रवींद्र रांजेकर
घर ही आपल्या मूलभूत गरजांपैकी एक महत्त्वाची गरज. माणसाच्या आणि काळाच्या गरजेनुसार घराचे स्वरूप बदलत गेले. मानवाने केलेला गुहेपासून महालापर्यंतचा प्रवास आपल्याला माहितीच आहे. कोणतीही गरज भागली की त्या गरजेबाबतच्या अपेक्षा उंचावतात आणि हेच तर राहणीमान उंचावण्याचे द्योतक आहे.
शहरांमध्ये सुमारे ४० ते ५० वर्षांपूर्वी बांधलेली घरे ही आर्थिक क्षमता आणि मर्यादित आर्थिक साहाय्यतेनुसार माफक आकारमानाची होती. घरांची उंची तीन ते चार मजल्यांची, लिफ्ट नसलेली आणि अतिशय कमी पार्किंग वा चारचाकींसाठी पार्किंग नसलेली होती.
काळ बदलत गेला. वाहने वाढत गेली. शहरांतील लोकसंख्या वाढत गेली. राहत्या घरांमध्ये सोयीसुविधांची कमतरता भासू लागली आणि त्यातूनच मग चारचाकीचे पार्किंग, लिफ्ट, रुंद जिने अशा सुविधांची आवश्यकता निर्माण झाली.
विशेषतः २०१५ नंतर राहती इमारत पाडून नवीन मोठ्या आणि सोयीच्या इमारती बांधण्याकडे कल वाढला. यातच गेल्या सात-आठ वर्षांत महानगरपालिकांनी पुनर्विकासाला (रीडेव्हलपमेंट) पोषक असे नियम अमलात आणले आणि नवनवीन फायदे विकसकांना देऊ केले.
यातून मिळणारे जास्तीचे क्षेत्रफळ सदनिका धारकांसाठी आणि विकसकांनादेखील सोयीचे होत असल्याने ‘पुनर्विकास प्रक्रिये’ने विशेष जोम धरला.
पुनर्विकासाचे मुख्य कारण म्हणजे इमारती जुन्या झाल्या. टेरेस, भिंती आणि टॉयलेटमधून गळती असे त्रास वाढले. जुन्या पाइपलाइन, ड्रेनेज सिस्टीम यांची दुरुस्ती करण्याचे प्रसंग वारंवार येऊ लागले. इलेक्ट्रिक वायरिंग खराब होणे, कमी क्षमतेचे असणे असे त्रास जाणवू लागले.
वेळेवर रंगरंगोटी, देखभाल न झाल्याने इमारतींना अवकळा आली. ज्येष्ठांसाठी लिफ्टची गरजही भासू लागली. कुटुंबे विस्तारली, घरातल्या खोल्या कमी पडू लागल्या, त्यामुळे दुसरे घर घेण्याची गरज भासू लागली. या सर्वांवर दिलासा मिळणारी गोष्ट म्हणजे शासनाने आणि महानगरपालिकांनी नियमांत केलेले सकारात्मक बदल आणि त्यातून मिळणारे वाढीव बांधकाम.
आपल्याच राहत्या जागेवर म्हणजे प्लॉटवर जास्त बांधकामाची परवानगी मिळाली, तर विकसक आपल्यालाही त्यातील फायदे देऊ शकेल हा विचार सहज पटणारा होता. याच काळात नवीन पिढी कमावती झाली.
त्यांनी देशापरदेशात सुंदर, अधिक सोयीसुविधांची घरे पाहिली, अनुभवली आणि त्यातूनच मोठे घर, नवीन प्रकारचे बांधकाम साहित्य, नवीन सोयी, उत्तम पार्किंग आणि आर्थिक क्षमतेनुसार राहत्या जागेच्या ठिकाणीच जास्तीची जागा घेण्याची सोय, हे साऱ्या अडचणींवरचे उत्तम उत्तर मिळाले!
घर आता नवीन धाटणीचे मिळणार हे पक्के झाले. लिफ्ट मिळाली, त्याला इलेक्ट्रिकल बॅकअप मिळाला. पार्किंग मिळाले आणि बिल्डिंगच्या आवारात सोलर लाईटची सोय झाली. इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंगची सोय झाली. सौरऊर्जेवरचे गरम पाणी मिळाले. वीज वाचवण्यासाठी हिट पंपसारखे आधुनिक पर्याय मिळाले.
रेनवॉटर हार्वेस्टिंगसारखी हितकारी बाब शासनाने अत्यावश्यक केली. व्हर्मिकल्चरल, मेकॅनिकल कंपोस्टिंगचा मर्यादित जागेतील सोपा मार्ग सापडला. जुन्या घराचा हा कायापालट नक्कीच स्वागतार्ह ठरला.
पुनर्विकास प्रक्रियेने आणखी चांगल्या गोष्टी दिल्या. बिल्डिंगसाठी कॉमन टॉयलेट, उपयुक्त असे टेरेस किंवा मोकळी जागा मिळाली. तिथे छोटेसे मंदिर, मेडिटेशनची जागा, वृद्धांसाठी फिरण्याची आणि बसण्याची जागा, मर्यादित बाग व झाडांचा सहवास, लहान मुलांसाठी खेळायला आणि छोट्याशा घरगुती कार्यक्रमासाठीही जागा मिळाली.
याशिवाय सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि त्यांतून होणारे रेकॉर्डिंग, सुंदरशी नेटकी एन्ट्रन्स लॉबी, इमारतीतील सदस्य आणि सुरक्षारक्षकांसाठी इंटरकॉम सुविधा, तसेच अग्निशमन व्यवस्था असे बरेच काही आले.
हे सारे होत असताना म्हणजेच नवीन गोष्टी मिळताना आपल्याला पुढे काही पैसे द्यावे लागतील, अशी सदनिका धारकांची मानसिकता तयार झाली.
पण विकसक कॉर्पस फंड देत असल्याने पुढे जाऊन इमारतीची देखभाल सहज शक्य होणार आहे, हे लक्षात घ्यायला हवे. काहीतरी मिळताना काहीतरी द्यावे लागणार हे लक्षात घेतले तर सामंजस्याने आणि सहकार्यातून पुनर्विकास सुलभ होतो हे निश्चित.
प्रकल्पाचा आवाका ज्याप्रमाणे मोठा, त्यानुसार क्लब हाऊस, पोहण्याचा तलाव, जॉगिंग ट्रॅक अशा सुविधा मिळू शकतात. नवीन शासकीय नियमानुसार ॲमिनिटी फ्लोअर ह्या सोयीचा विचारपूर्वक वापर केला, तर राहणीमान आणखी उत्तम होऊ शकते. आजच्या काळात घरून काम करणाऱ्या मंडळींची सोयही या फ्लोअरवर होऊ शकते.
पुनर्विकास करणे ही आता आवश्यक गोष्ट आहे. याची सुरुवात सदनिकाधारकांनी सहकार्याने, एकजुटीने, समंजसपणे करणे आवश्यक आहे. योग्य माणसांचे सल्ले घेणे, साधकबाधकपणे विचार करून विकसक नेमणे, ही फार महत्त्वाची प्रक्रिया आहे.
विकसक नेमताना त्याची कामे पाहणे, पूर्वीचे व्यवहार समजून घेणे, त्याच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेणे आणि त्याची प्रकल्प पूर्ण करण्याची योजना जाणून घेणे फार आवश्यक आहे.
याचबरोबर विकसक हा व्यावसायिक असून या व्यवहारातून त्यालाही फायदा होत आहे, याचा अंदाज घेणे आणि समाधानातून होणाऱ्या व्यवसायाचे फलित नेहमीच समाधानकारक असते याचे भान ठेवणे गरजेचे आहे. यातूनच प्रकल्प अपेक्षेप्रमाणे प्रत्यक्षात उतरतो.
पुनर्विकास प्रक्रिया एकदा सुरू झाली आणि सहकार्याने पूर्णत्वास गेली, की छान मोठे घर मिळेल, मोठी इमारत, नवीन सोयी, नवीन शेजारी मिळतील, एक मोठा टप्पा पार पडेल. मात्र या साऱ्याबरोबर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे, योग्यरित्या कचरा निर्मूलन करणे, पाण्याची काटकसर, पाण्याचा पुनर्वापर ही नवीन जीवनसूत्रे अवलंबणे आवश्यक आहे.
शासन सर्व काही देईल ही भावना सोडून स्वयंशिस्तीने आणि सामाजिक भान ठेवून दैनंदिन जीवन व्यतीत करणेदेखील अत्यावश्यक आहे. वीज, पाणी यांचा न्याय्य वापर आणि प्रदूषण नियंत्रण या आपल्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्या आपण निष्ठेने पाळल्या, तर सुंदर शहर आणखी सुंदर होईल हे निश्चित.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.