Friendship with emotions and stress esakal
साप्ताहिक

Teenage EQ : किशोरवयात तणावाच्या आणि भावनांच्या या लाटेला कसं सामोरं जायचं?

कुणी म्हणेल स्वतःच्या भावना ओळखायच्या म्हणजे काय? कळतातच की त्या सगळ्यांना. पण ते इतकं सोपं नसतं, विशेषतः किशोरवयात!

साप्ताहिक टीम

डॉ. वैशाली देशमुख

‘आजकालचा काळ’ असं म्हटलं की काय आठवतं, काय डोळ्यांसमोर येतं? खूप धावपळ, घाई, सतत घडणाऱ्या घडामोडी, आवाज, वेग, स्पर्धा, अस्वस्थता, माहितीचा अतिरेक आणि चिंता.

प्रगती आणि सुधारणा यांची जी काही व्याख्या आपण केली आहे, त्याचंच हे प्रतिबिंब आहे. हे चांगलं की वाईट? यात आपण आत्ता जाणार नाहीयोत.

पण आपण प्रचंड ताणतणावाला सामोरे जात आहोत; अनेक प्रखर, न पेलवणाऱ्या भावनांच्या उद्वेगाला तोंड देत आहोत यावर आपल्या सर्वांचं एकमत असेल! टोकाच्या अनियंत्रित भावना तणावाला आमंत्रण देतात.

आणि तणावातून अशा भावनांचा उदयही होतो. त्याचबरोबर भावनांवर नियंत्रण असेल, तर तणाव यशस्वीपणे हाताळता येतात. आणि योग्य प्रकारे हाताळलेले तणाव माणसाला भावनांच्या भोवऱ्यात भंजाळून जाण्यापासून वाचवतात.

तणावाच्या आणि भावनांच्या या लाटेला कसं सामोरं जायचं, या जीवनकौशल्याविषयी बोलूया. हे कौशल्य टप्प्याटप्प्यानं आत्मसात करायला लागतं; त्यासाठी अवधी लागतो, अनुभवाची आवश्यकता असते.

किशोरवयात अशी परिस्थिती निर्माण का आणि केव्हा होते, हे सर्वात आधी हे जाणून घेऊया. आपण याआधी बोललो आहोत, त्याप्रमाणे किशोरांच्या मेंदूचा विकास एका अर्धवट टप्प्यावर असतो. त्यात भावना आवेगी आणि अनियंत्रित असतात.

त्यामानानं विचारांचं मडकं कच्चं असतं. शिवाय मुलं आयुष्याच्या एका महत्त्वाच्या वळणावर उभी असतात.

नाती, करिअर यांविषयी कळीचे निर्णय घेणं; स्वतःची ओळख शोधणं ही या वयातली आव्हानं निश्चितच अवघड, तणाव निर्माण करणारी आणि दूरगामी परिणाम करणारी असतात.

तणाव निर्माण केव्हा होतो? जेव्हा आत्यंतिक घाई असते, शेवटच्या क्षणापर्यंत टंगळमंगळ केली जाते, परिणामांविषयी मन चिंताग्रस्त असतं, वेळेचं नियोजन नसतं, आणि जिवाला स्वस्थता नसते तेव्हा.

शिवाय इतरांशी सतत तुलना, परिस्थितीचं नीट आकलन न होणं, स्वतःचे प्राधान्यक्रम काय याविषयी स्पष्टता नसणं, स्क्रीन आणि समाजमाध्यमांचा अतिवापर करणं या सगळ्यात मानसिक स्वास्थ्याचा बळी जातो आणि तणावांचं पेव फुटतं.

आपण सहज एखाद्या रहदारीच्या रस्त्यावर फेरफटका जरी मारला तरी लोकांच्या भावनिक उद्रेकांचं दर्शन होत राहतं.

जेव्हा तणावाची परिस्थिती निर्माण होते तेव्हा अनेक शारीरिक आणि मानसिक परिणाम दिसतात. छातीत धडधडतं, घाम फुटतो, हातापायाला कंप सुटतो, पोटात कसंतरी होतं, डोकं गोंधळून जातं...

हे पुन्हा पुन्हा होत राहिलं तर उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार असे जीवनशैलीशी संबंधित आजार होतात. अति खाणं होतं आणि स्थूलता येते. स्वभाव चिडचिडा होतो, नाती दुरावतात, निर्णयक्षमतेवर परिणाम होतो, सतत असमाधानी वाटतं.

मग मुलं व्यसनं, गुन्हेगारी, लैंगिक प्रयोग याकडे उपाय म्हणून वळू शकतात. कधी कधी कौटुंबिक वातावरण इतकं खालवतं, की मुलांना घरात राहणं नकोसं वाटायला लागतं.

आजचे किशोर या साऱ्या अंतर्गत आणि बाह्य तणावांच्या आणि भावनांच्या त्सुनामीला पावलोपावली सामोरे जातायत. आधुनिक जीवनशैलीचा तो अटळ बाय-प्रॉडक्ट आहे. त्याला हाताळायचं कसं, हा एक मोठा प्रश्न आज समाजस्वास्थ्याच्याही दृष्टीनं भेडसावणारा आहे.

भावनांच्या संदर्भात आता सजगता आली आहे. ‘आयक्यू’ (इमोशनल कोशंट) म्हणजे बुद्ध्यंक हा शब्द गेली कित्येक वर्षं आपण ऐकत आलो आहोत. एखादी व्यक्ती उच्च बुद्धिमत्तेची असेल तर तिचं खूप कौतुक होतं, तिला सगळीकडे मान मिळतो.

पण हळूहळू लोकांच्या लक्षात यायला लागलं, की नुसती बुद्धिमत्ता उच्च असणं म्हणजे ‘तिळा उघड’चा मंत्र सापडणं नव्हे. आनंदाच्या, सुखाच्या आणि यशस्वीतेच्या गुहेची किल्ली काहीतरी वेगळीच असते.

आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीही याला अपवाद नव्हते. संपूर्ण जगाला वेगळ्या प्रकारे विचार करायला लावणारा हा अवलिया स्वतःला अगदी सामान्य बुद्धिमत्तेचा समजत असे. पण जनतेच्या मनाची नाडी मात्र त्यांनी अचूकपणे ओळखली होती.

म्हणजे बुद्धिमत्तेच्या पलीकडे त्यांच्याकडे काहीतरी विशेष होतं. अनेक अभ्यासांमधून हे ‘विशेष काहीतरी’ म्हणजे ‘भावनांक’ (ईक्यू - इमोशनल कोशंट) असा निष्कर्ष निघाला आहे.

जी व्यक्ती स्वतःच्या आणि इतरांच्या भावना नीट ओळखू शकते, त्यांचं योग्य नियोजन करू शकते आणि त्यातून योग्य निर्णयापर्यंत आणि वर्तणुकीपर्यंत पोहोचू शकते, त्या व्यक्तीचा भावनांक उच्च आहे असं म्हणतात.

कुणी म्हणेल स्वतःच्या भावना ओळखायच्या म्हणजे काय? कळतातच की त्या सगळ्यांना. पण ते इतकं सोपं नसतं, विशेषतः किशोरवयात!

भावना अचूकपणे ओळखणारं मेंदूतलं केंद्र अर्धवट विकसित झालेलं असतं. भावना अत्यंत तीव्र असतात. भावना ओळखण्यासाठी लागणाऱ्या संयमाचा पत्ताच नसतो. त्यामुळे भावनांक विकसित करण्याला या वयात विशेष महत्त्व आहे.

मगाशी आपण प्राधान्यक्रमाविषयी बोललो. एखाद्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं हे लक्षात आलं नाही, तर उगीचच प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतली जाते.

उदाहरणार्थ, तुमच्या फोटोला किती लाइक मिळाले यावरून जिवाची घालमेल करून घेणं तणावाचंच ठरणार की.

पण त्याला किती महत्त्व द्यायचं हे एखाद्या मुलीला माहिती असेल, तर तिला लाइक कमी मिळाले म्हणून थोडंफार वाईट वाटेल पण तिचं मनःस्वास्थ्य त्यामुळे बिघडणार नाही.

भावनांचं दमन करणं हे एखाद्या घरात नित्य घडत असेल, तर त्या किशोरांना भावना ओळखायच्या कशा आणि दर्शवायच्या कशा हे कळणारच नाही.

उदाहरणार्थ, कित्येक घरांत स्त्रीत्वाच्या आणि पुरुषत्त्वाच्या पारंपरिक कल्पनांमुळे फक्त स्त्रियांचीच नव्हे तर पुरुषांचीही घुसमट होते. त्या दबलेल्या भावना मग तणावांच्या स्वरूपात प्रकट होतात.

घरातल्या ज्येष्ठ व्यक्ती आपापल्या भावनांविषयी बोलत असतील, त्या योग्य प्रकारे व्यक्त करत असतील, तर त्याचा वस्तुपाठ मुलांसामोर राहतो.

मग ते राग दर्शवणं असेल किंवा नैराश्याला तोंड देणं असेल, आनंद व्यक्त करणं असेल किंवा पराभवाला सामोरं जाणं असेल.

पण इथे काही अडचणी येतात. एकतर आपल्या भावना व्यक्त करणं हे खूप कृत्रिम वाटू शकतं. ‘मला आत्ता खूप दुःख होतंय’ असं रोजच्या बोलण्यात कुठे म्हणतो आपण?

दुसरं म्हणजे आईबाबांच्या पद्धती मुलांना जशाच्या तशा उचलायच्या नसतात. उलट खूपदा ही नवी पिढी मोठ्या लोकांचे डोळे उघडते, त्यांची पारंपरिक झापडं काढायला लावते. ‘चालायचंच’ म्हणून स्वीकारलेल्या कित्येक परंपरांचा मुखवटा टराटरा फाडून काढते.

आपण निदान ती मतं ऐकून घेतली आणि त्यावर चर्चा केली, तरी मुलं भावनांना आणि तणावांना हाताळायचे त्यांचे असे स्वतंत्र मार्ग शोधू शकतील. पालकांची भूमिका नेहमीप्रमाणे इथेही वाटाड्याची असणार.

आपण स्वतःच्या भावनांविषयी जागरूक राहून त्या नियंत्रितपणे व्यक्त करत असू तर मुलं ते निरखतात, आणि त्यावरून स्वतःची पद्धत शोधून काढतात. ही एक हळूहळू होणारी प्रक्रिया आहे. एक उदाहरण पाहू-

घरी खूप पाहुणे येणार असतील तर आईला टेन्शन येतं. घर स्वच्छ व्हायला हवं, सगळ्या वस्तू जागच्या जागी असायला हव्यात, भरपूर पदार्थ करायला हवेत, जे काही पदार्थ करायचे ते व्यवस्थित व्हायला पाहिजे असं तिला वाटतं. फक्त त्याची पूर्वतयारी आणि वेळेचं नियोजन नीट होत नाही.

त्यामुळे तणावाला आमंत्रण मिळतं आणि भावना तीव्र होतात; घरात चिडचिड, आरडाओरडा, वाद होतात. हे बघून सगळ्यांना वाटतं पाहुणे आले नाहीत तर बरं. त्याला तोंड द्यायची मुलीची पद्धत वेगळी आहे.

उत्साहाला मुरड घालायची तिची तयारी आहे. ‘थोडंफार इकडे-तिकडे झालं तरी चालेल’ असं तिला वाटतं. एखाद-दुसरा काहीतरी पदार्थ करायचा, जमेल तशी साफसफाई करायची आणि भरपूर गप्पा मारायच्या असा तिनं या तणावावर काढलेला मार्ग आहे.

इथे बरोबर-चूक असे वाद न घालता एकमेकांचे दृष्टिकोन समजून घेतले, तर प्रत्येकाला स्वतःला झेपणारे उपाय शोधणं सोपं जाईल. आईला जे आवश्यक वाटतं त्याची तिनं योग्य तयारी करायची, काय मदत हवी असेल तर सुचवायची, पण त्यावर अडून राहायचं नाही.

त्याचबरोबर मुलीच्या वेगळ्या हाताळणीचा आदर करायचा. आणि आईची गरज समजून मुलीनं जमेल तितका, पटत असो वा नसो, हातभार लावायचा.

आपल्याला जर तणावनियंत्रण करायचं असेल, तर ते दोन पातळ्यांवर करायला हवं. एक म्हणजे प्रतिबंधक, तणाव निर्माण होऊच नये यासाठी प्रयत्न करणं. आणि दुसरं म्हणजे उपायात्मक, तणाव उत्पन्न झाल्यावर तो नियंत्रणात आणणं.

या वयातल्या मुलांसाठी तणावनिवारणाचा सर्वात सहज जमणारा आणि परिणामकारक मंत्र म्हणजे खेळ!

भरपूर खेळातून मुलं एकमेकांशी जमवून घ्यायला, पराभवाचा खिलाडूपणे स्वीकार करायला, प्रसंगी कमीपणा घ्यायला शिकतात. वेळेचं, आहाराचं महत्त्व शिकतात.

स्क्रीनसमोर आपोआपच कमी वेळ घालवतात. योगासनं आणि श्वासाचे व्यायाम यातूनही शरीर आणि मन सैलावतं.

वरवर पाहता हा उपाय खूप सोपा वाटत असला, तरी किती मुलांना हल्ली मोकळ्या मैदानात मनसोक्तपणे खेळायला मिळतं?

भावना आणि तणाव या दोन्हींचं सुयोग्य नियमन करण्याची जीवनकौशल्यं एकमेकांचा हात हातात घेऊन चालतात, कारण त्यांचं एकमेकांशी अतूट नातं आहे. रोजच्या जीवनात मुलांना त्यांचा वापर कधी आणि कसा करता येईल? काही प्रातिनिधिक प्रसंग पाहू.

परीक्षा : मला वाटतं आपण चर्चा करत असलेल्या दोन्ही गोष्टी परीक्षेइतक्या कधीच तीव्रतेनं जाणवत नसतील.

प्रतिबंध : वेळेचं आधीपासून नियोजन, वेळापत्रक, नियमित अभ्यास या नेहमीच्या गोष्टी आहेतच. त्याव्यतिरिक्त परीक्षेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणं, त्याला अतिरेकी महत्त्व न देता हाताळणं, अमर्याद अपेक्षा न ठेवणं आणि परीक्षेच्या तयारीचा प्रवास आनंददायी असू शकतो हे मुलांपर्यंत पोहोचवणं हे करता येईल का?

उपाय : तणाव संसर्गजन्य असतो. त्यामुळे प्रत्यक्ष परीक्षेच्यावेळी आपण तणावात आहोत का, हे आई-बाबांनी आधी पडताळून पाहायला हवं.

तयारी करण्याची वेळ आता गेलेली आहे, हे लक्षात घेऊन जे काही झालं आहे ते तरी आपलं मूल आत्मविश्वासानं आणि पूर्ण क्षमतेनं परीक्षेत उतरवेल का, हे पाहणं इतकंच आता हातात असतं, याचं भान ठेवायला लागणार.

आई-बाबांच्या नजरेतला विश्वास मुलांना निश्चितच बळ देईल. सहजपणे हसत, हातात पुरेसा वेळ ठेवून, मुलांशी प्रेमानं संवाद साधत हा वेळ घालवता येईल का?

स्क्रीनचा वापर : आजच्या काळात ह्या प्रश्नाला तोंड द्यायला न लागणारे पालक सापडणार नाहीत. राग, वैताग, असहायता, काळजी, अस्वस्थता अशा स्वरूपाच्या मुलांच्या आणि पालकांच्या भावनांची इथे टक्कर होते, त्यावरून वाद होतात.

प्रतिबंध : स्क्रीन पहिल्यांदा हातात देण्याआधी एक बेसिक नियमावली तयार करणे आणि त्यात वयानुसार वेळोवेळी बदल करणे. काही नियम घरातल्या सर्वांनी पाळणे. स्क्रीनला पर्याय उपलब्ध करून देणे.

(नुसतं ‘ठेव तो मोबाईल’ म्हणून चालणार नाही; छंद, खेळ, घरात मदत, छोट्या छोट्या जबाबदाऱ्या असं दुसरं काहीतरी मुलांच्या हातात हवं.) यामुळे मुलांच्या भावनांचंही व्यवस्थित नियोजन होतं.

उपाय : मोबाईल हिसकावून घेणं, अचानक वापरावर पूर्णपणे बंदी घालणं अशा टोकाच्या कृती उलटू शकतात. मुलांच्या भावविश्वात शिरून याकडे पाहणं, त्यांच्याशी प्रेमानं संवाद साधणं, त्यावर टप्प्याटप्प्यानं उपाय करणं, आवश्यक तिथं तज्ज्ञ मदत घेणं हे करता येतं.

प्रसंगांची ही यादी न संपणारी आहे. दैनंदिन जगण्याच्या धबडग्यात याविषयी जागरूक झालं आणि सजगपणे हाताळणी केली, तर ते पालकांच्या आणि मुलांच्या फायद्याचंच आहे.

-------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT