स्वप्ना साने
माझ्या पत्नीची त्वचा खूपच ड्राय आहे. डॉक्टरांनी सुचवल्याप्रमाणे एक विशिष्ट साबण ती वापरत होती. आता त्या साबणाचे उत्पादनच काही महिन्यांपूर्वीपासून बंद झाले आहे. त्याच्यासारख्या इतर साबणांचा वापर करूनही तो परिणाम मिळत नाही. चेहरा तर जास्तच खाजतो. काय करावे?
: ड्राय त्वचेला खरेतर साबण वापरूच नये असे माझे मत आहे. कारण तो साबण कितीही pH बॅलन्स्ड असला, तरी कुठेतरी त्या साबणामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल आणि मॉइस्चर निघून जाते आणि त्वचा जास्त ड्राय होत जाते. रोज साबणाचा वापर न करता, त्याऐवजी पुढीलप्रमाणे उपाय करून बघू शकता - साधे ओट मिक्सरमध्ये बारीक करावेत आणि त्यात समप्रमाणात दूध पावडर मिक्स करावी.
ह्या पावडरने त्वचा स्वच्छ करावी; उटण्याचा जसा वापर करतो, त्याचप्रमाणे एक तर पाणी घालून किंवा दही घालून पेस्ट तयार करावी. ह्या पेस्टने हळुवार स्क्रब करत त्वचा क्लीन करावी. तुम्हाला जर डेअरी प्रॉडक्टची ॲलर्जी नसेल तर हा पॅक नक्कीच तुम्हाला सूट होईल. साबण वापरणे जरा सोपे असते, आणि ह्या पावडरची पेस्ट करून रोज वापरणे जरा अवघड आहे, पण एकदा सवय झाली की सोपे होईल. एक मात्र नक्की करावे, सकाळी आणि रात्री झोपायच्या आधी त्वचा नीट मॉइस्चराईझ करावी.
रात्री नरीशिंग क्रीम वापरावे किंवा रोज बदाम तेलाने पाच मिनिटे मसाज करावा. त्वचा ड्राय असल्यामुळे अंघोळीसाठी खूप गरम पाणी वापरू नये, गरम पाण्यामुळे त्वचा अधिक ड्राय होते. तसेच सारखे हात धुणे, चेहरा धुणे टाळावे, दोन वेळेस धुतला तरी पुरेसा आहे. हात धुतल्यावर लगेच हँड क्रीम लावले तर बऱ्यापैकी फायदा होईल.
ड्रायनेसमुळे चेहऱ्याला जास्त खाज सुरू शकते. त्यामुळे वरील उपाय करून बघा, नक्की फायदा होईल. पण तरीही खाज थांबली नाही, तर तुम्हाला कुठली ॲलर्जी तर नाही ना, ह्याची खात्री करून घ्यावी.
तसेच तुम्हाला जर साबणाचा वापर करायचाच असेल, तर चांगल्या क्वालिटीचा केमिकल विरहित हॅण्डमेड सोप वापरून बघा, त्यातही कोको बटर किंवा शिया बटरच्या साबणाने जरा बरे वाटेल.
माझे केस पाठीपर्यंत लांब आहेत. पण खांद्याखाली केस खूपच विरळ झाले आहेत. फक्त खांद्यापर्यंतच्या केसांना व्हॉल्युम आहे, त्याखाली केस अगदीच कसेतरी झाले आहेत. गुंताही सारखा होतो. काय करावे? केसांची काळजी कशी घ्यावी, त्याबद्दल माहिती द्याल का?
: खांद्यापर्यंतच्या केसांना चांगला व्हॉल्युम असेल तर माझ्या मते, एकदा चांगला हेअर कट करून बघा. स्ट्रेट किंवा राउंड शेप देऊन विरळ झालेला भाग कापून टाकावा. असे केल्यावर केस हेल्दी दिसतील. आणि केस वाढल्यानंतर पुन्हा विरळ होऊ नयेत ह्यासाठी केसांची नीट निगा राखणे आवश्यक आहे.
केस रोज कमीतकमी आठ ते दहा मिनिटे चांगल्या कंगव्याने विंचरावे. असे केल्यास ब्लड सर्क्युलेशन चांगले होऊन केसांच्या मुळांना पोषण मिळते. त्वचेमध्ये नैसर्गिक तेल तयार होत असते. कंगव्याने नीट मुळापासून विंचरल्यावर त्या तेलाचे पूर्ण हेअर लेंथला पोषण मिळते. केस सिल्की आणि चमकदार दिसतात.
दुसरे म्हणजे, पौष्टिक आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या अन्नातून आवश्यक ते पोषण आपल्या शरीराला मिळाले नाही, तर त्याचा परिणाम सर्वात पहिल्यांदा त्वचेवर आणि केसांवर होतो. खास करून केसांसाठी प्रोटीन आणि व्हिटॅमिन सी, तसेच आयर्नची योग्य मात्रा आहारातून मिळायला हवी.
आणखी एक महत्त्वाचे म्हणजे, केसांवर खूप जास्त केमिकल वापरले जात असतील, तर त्यामुळेही केस डॅमेज होतात. खूप स्ट्राँग शाम्पू वापरणे टाळावे, माइल्ड हर्बल शाम्पूचा वापर करावा. हेअर स्टायलिंगमध्ये सारखी सारखी हीट ट्रीटमेंट करू नये, त्यामुळेही केसांचे टेक्स्चर खराब होऊन केस विरळ होऊ शकतात. कधी हीट ट्रीटमेंट घेऊन स्टायलिंग करायचे झाल्यास योग्य पद्धतीने काळजी घेऊन हीट प्रोटेक्टिव्ह क्रिम वापरूनच स्टायलिंग करावे.
मला हेअर एक्सटेन्शन वापरून बघायचे आहेत, ते सेफ असतात का? कारण माझे केस खूप दाट नाहीत, आणि समोरून जरा टक्कल पडल्यासारखे जाणवते. तर एक्सटेन्शन वापरल्यामुळे तिथला भाग चांगला दिसेल का?
: हेअर एक्सटेन्शन वापरायला अगदी सोपे आणि सेफ असते. फक्त तुम्हाला तुमच्या केसांच्या रंगाचे आणि शेड नीट मॅच करून घ्यावे लागेल. शिवाय कोणत्या साईजचे नीट बसतील, तेही बघून घ्यावे लागतील. तुम्हाला अंदाज नसेल तर तुमच्या ब्यूटी थेरपिस्टकडून माहिती करून घ्या आणि चांगल्या क्वालिटीचे एक्सटेन्शन मागवून घ्या.
ते कसे फिक्स करायचे तेसुद्धा आधी समजून घ्या, कारण एक्सटेन्शन व्यवस्थित लागले नाही तर केस नीट सेट होणार नाहीत अन् वेगळे एक्सटेन्शन लावलेले दिसेल. एक्सटेन्शन वेगवेगळ्या रंगांमध्येही उपलब्ध आहेत. तुम्हाला जर ट्रेंडी लुक हवा असेल, तर हायलाइट केलेले एक्सटेन्शन मागवू शकता.
हल्ली ऑनलाइन बऱ्याच रील आणि व्हिडिओ उपलब्ध आहेत, त्यामध्ये एक्सटेन्शन कसे वापरायचे याबद्दल गाइड करतात. पण तरीही मी सुचवेन की तुमच्या ब्यूटी एक्स्पर्टकडून एकदा नीट सगळी माहिती घेऊन मगच एक्सटेन्शन वापरायला सुरुवात करा.
स्प्लिट एंड असल्यास काय करावे? केस रफ आणि थोडे वेव्हीपण आहेत, खूप खराब दिसतात.
: केसांना स्प्लिट एंड म्हणजेच फाटे फुटले आहेत, कारण त्यांना नीट पोषण मिळत नाही. आहारात प्रोटीनचे प्रमाण कमी झाल्यास आणि वारंवार स्ट्राँग शाम्पूचा वापर केल्यास, अथवा ओले केस खूप वेळा टॉवेलने झटकून पुसल्यास असे होऊ शकते. ह्यावर उपाय म्हणजे, प्रोटीनयुक्त आहार घ्यावा.
त्याशिवाय दोन चमचे दह्यात एका अंड्याचे व्हाईट मिक्स करून हा पॅक केसांना लावावा. अर्ध्या तासाने केस धुऊन घ्यावेत. प्रोटीनयुक्त शाम्पू आणि कंडिशनर लावावे. ह्याशिवाय तीन महिन्यांच्या अंतराने केस ट्रिम करावेत. ब्यूटी थेरपिस्टचा सल्ला घेऊन हेअर स्पाच्या काही सेटिंग घ्याव्यात.
त्यामुळे केसांचा राठपणा कमी होऊन केस सॉफ्ट होतील. रेग्युलर ट्रीटमेंट घेतल्यास केसांच्या क्वालिटीमध्ये नक्की फरक जाणवेल. केस सॉफ्ट आणि हेल्दी दिसतील, शिवाय हेअर स्पामुळे केसांना हायड्रेशन मिळाले की स्प्लिट एंडही कमी होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.