stock market sakal
साप्ताहिक

रोक सको तो रोक लो!

भरघोस मागणी आणि अपुरा पुरवठा यामुळे टोमॅटो जसे महाग झाले तसा शेअर बाजार अधिकाधिक महाग होत चालला आहे.

भूषण महाजन

आजतरी आपला शेअर बाजार स्वप्नवत चालला आहे. थोडा थोडा खिसा गरम करत शेअर भांडार सांभाळावे. आपल्याच वजनाने बाजारात होणारी घसरण खरेदीसाठी विचारपूर्वक वापरावी.

एखादा बेफाम आणि बेबंद वळू आठवडी बाजारात घुसावा आणि त्याने तेथे अनिर्बंध धुडगूस घालावा तसा शेअर बाजार वरवर जात आहे. त्याच्या मागे गेल्यास आपले उखळ पांढरे होऊ शकते, हे गुंतवणूकदारांना कळले आहे व ते तसे करून घेत आहेत.

कुठल्याही किमतीला कुठलाही शेअर घेऊन तो अधिक वर कसा जाईल हेच ते बघत आहेत. भरघोस मागणी आणि अपुरा पुरवठा यामुळे टोमॅटो जसे महाग झाले तसा शेअर बाजार अधिकाधिक महाग होत चालला आहे.

‘रोक सको तो रोक लो’ असे म्हणत हा बैल, समोर आलेल्या प्रत्येक मंदीवाल्याला शिंगावर घेत आहे. आजतरी त्याच्या मार्गात आडवे येण्यापेक्षा त्याच्या मागे राहणे शहाणपणाचे वाटते. आता हा वळू स्वतःहून शांत व्हायची वाट पाहायची, की हातात आलेले डबोले घेऊन कडेला व्हायचे, हे ज्याच्या त्याच्या जोखीम क्षमतेवर अवलंबून आहे.

नशिबाला किती ताणायचे तेही कळत नाही. २००३ ते २००७ किंवा २०१६ ते २०१८ सारखी तेजी पुन्हा अवतरली असावी असाच भास होतो. आता हेच पाहा ना. १९५६० हे आपले निफ्टीचे टार्गेट होते, ते उणेपुरे साडेतीन महिन्यातच गाठले गेले.

६ जुलै ते १३ जुलै रोजच १९५०० अंशाला टक्कर दिल्यानंतर एक दिवस तो बांध फुटणारच होता. तो १४ जुलै रोजी फुटला. गत सप्ताहाचा बंद १९५६४ तर लागलाच पण सोमवारी (ता. १७ जुलै) त्यावर कळस चढला. सोमवारी निफ्टीने १९७००चाही टप्पा ओलांडला, अशा प्रकारे ३१ मार्चपासून निफ्टी साडेतेरा टक्के वाढली. तर सेन्सेक्स तेरा टक्के!!!

विश्लेषक आयटी, फार्मा आणि मेटल क्षेत्रात मंदीचे अंदाज बांधत होते. ते अंदाज धुळीला मिळवत ही तिन्ही क्षेत्रे तेजीत सामील झाली. निमित्त झाले टीसीएस व एलएनटी माइंड ट्रीचे अपेक्षेपेक्षा बरे आलेले निकाल. त्याचबरोबर लुपिन आणि ऑरो फार्माला युएसएफडीएने दिलेला हिरवा कंदील! आणि त्या जोडीला किंचित कमी झालेला अमेरिकेतला महागाई दर.

जंगलात वणवा पेटायला लागते छोटीशी चकमक आणि सोसाट्याचा वारा. अमेरिकेत महागाई किंचित कमी झाली (मागील वाढीव पायावर एक टक्क्यापेक्षा कमी), त्यात चीनने आमची अर्थव्यवस्था अजूनही लंगडीच आहे, असा कबुलीजबाब दिल्यावर बाजाराला पेटायला दुसरे निमित्त नको होते.

ह्या वळूच्या मार्गात आपण यायला नको. ट्रेलिंग स्टॉप लॉस ठेवत त्याच्या मागेच जाणे श्रेयस्कर. हा वळू स्वतःच तोंडाला फेस येऊन शांत होणार आहे. तसे कधीही होऊ शकते. खरे तर तसे होऊन पाच-सात टक्के बाजार खाली आला तर अधिक वर जायला बाजाराला शक्ती मिळेल. ती शक्यता गृहीत धरूनच तेजी केली पाहिजे. असो.

जीएसटी मंडळाची बैठक झाली व त्यात कॅसिनो, इतर ऑनलाइन गेमिंग आणि अश्वशर्यतींवरील जीएसटी कर १० टक्के वाढवून २८ टक्के केला आहे. सिगारेट, मद्य व वरील चैनीच्या बाबी नेहमीच अर्थमंत्र्यांच्या आवडीच्या असतात. कारण कितीही कर वाढवला तरी ह्यातील ग्राहक तक्रार करू शकत नाही.

एका रुपयाचे शंभर करायची आकांक्षा असल्यामुळे त्यातील वाटा सरकार काढून घेणार हे त्या ग्राहकाने स्वीकारलेले आहे. कर संकलन वाढले तर तिजोरीत भर पडेल, आणि कमी होऊन त्यानिमित्ताने ह्या सवयी कमी झाल्यास तेही समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने हवेच आहे. कर संकलन अपेक्षेपेक्षा अतिच कमी होऊन तिजोरीला चिमटा बसला तरच हा दर कमी होण्याची शक्यता.

राज्यांनी काही प्रमाणात मद्यावरील अबकारी करात छेडछाड करून ते मागे केलेच आहे. या निमित्ताने गुंतवणूक करताना त्या क्षेत्रातील सरकारी धोरणाची जोखीम विचारार्थ घेतली पाहिजे. आयटीसीचा बाजारभाव, चांगले निकाल येऊनही, या भीतीने किमान दोन वर्षे स्थिर होता.

पुढे कंपनीच्या सर्व उपकंपन्यांनी सतत चांगले निकाल दर्शवल्यावर व त्या एकामागे एक करीत नव्याने सूचीबद्ध होणार ह्या शक्यतेमुळे व आशेमुळे शेअर वर्षभरात दुपटीहून अधिक वाढला. साहजिकच डेल्टा कॉर्प, नझारा टेक आदी शेअर खाली आले.

अर्थात या करामुळे जुगार खेळणे काही कमी होणार नाही. काही दिवस नरम राहून डेल्टा कॉर्प पुन्हा उभारी घेऊ शकतो, पण आता सेंटीमेंट नरमाईचे आहे हे ध्यानात घेतले पाहिजे. १७५ रुपयांच्या आसपास शेअरला चांगला आधार आहे.

वेदांत व फॉक्सकॉन व्यवहार फिसकटू शकतो हे ह्या लेखमालेत मागे सूचित केले होते. पण पडलो तरी मला लागलेच नाही, असे म्हणत आमच्या दारात सक्षम भागीदारांची रांग लागली आहे; कंपनीचा सेमी कंडक्टर प्रकल्प होणारच, असे अगरवाल ह्यांनी जाहीर केले आहे.

देश इलेक्ट्रॉनिक वस्तूंची सरासरी १० हजार कोटी डॉलरची आयात करतो. त्यात ३० टक्के वाटा सेमीकंडक्टर व डिस्प्ले ग्लासचा आहे. डिस्प्ले ग्लासचे मोठे उत्पादन वेदांतची एक उपकंपनी करते. ह्या निमित्ताने १४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक कंपनी नव्याने देशात करणार आहे. इतर भांडवलाची जुळवाजुळव कशी होणार ह्याचा तपशील सध्या उपलब्ध नाही.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने संमिश्र निकाल दर्शवले. टीसीएसने विश्लेषकांच्या अंदाजाला धक्का देत वर्षाकाठी १७ टक्के नफा वृद्धी जाहीर केली आहे. तसेच प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचे नोकरी सोडण्याचे प्रमाण खाली आले आहे.

एचसीएल टेक व इन्फोसिसने या वर्षी पगारवाढीला स्थगिती दिली असली तरी टीसीएसने तसे केलेले नाही. साहजिकच निकालानंतर शेअर साडेपाच टक्के वाढला. कंपनीने ९ रुपये लाभांश देऊ केला आहे. २० जुलै रोजी लाभांश गणना होईल. एचसीएल टेकचे निकाल फारसे उत्साहवर्धक नव्हते.

कंपनीने ३५३४ कोटींचा नफा नोंदवला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत माफक प्रमाणात वाढला असला तरी मागील तिमाही समोर ११ टक्के कमी झाला आहे. अर्थात मुलगा आज जरी काठावर पास झाला असला तरी पुढील परीक्षेत नंबर मिळवेल ह्या मानसिकतेने बाजाराने भाव तोडला नाही.

पण माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तेजी (आयटी निर्देशांक ) ३१५०० ह्या पातळीपुढे कितपत टिकेल ह्याची शंकाच आहे. पुढे इन्फोसिसचे निकाल पाहिल्यावर पुढील धोरण ठरवता येईल. एचडीएफसी बँकेचे पहिल्या तिमाहीचे निकाल समोर आले आहेत.

ते संमिश्र आहेत. तरतुदी वाढविल्यामुळे, ढोबळ अनार्जित कर्जांचे प्रमाण (१.१४ टक्के) सरासरीपेक्षा कमी दिसते. मालमत्तेच्या प्रमाणात २.०४ टक्के नफा (रिटर्न ऑन अॅसेट) उत्साहवर्धक आहे.

पुन्हा एकदा २५ ते ३० टक्के निव्वळ नफा दरसाल वाढू शकेल, अशी चिन्हे दिसतात. तसेच महसूलवृद्धी संतोषजनक आहे. अर्थात हे निकाल एचडीएफसीच्या विलीनीकरणाच्या पूर्वीचे आहेत. पण पुस्तकी किंमत व बाजारभाव ह्यांचे प्रमाण आकर्षक आहे. विलीनीकरणानंतर पुनःश्च मूल्यमापन होईलच.

पण या किमतीला ह्या शेअरचा अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे. लवकरच हा शेअर गतवैभवाला जाईल, अशी अपेक्षा आहे. रशिया क्रीमियाला जोडणाऱ्या पुलावर ड्रोन हल्ला होऊन पूल खचला आहे.रशियाने तत्काळ काळ्या समुद्रातून होणारी युक्रेनची अन्नधान्य निर्यात थांबवली आहे.

ह्या समुद्रातून तुर्किये, इटली, इजिप्त, चीन वगैरे देशात निर्यात होते. आंतरराष्ट्रीय धान्य बाजाराने ह्या घटनेकडे फारसे गांभीर्याने बघितले नसले तरी एल निनो पाठोपाठ ह्या कृतीमुळे धान्यबाजारात पुढील वर्षी तेजी राहील अशी चिन्हे दिसतात. संयुक्त राष्ट्रांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून हस्तक्षेप केल्यास काही उपाय निघू शकेल.

चीनने नुकताच तेथील उद्योग व व्यवसायांकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा मवाळ केला आहे. अर्थव्यवस्थेला फक्त समाजवाद नको आहे, त्याला उद्यमशीलतेची जोड हवी हा साक्षात्कार शी जीन पिंग ह्यांना झाला हे बरे झाले. यापुढे उद्योगांचा गळा घोटणारे अनुपालन नसेल, हे त्यांनी सूचित केले.

परदेशी गुंतवणुकीकडे अधिक दयाळूपणे पाहण्याचे चीनने (आता तरी) ठरवलेले दिसते. अर्थात जगातील अर्थतज्ज्ञांनी चीनच्या अर्थव्यवस्थेच्या ह्यापुढील वाढीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यातून नवे भांडवल भारताकडे वळू शकले असते, पण ह्या अचानक नरमाईच्या धोरणामुळे भांडवलाचा पुढील प्रवास कसा होईल ते कळत नाही.

आजतरी आपला शेअर बाजार स्वप्नवत चालला आहे. थोडा थोडा खिसा गरम करत शेअर भांडार सांभाळावे. आपल्याच वजनाने बाजारात होणारी घसरण खरेदीसाठी विचारपूर्वक वापरावी.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

IPL 2025 Mega Auction: लिलाव संपला! १७३ खेळाडूंसाठी फ्रँचायझींनी खर्च केले ६३५.३० कोटी रुपये; पाहा खरेदी केलेल्या खेळाडूंची यादी

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

SCROLL FOR NEXT