‘स्व’चे विलीनीकरण भक्ती आहे. राम अथवा परमेश्वर मिळाल्यानंतर आपले सर्व गुण आणि रिद्धी-सिद्धी सर्वकाही समाप्त होऊन जाते.
जेव्हा आस वा आशा संपुष्टात येते तेव्हाच आपण हरीच्या जवळ पोहोचू शकतो. आत्मा स्थिर होतो तेव्हा ईश्वराची निधी अथवा कृपा प्राप्त होते, असा साधा सरळ भक्ती मार्ग रैदासजी कथन करतात.
डॉ. राहुल हांडे
नहिं अब मैं तैं मैं तैं, नाहीं, क्या स्यों कहौं बताई ।
जस तूं, तस तूं, तस तूहीं, कस उपमा दीजै ।
आता मी आणि तू भेद उरलेला नाही. कसे सांगू, की जसा तू आहेस अगदी तसाच तू आहेस. आता यासाठी कोणती उपमा द्यावी.
परमेश्वराची अनुभूती घेतलेल्या रैदासजींची अशी अवस्था झाली आहे. परमेश्वराचा साक्षात्कार अथवा अनुभूती आल्यानंतर झालेला परमानंद त्यांच्या शब्दांमधून जाणवत आहे. या परमानंदामुळे आपण जे अनुभवले ते सांगण्याची त्यांना घाई झालेली आहे.
तसेच जे अनुभवले ते त्यांना शब्दातदेखील पकडता येणे अशक्य झालेले आहे. एखादी लौकिक वस्तू प्राप्त झाल्यानंतर सामान्य माणसाला तो आनंद तत्काळ व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडत असतात.
तसेच त्याच्या आनंदाला पूर्णपणे कवेत घेणारे शब्दही त्याला सुचत नसतात. असाच काहीसा प्रकार रैदासजींच्या बाबतीत घडलेला दिसतो.
अशा अलौकिक आनंदाला शब्दांत उतरवण्यास रैदासजींसारखा संतश्रेष्ठाची प्रतिभा आणि शब्दकळा अपुरी पडलेली दिसते.
येथे त्यांच्या अनुभूतीच्या सत्यतेत मात्र कणभर उणेपणा जाणवत नाही. जीव आणि ब्रह्म यांना एकच मानणाऱ्या रैदासजींनी आपल्या पदांमध्ये आपली अनुभूती सर्वार्थाने शब्दात उतरवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.
जल के तरंग जल मांहि समाई, कहि काकौ नांव धरियै ।
ऐसे तैं मैं एक रूप हैं माधो, आपन ही निरवरिये ।
जळात निर्माण झालेली वलये ज्याप्रमाणे जळातच विलीन होऊन जातात. त्यामुळे कोणाला काय नाव द्यावे? जळ कोणते आणि त्यावरील वलय कोणते, हे कसे निश्चित करावे? त्याचप्रमाणे माधवा, तुझे आणि माझे एकरूपत्व आहे.
परमेश्वर आणि स्वतःचे एकरूपत्व अतिशय तरलपणे रैदासजी अनेक पदांमध्ये व्यक्त करतात. त्यांच्या मते परमेश्वराची अनुभूती ही, गुंगौ साकर कहा बखाने म्हणजे वाचाहीनाने साखरेच्या माधुर्याचे वर्णन करण्यासारखे आहे.
खरे पाहिले तर रैदासजींच्या आध्यात्मिक अनुभवात आपल्याला कोणती व्यवस्था अथवा एकसूत्रीपणा शोधणे शक्य नाही. त्यांच्या काव्यरचनेतून आविष्कृत होणाऱ्या तत्त्वज्ञानाला आणि आध्यात्मिक अनुभवाला कोणत्याही पारंपरिक दार्शनिक विचारधारेतदेखील बसवता येत नाही.
समाजव्यवस्थेने त्यांच्यावर लादलेल्या जन्मजात शुद्रत्वामुळे तत्त्वज्ञान आणि धर्मशास्त्र यांचे औपचारिक शिक्षण त्यांना मिळणे कदापि शक्य नव्हते.
अशा परिस्थितीत सत्संग, तीर्थाटन आणि स्वयंअध्ययन यांद्वारे त्यांनी त्यांचे चिंतन अथवा तत्त्वज्ञान विकसित केले होते. त्यामुळे त्यांच्या तत्त्वज्ञानात शास्त्राधारित संगती व तारतम्य यांचा अभाव आढळल्यास नवल वाटण्याचे कारण नाही.
अखिल विश्वात सर्वत्र एकाच परमसत्तेचा विस्तार आहे, हा अनुभव मात्र रैदासांमध्ये निरंतर असलेला दिसतो.
जस हरि कहिये तस हरि नांही, हैं अस जस कछु तैसा ।
कह रेदास मैं ताहि को पूजूं, जाके ठांव नांव नहिं कोई ।
‘हरीचे वर्णन जसे केले जाते, तसा तो नाही. तो असा आहे तसा आहे, मात्र नेमका कसा आहे. हे सांगता येत नाही. रैदास ज्याची पूजा करतो त्या हरीचे कोणतेही नाव नाही की स्थान नाही.’ अशाप्रकारे रैदासांचा हरी सगुण-निर्गुण या द्वंद्वाच्या पल्याड उभा असलेला दिसतो.
जगात नेमकेपणानं आकळता न आलेल्या अज्ञात अशा हरीला सगुण-निर्गुण अशी कोणतीच कसोटी लावता येत नाही. त्यामुळेच एका ठिकाणी रैदासजी म्हणतात, अगुन सगुन दौ समकरि ज्यान्यौ, चहं दिस दससन तोरा। (मी सगुण-निर्गुण दोन्ही समान मानतो.
याचे कारण मला चारही दिशांना किंवा सर्वत्र त्याचेच दर्शन होते.) रैदासजी सगुण-निर्गुण भेदात न पडता चराचरात परमेश्वराचे अस्तित्व अनुभवताना आणि दाखवताना दिसतात.
त्यामुळेच एका पदात ते म्हणतात, गुन निरगुन कहियत नहीं जाके, म्हणजेच अज्ञात परमसत्ता अथवा परब्रह्म यांना सगुण वा निर्गुण असे नेमकेपणाने म्हणता येत नाही.
जग म्हणजे माया या तत्त्वाची इतर संताप्रमाणे रैदासांनीदेखील यथेच्छ निंदा केली आहे. असे असले तरी रैदासांची त्यासंदर्भातील समज इतर संतांपेक्षा सखोल असलेली जाणवते.
याला कारण शुद्रात्वामुळे ह्या मायारूपी जगाची दाहकता त्यांना भोगावी लागलेली होती. त्यांनी कर्म, धर्म, पाप, पुण्य आदि सर्व मायांना देखील आरसा दाखवला आहे. याचे स्पष्टीकरण देताना रैदासजी म्हणतात-
ऐसे करम धरम जग बांध्यो, छुटे तुम बिन कैसे हो हरि ।
जप तप विधी निषेध करुनामय पाप पुन्न दोऊ माया ।
हे ईश्वरा! कर्म आणि धर्मानं तू जगताला बांधून टाकले आहे. हे करुणामया! जप-तप, विधी-निषेध आणि पाप-पुण्य हे सर्व काही माया आहे. याठिकाणी रैदासजी शब्दांच्या पलीकडे खूप काही सांगताना दिसतात.
आदि शंकराचार्यांपासून लौकिक जग माया आहे आणि ब्रह्म सत्य आहे, असे सांगितले जात आहे. त्याचा आधार घेऊन रैदासजी म्हणतात की धर्म, कर्म, जप-तप, विधी-निषेध, पाप-पुण्य हे सर्वकाही मायाच ठरते. त्याचबरोबर स्पृश्य-अस्पृश्य, उच्च-नीच असे माया असलेल्या जगतात करण्यात आलेले भेद देखील उपयोगाचे नाही, असेदेखील रैदासजी सुचवून जातात.
येथे त्यांनी मायावादावर प्रश्नचिन्ह उभे केलेले दिसते. सर्वकाही माया आहे, तर भेद कशाला? असा प्रश्न आपल्या अत्यंत सौम्य प्रकृतीला अनुसरून रैदासजींनी उभा केलेला दिसतो.
अशा माया असलेल्या जगाला समतेच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांना बेगमपुऱ्याची रचना करावी लागते.
सामान्यतः कबीर साहेब आणि रैदासजींचे नाव सोबत घेण्याचा प्रघात असलेला दिसून येतो. असे असले तरी रैदासजींची साधना आणि कबीर साहेबांची साधना यामध्ये काही प्रमाणात अंतर आढळते.
रैदासजींच्या निर्वाणानंतर सुमारे शंभर वर्षांनंतर इ.स.१६००मध्ये कबीर रैदास गोष्ठी नावाच्या ग्रंथाची रचना करण्यात आली. रैदासजी आणि कबीर साहेबांच्या भक्ती मार्गात निश्चितच काही वेगळेपण असावे, असे यावरून लक्षात येते.
त्यामुळे कबीर साहेबांच्या भक्तांनी ह्या दोघांमध्ये समन्वय साधण्यासाठी कबीर रैदास गोष्ठीची रचना केली असावी. हा ग्रंथ म्हणजे रैदासजी आणि कबीर साहेबांचा संवाद आहे. ह्या चर्चेच्या अखेरीस रैदासजी म्हणतात -
सो तुम गावौ हूं गांऊं। तेरा ग्यांन बिचारुं।
कहै रैदास कबीर गुर मेरा। भरम करम धोइ डारुं।।
तुम्ही जे गाता तेच मी गातो. मी भ्रम आणि कर्म दोन्ही धुऊन टाकले आहेत. आता कबीरा तू माझा गुरू आहेस. रैदासजी येथे कबीरांचे व त्यांच्या मार्गाचे श्रेष्ठत्व मान्य करत असले तरी कबीरांपेक्षा त्यांचे वेगळेपण लक्षात घेण्यासारखे आहे.
रैदासजी कबीरांसारखे प्रखर नसून अत्यंत सौम्य आहेत. कबीरांप्रमाणे त्यांचा धागा नाथसंप्रदायाशी असलेला जाणवत नाही.
नाथ संप्रदायातील सुखमन, सहज, सुनिं, अरध-उरध अशा काही शब्दांचा प्रयोग तुरळक ठिकाणी त्यांनी केलेला आहे. असे असले तरी त्यांच्या वाणीत ह्या शब्दांमागील क्लिष्टता आढळत नाही.
समकालीन संतांपेक्षा रैदासजींच्या ठायी असलेली खंडन-मंडन आणि टीकाप्रवृत्ती वेगळी जाणवते. त्यांचा भर भावना, आत्मसाधना, प्रेम, एकांत, निष्ठा व समर्पण यांच्यावर अधिक असलेला दिसतो.
‘अंतरगति’ आणि ‘अभिअंतर’ (अभ्यंतर) या शब्दप्रयोगांचा त्यांनी केलेला मनसोक्त वापर त्यांच्या स्वभावाची आणि प्रवृत्तीचा परिचय देतो.
अंतरगति राचैं नहीं, बाहर करै उजास ।
ते नर जमपुर जाहिंगे भषै सन्त रैदास ।
जो हदयाच्या अंतरंगातून ईश्वराशी अनुरक्त नाही आणि आपण भक्त असल्याचा बाह्य देखावा करतो, असे लोक यमपुरात जातील.
अंतरंग भक्तीला सर्वोच्च मानणाऱ्या रैदासजींचा जोर आपल्या अस्तित्वाला परमतत्त्वाशी विलीनीकरणावर आणि समर्पणावर असलेला दिसतो.
रस, ज्ञान, उपहास, आशा, कुळाचाराचा त्याग, इंद्रिय निग्रह, योगसाधना, आहार, त्याग, निद्रासाधना, वैराग्य, वेदप्रामाण्य, मुंडण आणि चरण प्रक्षालन इत्यादी प्रचलित भक्ती मार्गातील घटकांना रैदासजींच्या भक्ती संकल्पनेत स्थान नाही.
आपौ गई तब भगति पाई, ऐसी भगति है काई ।
राम मिल्यौ अपनौ गुन खोयौ, रिधी सिधि सबै जु गंवाई ।
कहे रैदास छूटि सब आस, तब हरि ताही कै पास ।
आतमा थिर भई, तब सबही निधि पाई ।।
‘स्व’चे विलीनीकरण भक्ती आहे. राम अथवा परमेश्वर मिळाल्यानंतर आपले सर्व गुण आणि रिद्धी-सिद्धी सर्वकाही समाप्त होऊन जाते. जेव्हा आस वा आशा संपुष्टात येते तेव्हाच आपण हरीच्या जवळ पोहोचू शकतो.
आत्मा स्थिर होतो तेव्हा ईश्वराची निधी अथवा कृपा प्राप्त होते, असा साधा सरळ भक्ती मार्ग रैदासजी कथन करतात. रैदासजी निर्गुण भक्तीचे उपासक म्हणून ओळखले जातात. गुन निरगुन कहियत नहिं जाके, असे म्हणणाऱ्या रैदासजींच्या काव्यात सगुण भक्तीचा आग्रह अनेकदा नजरेत भरण्या इतका दिसून येतो.
त्यांच्या वाणीत ईश्वर आपल्याला राम, गोविंद, विठ्ठल, वासुदेव, हरी, माधव, विष्णू, केशव, कमलापती, गोपाल, महेश, दामोदर, मुरारी, रघुनाथ, मुकुंद इत्यादी अनेक नावांनी मनसोक्त वावरताना दिसतो. त्यांचा ईश्वर इंद्रियातीत नसून इंद्रियगोचर आहे.
श्रवण, दर्शन, स्पर्श आणि स्वाद अशा ऐंद्रिय सीमांमध्ये त्याचे अस्तित्व जाणवते. इंद्रिय आणि मन यांनी ईश्वराची अनुभूती व्यक्त करताना रैदास म्हणतात, की चित्ताने त्याचे स्मरण करतो.
नेत्रांनी त्याला पाहतो आणि जिभेने त्याच्या अमृतासमान नामाचा उच्चार करतो. त्याचबरोबर हृदयात त्याचे चरण धारण करतो. हे ईश्वरा! रैदास तुला विनंती करतो की मला तुझ्याजवळ आश्रय दे.
चित सिमरनकरौं, नैन अवलोकनो, स्रवन बानी सुजसु पूरि राखौं ।
मनु सु मधुकरु करौ, चरन हिरदै धरौ, रसन अम्रित राम नामभाखौं ।
कहैं ‘रैदास’ एक बेनती हरि सिउं, पैज राखहुं राजा राम ! मेरी ।।
रैदासांच्या काव्यात संपूर्ण शरणागती दिसत असली तरी मध्ययुगीन काळात तेही उत्तर भारतात दलित समाजातून आलेली एक व्यक्ती भारताच्या अध्यात्म अवकाशात ध्रुव ताऱ्याचे स्थान प्राप्त करते, बाह्य कर्मकांड आणि सोंग-ढोंग यांना बाजूला सारून खऱ्या धर्माची व भक्तीची व्याख्या करते, समाजवादी पायावर उभ्या असलेल्या बेगमपुऱ्याचे चित्र रंगवते.
प्रभूच्या चरणी समान असलेल्या दासांना समतेची जाणीव करून देताना रैदास म्हणतात, प्रभुजी तुम स्वामी हम दासा, ऐसी भगति करै रैदासा. त्यामुळे रैदासांचे योगदान भारताच्या प्रबोधन यात्रेत अतुलनीय असे आहे.
-----------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.