Sanskrit Theatre Sakal
साप्ताहिक

संस्कृत रंगभूमीवरील दोन पऱ्या!

मुळात एकांकिका स्पर्धेत प्रवेश घेण्याची कल्पना कशी सुचली? विभागप्रमुख मधुरा गोडबोले सांगतात,

सकाळ डिजिटल टीम

रेणुका येवलेकर

रंगमंचावर मध्यभागी स्पॉट पडतो, स्वगत संपते, नाटक संपतानाचे संगीत सुरू असते आणि संपूर्ण प्रेक्षागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून जाते. कोणासाठी होत्या या टाळ्या? एका उत्कृष्ट कलाकृतीसाठी? की उत्तम अभिनयासाठी ? प्रेक्षकांची ती उत्स्फूर्त दाद होती,

सातासमुद्रापार येऊन इथली प्राचीन भाषा (जी आज बोली किंवा व्यवहाराची भाषाही नाही) आत्मसात करून, तेथील संस्कृतीशी स्वतःला जोडून घ्यायचा प्रयत्न करत चाळीस मिनिटे रंगमंचावर वावरणाऱ्या त्या दोन विदेशी मुलींसाठी... किंबहुना संस्कृत रंगभूमीवर चमकून गेलेल्या दोन पऱ्यांसाठी!

वर उल्लेखलेला प्रसंग सालाबादप्रमाणे यंदाही फर्ग्युसन महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या रा. ना. दांडेकर संस्कृत एकांकिका स्पर्धेतील. संस्कृत भाषेचे जतन आणि संवर्धन व्हावे यासाठी सुरू असणाऱ्या अनेक उपक्रमांपैकी हा एक. दरवर्षी महाराष्ट्रभरातून विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होऊन संस्कृत एकांकिका सादर करतात.

यंदाही स्पर्धा जाहीर झाली आणि नेहमीप्रमाणे प्रवेशिका आल्या. एका प्रवेश अर्जाने आयोजकांपासून सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. त्या अर्जावर सहभागी कलाकारांची नावे होती, शुहंग जांग आणि कॅरोल रोद्रिगेझ. पुण्यातल्या ‘अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज्’च्या संस्कृत भाषा विभागातर्फे त्या दोघींनी या स्पर्धेत भाग घेतला होता.

मुळात एकांकिका स्पर्धेत प्रवेश घेण्याची कल्पना कशी सुचली? विभागप्रमुख मधुरा गोडबोले सांगतात, ‘‘या दोन विद्यार्थिनी आमच्याकडे या वर्षासाठी आल्या होत्या. त्यातील डायना (शुहंग जांग) ही मूळची चीनची रहिवासी. सध्या ती युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हानियाच्या ‘साऊथ एशियन स्टडीज’ची (दक्षिण आशियायी अभ्यासक्रम) विद्यार्थिनी आहे.

ताम्रपटांवरच्या संशोधनासाठी संस्कृतचा अभ्यास तिला गरजेचा होता. त्यासाठी तिने आमच्याकडे प्रवेश घेतला. दुसरी विद्यार्थिनी म्हणजे कॅरोल रोद्रिगेझ. ती मूळची क्युबन. आणि सध्या युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडाची विद्यार्थिनी. तत्त्वज्ञानशास्त्र हा तिचा अभ्यासाचा विषय आहे आणि ती जैनिझमवर संशोधन करते आहे. त्यातील संकल्पना अधिक सविस्तर समजून घेण्यासाठी तिने संस्कृतचा अभ्यास सुरू केला. त्यासाठीच ती भारतात आली होती.

मीनल कुलकर्णी या आमच्या शिक्षिका एकदा वर्गात डायनाला ‘उत्तररामचरित’चा शिकवीत होत्या. ते वाचल्यावर तिला

अतिशय आवडले. त्यावर मीनल कुलकर्णी यांनी ‘तुला संस्कृत नाटक पाहायला आवडेल का?’, असे विचारले. त्यावर तिने ‘पाहायलाच काय, करायलाही आवडेल,’ असे उत्स्फूर्त उत्तर दिले. त्यातून मग या स्पर्धेत भाग घेण्याची कल्पना आम्हाला सुचली. स्पर्धेच्या सर्व नियमात संस्थेचा अर्ज बसत होता, हे पक्के झाल्यानंतर कॅरोलला आम्ही भाग घेण्याबाबत विचारणा केली. तिने विचार करायला वेळ घेतला, पण होकार दिला. तिथून मग हा सगळा प्रवास सुरू झाला.’’

दोनच स्त्री पात्रांची एकांकिका कोणती असेल, याचा विचार करत असताना पु.ल. देशपांडे यांचे ‘ती फुलराणी’ नाटक गोडबोले यांना आठवले. आणि जॉर्ज बर्नाड शॉ यांच्या ‘पिग्मॅलियन’ या संगीतिकेच्या मराठीमोळ्या अवतारावर आधारलेली ‘सा सुमरमणी’ ही एकांकिका लिहिली गेली.

दोन्ही स्त्री पात्रे असल्याने ‘मंजुळा’ झाली ‘मल्लिका’ आणि ‘प्रा. अशोक जहागीरदारां’ची झाली ‘भाषाशास्त्रज्ञ गार्गी’! डायना आणि कॅरोल यांना अनुक्रमे या भूमिका देण्यात आल्या. भारतीय संस्कृती आणि रंगभूमीचा गंधही नसलेल्या दोन अमेरिकी तरुणींकडून ही फुलराणी बसवून घेणे हे आव्हानच होते. पण गोडबोले यांच्यासह मीनल कुलकर्णी आणि संपदा कुलकर्णी या शिक्षकांनी हे शिवधनुष्य पेलायचे ठरवले आणि एक रंजक प्रवास सुरू झाला.

संस्कृत भाषा कार्यक्रमाच्या विद्यार्थिनी असल्याने या दोघींना संस्कृत वाचता येत होते, बऱ्यापैकी कळतही होते. त्यांना संहिता वाचून दाखवली आणि कथा समजावून सांगितली. लेखक दोन्ही पात्रांचा कसा विचार करतो तेही त्यांना समजावून सांगितले. आणि महत्त्वाचे म्हणजे, प्रत्येक शब्दाचा योग्य उच्चार त्यांच्याकडून घटवून घेतला.

मग त्यांनी पाठांतराला सुरुवात करण्याचे ठरले आणि खरी गंमत सुरू झाली. डायना एकपाठी असल्याने आणि तिचा संस्कृतचा पाया बऱ्यापैकी पक्का असल्याने ठरवून दिलेल्या कालावधीपूर्वीच तिने सगळे संवाद पाठ केले. त्यातच एकांकिकेतही तिचं पात्रं भाषा शिकणार असल्यामुळे तिला काही चुका करण्याचीही तशी मुभा होती. दुसरीकडे कॅरोलला प्रत्येक संवादाचा अर्थ समजावून घेऊन पाठांतर करण्याची सवय होती.

त्यामुळे तिला वेळ लागत होता. त्यातच तिचे पात्र भाषातज्ज्ञाचे असल्यामुळे भाषा प्रगल्भ होती आणि संवादात चूक करण्यास अजिबात वाव नव्हता. साहजिकच तिला अधिक वेळ लागत होता. त्यामुळे एकांकिका बसवणे जरा अवघड होऊन बसले. त्यावर मीनल कुलकर्णी यांनी रामबाण उपाय काढला. त्यांनी थेट पाठांतरांचे तास सुरू केले. प्रत्येक शब्द त्यांनी या मुलींच्या तोंडी योग्य उच्चारासह बसवला.

पाठांतराची गाडी रुळावर येत असताना अभिनय आणि रंगमंचावरील वावर यांचा विचार सुरू केला. इथल्या मातीतील पात्रांचे स्वभाव या मुलींना लक्षात यावे, यासाठी मधुरा गोडबोले आणि संपदा कुलकर्णी यांनी काही व्हिडिओ शोधून त्यांना दाखवले. ‘ती फुलराणी’चे जुने चित्रीकरण त्यांनी पाहिले. ‘मल्लिका’ समजून घेण्यासाठी डायनाने ‘अग्निहोत्र’ मालिकेत मुक्ता बर्वेने साकारलेल्या ‘मंजुळा’ या पात्राचा अभ्यास केला.

त्या पात्राच्या चाली, लकबी तिने समजून घेतल्या. तर दुसरीकडे कॅरोलने ‘ती फुलराणी’ हा चित्रपट, ‘चारचौघी’ हे नाटक पाहिले. त्याआधारे आणि काही प्रमाणात आपल्याच शिक्षकांना डोळ्यासमोर ठेवून तिने आपले पात्र खुलवण्यास सुरुवात केली.

त्याशिवाय डायना आणि कॅरोलला भारतीय रंगभूमी समजावण्यासाठी हे शिक्षक त्यांना काही नाटके पाहण्यास घेऊन गेले. रंगमंच कसा असतो? विंग्ज म्हणजे काय? लेव्हल कशा असतात? लाइट कसा पडतो? या सगळे त्यांनी या दोघींना समजावून सांगितले.

एकीकडे एकांकिका आकार घेत होती, मुलींचे पाठांतर होत होते. पण अजूनही काही शब्द त्रास देत होते. त्याविषयी सांगताना मीनल कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘काही शब्द उच्चारायची अमेरिकी मंडळींची पद्धत वेगळी असते. काही व्यंजने, काही उच्चार त्यांच्या भाषेत मुळातच नाही. मग त्यांच्या तोंडी ते उच्चार बसवावे लागत होते.

पण या मुलींना संस्कृतात शब्दोच्चाराला काय महत्त्व आहे, हे समजावल्याने त्यांनी ते सगळे उच्चार घोटून घोटून अंगवळणी पाडून घेतले. शिवाय ही पात्रे ज्या संस्कृतीतील होती, ती या मुलींसाठी अपरिचित होती. त्यामुळे संवादांची अभिव्यक्ती त्या संस्कृतीनुरुप व्हावी, यासाठी आम्ही विशेष परिश्रम घेतले.’’ मधुरा गोडबोले यांना संगीताची जाण असल्याने त्यांनी सगळी गाणी आणि एकूण संगीत दिग्दर्शन केले.

सगळे तयार होते, पण अडचण आली ती तांत्रिक बाबींची. तीन शिक्षिका, दोन विद्यार्थी आणि तीन मदतनीस वगळता मनुष्यबळच नव्हते. मग त्यांनी प्रकाशयोजना आणि नेपथ्य आदींसाठी नाटकात कामे करणाऱ्या काहीजणांची मदत घेतली. या बाबी आल्यावर एंट्री-एक्झिट, सेटचे बदल, कपड्यांचा बदल, प्रॉपर्टीज् हाताळणे, संगीत-प्रकाश या सगळ्यासह तालमी सुरू झाल्या. आता सगळे आवाक्यात आहे, असे वाटले आणि तेवढ्यात एक विलक्षण विघ्न आले.

पुण्यात त्यावेळी सर्दी-तापाची साथ आली होती. या साथीने सर्वात आधी डायनाला गाठले. प्रयोगाला दीड आठवडा बाकी असताना तिला ताप भरला. तालीम थांबली. ती बरी होते न होते तोवर सगळ्यांमध्ये ही साथ पसरली. संपूर्ण एक आठवडा तालीम बंद ठेवावी लागली.

सहा दिवस शिल्लक असताना कॅरोलला ताप आला. सगळेच या प्रकाराने धास्तावले होते. पण सगळे जिद्दीच्या जोरावर उभे राहिले आणि शेवटचे तीन दिवस शिल्लक असताना तालमींना पुन्हा मुहूर्त लागला. या तालमींमध्ये कॅरोलला अशक्तपणा जाणवत होता, पण त्यावर मात करत ती उभी राहिली.

या आजारपणाच्या काळातील गोष्टी सांगताना संपदा कुलकर्णी सांगतात, ‘‘आमच्यासाठी या दोघी म्हणजे घरातल्या मुलींसारख्या होत्या. डायना घरातल्या लहान मुलीसारखी. तिचे नाटकात काही चुकू लागले की ती आजारपणाचे दाखले देऊन अलगद स्वतःची सुटका करून घेत असे. कॅरोल मात्र घरातल्या मोठ्या लेकीप्रमाणे समजूतदारपणे वागत असे.

एकदा तर दोघी लागोपाठ चुकल्या, म्हणून आम्ही दोघींना रागावलो. यावर कॅरोलचे संवाद पाठ नाहीत म्हणून माझ्या चुका होतात, असे मजेदार स्पष्टीकरण डायनाने दिले. डायनाची एक सवय होती. तिच्या डोक्यात एखादी गोष्ट ‘फिट’ झाली, की ते बदलणे अवघड असे. बऱ्याचदा ती स्वतःच्या लकबी पात्राच्या ठिकाणी आणत असे. त्या दूर करण्यासाठी शिक्षकांना फारच तारेवरची कसरत करावी लागे. दुसरीकडे कॅरोल तर्कावर चालत असे. तिला प्रत्येक हालचालीमागचे कारण समजावून दिल्यावर ती लगेच अमलात आणायची.’’

सगळे सावरत, पडत-धडपडत, हसत-रडत आणि नवनवीन अनुभवांचा हा प्रवास करत अखेरीस प्रयोगाचा दिवस उजाडला. सगळ्या तयारीनिशी सकाळी संपूर्ण संघ फर्ग्युसन महाविद्यालयात आला. यांच्या सहभागाबद्दल सर्वांनाच कुतूहल वाटत होते. एरवी आपल्याबद्दल लोकांच्या असणाऱ्या कुतूहलाचे आपल्याला दडपण येते. पण इथे त्या दोघींना त्या अपेक्षांचे दडपण नव्हते, मात्र इतर एकांकिका पाहिल्यावर त्यांनाही दडपणाच्या ‘फिव्हर’ची लागण झाली. पण प्रयोगाची वेळ आली आणि सगळे दडपण दूर झाले.

एकांकिकेला प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाने या दोघी अधिकच खुलल्या आणि नितांतसुंदर प्रयोग त्यांनी सादर केला. विशेष म्हणजे एखादा विनोद घडल्यावर येणारा हशा किंवा चांगल्या संवादाला वाजणाऱ्या टाळ्या, हे त्या पहिल्यांदाच अनुभवत होत्या. मात्र त्याने बावरून न जाता, सराईत नटांप्रमाणे योग्य विराम घेऊन त्यांनी नाटक पुढे नेले. प्रेक्षागृहातील टाळ्यांनी आणि प्रेक्षक-परीक्षकांच्या प्रतिक्रियांनी सादरीकरणाची आणि एकूण या प्रवासाची पोचपावती दिली. एवढेच नाही,

तर सर्वोत्कृष्ट अभिनय (स्त्री पात्र), विशेष लक्षवेधी अभिनय, दिग्दर्शन - द्वितीय आणि सर्वोत्कृष्ट नाटक -तृतीय अशी तब्बल चार पारितोषिकांची कमाई ‘सा सुमरमणी’च्या समूहाने केली. पुढे स.प. महाविद्यालयात होणाऱ्या एका कार्यक्रमातही त्यांना सादरीकरण करण्याचे आमंत्रणही मिळाले. सर्व बाजूंनी कौतुकाचा वर्षाव होत होता आणि सगळ्या समूहाच्या चेहेऱ्यावर समाधान झळकत होते.

कोण कुठल्या या कॅरोल-डायना, भारतात संस्कृत भाषाभ्यासासाठी काही महिने येतात काय आणि केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर चक्क एक संस्कृत एकांकिका स्पर्धा गाजवतात काय! हे सगळे स्वप्नवत वाटते, पण त्यांचे कष्ट आणि यश पाहून समाधान वाटते. आपल्या संस्कृतीपेक्षा एकदम भिन्न विचारसरणी आणि भिन्न संकल्पना असणारी संस्कृती थोडक्या दिवसात आत्मसात करून नाट्यप्रयोग करणे खरोखरच कठीण आहे.

पण हे शक्य करून दाखवलेल्या या कॅरोल व डायनाकडे पाहून मनात तुकोबांच्या ओळी येतात, ‘शुद्धबीजा पोटी फळे रसाळ गोमटी...’! पुढे मात्र या दोघींना डोळ्यासमोर ठेवून म्हणावेसे वाटते, ‘मुखी अमृताची वाणी, यत्न नाट्याच्या कारणी!’

आज त्या दोघी आनंदाचे, अनुभवांचे आणि नव्या मैत्रीचे गाठोडे घेऊन आणि इथल्या प्रत्येकाच्या मनात मल्लिका आणि गार्गीच्या आठवणींचे बिंब ठेवून आपल्या देशी परतल्या आहेत...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election 2024 Results Live : मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT