Rainy food sakal
साप्ताहिक

पावसाळी रानमेवा...

सकाळ डिजिटल टीम

अमृता आत्रे

कोणतीही लागवड नाही, कोणतेही खत किंवा कीटकनाशक नाही, कोणत्याही मेहनतीशिवाय पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या भाज्या म्हणजे भाज्याप्रेमींकरिता पावसाळ्यातली पर्वणीच! वर्षातून एकदाच येणारा हा रानमेवा म्हणजे खऱ्या अर्थाने ऑरगॅनिक फूड असते.

घरी सुरण आणला की आई त्याचे कोंब बाल्कनीतल्या एखाद्या कुंडीत खुपसून ठेवत असे. रोज सकाळी त्याला पाणी घालत असे. पालवी कधी फुटतेय याची हुरहूर तिला लागून राहिलेली असे, नियमित निरीक्षण चालू राही, पण रोप काही उगवायचे नाही आणि रोजच्या रहाटगाड्यात तीसुद्धा ही गोष्ट विसरून जायची.

पण एकदा मात्र अचानक कुंडीत पोपटी, कोवळी रोपे दिसायला लागली. बघता बघता जोमाने वाऱ्यावर डोलायला लागली. चातकाप्रमाणे वाट पाहूनसुद्धा ज्यांनी दर्शन दिले नाही, त्या रोपांना मातीच्या गर्भात राहून ऋतू बदललाय, आभाळ भरून आले आहे, हे कसे कळले? रोजचे पाणी आणि पावसाचे पाणी यातला फरक कसा काय कळला? हीच निसर्गाची अगम्य लीला... पावसाची जादू!

माझ्या आईला परसातल्या भाज्यांची फार आवड. परसात पिकणाऱ्‍या भाज्यांचे तिला खूपच अप्रूप. अंबरनाथमधील आमच्या आजीच्या परसात पावसाळ्यात उगवणारा टाकळा, कुलु खुडायला आम्हालापण खूप मज्जा यायची.

सकाळी सकाळी टेकडीवर जाऊन पावसाचे थेंब ल्यालेला तो दोन पानाचा कोवळा कोवळा टाकळा, हिरवी पोपटी गवतासारखी पाती असलेली कुलु खुडण्यासाठी आम्हा दोघा बहीण-भावांमध्ये स्पर्धा लागायची.

टाकळा, कुलु या खास पावसाळी भाज्या! पावसाच्या थेंबातले अमृत पिऊन जागृतावस्थेत येतात. या आणि इतर सर्वच पावसाळी भाज्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे, पावसाळा संपताच या वनस्पती लुप्त होतात. पण पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यात पुन्हा उगवतात तेच गुण घेऊन, त्याच चवी घेऊन.

सध्या पाऊस जरी वर्षभर, बेभरवशाचा पडत असला तरी बाजारात शेवळं, कोरळाचे दर्शन झाले की समजायचे पावसाळा ऋतूतला पाऊस आपल्या दरवाजात येऊन ठेपला आहे आणि ‘भुईवरच्या छत्र्यां’चीच म्हणजेच विविध प्रकारच्या रानभाज्यांची बाजारात चंगळ सुरू होते.

भुईवरच्या छत्र्या म्हणायचे कारण म्हणजे, छत्र्या जशा पावसापासून आपले संरक्षण करतात, तशाच या विविध चवींच्या भाज्या त्यांच्या औषधी गुणांनी आपले संरक्षणच करत असतात.

कोणतीही लागवड नाही, कोणतेही खत किंवा कीटकनाशक नाही, कोणत्याही मेहनतीशिवाय पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या भाज्या म्हणजे भाज्याप्रेमींकरिता पावसाळ्यातली पर्वणीच! वर्षातून एकदाच येणारा हा रानमेवा म्हणजे खऱ्या अर्थाने ऑरगॅनिक फूड असते.

येऊर, मुरबाड, कर्जत, वसई, पालघर, सफाळे येथील डोंगराळ प्रदेशात अथवा जंगलभागात अनेक प्रकारच्या रानभाज्या आढळतात. आपल्यातील अनेकजण या नैसर्गिक, दुर्मीळ ठेव्याबाबत अनभिज्ञ असतात.

खरेतर या भाज्या सर्वच ठिकाणी उपलब्ध नसतात, त्यामुळे प्रत्येकालाच या भाज्या घेता येत नाहीत. उपलब्ध असल्या तरी नावे माहीत नसतात, गुणधर्म माहीत नसतात, करायची पद्धत माहीत नसते म्हणून त्यांच्याकडे पाठ फिरवली जाते. या भाज्या चवीला रुचकर, तसेच पौष्टिक आणि औषधीसुद्धा असतात.

अशाच काही भाज्यांची ही ओळख

टाकळा : टाकळा ही वनस्पती पावसाळ्यात उगवते व ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत तिला फुले येतात. मेथीच्या भाजीप्रमाणे दिसणाऱ्या या भाजीच्या कोवळ्या पानांची भाजी करतात.

कुलु : पावसाळ्याच्या अगदी पहिल्या सरीनंतर कुलुची भाजी रानात सर्वत्र दिसू लागते. अगदी काही दिवसांतच ही भाजी येत असल्याने बाजारात सर्वात आधी याच भाजीचे आगमन होते. फोडशी किंवा काल्ला या नावानेसुद्धा ही रानभाजी ओळखली जाते. ही भाजी म्हणजे एक प्रकारचे गवतच असते आणि फक्त पावसाळ्यातच मिळते. इतर पावसाळी भाज्यांप्रमाणे चविष्ट असते. ही भाजी शाकाहारी व मांसाहारी या दोन्ही प्रकारांत करता येते.

कुर्डू : कुर्डू हे एक प्रकारचे तणच असते. कोवळी पाने शिजवून त्याची भाजी करतात. या पालेभाजीमुळे कफ कमी होतो.

दिंडा : दिंडा भाजी पावसाळा संपला की मृतावस्थेत जाते आणि पावसाळ्याच्या पहिल्या सरीबरोबर त्याला नवे कोंब फुटू लागतात. पूर्ण वाढ होण्याआधीच तिचे कोंब खुडले जातात. दिंडाची भाजी खास प्रसिद्ध आहे.

भारंग : ही भाजी उगवल्यानंतर कोवळी असतानाच तोडली जाते. भारंगच्या पानांच्या कडा करवतीच्या दातांसारख्या असतात. भारंगाची सुकी भाजी विशेष लोकप्रिय आहे. ही भाजीसुद्धा नवीन फुटलेल्या कोंबाच्या व पानांच्या स्वरूपात काढली जाते. यांच्या पानांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. गणपतीच्या सुमारास या झाडाला निळसर जांभळ्या रंगाच्या फुलांचे तुरे येतात.

कर्टोली : कर्टोली एक फळभाजी असून ती पावसाळ्यात उगवते. ही भाजी कारल्यासारखी दिसते आणि कडूसुद्धा असते. कारल्याची भाजी करतात तशीच या फळाची भाजी केली जाते. कर्टोलीचे वेल कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम घाट व पश्‍चिम महाराष्ट्र परिसरात आढळतात. कर्टोलीला जून ते ऑगस्ट महिन्यांत फुले येतात व त्यानंतर फळे तयार होतात.

शेवळं : महाराष्ट्रामध्ये शेवळं वनस्पती कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र व अकोला येथील जंगलात आढळते. शेवळं म्हणजे खरेतर सुरणाच्या फुलांची दांडी. पावसाळा सुरू झाला, की जमिनीत असलेल्या सुरणाच्या कांद्याला उंच दांडी असलेला फुलोरा येतो. आतून गुलाबी व बाहेरून तपकिरी जांभळट रंगाच्या बोटीच्या आकाराच्या टोपणात हा फुलोरा झाकलेला असतो.

फुलोरा अतिशय नाजूक सोनेरी पिवळसर रंगाचा व तळाकडे जांभळट होत गेलेला असतो. या फुलोऱ्याच्या तळाशी मादीफुले तर वरच्या बाजूस नरफुले असतात. भाजीसाठी संपूर्ण फुलोऱ्याची दांडीच वापरतात.

यामध्ये प्रोटीनचे प्रमाण खूप असते, पण ताजी दांडी काढल्यानंतर त्याची भाजी लवकरात लवकर करणे आवश्यक असते. कारण फुलोऱ्याला झाकणारे टोपण व त्यामध्ये असलेल्या जास्त प्रोटीनमुळे हे शिळे झाले तर कुजलेल्या मांसासारखा वास येऊ लागतो.

पावसाच्या पाण्यावर बहरणाऱ्या, नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या या सर्व भाज्या खायला रुचकर आणि आरोग्यासाठीदेखील चांगल्या असतात. त्यामुळे पावसाळ्याबरोबर येणारा हा रानमेवा चुकवू नका. आता बाजारात जाल तेव्हा या भाज्यांची नक्की चौकशी करा आणि त्याचा आस्वाद घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT