सुलभा प्रभुणे
कारल्याची भाजी
वाढप
४ ते ५ व्यक्तींसाठी
साहित्य
अर्धी वाटी डाळीचे पीठ, ४-५ कारली, दाण्याचे कूट, सुक्या खोबऱ्याचा कीस, तीळ, मीठ, किंचित साखर, फोडणीसाठी मोहरी, मिरची पावडर, हळद, कोथिंबीर, लिंबाचा रस.
कृती
सर्वप्रथम कारली आडवी मधोमध कापून आतील बिया काढाव्यात. त्यानंतर एका पातेल्यात पाणी उकळत ठेवावे व चाळणीवर दहा मिनिटे कारली वाफवून घ्यावीत. नंतर पॅनमध्ये थोडेसे तेल आणि डाळीचे पीठ घालून खमंग भाजून घ्यावे. पीठ भाजल्यावर त्यात दाण्याचे कूट, सुक्या खोबऱ्याचा कीस, तीळ, मीठ, किंचित साखर, मिरची पावडर, हळद आणि कोथिंबीर घालून मिश्रण तयार करावे. तयार केलेले मिश्रण वाफवलेल्या कारल्यांत गच्च भरावे. नंतर कढईत फोडणी करून त्यात भरलेली कारली सोडून दहा मिनिटे बारीक गॅसवर शिजवावीत. तयार भाजीवर थोडासा लिंबाचा रस घालावा.
---------------
मिनी इडली कबाब
वाढप: ४ ते ५ व्यक्तींसाठी
साहित्य: दोन मोठे चिरलेले टोमॅटो, २०-२२ मिनी इडल्या, कांद्याची पात, एका बिटाचे मोठे तुकडे, २ सिमला मिरच्या, १ कप फ्लॉवरचे मोठे तुकडे, अर्धी वाटी पनीरचे मोठे तुकडे, नारळ-मिरची-कोथिंबीर-लसूण घालून तयार केलेली चटणी, २ टेबलस्पून टोमॅटो सॉस, पाव वाटी तेल.
कृती:
एका बाऊलमध्ये मिनी इडली, सिमला मिरच्या, फ्लॉवरचे तुकडे, पनीरचे तुकडे ठेऊन त्यावर किंचित मीठ, तयार चटणी, टोमॅटो सॉस घालून दहा मिनिटे मुरवत ठेवावे.
नंतर बांबूच्या टूथपिकसारख्या लांब काड्या घेऊन त्याला क्रमाने इडली, सिमला मिरची, बीट, फ्लॉवर, टोमॅटो, पनीरचे तुकडे लावावेत. अशा ७-८ स्टिक्स तयार कराव्यात. फ्राइंग पॅनमध्ये तेल घालून त्या खरपूस भाजाव्यात. ओव्हनमध्येही भाजता येतील.
पनीर बाईट्स विथ मॅंगो
वाढप: ४ ते ५ व्यक्तींसाठी
साहित्य: दोन वाट्या पनीरचे तुकडे, १ वाटी हापूस आंब्याचे तुकडे, पाव वाटी काजू, बदाम, अक्रोडाचे तुकडे, २ चमचे तीळ, मीठ, २ चमचे तेल किंवा तूप, १ चमचा मिरची पावडर किंवा चिली फ्लेक्स, १ चमचा चाट मसाला, १ वाटी घट्ट दही, सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर, २ चमचे मनुका.
कृती:
प्रथम दह्यामध्ये मीठ, चिली फ्लेक्स, चाट मसाला व थोडी कोथिंबीर घालावी. हे मिश्रण पनीरच्या तुकड्यांवर टाकून १५ मिनिटे मुरवत ठेवावे. पॅनमध्ये तेल किंवा तूप घालून त्यावर ड्रायफ्रूट्सचे तुकडे हलके भाजावेत. नंतर पॅनमध्ये मुरवत ठेवलेले पनीरचे तुकडे घालून सारखे परतावे.
पनीरचे तुकडे कोरडे व्हायला लागले, की त्यावर भाजलेले ड्रायफ्रूट्सचे तुकडे व तीळ घालावेत. नंतर आंब्याचे तुकडे घालून गॅस लगेच बंद करावा आणि हलकेच परतावे. डिशमध्ये काढून त्यावर मनुका व कोथिंबीर घालून पनीर बाईट्स सर्व्ह करावेत.
***
व्हेज कटलेट्स
वाढप: ४ ते ५ व्यक्तींसाठी
साहित्य: फ्लॉवर, गाजराचे तुकडे, दुधी भोपळ्याचे तुकडे, चिरलेला कांदा, मटारचे दाणे - प्रत्येकी अर्धी वाटी, २ उकडलेले बटाटे, २ चमचे आले-लसूण-मिरची-कोथिंबीर यांचे वाटण, अर्ध्या लिंबाचा रस, पाव वाटी बारीक रवा किंवा ब्रेड क्रम्ब्स, पाव वाटी तेल, १ टीस्पून गरम मसाला.
कृती:
मटारचे दाणे व बटाटा सोडून सर्व भाज्या मिक्सरमध्ये थोड्या बारीक कराव्यात. त्यात आले-लसूण-मिरची-कोथिंबीर यांचे वाटण घालावे. पॅनमध्ये १ टीस्पून तेलात हे मिश्रण परतावे. मिश्रण कोरडे झाले, की गॅस बंद करावा.
मिश्रणात मीठ, लिंबाचा रस, गरम मसाला, मटारचे दाणे घालावेत. त्यात बटाट्याचा लगदा करून घालावा व नीट मिसळून घ्यावे. नंतर हवा तो आकार देऊन कटलेट तयार करावेत. कटलेट रवा किंवा ब्रेड क्रम्ब्समध्ये घोळवावेत.
नंतर फ्राइंग पॅनमध्ये कटलेट खरपूस शॅलो फ्राय करावेत. टोमॅटो सॉस किंवा चटणीबरोबर सर्व्ह करावेत.
------------
(indian spicy vegetable recipe in simple way)