिवशी देवी शैलपुत्रीचे रूप पुजले जाते. हे दुर्गा देवीचे पहिले रूप आहे. नवदुर्गेतील ही पहिली दुर्गा असल्याने ह्या देवीची पूजा पहिल्या दिवशी करण्यात येते. पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून या देवीचे नाव शैलपुत्री. ह्या देवीचा आवडता रंग नारंगी अथवा भगवा मानला जातो. त्यामुळे सर्व दांडियारासमध्ये, सार्वजनिक ठिकाणी नारंगी रंगांच्या वस्त्रांचा समावेश असतो.

दुसरा दिवस : पांढरा रंग - दुसऱ्या दिवशी दुर्गामातेचे ब्रह्मचारिणी हे रूप पुजले जाते. ब्रह्म अर्थात तपस्या आणि चारिणी याचा अर्थ आचरणात आणणारी. या देवीचा आवडता रंग पांढरा. पांढरा रंग हा आयुष्यात संयम शिकवतो आणि हिंसेला परावृत्त करतो. ह्या दिवशी पांढरी, ऑफव्हाईट, पिंगट रंगाची वस्त्रे परिधान करतात.

तिसरा दिवस : लाल रंग - दुर्गादेवीच्या तिसऱ्या शक्तीचे नाव आहे चंद्रघंटा. या देवीचा आवडता रंग लाल. लाल रंग आनंद आणि उत्साहाचे प्रतिनिधित्व करतो. म्हणून या रंगाला महत्त्व आहे. देवीचे हे रूप अतिशय अलौकिक आहे. लाल रंग हा पराक्रमाचेही प्रतीक आहे आणि म्हणूनच या दुर्गामातेच्या रूपाला हा रंग प्रिय आहे, असे म्हटले जाते.

चौथा दिवस : गडद निळा रंग (रॉयल ब्ल्यू) - दुर्गा देवीचे चौथे रूप म्हणजे देवी कुष्मांडा. या देवीला गडद निळा रंग प्रिय आहे म्हणून चौथ्या दिवशी या रंगाची वस्त्रे परिधान करावीत. दुष्कर्म करणाऱ्या आणि राक्षसी शक्तींचा नाश करण्यासाठी या देवीची उपासना केली जाते. त्यामुळेच सुखकारक असा गडद निळा रंग या देवीचा आवडता रंग असल्याचेही सांगण्यात येते.

पाचवा दिवस : पिवळा रंग - दुर्गेचे पाचवे रूप स्कंदमाता. देवी स्कंदमाता भक्तगणांची दुखणी दूर करून त्यांच्यामध्ये चैतन्य आणते असे मानले जाते. पिवळा रंगही उत्साह आणि चैतन्याचे प्रतीक आहे. म्हणूनच देवी स्कंदमातेची पंचमीची ही पूजा पिवळ्या फुलांनी आणि पिवळे वस्त्र परिधान करून केली जाते. पिवळा रंग हा प्रसन्नता, शांती आणि समाधान दर्शवितो.

सहावा दिवस : हिरवा रंग - देवीचे कात्यायनी हे सहावे रूप परमेश्वराच्या क्रोधातून उत्पन्न झाले, अशी आख्यायिका आहे. या देवीला हिरवा रंग आवडतो असे मानले जाते. अविवाहित मुली या देवीची पूजाअर्चा करून योग्य वर मागतात व विवाहित महिला वैवाहिक जीवनात सुखशांती व समाधान मिळावे ह्यासाठी पूजन करतात. हिरवा रंग वैवाहिक जीवनाशी जोडलेला असे मानले जाते.

सातवा दिवस : राखाडी रंग (ग्रे) - नवरात्रातील सप्तमी दिवस हा देवी कालरात्रीचा असतो. सर्व बाधा दूर करण्यासाठी व दुष्टांचा विनाश होण्यासाठी ह्या देवीचे पूजन केले जाते. या देवीला करडा रंग प्रिय आहे. या रंगाचे स्वरूप थोडे उग्र असले तरीही शुभकाळाची ग्वाही देणारे आहे. सप्तमीला करड्या, राखडी, रंगांची वस्त्रे परिधान करतात.

आठवा दिवस : जांभळा रंग - देवी दुर्गेचे आठवे रूप म्हणजे महागौरी. तिचा आवडता रंग जांभळा. शांती आणि समाधानाचे प्रतीक असलेला हा रंग आयुष्यातील सर्व मंगलकार्यांना वापरला जातो. या दिवशी कन्यापूजनही केले जाते.

नववा दिवस : मोरपंखी रंग - माता दुर्गेचे नववे रूप देवी सिद्धिदात्रीचे होय. ह्या दिवसाचा रंग मोरपंखी. हा रंग समृद्धी, नावीन्यता, ऊर्जा, महत्त्वाकांक्षा आणि दृढ विश्वासाचे प्रतीक मानले जाते.

आता आणखी वाट बघू नका. वर सांगितलेल्या रंगसंगतीचे पोशाख आपापल्या कपाटांमधून बाहेर काढून उत्सवाच्या तयारीला लागा. ह्या उत्सवात ट्रॅडिशनल कपड्यांचा वापर करा. साडी, घागरे, लेहंगे, इंडो-वेस्टर्न स्टाइलचे छान कपडे परिधान करून मस्त दागिने आणि फॅशन ॲक्सेसरीज घालून गरबा, दांडियारासचा मनमुराद आनंद लुटा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Exit Polls: मविआ स्पष्ट बहुमताजवळ जाणार! ‘या’ एकमेव एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतोय?

Assembly Election Voting 2024: भाजपच्या महिला आमदाराने स्वतःला मतदान केंद्रात घेतले कोंडून, विरोधी पक्षाची दगडफेक

Ulhasnagar Assembly constituency Voting : उल्हासनगरात पैसे वाटल्यावरून पप्पू कलानी व कुमार आयलानी आमने-सामने, दोन्ही गटात तणाव

Exit Poll: एक्झिट पोल येताच देवेंद्र फडणवीस मोहन भागवतांच्या भेटीला; संघ मुख्यालयात खलबतं

Sports Bulletin 20th November : भारतीय क्रिकेटपटूंनी बजावला मतदानाचा हक्क ते लिओनेल मेस्सी १४ वर्षांनी पुन्हा भारतात येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT