अरविंद परांजपे
वयाच्या २५ व्या वर्षी त्याला पिसामध्ये प्राध्यापक पद मिळाले, आणि नंतर तीनच वर्षांनी त्याने पादुआ विद्यापीठात भूमिती, यांत्रिकी आणि खगोलशास्त्र शिकवण्यास सुरुवात केली. तिथे तो १६१०पर्यंत शिकवत होता. त्याला अनेक विषयांच्या अभ्यासात रस होता.
याच कालावधीत त्याने मूलभूत आणि व्यावहारिक विज्ञानात कंपाससारखे अनेक शोध लावले. पण आपल्याला लोक अनेक वर्षे ओळखतील असा कुठलाही शोध आपण लावलेला नाही, अशी खंत गॅलिलिओला वयाच्या जवळपास पंचेचाळिसाव्या वर्षी वाटू लागली होती..
टीको ब्राहेची निरीक्षणे आणि योहान्स केप्लरच्या गणिताने सूर्य केंद्रित विश्वाच्या संकल्पनेला संपूर्ण मान्यता मिळवून दिली होती, हे तर खरंच आहे. आणि असं झालं नसतं तर कदाचित ग्रह सूर्याभोवती फिरतात हे कळायला आणखीन एका शतकाचा अवधी लागला असता. पण तरीही या दोघांच्या कामाला अगदी वेळेवर मदत झाली ती गॅलिलिओ गॅलीलीची (१५६४- १६४२).
गॅलिलिओचा जन्म इटलीतील पिसा येथे १५ फेब्रुवारी १५६४ रोजी झाला होता. त्याचे वडील विनचेन्झो गॅलीली ल्युटवादक (बोटांनी तारा छेडून वाजविण्याचे तंतुवाद्य), संगीतकार आणि संगीताचे शास्त्रीय अभ्यासक होते.
वडिलांच्या तालमीत गॅलिलिओ स्वतः एक निपुण ल्युटवादक झाला होता. वडिलांकडूनच तो आपल्याला जे पटलं नाही त्याबद्दल शंका आणि प्रश्न विचारायला शिकला होता. त्यांची आर्थिक परिस्थिती नेहमीच हलाखीची होती आणि त्याचा भार गॅलिलिओने आयुष्यभर उचलला.
गॅलिलिओ आठ वर्षांचा असताना पिसा सोडून त्याच्या परिवाराने फ्लोरेन्सला स्थलांतर केले. पुढे दोन वर्षांनी त्याला फ्लोरेन्सच्या जवळ व्हॅलंब्रोसा अॅबीमध्ये पाठवण्यात आले. इथे त्याने सन १५७८पर्यंत इतर विषयांच्या बरोबर तर्कशास्त्राचाही अभ्यास केला.
वयाच्या १६व्या वर्षी गॅलिलिओचा कल धर्मगुरू होण्याकडे होता. पण त्याच्या वडिलांनी त्याला पिसा विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेण्यास पाठवलं. एका रविवारी तो तिथल्या कॅथेड्रलमध्ये प्रवचन ऐकायला गेला होता. याच कॅथेड्रलच्या दक्षिणेस पिसाचा झुकता मनोरा आहे.
तिथे त्याचे लक्ष वाऱ्यांमुळे हलत असलेल्या झुंबरांवर गेलं. त्याने या झुंबरांच्या दोलनांचा कालावधी मोजण्याचा प्रयत्न केला. घड्याळाचा शोध अजून लागलेला नव्हता, त्यामुळे आंदोलनांचा कालावधी मोजण्यासाठी त्याने हाताच्या नाडीच्या ठोक्यांचा वापर केला. आणि, आंदोलन कितीही कमी किंवा जास्त असलं तरी दोलनाचा कालावधी मात्र समानच असतो, असं त्याच्या लक्षात आलं.
पुढे १६०२ साली गॅलिलिओने वेगवेगळ्या लांबीच्या लंबकांच्या दोलनाचा कालावधी मोजण्याचा प्रयोग केला तेव्हा त्याच्या लक्षात आलं, की आंदोलन कितीही मोठं किंवा लहान असलं तरी ज्या दोरीनं (किंवा तारेनं) लंबकाचं वजन बांधलं आहे त्या दोरीच्या लांबीवर एका आंदोलनाचा कालावधी अवलंबून असतो. लंबकाच्या वजनाचाही त्यावर प्रभाव पडत नाही. गॅलिलिओचा हाच शोध पुढे लंबकांच्या घड्याळांच्या निर्मितीला कारणीभूत ठरला.
ह्या सगळ्या काळात गॅलिलिओला गणितापासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आलं होतं. कारण अर्थातच वैद्यकीय व्यवसायाच्या मोठ्या अर्थकारणाचं होतं. पण वेगळेच काहीतरी घडायचे होते.
गॅलिलिओ एकदा चुकून भूमितीवरचे एक व्याख्यान ऐकायला गेला आणि नॅचरल फिलॉसॉफीच्या प्रेमात पडला. त्या काळात भौतिकशास्त्र वगैरे ज्ञानशाखा नॅचरल फिलॉसॉफी म्हणून ओळखल्या जात असत. पुढे त्याच्या वडिलांनी त्याला त्या दिशेला वळण्यास परवानगी दिली.
गॅलिलिओने लहान वयातच एक नवीन यंत्र तयार केलं होतं, थर्मोस्कोप किंवा तापदर्शक. त्याच्या या तापदर्शकाचीच पुढची आवृत्ती म्हणजे थर्मामीटर. पुढच्या काळात वैद्यकीय व्यवसायात त्याचं हे यंत्र अत्यंत महत्त्वाचं ठरलं.
याच काळात युरोपमधील जवाहिरे एखाद्या दागिन्यात मौल्यवान धातूची मात्रा किती आहे हे शोधण्यासाठी त्या धातूचे वजन आधी हवेत आणि मग पाण्यात करत असत. आर्किमिडिजची ‘युरेका – युरेका’ (सापडलं - सापडलं) म्हणत रस्त्यावरून नग्नावस्थेत पळत जाण्याची गोष्ट तुम्हाला आठवली असेल.
गॅलिलिओने आर्किमिडिजच्या पुस्तकांचा अभ्यास केला होता. या अभ्यासावर आधारित एक नवीन यंत्र त्यानं निर्माण केलं. त्याच्या या नव्या यंत्राला त्यानं नाव दिलं ‘ल बिलनचेट्टा’ (La Bilancetta) म्हणजे छोटा तराजू. हा शोध त्याने एका लहानशा पुस्तकातून लोकांसमोर मांडला. जवाहिऱ्यांसाठी हे यंत्र खूप उपयोगी ठरलं, आणि जेमतेम २२ वर्षांचा गॅलिलिओ एकदम प्रसिद्धीच्या झोतात आला.
वयाच्या २५व्या वर्षी त्याला पिसामध्ये प्राध्यापक पद मिळाले, आणि नंतर तीनच वर्षांनी त्याने पादुआ विद्यापीठात भूमिती, यांत्रिकी आणि खगोलशास्त्र शिकवण्यास सुरुवात केली. तिथे तो १६१०पर्यंत शिकवत होता. त्याला अनेक विषयांच्या अभ्यासात रस होता. याच कालावधीत त्याने मूलभूत आणि व्यावहारिक विज्ञानात कंपाससारखे अनेक शोध लावले.
गॅलिलिओ अनेकदा व्हेनिसला जात असे. अशाच एका प्रवासात त्याची ओळख मरिना गांबाशी झाली. तिच्याबरोबर जवळीक वाढल्यावर ती पादुआत गॅलिलिओबरोबर राहू लागली. या जोडप्याला व्हर्जिनिया आणि लिव्हिया अशा दोन मुली आणि विन्सेंझो नावाचा एक मुलगा झाला.
पण गॅलिलिओ आणि मरिनाचं रीतसर लग्न झालेलं नव्हतं त्यामुळे मुलांना वडिलांचं नाव लावता आलं नाही. व्हर्जिनियाला तर ‘व्हेनिसच्या मरिनाच्या व्यभिचाराची’ म्हणून ओळखलं जात असे. तर नेहमी आजारी असणाऱ्या लिव्हियाच्या रेकॉर्डमध्ये वडिलांचं नावच वगळण्यात आलं होतं.
विन्सेंझोला मात्र नंतरच्या काळात गॅलिलिओचा कायदेशीर वारस म्हणून मान्यता मिळाली. व्हर्जिनिया आणि लिव्हिया या दोघी बहिणींची लग्नं होणं शक्य नसल्यामुळे गॅलिलिओने त्यांना जवळच्या सॅन मॅटेओच्या कॉन्व्हेंटमध्ये दाखल केलं, तर भाऊ विन्सेंझो वादक झाला.
कॉन्व्हेंटमध्ये व्हर्जिनियाने मारिया सेलेस्ते हे नाव घेतलं. गॅलिलिओबरोबर तिचा वरचेवर पत्रव्यवहार होत असे. मारियाने लिहिलेली पत्रं गॅलिलिओने जपून ठेवली, पण गॅलिलिओने तिला पाठवलेली पत्रं मात्र कॉन्व्हेंटने नष्ट केली.
मारिया आपल्या वडिलांच्या खूप जवळ होती, असं तिच्या पत्रातून दिसून येतं. तर गॅलिलिओ तिचा उल्लेख, ‘उत्कृष्ट मनाची, आणि माझ्याशी अतिशय प्रेमळपणे जोडलेली स्त्री’ म्हणून करतो. फ्लॉरेन्सच्या सॅन्ता क्रोचे बॅसिलिका येथे या दोघांना शेजारी शेजारी दफन करण्यात आले आहे.
आपल्याला लोक अनेक वर्षे ओळखतील असा कुठलाही शोध आपण लावलेला नाही, अशी खंत गॅलिलिओला वयाच्या जवळपास पंचेचाळिसाव्या वर्षी वाटू लागली होती. पण त्याची ही खंत काही फार काळ टिकली नाही.
दूरची गोष्ट जवळ दिसेल असे एक यंत्र घेऊन हान्स लिपरहॉय नावाची एक जर्मन-डॅनिश व्यक्ती आपल्याकडे येणार असल्याचे गॅलिलिओला त्याच्या पावले सार्पी नावाच्या मित्राने एकदा सांगितले. त्यावेळी तो व्हेनिसमध्ये होता. हान्स लिपरहॉयने हा शोध म्हणे १६०८ साली लावला होता. हे ऐकताक्षणीच गॅलिलिओला या नवीन यंत्राचे खरे महत्त्व लक्षात आले.
इतकी महत्त्वाची गोष्ट सार्पीनं त्याला आधी सांगितली नाही म्हणून तो प्रचंड भडकला. राग जरा शांत झाल्यावर मोठ्या पदावर असलेल्या सार्पीला त्याने आपली सर्व शक्ती पणाला लावून लिपरहॉयला व्हेनिसला येण्यापासून थांबवण्याची आणि त्याने बनवलेलं ते यंत्र आपल्याला आणून देण्याची गळ घातली. लिपरहॉयचे ते यंत्र हातात पडल्यावर गॅलिलिओने त्याचा कसून अभ्यास केला आणि मूळ यंत्रासारखेच पण त्याहीपेक्षा चांगले यंत्र तयार केले.
हे यंत्र म्हणजेच दुर्बीण. दुर्बिणीमुळे दृष्टीच्या पलीकडील सृष्टी आपल्या समोर आली. कशी ते बघूया पुढच्या लेखात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.