goa esakal
साप्ताहिक

Goa's Haveli : २००-३०० वर्षांपूर्वीच्या काळात घेऊन जाणारे गोव्याच्या इंडो-पोर्तुगीज हवेल्यांचे विस्मयजनक जग

पर्यटकांना पाहण्यासाठी खुल्या असणाऱ्या अशा काही वारसावास्तूंचा हा परिचय.

सकाळ डिजिटल टीम

भूषण तळवलकर

गोव्यातील प्रशस्त आणि खास भारतीय व पोर्तुगीज स्थापत्यकलांचा संगम साधणाऱ्या वास्तूंचा वारसा जपण्याचा प्रयत्न बऱ्याच गोमंतकवासीयांनी केला आहे. या वास्तूंची सफर करताना आपण तेथील कलात्मक फर्निचर, झुंबरे, भोजनसाहित्य, काचसामान इतकेच काय पण लाकडी खिडक्यांच्या चौकटींमध्ये बसवलेली सपाट शिंपल्यांपासून तयार केलेली अर्धपारदर्शक तावदाने पाहतो आणि दोन-तीनशे वर्षांमागच्या एका वेगळ्याच विश्वात जातो...

गोमंतक राज्य १९६१ साली सुमारे साडेचारशे वर्षांच्या पारतंत्र्यातून मुक्त झाले. आपले वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थान आणि वैविध्यपूर्ण संस्कृती यांच्या बळावर तेथील स्वदेशी राज्यकर्त्यांनी त्यानंतर पर्यटन हा गोव्याचा प्रमुख व्यवसाय केंद्रस्थानी धरून त्याप्रमाणे सोयीसुविधांचा  विकास केला. अल्पावधीतच त्याला उत्तम प्रतिसाद मिळून सुट्टी घालवण्यासाठी देशी पर्यटकांपेक्षा विदेशी पर्यटकांचे हे जगातील एक आवडते स्थळ बनले. गेल्या सुमारे पंचवीस-तीस वर्षांत भारतीय नागरिकांचे जीवनमानही सुधारत गेल्यामुळे देशी पर्यटकांचाही ओघ इथे वाढत गेला. गोव्यातील बहुधर्मीय सणसमारंभ, त्यांमध्ये सादर होणारी नृत्ये, गायनप्रकार, नाट्य-तियात्र संस्कृती, उत्तमोत्तम स्थापत्य मिरवणारी अनेकविध मंदिरे, चर्च, त्यांमध्ये उत्साहाने साकारली जाणारी सजावट, साजरे होणारे उत्सव-फेस्त, मत्स्याहाराला प्राधान्य देणारी खाद्यसंस्कृती, समुद्रावर खेळले-शिकवले जाणारे साहसी क्रीडाप्रकार, कलासंस्कृती जपणारी अनेक संग्रहालये... अशी पर्यटनाची, मनोरंजनाची अनेक अंगे असतानादेखील गेल्या काही वर्षांत गोमंतक पर्यटन हे प्रामुख्याने समुद्रकिनारे आणि खाद्य-मद्य चैन साधण्यापुरतेच मर्यादित होत चालले आहे. असे असले तरी परंपरांचा सार्थ अभिमान असलेले अनेक मूळ गोवेकर आपापली संस्कृती जपण्याचा, देशी-विदेशी पर्यटकांसमोर ती सादर करण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतात. अशाच प्रयत्नांमधून गोव्यातील प्रशस्त आणि खास भारतीय व पोर्तुगीज स्थापत्यकलांचा संगम साधणाऱ्या वास्तूंचा वारसा जपण्याचा प्रयत्न बऱ्याच गोमंतकवासीयांनी केला आहे. यांपैकी काहींनी अडीचशे-तीनशे वर्षांपूर्वीच्या वास्तूंचा कष्टपूर्वक जीर्णोद्धार करून विशिष्ट शुल्क आकारून पर्यटकांना त्या पाहण्यासाठी खुल्या केल्या आहेत. यांपैकी काही वास्तू विवाह समारंभ, मेजवान्या अशा समारंभांसाठीही उपलब्ध असतात. काही वास्तूंमध्ये राहण्यासाठी खोल्याही आहेत. त्या-त्या वारसा वास्तूंचे मालक अथवा व्यवस्थापक पर्यटकांना वास्तूंमधून फिरवून तिच्या विविध अंगांची, दालनांची, तिथे आयुष्य व्यतीत केलेल्या कुटुंबांच्या जीवनशैलीची माहितीही देतात. या वास्तू पूर्वीच्या उच्चभ्रू आणि तेव्हाच्या समाजातील वरच्या स्तरातील व्यक्तींनी बांधलेल्या असल्यामुळे त्यांची सफर करताना आपण तेथील कलात्मक फर्निचर, झुंबरे, भोजनसाहित्य, काचसामान इतकेच काय पण लाकडी खिडक्यांच्या चौकटींमध्ये बसवलेली सपाट शिंपल्यांपासून तयर केलेली अर्धपारदर्शक तावदाने पाहतो आणि दोन-तीनशे वर्षांमागच्या एका वेगळ्याच विश्वात जातो. प्रशस्त अंगण हेही या सर्व वास्तूंचे अविभाज्य अंग असल्याने त्यातील घनदाट छाया प्रदान करणारे वृक्ष, सुंदर फुलांचे ताटवे, त्यामध्ये साकारलेले छोटे-मोठे पुतळे, बसायचे दगडी बाक, छोटे तळे, त्यातील कारंजे आदी शोभास्थानेही आपले लक्ष वेधून घेतात. पर्यटकांना पाहण्यासाठी खुल्या असणाऱ्या अशा काही वारसावास्तूंचा हा परिचय. 

Goa

 आपल्या देशावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश, फ्रेंच आदी परकीय सत्तांनी इथे उत्तर युरोपीय स्थापत्यशास्त्राचा  परिचय देणाऱ्या न्यायालये, ग्रंथालये, महाविद्यालये, पोस्ट ऑफिस, रेल्वे स्थानके, नगर परिषदा यांसारख्या अनेक सार्वजनिक वापराच्या वास्तू उभारल्या, तर पोर्तुगिजांनी गोव्यात दक्षिण युरोपीय स्थापत्य वैशिष्ट्ये असणाऱ्या कौटुंबिक वापराच्या अनेक खासगी हवेल्या बांधल्या. हवेलीच्या बांधकामासाठी स्थानिक जांभा दगड, लाकूड यांचा वापर होत असे. जोरदार पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी केलेल्या उतरत्या छपरांवर लाल मातीची भाजलेली मंगलोरी कौले वापरण्यात येत. हिरव्या, निळ्या, गुलाबी, पांढऱ्या, पिवळ्या रंगांच्या बाह्य भिंतींवर तपकिरी रंगाची कौले फारच शोभून दिसत. हवेलीचा  अंतर्भाग तर मालकाच्या  सुबत्तेचा आणि कलासक्ततेचा यथार्थ परिचय करून देणारा असे. गुंतागुंतीच्या कलाकुसरीने नटलेले  फर्निचर स्थानिक शिसम झाडाच्या  लाकडापासून केले जाई. भौमितिक नक्षी दाखवणाऱ्या फरशा पोर्तुगाल किंवा इटलीवरून येत. बेल्जियममध्ये तयार झालेली झुंबरे  हवेलीला आतून उजळून टाकत. व्हेनिसमध्ये  तयार झालेले आरसे, पैलू पाडलेल्या  काचा, काचेचे  प्याले, चषक इत्यादी हवेलीच्या अंतर्भागातील लखलखाटात भर टाकत. खिडक्या, दरवाजे यांच्यावरून  झुळझुळणारे अर्धपारदर्शक पडदे  आणि काही दालनांतील गुबगुबीत जाजमे पोर्तुगालहून  येत. भोजनकक्षातील पोर्सेलीन  आणि इतर मातीची भांडी चीन, मकाऊ, जपान या देशांतून मागवण्यात येत असत. इतर अनेक उपयोगाच्या दालनांबरोबरच  हवेलीत प्रशस्त  अभ्यासकक्ष, नृत्यकक्ष, प्रार्थनाकक्षही असत. सर्व दालनांमध्ये मांडून ठेवलेल्या अनेक कलाकुसरीच्या वस्तू जगाच्या विविध भागांमधून येत. या हवेल्या म्हणजे छोटेखानी राजवाडेच असत. जगाच्या अनेक भागांमध्ये पसरलेल्या आपल्या राजसत्तेचा उपयोग करून घेत या हवेल्यांमध्ये राहणारे उच्चपदस्थ आणि त्यांचे कुटुंबीय या सर्व भौतिक वैभवाचा उपभोग घेत.  

उत्तम पद्धतीने जपणूक करून पर्यटकांना जुन्या काळातील प्रतिष्ठित ख्रिश्चनांच्या जीवनशैलीची अनुभूती देणाऱ्या अशा वास्तू मुख्यतः दक्षिण गोव्यात आहेत. पणजीपासून सुमारे २५ किलोमीटर दूर आग्नेय दिशेस अंतर्भागात असलेले लोटली हे नितांत सुंदर गाव. झुआरी नदीच्या  जवळच  वसलेल्या या गावावर वृक्षांची घनदाट छाया असते. छोटे ओहोळ गावात वाहत असतात. टुमदार घरांमधून जाणारा वळणावळणांचा रस्ता गावाच्या मुख्य चौकात पोहोचण्याआधी उजव्या बाजूला सुमारे पावणेदोन एकरात उभी असलेली ‘फिग्युरेदो मॅन्शन’ ही भव्य वास्तू आपले लक्ष वेधून घेते. सोळाव्या शतकाच्या मध्यानंतर पोर्तुगीज सत्ता गोव्यात स्थिर झाल्यावर शंखवाळ गावचे मूळ रहिवासी असलेले फिग्युरेदो कुटुंब लोटलीला स्थलांतरित झाले आणि तिथे त्यांची भरभराट होत गेली. त्या कुटुंबातील अनेक व्यक्ती वकिली, राजकारण इत्यादी क्षेत्रांत नाव कमावू लागल्या. त्यांच्यापैकी काही संसदपटू झाले. त्यांच्या मानमरातबाला साजेशी अशी भव्य हवेली बांधण्यात त्या वेळचे कुटुंबप्रमुख मॅन्युअल व्हिन्सेंट दे फिग्युरेदो यांनी पुढाकार घेतला आणि १५९० साली त्या वेळच्या कुटुंबाला पुरेल एवढी वास्तू बांधून घेतली. पुढच्या दोन शतकांत फिग्युरेदो कुटुंब आणखी वाढत गेल्याने १७९०च्या सुमारास कायतानो दे फिग्युरेदो यांनी या वास्तूचा मोठा विस्तार केला. पुढे एकोणिसाव्या शतकात या कुटुंबाचा दबदबा आणखी वाढत गेल्यामुळे त्या वेळचा पोर्तुगालचा राजा पाचवा जॉन याने या कुटुंबाला खास राजचिन्ह बहाल केले. या हवेलीच्या सध्याच्या मालकीणबाई मारिया दे फातिमा फिग्युरेदो दे अल्बुकर्क यांचा जन्म गोव्यातला. नंतर पोर्तुगालला स्थलांतरित होऊन एस्ती लाउडर या सौंदर्यप्रसाधने बनवणाऱ्या प्रसिद्ध अमेरिकी कंपनीत त्यांनी काम केले. बरीच वर्षे पोर्तुगालला व्यतीत केल्यानंतर त्या आपल्या मातृभूमीत परतल्या आणि आपल्या आईला दिलेल्या वचनाला जागत काहीशा जीर्ण झालेल्या, आपल्या जन्मस्थळ असलेल्या या वास्तूचा जीर्णोद्धार त्यांनी हाती घेतला. तो पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ही हवेली लोकांना पाहण्यासाठी खुली केली.

goa

 हवेलीच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत जाताच दुतर्फा मध्यम उंचीचे वृक्ष आणि शोभिवंत फुलझाडांचे ताटवे आपले स्वागत करतात. त्याच्या पुढे चारचाकी, दुचाकी वाहनांसाठी प्रशस्त पार्किंग आहे. तिथून पुढे येताच दोन मोठी पोर्च (पोर्तुगीज भाषेत बालकाओ) आणि लांबचलांब आडव्या पसरलेल्या हवेलीच्या नऊ-दहा फूट उंचीच्या शोभिवंत खिडक्या आपले लक्ष वेधून घेतात. पोर्च आणि खिडक्या यांच्यावरील गोलाकार महिरप युरोपीय आणि भारतीय परंपरांचा संगम साधते. संपूर्ण हवेली सुमारे पाच फूट उंचीच्या जोत्यावर उभारलेली असल्याने चौदा पायऱ्या चढून हवेलीत प्रवेश करावा लागतो. उंच जोत्यावर हवेली बांधण्याची दोन-तीन कारणे म्हणजे, पावसाचे पाणी खालून झिरपून घरात येऊ नये, बागेतील किडे-साप घरात येऊ नयेत आणि इतर गावकऱ्यांच्या तुलनेत आपण उच्चस्थानी आहोत हे दर्शवता यावे.  व्हरांड्याच्या नंतर एक उंच दार पार केल्यानंतर आपण मुख्य बैठकीच्या दालनात (पोर्तुगीज भाषेत ‘सलाँ’त) येतो. रंगीत टाइलमध्ये साकारलेल्या फुलांच्या  नक्षीने सजवलेल्या या दालनात कलाकुसरीने नटलेल्या शिसम लाकडाच्या खुर्च्या, टेबले, टेबलांवरील चिनी मातीच्या, काचेच्या शोभिवंत वस्तू, भिंतींवर मोठाले आरसे, लॅम्पशेड इत्यादींचा एवढा खच आहे की त्यांवर नजर ठरत नाही. जमिनीवर ठेवलेल्या चिनी मातीच्या उंच फुलदाण्यादेखील दालनाची शोभा वाढवतात. उंच खिडक्यांवर लावलेल्या झुळझुळीत पडद्यांमधून झिरपणारा बाहेरचा नैसर्गिक प्रकाश आणि आतमध्ये लावलेल्या झुंबरांमधून पसरणारा विद्युतदिव्यांचा प्रकाश यांच्या मिश्रणातून हा सर्व नजारा फारच उठून दिसतो. या कक्षातील एक खासियत म्हणजे सोळा कप्पे असणारे सतराव्या शतकात गोव्यात बनवले गेलेले वैशिष्ट्यपूर्ण कपाट. जगात अशी केवळ तीनच कपाटे आहेत. लंडनच्या व्हिक्टोरिया ॲण्ड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेले असे कपाट फिग्युरेदो कुटुंबानेच भेट दिलेले आहे. इथून पुढे गेल्यावर अभ्यासकक्ष लागतो. दोन्ही बाजूला असलेल्या लाकडी कपाटांमध्ये अनेक विषयांवरची पुस्तके, ग्रंथ व्यवस्थित जतन केले आहेत. मध्यभागी एका गोलाकार टेबलावर जुना टाईपरायटर, त्याच्या बाजूने शाईची दौत, लेखण्या, शिक्के इत्यादी ठेवले आहेत. या दालनात येताच जमिनीच्या टाइलचे डिझाईन जरा गंभीर झाल्याचे  लक्षात येते. हेच डिझाईन त्याला लागून असलेल्या प्रार्थनाकक्षातही चालू राहते. प्रार्थनाकक्षाच्या भिंतींना लागून असलेल्या लाकडी कलाकुसरीने समृद्ध अशा देव्हाऱ्यांत जीझस, मदर मेरी, मदर मेरीचे माता-पिता सेंट ॲना आणि सेंट जोआकिम यांच्या प्रतिमा, तसेच बाजूच्या टेबलांवर काचेच्या  हंड्यांमध्ये साधुसंतांच्या प्रतिमा आहेत. हा कक्ष पाहून आपण लहान मुलांच्या शयनकक्षात येतो. टाइलचे आणि भितींवरील नक्षीकामाचे डिझाईन आता पुन्हा बदलून मनोहारी होते. इथे असलेल्या ३०० वर्षांपूर्वीच्या गुजराती शैलीच्या पाळण्यात मारिया दे फातिमा आणि त्यांच्या आधीच्या काही पिढ्या झोपलेल्या आहेत. बाजूला मशीला या नावाने ओळखली जाणारी चर्चला जाण्यासाठीची दोन माणसांची पालखी ठेवली आहे. यापुढचा कक्ष म्हणजे नृत्यकक्ष, अर्थात बॉलरूम. याचा तळ पूर्णपणे लाकडी आहे. बैठकीच्या खोलीतील फर्निचरपेक्षाही अधिक कलाकुसर असलेली टेबले, खुर्च्या, झुंबरे यांनी हा कक्ष सजला आहे. यजमानांनी किंवा नृत्यसमारंभाच्या मुख्य पाहुण्याने बसायची एक लाकडी खुर्ची तर इतक्या नाजूक आणि गुंतागुंतीच्या कलाकुसरीने नटलेली आहे, की त्याच्या चमकेतून खुर्चीवर मौल्यवान खडे बसवल्याचा भास होतो. वेताने  विणलेल्या या खुर्चीच्या वरच्या डोके टेकण्याच्या भागात कोरीवकाम करणाऱ्या कारागिराने  दत्तगुरूंची त्रिमूर्ती कोरली आहे! या कक्षाच्याच एका भागात अठराव्या शतकातील पियानोही आहे. 

यानंतर आपण मेजवानी कक्षात प्रवेश करतो. सुमारे पन्नास लोक बसू शकतील अशा या भोजनकक्षात गोलाकार टेबले, त्यांवर  अंथरलेली नक्षीदार कापडे, त्यांच्या भोवताली उत्कृष्ट कोरीवकाम केलेल्या खुर्च्या, छतावर टांगलेली झुंबरे, भिंतींवरच्या  हंडीदार लॅम्पशेड, बाजूच्या कपाटांमध्ये  रचून ठेवलेले अनेकविध क्रॉकरी सेट असा शाही थाट आहे. वाढायचे पदार्थ ठेवण्याच्या टेबलांभोवतीही छान सजावट आहे. इथेच सोन्याचा मुलामा असलेला, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून कुटुंबाच्या राजचिन्हासह खास बनवून घेतलेला साठ नगांचा टी सेट ठेवला आहे. या कक्षाच्या एका बाजूच्या खिडक्यांमधून हवेलीच्या मधोमध असलेल्या चौकातील बगीचाचे दर्शन होत असल्याने मेजवानीचे वातावरण आणखी आल्हाददायी होते. मी गेलो त्या दिवशी संध्याकाळीच तिथे एका मेजवानी समारंभाचे आरक्षण होते. त्यामुळे प्रत्यक्ष मेजवानीत सहभाग नसतानाही मला तो सर्व थाट अनुभवता आला. आणखी एक सांगण्याजोगी गोष्ट म्हणजे, प्रत्येक दालनात गेल्यावर मारिया दे फातिमा यांनी तिथले सर्व दिवे, झुंबरे लावून प्रकाशाच्या मनमोहक खेळाचा नमुनाही पेश केला!

आपले बालपण आणि पोर्तुगालमधील दीर्घ वास्तव्यातील आठवणी, तसेच पर्यटकसन्मुख दृष्टिकोन ठेवत मारिया दे फातिमा यांनी संपूर्ण वास्तूचा आणि तिच्या अंतर्भागाचा जीर्णोद्धार केला. राहायला येणाऱ्या पर्यटकांसाठी काही खोल्यांमध्ये आधुनिक सोयी-सुविधा तसेच मागच्या अंगणात पोहण्याचा तलावही तयार करून घेतला. पर्यटकांना राहण्यासाठी उपलब्ध असलेल्या खोल्यांना कुटुंबातील प्रसिद्ध स्त्रियांच्या स्मरणार्थ नावे दिलेली आहेत. ‘जॉर्जिना’ आणि ‘एल्सा’ या खोल्यांमध्ये दोन वेगवेगळे पलंग आहेत, तर ‘आमेलिया’ या खोलीत एकच मोठा डबलबेड आहे. मोठ्या कुटुंबाला राहण्यासाठी असलेल्या स्वीटरूममध्ये ‘एस्पेसिओसा’ आणि ‘ग्रासा’ अशा दोन खोल्या आहेत.  

आपला मुलगा पेद्रो फिग्युरेदो दे अल्बुकर्क याच्या मदतीने मारिया दे फातिमा या हवेलीची देखभाल करतात. या दोघांनी ही हवेली एवढी लखलखीत ठेवली आहे, की त्याची सैर करायला सुरुवात करताना तशी सूचना नसतानाही मला पायातले बूट-मोजे बाहेरच काढून ठेवावेसे वाटले. त्यामुळे पुरातन रंगीत टाइलवर उघड्या पावलांनी फिरताना आणखी मजा तर आलीच, पण त्या खराबही झाल्या नाहीत. पर्यटकांनी आपली पादत्राणे बाहेर काढून ठेवण्याची नम्र सूचना लिहिण्याचे मी मारिया दे फातिमा यांना  हवेली पाहून बाहेर पडताना  सुचवले!

goa

फिग्युरेदो मॅन्शनवरून रस्त्याच्या बाजूची हिरवीगार भातशेते  पाहत आणखी पुढे सुमारे एक किलोमीटरवर असलेले लोटलीचे सुंदर ‘सेव्हिअर ऑफ द वर्ल्ड’ चर्च ओलांडून गेल्यावर डावीकडे महेंद्र अल्वारेस यांनी साकारलेले ‘बिग फूट-ॲन्सेस्ट्रल गोवा’ हे गोव्याच्या परंपरागत जीवनाची अनेक अंगे दाखवणारे प्रशस्त प्रदर्शनस्थळ  आणि उजवीकडे ‘कॅसा अराउजो  अल्वारेस’ ही हवेली लागते. सुमारे २५० वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या, पेशाने वकील आणि न्यायाधीश असलेल्या साल्वादोर युफेमिआनो अराउजो अल्वारेस यांनी साकारलेली ही हवेली उत्तुंग वृक्षांच्या सान्निध्यात असल्याने निसर्गसंपन्न आणि प्रशांत वाटते. प्रवेशद्वाराआधी एका चौथऱ्यावरच्या दगडी फरशीवर या हवेलीचा फलक घेऊन बसलेल्या उग्र, परंतु देखण्या सिंहाचा पुतळा आपले स्वागत करतो. सुंदर अशी दगडी कुंपणभिंत निरखत मुख्य प्रवेशद्वारातून आत जाताना दुतर्फा छोटी फुलझाडे, हिरवळ आपल्याला प्रसन्न करतात. ही हवेलीदेखील सुमारे चार फूट उंचीच्या जोत्यावर बांधलेली असल्याने पोर्चच्या दहा-बारा दगडी पायऱ्या चढून जावे लागते. पोर्चच्या आत दोन्ही बाजूंना बांधून काढलेले गेरू रंग दिलेले दगडी बाक (सोपें) हे पोर्तुगीज स्थापत्यशैलीचे एक वैशिष्ट्य. भाजी-मासे-पाव आदींच्या फिरत्या विक्रेत्यांना तसेच  अपरिचितांना मुख्य घरात न घेता व्यवहार करणे, बाहेरून आल्यावर बसून पादत्राणे काढणे, संध्याकाळी किंवा रात्री कुटुंबीयांनी समोरासमोर बसून गप्पा मारणे असे याचे विविध उपयोग होते. पोर्चमधून हवेलीत शिरताना टोप्या, चालण्याच्या काठ्या इ. ठेवायचा लाकडी स्टँड आणि कपाट लागते. बाहेर पडताना आपली टोपी-काठी घेतल्यावर आपले रंगरूप न्याहाळण्यासाठी या स्टँडला एक आरसाही बसवलेला आहे. विविध किल्ल्या टांगण्यासाठी घोड्याच्या नालाच्या आकाराचा एक किल्ली स्टँड भिंतीवर लावला आहे. इथून पुढे डावीकडे बैठकीचा कक्ष आणि उजवीकडे कर्त्या पुरुषाचे कार्यालय आहे. मात्र एकदम समोर दोन भाग असलेले एक अर्धे दार दिसते. त्याला असलेल्या भोकांमधून आतल्या लोकांना पोर्चमधून कोण आत येत आहे हे समजत असे. हे दार ओलांडून आत गेल्यावर समोरच मदर मेरीची माता सेंट ॲना हिला समर्पित एक सुंदर देवालय आहे. याच्या  दाराशी वर टांगलेल्या झुंबरात  देवदूत ट्रम्पेट वाजवत असल्याचे छोटे शिल्प पाहून आश्चर्य वाटते. उजवीकडच्या कार्यालय कक्षात लाकडी मेज, खुर्ची, पिढीजात वापरले गेलेले लिखाण साहित्य, शिक्के यांचा संग्रह आहे. कुटुंबातील धूम्रपानाच्या शौकीन असलेल्या व्यक्तींनी  वापरलेल्या, कलाकुसर संपन्न अशा तीस-बत्तीस लाकडी पाइपचाही एक संग्रह या कार्यालयात आहे. यानंतर आपण मुख्य शयनकक्षात येतो. दरवाजाच्या वर चंद्र आणि तारा असे चिन्ह लावलेले आहे. फक्त रात्रीच्या वेळेसच  (दुपारी नव्हे!) निद्राधीन व्हावे असा संदेश ते देत असे. या दालनात भक्कम शिसवी लाकडापासून केलेला छपरी पलंग, हात-पाय ताणून पसरून बसण्याची डोलणारी आरामखुर्ची, टेबले, कपाट, लोखंडी ट्रंकांसाठी छोटा माळा हे तर आहेतच, पण आणखी काही विस्मयजनक वस्तू आहेत. जमिनीवर ठेवलेल्या दोन चौकोनी लाकडी पेट्यांची झाकणे उघडल्यावर त्या शौचपेट्या असल्याचे लक्षात येते! मुख्य शौचालये, स्नानगृहे  हवेलीच्या दुसऱ्या भागात दूर असल्याने नंतर बाहेर नेऊन साफ करण्याजोगे हे शौचकूप  रात्रीच्यावेळी शयनगृहात ठेवले जात. तसेच तिथे  हलवण्याजोगी बेसिनदेखील ठेवलेली दिसतात. याच्यानंतर आपण बालकांच्या शयनगृहात येतो. लहान मुलांचे बिछाने, पाळणे, खेळणी, पांगुळगाडा वगैरेंबरोबर जीझसच्या प्रतिमा असलेला एक देव्हाराही  भिंतीवर लावलेला  दिसतो. मुलांनी सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी देवाची प्रार्थना आठवणीने म्हणावी म्हणून या प्रतिमा आवर्जून लावल्या जात. 

यानंतर आपण एका पॅसेजमध्ये येतो. त्यात लाकडी कोरीवकामाने  सजलेल्या अनेक टेबल-खुर्च्या तसेच शोभेच्या वस्तूंबरोबरच  काही विस्मयचकित करणाऱ्या गोष्टी दिसतात. खिडकीच्या उघडणाऱ्या लाकडी झडपांमध्ये  उभ्या-आडव्या लाकडी पट्ट्या मारून त्यात बसवलेले अर्धपारदर्शक सपाट समुद्री शिंपले आपण इतरत्र फारसे कुठेही पाहिलेले नसतात! ऊन किंवा पावसाचे पाणी तसेच बाहेरची उष्णता आत येऊ नये, परंतु खिडकी बंद केल्यास प्रकाश मात्र आत यावा म्हणून केलेली ही जुन्या काळची अफलातून योजना. पॅसेजच्या वरच्या बाजूला एक पोटमाळा आहे. भिंतीला तिथे पाच-सहा भोके पाडलेली दिसतात. चोरांनी डाका घालायचा प्रयत्न केल्यास घरातील पुरुषमंडळी बंदुका सरसावून या भोकांमधून बाहेर असलेल्या चोरांवर गोळीबार करत. तिथेच बाजूला भिंतीत ‘कुरकुट’ या नावाने ओळखला जाणारा कोनाडा दिसतो. त्यात प्रकाशासाठी तेलाचा दिवा किंवा कंदील ठेवला जाई. यापुढे लागतो तो मद्यखाना! मद्याची लाकडी पिपे, सुरया यांच्याबरोबरच वेताच्या किंवा दोरीच्या जाळीने वेढलेल्या ‘गराफांओ’ नावाच्या विविध प्रकारच्या फेणी, उर्राक करण्याच्या, साठवण्याच्या काचेच्या बरण्या, वेगवेगळ्या मद्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे काचेचे ग्लास इत्यादी सामग्री आपल्याला भुरळ घालते! यानंतर लागते ते आयकॉन चॅपल. मदर मेरी आणि बालक जीझस यांच्याप्रमाणेच माता आणि बालक या संकल्पनेवर आधारित लाकडावर रेखाटलेली अनेक रंगीत चित्रे या दालनात लावून ठेवली आहेत. याच्यापुढचे छोटे दालन वादनखोली  आहे. कुटुंबातील मंडळी इथे असलेली विविध वाद्ये वाजवून संगीतानंद घेत असत. याच्यापुढे जात आपण मागच्या पडवीत येतो. तिथे गोड्या पाण्याची एक खोल विहीर आणि त्याच्यावर लावलेली कप्पी-दोरी-तांब्याची कळशी आदी वापरासाठी तयार अवस्थेत आहेत. पडवीत  कुदळ-फावडी-टिकाव-नांगर-खुरपी-टोपल्या अशा शेतीकामाच्या  विविध हत्यारांबरोबर  एक बैलगाडीही  आहे. याच अवजारांत एक वेगळेच विलक्षण अवजारही दिसते. ते म्हणजे विहिरीतून पाणी काढताना दोरीची गाठ निसटून कळशी विहिरीत पडली तर ती काढायचे उपकरण. धातूच्या एका कडीला चार-पाच  हुक लावलेले हे साधन दुसऱ्या दोरीला बांधून विहिरीत पडलेल्या कळशीजवळ सोडून हलवले जाई. मग त्यांतला एखादा हुक कळशीच्या तोंडातून आत घुसून तिच्या कडेला अडकून बसत असे. मग दोरी ओढून ती कळशी वर घ्यायची. प्रत्येक समस्येवर त्या त्या काळातील हुशार कारागीर योग्य ते जुगाड शोधून  काढायचेच!   

goa

पुढे लागतो तो मोठाला मुदपाकखाना. ‘बूयाँओ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या लोणची-तेले-साठवणुकीचे पदार्थ भरून ठेवायच्या चिनी मातीच्या अनेक बरण्या, ‘कॉन्फ्रो’ या नावाने ओळखली जाणारी भात शिजवायची तांब्याची-पितळेची भांडी, सुपल्या, स्वयंपाकाचे डाव, पळ्या, सोऱ्या, साचे, बंब, चुली या सर्व साधनांबरोबरच  इथे दोन-तीन अनोख्या वस्तूही दिसतात. चुलींच्या वर एक आडवा बांबू लावून त्याला कांदे, वांगी, मांस इत्यादी बांधून ठेवले जाई. चुलीतून निघणाऱ्या धुरात ते पदार्थ खरपूस भाजले जात. त्या काळी चीनमधून येणाऱ्या साखरेला मुंग्यांपासून जपावे लागे. मग साखर साठवायच्या मोठाल्या चिनी मातीच्या बरण्या दगडाच्या एका वर्तुळाकार रिंगवरती ठेवून त्या रिंगच्या बाहेरून एक आणखी मोठी दगडाची रिंग ठेवत. या दोन दगडी रिंगांच्या मधे पाणी सोडल्यावर मुंग्यांना, मुंगळ्यांना त्यात प्रवेशबंदी  होई! किती साध्या पण परिणामकारक रचना असायच्या तेव्हाही. या कक्षात सुमारे दीड शतकापूर्वीचा त्या काळी सुबत्तेचे प्रतीक असलेला केरोसीन जाळून व्हेपर ॲबसॉर्प्शन तत्त्वावर चालणारा स्वीडनच्या ‘इलेक्ट्रोलक्स’ कंपनीचा रेफ्रिजरेटरदेखील ठेवला आहे. 

मागच्या बाजूला जुन्या काळची डुक्करसफाई पद्धतीची शौचालये आणि बाहेरच्या बाजूला चुलाण पेटवल्यावर आतल्या बाजूला गरम पाणी मिळणारी न्हाणीघरे  आहेत. ती पाहतानादेखील बरीच नवीन माहिती मिळते आणि मनोरंजन होते. मग हवेलीच्या अंतर्भागात पुन्हा प्रवेश करत आपण मुदपाकखान्यातून भोजनकक्षात जाणाऱ्या पॅसेजमध्ये येतो. तिथे दोन-तीन कपाटांत ठेवलेल्या गणपतीच्या सुमारे चार-पाचशे रंगीत, विविध प्रकारांच्या मूर्ती पाहून हरखून जायला होते. हवेलीचे मालक महेंद्र अल्वारेस गणेशभक्तही आहेत. जुन्या काळातील मिळालेल्या पाषाणाच्या गणेशमूर्तीही त्यांनी या ठिकाणी बसवलेल्या आहेत. याचबरोबर एक दक्षिणावर्ती (उजव्या वळणाचा) शंखही ठेवला आहे. पुढे भव्य अशा भोजनकक्षात आल्यावर सभोवती बावीस खुर्च्या असलेले सलग डायनिंग टेबल आपल्याला स्तिमित करते. वर लाकडी छताला  टांगलेली  झुंबरे,  बाजूने लावलेल्या अनेक कपाटांमध्ये  नीटनेटक्या ठेवलेल्या जेवणाच्या थाळ्या, चमचे, वाढपाची  भांडी, चहाचे कप-बशा हवेलीच्या गतवैभवाची साक्ष देतात. मोठ्या उंच खिडक्यांमधून बाहेरच्या बगीचाचा विलोभनीय देखावाही दिसतो आणि शुद्ध हवाही येते. या कक्षातून पुन्हा बाहेरच्या बाजूला येताना बैठकीची खोली लागते. या खोलीतील खुर्च्या-टेबले  भिंतींच्या बाजूला लावून तिचे रूपांतर नृत्यकक्षातही होत असे. त्यामुळेच भोजनकक्ष आणि बैठक-नृत्य कक्ष यांच्यामधील दरवाजापाशी एक मोठा पियानो ठेवलेला आहे. यावर वाजवले जाणारे तीव्र संगीत नृत्य करताना पावले थिरकण्यास साहाय्यभूत होत असे आणि भोजनाच्या वेळी मंद लयीत वाजवले जाणारे संगीत विविध व्यंजनांची लज्जत वाढवत असे. अशा खऱ्या  अर्थाने ‘साग्रसंगीत’ भोजनाच्या कल्पनेने आपण काही क्षण हरवून जातो! पुढे असलेल्या बैठकीच्या दालनात प्रवेश करताच त्याच्या रुंद आणि उंच खिडक्या, त्यावर लावलेली रंगीबेरंगी काचांची तावदाने पाहून डोळे सुखावतात. या दिवाणखान्यात छताला टांगलेली झुंबरे, कलाकुसर केलेली लाकडी टेबले, रंगीबेरंगी गाद्या-तक्क्यांनी मढवलेले सोफे, खुर्च्या, फुलदाण्या, भिंतींवरचे आरसे तर आहेतच, पण त्याबरोबर आश्चर्यचकित करणारे एक लाकडी डेस्कही आहे. त्याचे झाकण बंद असताना ते कपाट वाटते. झाकण उघडल्यावर त्याचे डेस्क होते आणि आतल्या भागात असलेले विशिष्ट पद्धतीनेच उघडता येणारे सोळा रहस्यमय कप्पेही समोर येतात. 

एवढे सारे वैभव पाहून आपण पुन्हा पहिल्या काठी-टोपी ठेवण्याच्या स्टॅंडकडे येतो आणि या हवेलीची सफर पूर्ण करतो. तिथून निघताना हवेलीचे सध्याचे मालक महेंद्रबाब अल्वारेस आणि त्यांचा पुत्र ॲड्रीअल अल्वारेस या हवेलीच्या जतनासाठी किती काळजी घेत असतील या भावनेने आपण विचारमग्न होतो!  

लोटलीच्या आणखी दक्षिणेला अंतर्भागात सुमारे अठरा किलोमीटर अंतरावर वसलेले चांदर हे अत्यंत शांत आणि रम्य गाव. या गावाच्या मुख्य चौकात ‘नोस्सा सिन्होरा दे बेलेम’ हे चर्च आणि त्याच्यापासून काही अंतरावर एका बाजूला ‘ब्रॅगांझा मॅन्शन’ आणि दुसऱ्या बाजूला ‘फर्नांडिस मॅन्शन’ अशा दोन भव्य वारसा वास्तू आहेत. चांदरचे मूळ नाव चंद्रपूर. अकराव्या शतकात हे गाव कदंब राजसत्तेची राजधानी होते. परंतु आता याच्या मुख्य चौकात उभे राहिले की आपण पनामा, कोलंबिया वगैरेसारख्या एखाद्या लॅटिन अमेरिकी देशात तर नाही ना, असा भास होतो! पांढऱ्याशुभ्र रंगात रंगवलेले चर्च आणि आजूबाजूची चार-पाच  तशीच पांढरीशुभ्र  स्मारकस्थळे, मोकळी मैदाने, रेखीव रस्ते आपल्या मनात भ्रम निर्माण करतात. या गावात १८७८ साली जन्मलेल्या मेनेझीस ब्रॅगांझा यांना गोव्याचे लोकमान्य टिळक किंवा मोतीलाल नेहरू म्हटले जाते. गर्भश्रीमंत घराण्यात जन्म होऊनही पोर्तुगिजांच्या मदांध सत्तेविरुद्ध त्यांनी आयुष्यभर सनदशीर मार्गाने लढा दिला, सुधारणावादी वृत्तपत्र चालवले, धार्मिक जुलुमशाहीचा प्रखर विरोध केला. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर त्या चर्चने ते अतिशय प्रतिष्ठित नागरिक असूनही चर्चच्या आवारात त्यांचे दफन करण्याचे नाकारले. चर्चच्या बाहेर त्यांचा दफनविधी झालेली जागा आता स्मारकस्थळ म्हणून जतन केली आहे. या ब्रॅगांझांची प्रासादतुल्य हवेली म्हणजे ब्रॅगांझा मॅन्शन. ही वास्तू पूर्वीच दोन बहिणींमध्ये विभागली गेली. डावीकडचा भाग ब्रॅगांझा-परेरा कुटुंबाचा असून सध्याचे मालक ॲश्ले परेरा तो दाखवतात. उजवीकडच्या भागात  मेनेझीस ब्रॅगांझा यांचा हजारो पुस्तकांचा, वृत्तपत्रांचा खजिना आहे. पण तो भाग लोकांना पाहण्यासाठी खुला नाही.

goa

मुख्य प्रवेशद्वारातून आत येताच डावीकडे बगिच्यात कुटुंबीयांनी बसण्यासाठी केलेले, टाइलचे तुकडे मोझाइक पद्धतीने लावलेले सिमेंटचे बाक आणि मधोमध तसेच टेबल दिसते. हवेलीच्या डाव्या आणि उजव्या भागांमध्ये जाण्यासाठी असलेला सामाईक जिना चढून वर गेल्यावर  डाव्या बाजूच्या  भव्य अशा दिवाणखान्यात आपण प्रवेश करतो. तिथे सुरुवातीलाच असलेल्या  एकसंध  लाकडी स्टँडवर टोप्या, कोट आणि काठ्या ठेवण्याची सोय आहे. त्याच्या जवळच एक विचित्रसा विरुद्ध बाजूंच्या दोन कोपऱ्यांत पाठी असलेला कोरीवकामयुक्त बाक दिसतो. याला  ‘लव्ह चेअर’ म्हटले जाई  असे  ॲश्ले सांगतात!  पतिपत्नींना  किंवा कुटुंबातील कोणाही  दोन व्यक्तींना आरामात जवळजवळ बसून मान न वळवता एकमेकांशी हळुवार गप्पा मारता याव्यात यासाठी त्याची निर्मिती केली होती.  दिवाणखान्यात भूमितीय आकृत्या असलेल्या रंगीत इटालियन टाइल बसवलेल्या आहेत, तर छत सागवानी लाकडाचे आहे. इथे असलेली अनेक टेबले-खुर्च्या शिसम लाकडावर बारीक  कोरीवकाम करून बनवली गेली आहेत. काही खुर्च्यांच्या पाठींवर ए.एफ.एस.पी.  ही  आंतोनिओ फ्रान्सिस्को दे संताना परेरा या एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेल्या उमराव पुरुषाच्या नावाची आद्याक्षरेही कोरलेली आहेत. काही टेबलांचे पाय हत्तीचे डोके आणि सोंड या आकारांत कोरलेले आहेत. या कक्षात महाकाय कासवांच्या दोन पाठीही  ठेवलेल्या पाहायला मिळतात. यानंतर आपण बाजूच्या गॅलरीत प्रवेश करतो. बऱ्याच  अद्‍भुत  वस्तू ठेवलेले  हे छोटेखानी संग्रहालयच आहे. एका टेबलाच्या पायांवर माकडे  झाडावर चढून वरच्या बाजूची फळे तोंड वर करून खात आहेत असे कोरीवकाम आहे, तर एका टेबलावर अत्यंत दुर्मीळ असा  ‘कोको द मेर’ हा  सेशेल्स  देशातील झाडाचा द्विदल नारळ आहे. वेगळेच सर्पिल कोरीवकाम केलेली  मोठाली  लाकडी दारेही  लक्ष वेधून घेतात. काही टेबलांवर प्राण्यांच्या, जलचरांच्या काही अस्थी ठेवलेल्या दिसतात. भिंतीवरची काही चित्रे सोळाव्या शतकातील असून काचांवर उलट्या बाजूने ती काढली आहेत, असे  ॲश्ले  सांगतात. यानंतर आपण भोजनगृहात प्रवेश करतो. याचे लाकडी छत उलट्या बोटीच्या आकाराचे आहे. एका वेळी वीसजण बसू शकतील असे तीन भागातले डायनिंग  टेबल  इथे आहे. तीन भागांची रचना अशासाठी आहे, की कमी लोक असल्यास मधला भाग काढून ठेवून बाजूचे दोन भाग एकमेकांशी जोडून ते दहा लोकांसाठीही वापरले जाऊ शकते! बाहेरून  लाकूड आणि आतून तांब्याच्या असलेल्या बीअर मगचा सेटही इथे पाहायला मिळतो. चांदीची  ब्रिटिश  बनावटीची  भांडी,  जिन हे   मद्य  ठेवण्यासाठी  हॉलंडमध्ये तयार झालेल्या चिनी मातीच्या  उभ्या बरण्या, चीन-मकाऊ देशांमध्ये तयार केलेली भांडी, थाळ्या अशा बऱ्याच वस्तू इथे आहेत.  केरोसीनवर चालणारा एक फ्रिज इथेदेखील आहे. यानंतर आपण देवघरात प्रवेश करतो. ‘अवर लेडी ऑफ पीइटी’ला समर्पित असलेल्या या देवघरात सेंट फ्रान्सिस झेविअर यांचे एक नख एका लाकडी पेटीत सोन्याच्या चक्रात जतन केले आहे.

यानंतर आपण इटालियन संगमरवरी फरशी असलेल्या नृत्यगृहात प्रवेशतो. याचे छत निळा रंग दिलेल्या आणि त्यावर सोनेरी नक्षी कोरलेल्या जाळीदार जस्ताच्या पत्र्यापासून बनवलेले आहे. त्यामुळे नृत्य करत असताना होणाऱ्या आवाजाचे प्रतिध्वनी म्हणजेच गोंगाट कमी होऊन पदन्यासाचा आवाज जास्त स्पष्ट ऐकू येत असे. सभोवती निळ्या रंगाच्या पाठी आणि गाद्या बसवलेले सोफे  नृत्यकक्षाची शोभा वाढवतात. छताशी  टांगलेली तीन भलीमोठी झुंबरे आणि भिंतींवर लावलेले दिवे यांच्या प्रकाशात नृत्यकक्ष फारच रमणीय भासतो. नृत्याला साथ देण्यासाठी एका कोपऱ्यात ब्रिटिश बनावटीचा एक पियानोही आहे. हवेलीचे मूळ उमराव ए.एफ.एस. परेरा आणि त्यांच्या पत्नी मारिया रिटा दे कुन्हिया परेरा यांना  अठराव्या शतकात पोर्तुगालचा राजा लुई याने भेट दिलेल्या दोन शाही खुर्च्याही इथे दिसतात. पुढची खोली ही पाहुण्यांचा शयनकक्ष आहे. वेगळेच कोरीवकाम आणि वेताचे  विणकाम यांनी समृद्ध असा  सिंगल बेड इतरत्र पाहायला मिळेल असे वाटत नाही. बाजूलाच कोट, टोप्या, शर्ट, विजारी, बूट असे सारे काही व्यवस्थित ठेवण्यासाठीचा एक अद्वितीय असा उघडा लाकडी स्टँड ठेवलेला  आहे. एकाच माणसासाठी असलेली खुर्चीवजा पालखीही इथे दिसते. यानंतर  आपण बाहेरच्या दुसऱ्या लांबलचक गॅलरीत येतो. इथे जुन्या काळी जहाज प्रवासाला न्यायच्या अनेक लाकडी पेट्या, पालख्या यांच्याबरोबरच ए.एफ.एस. आणि मारिया रिटा द कुन्हिया परेरा यांच्या स्मारकशिलाही आहेत, ज्यांच्या सर्वात वरच्या भागात पोर्तुगालच्या राजाने या कुटुंबाला बहाल केलेले राजचिन्ह  कोरले आहे. सोळाव्या ते विसाव्या शतकातील वस्तूंनी, त्यामागच्या कहाण्यांनी भरलेली अशी ही ब्रॅगांझा हवेली पाहून आपण बाहेर पडतो, तेव्हा वर्तमानकाळात येण्यासाठी काही क्षण घालवावे लागतात!   

ब्रॅगांझा मॅन्शनपासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर एकेकाळच्या कदंब राजांच्या किल्ल्याच्या परिघात असलेली ‘फर्नांडिस मॅन्शन’ ही आणखी एक वारसा हवेली आहे. ही हवेली बहुधा गोव्यातील जतन केलेल्या हवेलींमधील सर्वात जुनी, किंबहुना पोर्तुगिजांचे  गोव्यात आगमन होण्याआधीची आहे. त्यामुळे याचे जुने नाव ‘होडले घोर’ (मोठे किंवा थोरले घर) असेही आहे. मूळ हवेलीचा आता आहे त्या रूपातील विस्तार मात्र एकोणिसाव्या शतकात झाला. सारा बार्बोझा फर्नांडिस आणि त्यांचे पुत्र रंजीव फर्नांडिस हे सध्याचे मालक हवेलीची काळजी घेतात. या हवेलीतील बऱ्याच गोष्टी इतर ठिकाणांप्रमाणे असल्या तरी इथे काही खास बाबी दिसतात. या हवेलीचे प्रवेशद्वार रस्त्यावरच आहे. समोरच्या बाजूला फारसा बगीचा नाही, पण अंतर्भागात मोठा चौक आहे. या मधल्या भागातील वायुवीजनाच्या चौकाला ‘राज अंगण’ किंवा ‘रॉझांगण’ म्हणत.  तसेच इतर हवेलींमध्ये  तळमजला किंवा वरचा मजलाच फिरता येतो, पण इथे मात्र दोन्ही मजल्यांवर असलेल्या प्रेक्षणीय बाबी दाखवल्या जातात. हवेलीसमोर  आले, की तिचा भव्य आडवा विस्तार, गुलाबी-तपकिरी रंगांच्या छटांत दिसणारे रमणीय रूप, दोन्ही मजल्यांवर वेगवेगळ्या डिझाइनच्या असणाऱ्या बावीस महिरपदार खिडक्या, वरच्या मजल्यावरची नाजूक गुंतागुंतीचे कोरीवकाम असलेला कठडा मिरवणारी लांबलचक बाल्कनी आदी नजारा नजरेत भरतो. वरच्या मजल्याच्या खिडक्या म्हणजे खरंतर उघडता येण्याजोगी दारे असून त्यांना काचेची तावदाने आहेत. तळमजल्यावरच्या खिडक्यांना सपाट समुद्री शिंपल्यांची तावदाने आहेत. 

जाडजूड दरवाजातून आत गेल्यागेल्या काही उघड्या, काही बंद पालख्या, मेणे, जुन्या पुस्तकांनी खच्चून भरलेले कपाट, स्वयंपाकघरातील अवजारे, लोणची साठवण्याच्या मातीच्या अगडबंब बरण्या, शेतीकामाची अवजारे इत्यादी पाहायला मिळतात. शेतात घुसलेल्या डुकराचे पाय पकडण्यासाठी लावायचा चापही यांत आहेत. फर्नांडिस कुटुंबीयांचे खूप जुने पूर्वज यादववंशीय योद्धे होते. ते करत असलेल्या मुसळनृत्यात वापरली जाणारी मुसळेही इथे आहेत. अजूनही या भागात मुसळनृत्ये रंगतात असे रंजीव सांगतात. 

वरच्या मजल्यावर आल्यावर प्रथम दिवाणखाना लागतो. आतील चौकाच्या बाजूने तो उघडा असल्याने नैसर्गिक प्रकाश आणि मोकळी हवाही भरपूर येते. यात कोरीवकाम केलेली लाकडी टेबले, खुर्च्या, कोट-टोपी-काठी-आरसा स्टँड, फुलदाण्या, लॅम्पशेड आहेतच, पण दोन माणसांनी बसायची एक लव्हचेअरही आहे. या खुर्चीवर बसायची संधी रंजीव आग्रह करून आपल्याला देतात! या दिवाणखान्याच्या एका भागात कुटुंबाचे प्रार्थनाघरही आहे. इथे ठेवलेल्या एका चहाच्या सेटमधील कप प्रकाशाच्या विरुद्ध धरल्यास त्याच्या तळात एका जपानी स्त्रीचा चेहरा दिसू लागतो!

हा भाग पाहून झाल्यावर आपण हवेलीचा अविभाज्य घटक असलेल्या प्रशस्त नृत्यगृहात येतो. सर्वप्रथम आपले लक्ष वेधून घेतात त्या बाहेरून दिसलेल्या उंच खिडक्या. आतून त्या आणखी मोहक दिसतात. त्यांमधून पाझरणाऱ्या बाहेरच्या प्रकाशामुळे या कक्षाचे त्रिमित रूप आणखीच खुलते. लाकडी तळ आणि छत, भलीमोठी झुंबरे, शिसवी लाकडावर कोरीवकाम केलेल्या खुर्च्या, टेबले यांच्याबरोबर एका टेबलावर नृत्याला साथ करणारी काही चर्मवाद्ये, व्हायोलिन इत्यादी ठेवली आहेत. या सर्व वाद्यांमध्ये सर्वात भारी आहे तो ‘कोलार्ड ॲण्ड कोलार्ड’ या लंडनस्थित जगप्रसिद्ध कंपनीने सुमारे दीडशे वर्षांपूर्वी बनवलेला पियानो. अजूनही तो उत्तम वाजतो. आता या पुरातन पियानोचे मूल्य पन्नास लाख रुपयांच्या घरात असेल! याच्यापुढे एक छोटा शयनकक्ष आहे. कलात्मक छपरी पलंग, आरशाचे कपाट यांच्याबरोबरच इथे एक छोटे अद्‍भुत कपाट आहे. एकात एक, एकात एक असे अनेक गुप्त कप्पे त्यात आहेत, जे उघडताना संपता संपत नाहीत! यानंतर दिवाणखान्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या एका खोलीत आपण येतो. तिथे इतर सामानाबरोबर महिलांचे कपडे बदलण्यासाठीचे एक मोठे पोकळ कपाट आहे. ते उघडून दाखवताना रंजीव अचानक खाली वाकून एक गुप्त कळ उचलतात आणि त्या कपाटाचा संपूर्ण तळ उचलला जाऊन खाली जाणारा एक जिना दिसू लागतो. पूर्वीच्या काळी घरावर दरोडा पडल्यास किंवा शत्रूचे आक्रमण झाल्यास हवेलीबाहेर निसटण्याचा हा गुप्त भुयारी मार्ग होता. तो हवेलीच्या मागच्या निर्जन भागात उघडतो. या गुप्त मार्गाच्या फूटभर जाडीच्या भिंतींना वेगवेगळ्या कोनात भोके पाडली आहेत. कुटुंबातील स्त्रिया दागदागिने-धन घेऊन निसटून जाताना पुरुषमंडळी घरातील बंदुका घेऊन त्या भोकांमधून बाहेर गोळीबार करू शकत. आता बंदुका नाहीत, पण रंजीव त्या काळच्या सरळ पात्याच्या काही तलवारी मात्र हाताळायला देतात. नदीकडे जाणारा तो गुप्त मार्ग, गोळीबाराची भोके, तलवारी हा या हवेलीतील शेवटचा थरार असतो!  

चांदरच्या  आणखी दक्षिणेला सुमारे दहा-अकरा किलोमीटर अंतरावर केपें हे कुशावती नदीच्या काठावरचे एक असेच सुंदर आणि शांत गाव. या गावात ‘पलासिओ दो दियाओ’ या नावाची इ. स. १७८७मध्ये बांधली गेलेली एक देखणी हवेली आहे. दियाओ या पोर्तुगीज शब्दाचा अर्थ डीन म्हणजेच चर्चचे मुख्य धर्मगुरू. जोस पाऊलो द कोस्ता परेरा अल्मेडा या नावाचे एक धर्मगुरू १७७९ साली गोव्यात आले आणि केपें या खेडेगावात होली क्रॉस या नावाचे चर्च स्थापित करून त्याच्या जवळच ही हवेली बांधून राहू लागले. १८३५मध्ये त्यांचा मृत्यू होण्याआधीच १८२९ साली त्यांनी ही हवेली गोव्याच्या पोर्तुगीज  व्हाइसरॉयला त्याच्या वैयक्तिक वापरासाठी भेट दिली. गोवामुक्तीनंतर चर्चकडे ताबा आलेल्या या हवेलीचे महत्त्व कमी होत गेल्यामुळे तिला अवकळा आली. गोव्यात जन्मलेले आणि पेशाने इंजिनिअर असलेले रूबेन वास्को  द गामा आणि त्यांच्या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ पत्नी सेलिया यांनी त्यांच्या ऐतिहासिक वास्तूंच्या प्रेमाखातर ही हवेली २००२मध्ये विकत घेतली आणि त्याचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवले. ही वास्तू दोनशे वर्षांपूर्वी जशी होती, त्या रूपात परत आणायची त्यांना इच्छा होती. गोव्यात यासंबंधीचे कोणतेही नकाशे, तपशील उपलब्ध नसल्याने त्यांनी पोर्तुगालचा दौरा करून अत्यंत चिकाटीने तिथून त्या हवेलीचे मूळ नकाशे, चित्रे तसेच जीर्णोद्धाराविषयीचे ज्ञान मिळवले आणि त्याबरहुकूम तीन वर्षे घालवून ही हवेली मूळ रूपात आणली. २०१३पासून त्यांनी ही हवेली लोकांना पाहण्यासाठी खुली केली. 

goa

हवेलीभोवती सुमारे दोन एकरात पसरलेला अत्यंत रमणीय बगीचा हे या हवेलीचे मुख्य बलस्थान. नदीजवळच्या थोड्याशा उंच टेकाडावर हवेली वसलेली असल्याने या बगिच्याला तीन टप्पे किंवा उतार आहेत. नारळ, सुपारीसारखी  मोठाली  झाडे, इतर वृक्ष, झुडुपे, हिरवळ यांनी समृद्ध अशा बागेत निवांत बसण्यासाठी दगडाच्या कायमस्वरूपी खुर्च्या, बाक, छोटे तळे वगैरे आहेतच, पण बागेला जिवंतपणा आणण्यासाठी त्यात विचार करत बसलेला मुलगा, पुस्तक उघडून वाचत बसलेली मुलगी, स्वप्नरंजन करणारे तरुण-तरुणी असे काही गमतीदार पुतळेही बसवले आहेत. छोट्या तळ्यात मत्स्यकन्या आणि मासा यांचेही पुतळे आहेत. हिरव्यागार बगीचाच्या पार्श्वभूमीवर  पिवळ्या आणि पांढऱ्या रंगांत रंगवलेली ही कौलारू हवेली फारच खुलून दिसते. सुमारे बावीस पायऱ्या चढून आपण हवेलीच्या मधोमध असलेल्या पोर्चमध्ये पोहोचतो. या पोर्चच्या वर कोरलेले, पोर्तुगालच्या राजसत्तेने या हवेलीला बहाल केलेले राजचिन्हही  खुलून दिसते.

 हवेलीत प्रवेश करतानाच लागणारे, १७८७ साली या हवेलीत पहिली प्रार्थना म्हटली गेली ते देवघर त्याच जागी पुनर्स्थापित केलेले आहे.  डावीकडून सुरुवात केल्यावर प्रथम बैठकीची खोली, मग नृत्यकक्ष आहेत. कोरीवकाम केलेल्या खुर्च्या, टेबले, सोफे, बैठका, पालख्या यांच्याबरोबरच तीन-चार  कपाटांत आणि टेबलावर अनेक जुने ग्रंथ जतन करून ठेवले आहेत. गोव्याचा इतिहास, कला या विषयांवरचे हे ग्रंथ चाळणे हाही एक उत्तम अनुभव असतो. अनेक खिडक्यांना लावलेली  सपाट शिंपल्यांपासून बनवलेली अर्धपारदर्शक तावदाने बाल्कनीच्या सुंदर रेलिंगना खूप शोभा आणतात. या हवेलीत एक स्मोकिंग रूमदेखील आहे,  त्या खोलीत जुने स्टॅम्प, नाणी यांचा संग्रह आणि जुन्या काळातले कॅरम, बुद्धिबळ असे खेळ आहेत. इथेच ‘मेसन ॲण्ड हॅम्लिन’ या अमेरिकी कंपनीने बनवलेला एकोणिसाव्या शतकातील एक  पियानोही आहे. एका खोलीत कपड्यांची कलाकुसरसंपन्न लाकडी बास्केट आणि टोप्या बनवण्याचा लाकडी साचाही पाहायला मिळतो.  मागच्या बाजूला असलेल्या भोजनगृहाच्या जवळ बगिच्याच्या सान्निध्यात असलेल्या ‘बेल्व्हेडीअर’ असे नाव दिलेल्या एका प्रशस्त व्हरांड्यात रूबेन पर्यटकांसाठी रेस्टॉरंटही चालवतात. आपली भेटीची वेळ आणि भोजनरुची आधी कळवल्यास ते स्वादिष्ट व्यंजने सादर करतात. त्यासाठी लागणारे बरेच पदार्थ त्यांच्या स्वतःच्या शेतामध्येच पिकतात. रूबेन हे जसे पर्यटकांच्या स्वागतासाठी नेहमी तत्पर असतात, तसेच या हवेलीच्या छोट्याछोट्या भागांचा जीर्णोद्धार अजूनही कसा करता येईल, यासाठी सतत प्रयत्नशीलही असतात. ही हवेली पाहून आपण बाहेर पडतो तेव्हा हवेलीभोवतीच्या बगिच्यात काही वेळ विसावताना आपण त्यांच्या प्रयत्नांना मनोमन दाद देतो!  

या हवेलीच्या मागे जाणारा रस्ता कुशावती नदीच्या छोट्या धरणावर जातो. नदीचा वळणदार प्रवाह, त्यावरचा जुना गोलसर बांध, काठावरची घनदाट झाडी आणि भरून राहिलेली शांतता मनाला सुखावतात. मी गेलो होतो तेव्हा बांधावरून वाहत असलेल्या पाण्यातून एक स्थानिक माणूस शांतपणे पलीकडच्या किनाऱ्यावर चालत जात असतानाचे विलक्षण दृश्य मला पाहायला मिळाले. (अर्थात पर्यटकांनी असले साहस अजिबात करू नये!)

जीर्णोद्धार केलेला असला तरी  मूळ रूप टिकवून ठेवल्यामुळे  आपल्याला २००-३०० वर्षांपूर्वीच्या काळात घेऊन जाणारे असे हे गोव्याच्या इंडो-पोर्तुगीज हवेल्यांचे विस्मयजनक जग आणि ते जपण्याचा जिवापाड प्रयत्न करणारे त्यांचे स्थानिक मालक. पर्यटकांकडून मिळणाऱ्या उत्पन्नातून या हवेल्यांचा देखभाल खर्चही धड निघत नाही याची खंत ते व्यक्त करतात. तरीही काही हवेल्यांमध्ये प्रवेशमूल्य ऐच्छिक आहे! आपल्या पूर्वजांनी, इतिहासप्रसिद्ध व्यक्तींनी उभारलेल्या या हवेल्या  पदरमोड करून  जतन  करण्याचा, पुढच्या पिढीला त्या हस्तांतरित करण्याचा ध्यास हवेली मालक बाळगतात. गोव्याला होणाऱ्या आपल्यासारख्या पर्यटकांच्या अनेक भेटींमध्ये इतर मौजमजेबरोबरच  हा ऐतिहासिक ठेवादेखील आवर्जून बघण्याचा ध्यास आपणही  बाळगायला हवा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT