Sant dhanna jaat  esakal
साप्ताहिक

संत धन्ना जाट यांचे जीवन म्हणजे कृषिकर्म आणि भक्तिमार्ग यांचे एकरुपत्व!

प्रपंच आणि परमार्थ यांचा समतोल आणि अपरिहार्यता म्हणजे धन्नाजींचे तत्त्वज्ञान. उत्तर भारताच्या विठ्ठल मंदिरातील गरुडखांब म्हणजे धन्ना भगत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

डॉ. राहुल हांडे

संत धन्ना जाट यांचे जीवन म्हणजे कृषिकर्म आणि भक्तिमार्ग यांचे एकरुपत्व म्हणून पाहता येते. प्रपंच आणि परमार्थ यांचा समतोल आणि अपरिहार्यता म्हणजे धन्नाजींचे तत्त्वज्ञान, असे म्हणता येते. उत्तर भारताच्या विठ्ठल मंदिरातील गरुडखांब म्हणजे धन्ना भगत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

इसवी सन १४३० ते १४३५च्या दरम्यानचा काळ असावा. आताच्या राजस्थानातील टोंक जिल्ह्यातील धुवाकंला गावातील शेतकरी असलेल्या जाट समाजातील रामेश्वर जाट आणि गंगाबाई गडवाल ह्या दांपत्याचा किशोरवयीन मुलगा बैलगाडीत आपल्या शेतात पिकलेले धान्य घेऊन घराकडे निघाला होता.

अथक परिश्रम आणि निसर्गानं दिलेली साथ यामुळे त्या हंगामात काळ्या आईने ह्या शेतकरी कुटुंबाच्या पदरात भरभरून दान टाकले होते. रामेश्वर जाट व गंगाबाई खळ्यावरून धान्य घेऊन येण्यासाठी गेलेल्या आपल्या मुलाची वाट पाहत होते. कुणब्याच्या घरात त्याच्या घामाने भिजलेल्या लक्ष्मीचा प्रवेश होणार होता.

रामेश्वर जाट यांनी आपल्या शेतात पिकलेल्या धान्यातील उत्तम दाणे पुढील पेरणीसाठी बीज म्हणून राखून ठेवले होते. त्यांचा मुलगा वडिलांनी राखून ठेवलेले हे बीजदेखील आपल्या बैलगाडीत टाकून घेऊन येत होता. वाटेत ह्या मुलाला काही साधू-संतांनी अडवले आणि त्याच्याकडे अन्नाची भिक्षा मागितली.

ह्या किशोरवयीन मुलाला वाटले, की आपल्याकडील सर्वोत्कृष्ट असे साधू-संतांना द्यावे. यासाठी त्यानं वडिलांनी बीज म्हणून राखून ठेवलेले उत्तम धान्य त्यांना देऊन टाकले. मुलगा घरी पोहोचल्यावर त्याच्या दातृत्वाचा वृत्तांत वडिलांना समजला. ते रागावले आणि त्यांनी मुलावर तोंडसुख घेण्यास सुरुवात केली.

पोराने गुन्हाच तसा केलेला होता. वडिलांचे बोल जिव्हारी लागलेल्या मुलाने शेतात जाऊन खडे पेरले. आणि त्या पेरणीतून खरोखरच पीक उभे राहिले. आधी कधीच मिळाले नव्हते एवढे उत्पन्न रामेश्वर जाट यांना त्यांच्या शेतीने यावेळी दिले होते. रामेश्वर जाट यांचा हा किशोरवयीन मुलगा म्हणजे राजस्थान व उत्तर भारतातील भक्ती आंदोलनांच्या प्रणेत्यांपैकी एक असलेले संत ‘धन्ना जाट’ अथवा ‘धन्ना भगत’.

बळीराजा संत धन्ना जाट यांच्या जीवनातील ह्या कथेला वास्तवाच्या कसोट्या लावणे शक्य नाही. मात्र उपदेश आणि संतत्वाची व्याख्या निश्चित करण्यासाठी ही कथा नक्कीच उपयुक्त आहे. इ.स.१४१५मध्ये जन्मलेल्या धन्ना जाट यांच्या जीवन चरित्राचे अवलोकन करताना सतत तुकोबारायांची आठवण येते. तुकोबांची उंची धन्नाजींकडे नाही, हेदेखील स्पष्ट करावेसे वाटते.

कुणब्याच्या घरात जन्माला आलेला मुलगा संतत्वापर्यंत पोहोचतो हा त्यांच्यातील महत्त्वाचा समान धागा म्हणता येतो. त्यांचा तुकोबांशी असलेला आणखी एक संबंध म्हणजे प्रपंचाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना भवसागर पार करण्याची लागलेली आस. मात्र एका बाबतीत धन्नाजी तुकोबाच काय तर भारतातील सर्वच संतांना मात देताना दिसतात.

आपल्या एका काव्यरचनेत धन्नाजी म्हणतात, ‘हे परमेश्वरा मी तुझी आरती करतो. तू आपल्या भक्तांचे मनोरथ पूर्ण करत असतोस. यास्तव मीदेखील तुझ्याकडे काही मागत आहे. माझी इच्छा आहे, की मला पीठ, दाळ व तूप मिळावे ज्यामुळे माझे चित्त कायम प्रसन्न राहील. मला उत्तम वस्त्रे आणि जोडे मिळावेत.

माझ्या शेतात भरपूर धनधान्य पिकावे. माझ्या गोठ्यात दुभत्या गायी-म्हशी आणि एक वेगवान घोडी असावी. एवढेच नव्हे तर या सर्व आबादानीत राहणारी एक सुंदर पत्नीदेखील असावी.’

धन्नाजींची ही परमेश्वराकडे केलेली मागणी पाहिली तर हे संत होते का, अशा विचाराने सर्वार्थाने विरक्त म्हणजे संत ही व्याख्या अथवा संकल्पना खोलवर रुजलेल्या भारतीय मनाला धक्का बसण्याची दाट शक्यता आहे.

धन्नाजींची ही मागणी ज्ञानदेवांच्या पसायदानाच्या नेमकी उलट वाटणारी आहे. ज्ञानदेव विश्वासाठी पसायदान मागतात, तर धन्नाजी स्वतःसाठी दान मागताना दिसतात. असे असले तरी जगाचा विचार करता ज्या नव्याण्णव टक्के सामान्य माणसांच्या जिवावर ह्या जगाचा डोलारा उभा आहे, त्यांचीदेखील परमेश्वराकडे हीच मागणी असते.

आपल्या प्रामाणिक व परिश्रमपूर्ण जीवनात सामान्य माणूस एवढीच मागणी परमेश्वराकडे करत असतो. पंढरीच्या दिंडीत पायी चालत जाणारा वारकरी विठुरायाला साधे फूलदेखील अर्पण करत नाही. केवळ त्याच्या पायावर डोके टेकवून माझे जीवन परिश्रमाचे आहे. घाम गाळून मी संसाराचा गाडा ओढत आहे आणि लेकराबाळांचे पोट भरत आहे.

माझ्या ह्या जीवनक्रमात कोणती बाधा येऊ देऊ नको, एवढीच मागणी तो करत असतो. आणि ‘तू चालत राहा मी उभा आहे’ असे आश्वासन कर कटीवर ठेवून पांडुरंगदेखील आपल्या भक्ताला देत असतो. याठिकाणी धन्नाजी प्रपंचातून विरक्त न होता त्याच्यात राहूनच परमेश्वराला अनुभवणाऱ्या सर्वसामान्य वारकऱ्यांचे खरे प्रतिनिधी वाटतात.

ज्याच्या हृदयात परमेश्वराने कायमचा वास केला आहे. अशा प्रत्येकाला असा सुखाचा संसार मिळाला, तर ज्ञानदेवांच्या पसायदानातील बराच मोठा अंश प्रत्यक्षात उतरू शकतो. सर्वसामान्य माणूस त्याच्या मोजक्या व माफक इच्छा-आकांक्षांनी तृप्त झाला, तर अवघाची संसार सुखाचा होण्यास खरे सहकार्य होऊ शकते.

धन्ना भगत यांची तीन पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. शीख परंपरेत त्यांच्या पित्याचे नाव ‘पन्ना’ आणि मातेचे नाव ‘रेवा’ असे देण्यात आले आहे. ठाकूर देशराज यांच्या जाट इतिहास नावाच्या ग्रंथात त्यांचे जन्मस्थान राजस्थानातील जयपूर जिल्ह्यातील फागी तालुक्यातील चौरू हे गाव सांगण्यात आले आहे.

शिखांचे पाचवे गुरू अर्जन देव यांनी धन्ना भगत यांची प्रशंसा करताना म्हटले आहे, की एका बालकाच्या निरागसतने जीवनाकडे आणि परमेश्वराकडे पाहण्याची दृष्टी धन्नाजींना लाभली होती.

शंकराच्या पिंडीला नैवेद्य खाण्यास भाग पाडणाऱ्या नामदेवरायांच्या कथेप्रमाणे दगडात ‘वाहेगुरु’ म्हणजे परमेश्वराला अवतरण्यास भाग पाडणाऱ्या धन्नाजींची एक कथा शीख परंपरेत प्रसिद्ध आहे.

धन्नाजी एका पंडिताकडे गेले असता पंडित मूर्तीला नैवेद्य भरवत होता. पंडिताला जोराची भूक लागली होती. त्यामुळे त्याला एकदाचे हे रोजचे कर्मकांड आटोपण्याची घाई झाली होती. धन्नाजी पंडिताला त्याच्या कृतीविषयी प्रश्न विचारत होते.

दगडाची मूर्ती खरोखरच नैवेद्य खाईल का आणि माझ्याही हातून खाईल का, असा प्रश्न धन्नाजींनी पंडिताला केला. यावर पंडिताने होकारार्थी उत्तर दिले. तरी धन्नाजींचे प्रश्न संपत नव्हते. अखेर पंडिताने त्यांना एक दगड दिला आणि सांगितले जा पहिल्यांदा याला नैवेद्य खाऊ घाल. धन्नाजी तो दगड घेऊन घरी आले.

त्यांनी स्वतःच्या घरात जे काही होतं त्यापासून सर्वोत्तम भोजन बनवले. दगडाला परमेश्वर म्हणजे वाहेगुरु समजून त्याला खाण्याचा आग्रह धरू लागले. त्यांचा हा आग्रह दोन दिवस व दोन रात्री अखंड चालू होता.

अखेर थकलेले धन्नाजी त्या दगडासमोर ग्लानी येऊन झोपी गेले. तिसऱ्या दिवशी परमेश्वर दगडातून अवतरला. त्यानं धन्नाजींचे भोजन स्वीकारले. तो त्यांच्या शेतीच्या प्रत्येक कामात सहकार्य करू लागला.

त्यांच्यासाठी स्वतःच्या हातानं लस्सी बनवू लागला. धन्नाजीला दगड देणाऱ्या पंडितालादेखील याची प्रचिती आली. भंडारा डोंगराच्या गुहेत तपश्चर्या करणाऱ्या तुकोबांना बारव्या दिवशी चराचरात पांडुरंग दिसू लागला, जनाईच्या प्रत्येक कामात पांडुरंग सहकार्य करत होता, नामदेवरायांच्या हातून तो नैवेद्य खात होता.

यात चमत्काराचा भाग नाही. ही खऱ्या संतांची अनुभूती आहे. मातीच्या कणाकणात परमेश्वर अनुभवण्याची क्षमता येणे म्हणजे खऱ्या अर्थानं संतत्व प्राप्त होणे. धन्नाजीदेखील त्याला पारखे राहू शकत नव्हते.

धन्ना भगत हेदेखील स्वामी रामानंद यांच्या प्रमुख बारा शिष्यांपैकी एक होते, असा दावा केला जातो. इतर अकरा जणांप्रमाणे त्यांच्याही कोणत्याच पदात गुरू म्हणून स्वामी रामानंद यांचा उल्लेख आलेला नाही. नामदेवराय आणि इतर संतांचा उल्लेख मात्र धन्नाजी करताना दिसतात. आपण स्वतः जाट जातीचे असून इतर संतांच्या जातीगत कर्माचा उल्लेखदेखील एका पदात करतात -

गोबिंद गोबिंद गोबिंद संगि नामदैउ मुन लीणा ।

आढ दाम को छीपरो होइउ लाषीणा ।।

बुनना तनना तिआगिकैं, प्रीति चरन कबरा ।

नीच कुला जोलाहरा भइंउ गुनीय गहीरा ।।

रबिदासु ढुंवता ढोरनी, तिन्हि तिआगी माइआ ।

परगटु होआ साथसंगि, हरि दरसनु पाइआ ।।

इह बिधि सुनिकै जाटरो, उठि भगती लागा ।

मिले प्रतषि गुसाईआँ, धंना बडभागा ।।

धन्नाजी म्हणतात की गोविंदात सदा लीन असलेले शिंपी नामदेवांची महत्ता, आपल्या हातमागावर धाग्यांची गुंफण करण्याची सोडून भगवंताच्या चरणांवर प्रेम करणारा विणकर कबीरांचे गुण, मृत पशूंना ओढून त्यांच्या कातड्याचा व्यवसाय करणाऱ्या रविदासांनी केलेला मायेचा त्याग, घरोघर जाऊन लोकांचे केशकर्तन करणारे सेन नाई यांची भक्ती.

हे सर्व ऐकून व पाहून मीदेखील भक्तिमार्गाकडे आकृष्ट झालो. त्यामुळे जाट असलेल्या मलादेखील परमेश्वराचे दर्शन झाले. हे मी माझे भाग्य समजतो. यावरून एक अंदाज असा करता येतो, की धन्नाजींच्या काळापर्यंत नामदेवराय, कबीर, रविदास, सेना महाराज हे संत उत्तर भारताच्या भक्ती क्षितिजावर सूर्यासारखे तळपू लागले असावेत.

त्यांच्या प्रेरणेमुळे धन्नाजींनी राजस्थानात भक्ती आंदोलनाचे बीजारोपण केले. ज्याचे संगोपन पीपाजी यांनी केले, आणि त्याचा डेरेदार वृक्ष करण्याचे काम दादू दयाल यांनी केले. ह्या वृक्षाची एक प्रमुख शाखा म्हणून संत मीराबाई यांचा परिचय देता येतो.

संत धन्ना जाट यांचे जीवन म्हणजे कृषिकर्म आणि भक्तिमार्ग यांचे एकरूपत्व म्हणून पाहता येते. प्रपंच आणि परमार्थ यांचा समतोल आणि अपरिहार्यता म्हणजे धन्नाजींचे तत्त्वज्ञान, असे म्हणता येते. उत्तर भारताच्या विठ्ठल मंदिरातील गरुडखांब म्हणजे धन्ना भगत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

गरुडखांबाप्रमाणे धन्ना भगत यांना मिठी मारल्याशिवाय उत्तर भारतातील भक्ती आंदोलनाला आकळता येणे अशक्य आहे. धन्नाजींची वाणी म्हणजे राजपूतान्याच्या मातीचा मृदगंध आहे. कुणब्याच्या कामातील घाम शेताच्या मातीत मिसळत असतो. तसाच धन्नाजींच्या पदांमध्ये हे स्वेदबिंदू शब्दांचे रूप धारण करताना दिसतात. त्यामुळेच राजपुतान्याचे तुकोबा असलेले धन्नाजी म्हणतात -

धन्ना कहै हरि धरम बिन, पंडित रहे अजाण ।

अणबाहयौ ही नीपजै, बूझौ जाई किसाण ।।

---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT