Mehandi competition  sakal
साप्ताहिक

Sakal Mehndi Competition : परीक्षकांचे मनोगत

साप्ताहिक सकाळच्या दरवर्षी होणाऱ्या मेंदी स्पर्धेतून मेंदी कलेचा वारसा जपला जातोय.

साप्ताहिक टीम

श्रावण महिना म्हणजे नागपंचमी, मंगळागौर, रक्षाबंधन अशा सणांची मालिकाच. आणि हे सण म्हटले की मेंदी आलीच. मेंदी हा स्त्रियांच्या शृंगारातला अविभाज्य भाग! साप्ताहिक सकाळच्या दरवर्षी होणाऱ्या मेंदी स्पर्धेतून मेंदी कलेचा वारसा जपला जातोय.

सुंदर, सुबक, रेखीव डिझाईन्स

धनश्री हेंद्रे

मेंदी स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रासाठी घेतली जाते. यावर्षीही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धक सहभागी झाले होते.

मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, नारायणगाव, रत्नागिरी, कागल, सांगली, सातारा, देवरुख, जुन्नर, नागपूर, अमरावती, सोलापूर, धामणगाव, भुदरगड, कणकवली, कोरेगाव, पाटेगाव, इचलकरंजी, छत्रपती संभाजीनगर अशा विविध ठिकाणांहून स्पर्धकांनी मेंदी रेखाटने पाठवली होती. शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

मोठ्या संख्येने रेखाटने आल्यामुळे आम्हालाही परीक्षण करायला खूप वाव मिळाला. सुंदर, सुबक, रेखीव मेंदी डिझाईन्स आली होती.

श्रावण, श्री भवानीमाता, जगन्नाथ, नववधू, श्रीकृष्ण, बाळकृष्ण, विष्णू, विठ्ठल-रुक्मिणी, गणपती, स्वाती, आषाढी एकादशी, प्रपोज थीम, बेबीशॉवर, गौतम बुद्ध, नागपंचमी अशा अनेक थीम्सवर आधारित मेंदी डिझाईन्स स्पर्धेसाठी आली होती. पण सर्वाधिक दिसली ती मोरांची थीम. मोरांची रेखाटने अनेक प्रकारे वापरलेली दिसली.

पारंपरिक थीमचाही अतिशय सुबकपणे वापर केलेला होता. अनेक स्पर्धकांनी मेंदी काढतानाचे व्हिडिओदेखील साप्ताहिक सकाळच्या इन्टाग्राम हँडलवर पोस्ट केले होते.

स्पर्धेसाठी उत्तमोत्तम रेखाटने आली, परंतु काही ठिकाणी नियमांकडे थोडे दुर्लक्ष झालेले दिसले. पुढच्या वेळेस स्पर्धकांनी त्याची काळजी घ्यायला हवी. सर्व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!

(धनश्री हेंद्रे व्यावसायिक मेंदी आर्टिस्ट आहेत.)

कलेचा उत्सव

धनश्री शेखरे

सर्वप्रथम, सर्वच विभागांमध्ये भाग घेतलेल्या स्पर्धकांचे कौतुक आणि अभिनंदन!

साप्ताहिक सकाळच्या वार्षिक मेंदी स्पर्धेचे परीक्षण करताना नेहमीच आनंद होतो, कारण ही नुसती स्पर्धा नसून कलेचा आणि सांस्कृतिक वारशाचा एक सुंदर उत्सव आहे. ही स्पर्धा महाराष्ट्रातील मेंदी कलाकारांच्या कौशल्याचा आणि सजर्नशीलतेचा सन्मान तर करतेच, पण या कलेचे प्रदर्शन करण्यासाठी कलाकारांना एक हक्काचे व्यासपीठदेखील देते.

मेंदी स्पर्धा जाहीर झाली तेव्हा अवघा महाराष्ट्र विठुरायाच्या वारीच्या तयारीसाठी सज्ज होता, त्यामुळेच अनेक डिझाईन्समध्ये विठुरायाचे दर्शन झाले.

बोलावा विठ्ठल। पहावा विठ्ठल। करावा विठ्ठल जीवभाव।

ही संत तुकारामांच्या अभंगामधील ओळ एका मेंदी डिझाईनमध्ये हेच सांगून गेली, की एका मेंदी कलाकारासाठी त्याची कला हीच त्याची पंढरी आहे. कोणत्याही कलाकाराला त्याच्या कलेची उपासना केल्यानंतर जो भाव प्राप्त होतो, तो पंढरीची वारी केल्यासारखाच असावा असे मला मनोमन वाटते.

यंदाच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून डिझाईन्स आली. अनेक शाळांनी नोंदवलेला सहभाग अत्यंत स्तुत्य आहे. बालविभागामधील स्पर्धकांचे विशेष कौतुक करावेसे वाटते. अनेक नवशिक्या स्पर्धकांचे मेंदी रेखाटनाचे प्रयत्नदेखील वाखाणण्यासारखे आहेत.

बालविभागामध्ये दोन गट असल्यामुळे छोट्या स्पर्धकांना आपली कला सादर करण्यासाठी विशेष संधी मिळाली. व्यावसायिक मेंदी प्रकारामध्ये कलाकारांनी किती कसून सराव केला आहे आणि व्यावसायिक स्तरावर येण्यासाठी किती मेहनत घेतली आहे हे त्यांच्या डिझाईन्स बघूनच लक्षात आले.

अनेक स्पर्धकांचे काम चांगले असूनदेखील काही नियम आणि अटींकडे दुर्लक्ष झाल्यामुळे स्पर्धक विजेतेपदापासून दूर राहिले आहेत. त्यामुळे पुढील स्पर्धेमध्ये भाग घेताना स्पर्धकांनी न चुकता नियम आणि अटींचे पालन करावे!

(धनश्री शेखरे व्यावसायिक मेकअप आर्टिस्ट आहेत.)

कला सर्वत्र पूज्यते

रमेश गाढवे

सर्जनात्मकतेतून सौंदर्याची लयलूट करणाऱ्या साप्ताहिक सकाळच्या मेंदी स्पर्धेसाठी आलेल्या बहुतांश कलाकृती उल्लेखनीय होत्या. हौशी कलाकार, व्यावसायिक कलाकार व शालेय विद्यार्थ्यांनीही स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदविला.

कलाकृतींचे परीक्षण ही जगातील खूप अवघड बाब आहे. कारण कलाकृतीमध्ये विवेकाबरोबर सर्जनशीलतेची जोड असते. प्रत्येक कलाकार आपली कलाकृती किती दर्जेदार आहे, याचे कलात्मकतेने सादरीकरण करण्याचा प्रयत्न करतो.

चित्रकला ही चौसष्ट कलांमधील एक कला, आणि मेंदी काढणे ही एक प्रकारची चित्रकलाच आहे. आधुनिक युगात मेंदी कला व्यवसाय म्हणूनही उदयाला आली आहे. या वर्षीच्या स्पर्धेमध्ये सर्वच गटांतून असंख्य कलाकृती मिळाल्याने आम्हा परीक्षकांनाही विशेष कलाकृतींचे सादरीकरण पाहायला मिळाले.

मेंदी रेखाटनांमध्ये पक्ष्यांच्या आकाराचे अलंकरण, मुक्ताविष्कार, आकारातील लयबद्धता, स्पेस मॅनेजमेंट; मानवाकृती म्हणजेच राधा-कृष्ण, विठ्ठल-रखुमाई, श्रीगणेश या देवदेवतांच्या जीवनातील प्रसंग, लग्नसोहळ्यातील नवरा-नवरीचे प्रेझेंटेशन इत्यादी अनेकविध प्रकार स्पर्धकांनी सादर केल्यामुळे स्पर्धेला एक उच्च दर्जा प्राप्त झाल्याचे जाणवले.

सर्वच स्पर्धकांनी आपल्या मेंदीतून सुबकता आणि नेमकेपणावर भर दिला होता. विशेष म्हणजे मुलगेही या स्पर्धेमध्ये सह‌भागी झाले होते.

काही कलाकृतींतून सामाजिकतेचे दर्शन घडले. आयोजकांनी नेमून दिलेल्या नियमांचे पालन करून ड्रॉइंग पेपरवर काळ्या शाईने काढलेले रेखाटन व हातावरील मेंदीचे रेखाटन यांतील साम्य ही बाब स्पर्धेमध्ये उल्लेखनीय ठरते.

स्पर्धकांनी हे लक्षात घेऊन सादरीकरण केले. ज्या स्पर्धकांचा नंबर आला नाही, अशा स्पर्धकांनी पुढील स्पर्धेसाठी आपल्या त्रुटी सुधारण्यावर भर द्यावा. आयोजकांनी दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे व कलाकृती सादर करावी.

शेवटी कला ही निरंतर आहे. कलेमध्ये सराव, सातत्य व प्रमाणबदल या गोष्टींना खूप महत्त्व आहे. त्यामुळे कलासक्त व्हा... कलेचा आनंद घ्या...!

(रमेश गाढवे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या एच. ए. स्कूलमध्ये कलाशिक्षक आहेत.)

-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Vikramgad Assembly constituency 2024 : स्थलांतरीत मजुरांमुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता, उमेदवारांपुढे आव्हान.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT