फूडपॉइंट : सुजाता नेरुरकर
कटाची आमटी
साहित्य : दोन कप कट, १ टेबलस्पून तेल, ३ ते ४ लसूण ठेचून, पाव टीस्पून हिंग, खडा मसाला - २ लवंग, ४ ते ५ मिरे, अर्धी दालचिनी, १ टीस्पून जिरे, तमालपत्र, १ टीस्पून लाल मिरची पावडर, अर्धा टीस्पून गरम मसाला, अर्धा टीस्पून जिरे, पाव टीस्पून हळद, २ टेबलस्पून वाटलेले पुरण, मीठ चवीनुसार, १ अमसूल, कोथिंबीर चिरून.
कृती : एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, हिंग, खडा मसाला घालून थोडेसे गरम करून घ्यावे. मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, धने-जिरे पावडर, मीठ व कट घालून मिक्स करावे. वाटलेले पुराण घालावे. आता आमटीला उकळी येऊ द्यावी. मग अमसूल व कोथिंबीर घालून उकळी आली की विस्तव बंद करावा. गरम गरम पुरणपोळी व कटाची आमटी सर्व्ह करावी.
पुरणपोळी व कटाची आमटी
वाढप : साधारण ७ पुरणपोळ्या
साहित्य :
पुरणासाठी : एक कप चणा डाळ, पाऊण कप गूळ (किंवा निम्मा गूळ, निम्मी साखर), १ चिमूट हळद, १ चिमूट मीठ, १ टीस्पून वेलची पूड, थोडेसे जायफळ.
आवरणासाठी : सव्वा कप बारीक रवा, १ टेबलस्पून तेलाचे मोहन, मीठ चवीनुसार, अर्धा कप दूध पीठ भिजवण्यासाठी, पाव टीस्पून हळद, पोळी लाटण्यासाठी तांदळाचे पीठ, पोळीला लावण्यासाठी तूप.
कृती :
पुरणासाठी : प्रथम चणा डाळ स्वच्छ धुऊन २ तास पाण्यात भिजत ठेवावी. मग डाळीच्या तिप्पट पाणी व मीठ, हळद घालून डाळ कुकरमध्ये ५ शिट्ट्या आणून शिजवावी. एका भांड्यावर चाळणी ठेवून त्यात शिजलेली डाळ निथळून घ्यावी. निथळलेले पाणी कटाची आमटी करण्यासाठी वापरायचे आहे. आता डाळ एका परातीत काढून चांगली मॅश करावी.
एका नॉनस्टिक पॅनमध्ये मॅश केलेली डाळ काढावी व त्यामध्ये बारीक चिरलेला गूळ घालावा. पुरण घट्ट व्हायला आले, की त्यामध्ये वेलची पूड व जायफळ पूड घालावी. पुरण घट्ट झाले, की त्यात मधोमध झारा उभा करून पाहावा, तो उभा राहिला तर पुरण तयार झाले असे समजावे. डाळ चांगली मॅश करून घेतली, की पुरण वाटायची गरज राहत नाही.
आवरणासाठी : आपण आवरणासाठी गव्हाचे पीठ किंवा मैद्याऐवजी बारीक ‘झीरो’चा रवा वापरणार आहोत. हा रवा नसेल तर आपल्याकडील रवा मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता. एका बाउलमध्ये रवा, मीठ, हळद तेलाचे कडकडीत मोहन व लागेल तसे दूध वापरून पीठ मळून घ्यावे. पीठ खूप घट्ट किंवा सैल मळू नये.
पिठाला तेलाचा हात लावून झाकून एक तास बाजूला ठेवावे. म्हणजे रवा छान भिजेल. एका तासाने पीठ परत चांगले मळून घ्यावे. त्याचे एकसारखे मध्यम आकाराचे गोळे करावेत. पिठाचा एकेक गोळा घेऊन तांदळाची पिठी लावून पुरीसारखे लाटावे. त्यामध्ये पिठाच्या गोळ्यापेक्षा थोडे कमी पुरण भरून पुरी मुडपून गोळा बंद करावा. तांदळाचे पीठ लावून पोळी लाटावी.
तवा गरम करायला ठेवावा. तवा एकदम खूप तापलेला नसावा, नाहीतर पोळी तव्यावर टाकल्या टाकल्या तव्याला चिकटून करपून जाईल. तसेच पोळी तव्यावर टाकल्या टाकल्या लगेच उलटूही नये नाहीतर ती पूर्ण फुगणार नाही. पोळी उलटली की उलथण्याने पोळीच्या कडा हळुवारपणे दाबून पोळी फुलवून घ्यावी. पोळी छान भाजली गेली, की खाली उतरवून कागदावर काढावी, म्हणजे त्यामधील वाफ निघून जाईल. पोळी भाजताना किंवा खाली उतरवल्यावर वरून तेल किंवा तूप लावावे.
-----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.