halad esakal
साप्ताहिक

पिवळीधमक दिसे ही सगुणाबाई, तिच्याशिवाय स्वयंपाकाचं पान हलत नाही!

“तुला ठाऊक आहे मेधा? हळद फार गुणाची आहे बरं! या हळदीच्या गुणांचा अनेकदा माणसाला मागमूसही नसतो. पण ही हळद न कुरकुरता जिथं-तिथं माणसाच्या उपयोगासाठी धावते.

सकाळ डिजिटल टीम

“बाई म्हणाल्या, कोणत्याही औषधी वनस्पतीचं एक रोप लावा. त्याची निगा राखा, ते चांगलं वाढवा आणि सोबत त्या वनस्पतीच्या माहितीचा तक्ता तयार करा. त्या तक्त्यातली त्या वनस्पतीची माहिती परिपूर्ण असली पाहिजे.

उन्हाळ्याची सुट्टी संपल्यावर बाई सर्व मुलांनी लावलेलं रोपं आणि त्यांनी लिहिलेला तक्ता पाहणार आहे. ज्याचा तक्ता अद्ययावत आणि रोप चांगलं हिरवंगार, त्याला शाळेतर्फे बक्षीस दिलं जाणार आहे. आहे की नाही गंमत?”

एकनाथ आव्हाड

मेधा शाळेतून घरी आली ती मोठ्या उत्साहातच. घरात पाय टाकल्याबरोबर तिने आईला हाक मारली, “आई, अगं कुठे आहेस तू?” स्वयंपाक खोलीतूनच आईने तिच्या हाकेला उत्तर दिलं, “मेधा, अगं मी किचनमध्ये आहे बाळा.” मेधा स्वयंपाक खोलीजवळ येताच आई हसून म्हणाली, “सुटली का तुझी शाळा? ते पाठीवरचं दप्तर काढ आधी.

शाळेचे कपडे बदल; हात, पाय धू; मग किचनमध्ये ये. तुझी गाडी सुटली की सुसाट धावते. मधे थांबतच नाही.” मेधा फक्त हसली. तिने दप्तर नेहमीच्या ठिकाणी ठेवलं. कपडे बदलून हातपाय, तोंड स्वच्छ धुतलं.

टॉवेलनं तोंड पुसतच ती आता स्वयंपाक खोलीत शिरली. आईला शाळेत घडलेली गोष्ट आपण कधी सांगतोय असं तिला झालं होतं. आईला बिलगत ती म्हणाली, “आई, आज की नाही शाळेत काय झालं ठाऊक आहे?”

“अगं, मला कसं ठाऊक असेल तुझ्या शाळेत काय झालं ते?” आईने तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला.

“अगं आई, आमच्या विज्ञानाच्या कामत बाईंनी एक अनोखी स्पर्धा जाहीर केलीय.”

“स्पर्धा? कुठली स्पर्धा?”

“औषधी वनस्पतींची लागवड करायची स्पर्धा.”

“म्हणजे?” आईने प्रश्नार्थक चेहरा करून विचारलं.

“म्हणजे वाघाचे पंजे. काय गं आई, तुला औषधी वनस्पती माहीत नाहीत? अगं, तुळस, लसूण, हळद या सर्व औषधी वनस्पती आहेत, असं बाई म्हणाल्या.”

“हो का?”

“हो. बाई म्हणाल्या, कोणत्याही औषधी वनस्पतीचं एक रोप लावा. त्याची निगा राखा, ते चांगलं वाढवा आणि सोबत त्या वनस्पतीच्या माहितीचा तक्ता तयार करा. त्या तक्त्यातली त्या वनस्पतीची माहिती परिपूर्ण असली पाहिजे.

उन्हाळ्याची सुट्टी संपल्यावर बाई सर्व मुलांनी लावलेलं रोपं आणि त्यांनी लिहिलेला तक्ता पाहणार आहेत. ज्याचा तक्ता अद्ययावत आणि रोप चांगलं हिरवंगार , त्याला शाळेतर्फे मोठ्ठं बक्षीस दिलं जाणार आहे. आहे की नाही गंमत?”

मेधाचा उत्साह तिच्या बोलण्यातून ओसंडून वाहत होता. “आणि मग आई, सर्व मुलांनी लावलेली वेगवेगळी रोपं एकत्र करून आमच्या कामत बाई औषधी वनस्पतींची छोटीशी बागसुद्धा तयार करणार आहेत.”

“बरं मग तू कोणतं रोप लावणार आहेस?” आईने मेधाला प्रश्न केला.

“आई तूच सांग ना, मी कोणतं रोप लावू? मला त्या औषधी रोपाची माहिती कुठे मिळेल?”

मायलेकीचं बोलणं बाजूच्याच खोलीत कपड्यांच्या घड्या घालता घालता आजी ऐकत होती. तिनं हातातलं काम पूर्ण केलं आणि ती किचनमध्ये आली. मेधाला म्हणाली, “मेधा, तू ना हळदीचं रोप लाव.”

“हळदीचं रोप? पण आजी मला हळदीबद्दल जास्त माहिती कोण देईल?” मेधानं शंका उपस्थित केली.

“आपण मिळवू माहिती. पुस्तकातून, इंटरनेटवरून गोळा करू आणि थोडीफार माहिती आहे मलाही.” आईनं तिला समजावलं.

“तुला ठाऊक आहे मेधा? हळद फार गुणाची आहे बरं! या हळदीच्या गुणांचा अनेकदा माणसाला मागमूसही नसतो. पण ही हळद न कुरकुरता जिथं-तिथं माणसाच्या उपयोगासाठी धावते.

अगं देवापुढे कुंकवासोबत हळद असते, भाज्यांमध्ये हळद घालतात. एवढंच काहींना माहीत असतं.” आजीने हळदीबद्दल सांगायला सुरुवात केली.

“अगं आजी, मलाही हळदीबद्दल एवढंच माहिती आहे.”

“अगं मेधा, भाजीत, आमटीत हळद घालतात ती भाजी, आमटी केवळ पिवळीधम्मक दिसण्यासाठीच नव्हे. हळदीमुळे भाज्यांना पिवळा रंग येतोच पण त्यांचा स्वादही वाढतो बरं का.”

आई म्हणाली, “आणि मेधा, तुला ठाऊक आहे, तुला खोकला झाला की मी दुधात हळद, गूळ अन् किंचित मीठ घालून ते दूध उकळून तुला प्यायला देते ते! दुसऱ्या दिवशी तुझा खोकला एकदम गायब होऊन जातो की नाही?”

“हो गं आई, अगदी खरं.”

“ए आजी, मी वही नि पेन आणू का? तू हळदीची माहिती सांग पटपट, मी आपली वहीत लिहून घेईन झटझट,” मेधाची गडबड सुरू झाली.

“तू थांब बरं इथेच. आधी नीट ऐक. घाई करू नकोस. तुझं आपलं नेहमीच ‘पी हळद अन् हो गोरी’ असंच काहीसं असतं.”

“आजी, हळद पाण्यातून प्यायल्यानं माणूस गोरं होतं?” मेधाचा प्रश्न तयार.

“अगं, हळदीमध्ये रक्त शुद्ध करायचा गुण असतो. हळदीमुळे शरीरातलं रक्त शुद्ध होऊन शरीराचा रंगही उजळतो. लग्नाच्यावेळी हळद अंगाला लावण्यामागे हाही एक उद्देश असतोच. पण हळद पाण्यातून प्यायल्याबरोबर लगेच रंग गोरा होत नाही बरं का. प्रत्येक गोष्टीला काही वेळ जावाच लागतो. घायकुतीला येऊन कसं चालेल?”

“आजी हळदीचं फळ झाडाला येतं का गं?”

“अगं वेडाबाई, हळदीचं फळ झाडाला लटकत नाही काही. ते जमिनीच्या खाली असतं. हळदीचं रोप साधारण कमरेपर्यंत उंच वाढतं. त्याची पानं केळीच्या पानासारखी असतात. ती सुगंधी असतात बरं. त्याच्या कंदाला जमिनीत गाठी फुटतात.

या गाठी पिवळ्या रंगाच्या असतात. या गाठींनाच हळद म्हणतात. या हळदीच्या गाठी जमिनीतून खणून काढून स्वच्छ करतात. नंतर एका डेऱ्यात ठेवतात. त्या डेऱ्याचं तोंड बंद करून मंद आचेवर गाठी शिजवून त्यांचा कच्चा वास काढून टाकतात. त्यानंतर ह्या गाठींची पावडर करतात. कळलं का आता?”

“हो, छान कळलं! पण आजी, या हळदीचेसुद्धा काही प्रकार असतील ना गं ?”

“हो, आहेत की. एक असते लोखंडी हळद, ही फक्त रंग बनवायला वापरली जाते. दुसरी असते सुगंधी हळद, जी आपल्या जेवणात, मसाल्यात वापरली जाते आणि तिसरी असते जंगलात आढळणारी आंबेहळद. ही आपण जेवणात वापरत नाही.

परंतु रक्तदोष आणि कंड सुटणं या रोगांत ती गुणकारी समजली जाते. कापड छापण्याच्या कामीही हळदीचा उपयोग करतात. आणि हो, मेधा तुला माहीत आहे का, हळद आणि चुन्याच्या मिश्रणातून कुंकू तयार केलं जातं ते!”

“अय्या, हो? हळद पिवळी, कुंकू लाल; कसा चमत्कार आहे ना हा!” मेधा पटकन बोलली.

“अगं मेधा, या हळदीचे खूप उपयोग आहेत. गरम दुधात हळद आणि मिरे घालून प्यायल्याने थंडी वाजून येणारा ताप नाहीसा होतो. हळद आणि चुन्याचा लेप लावल्यावर मुका मार लागल्याने आलेली सूज उतरते.

जर एखादी जखम लवकर भरून येत नसेल किंवा सुकत नसेल, तर अशा जखमेवर हळद घालून गरम केलेलं तेल लावलं तर जखम लवकर भरून यायला मदत होते. हळद आणि तुरटीच्या लाहीचं चूर्ण प्रमाणात एकत्र करून कानात घातल्यावर कानातनं पू येणं बंद होतं.

मेधा, ही हळद माणसाला ठायी ठायी उपयोगी पडते. हळद उत्तम जंतुनाशक आणि दुर्गंधहारकही आहे बरं का बाळा .”

“आजी, खूपच छान सांगितलेस गं हळदीचे उपयोग. आता संध्याकाळी दादा आला, की हळदीची आणखी माहिती आपण इंटरनेटवर शोधू. आणि बाबांनाही औषधी वनस्पतींचं एखादं पुस्तक लायब्ररीतून आणायला सांगू.

म्हणजे आपली हळदीची जंत्री पूर्ण होईल. पक्कं ठरलं माझं. मी आता हळदीचंच रोप लावणार. हे सगळं ऐकून मला एक गोष्ट आठवली. सांगू तुम्हाला? त्यापेक्षा मी असं करते, तुम्हाला एक कोडंच घालते.”

“आता मधेच कसलं कोडं?” आई मेधाला म्हणाली.

“ऐका तर खरं. आणि लवकर उत्तर द्या बरं.

पिवळीधमक दिसे ही सगुणाबाई

तिच्याशिवाय स्वयंपाकाचं पान हलत नाही

जंतुनाशक गुण तिचा उपयोगी भारी

खरचटल्यावर लावल्यास जखम करी बरी

चुन्यासोबत आल्यावर कुंकू तयार होते

अंगाला चोळल्यास उजळपणा देते

रोजच्या जेवणात घरगुती उपचारात

कोणती बरं वनस्पती हमखास वापरतात?”

“हळद!” आई आणि आजी दोघीही एकसुरात म्हणाल्या.

मेधा म्हणाली, “अगदी बरोबर, दोघींनाही दहापैकी दहा गुण. आता हळदीचं रोप कुंडीत लावायला आणि हळदीची माहिती जमवायला मला तुम्ही मदत करायची बरं .

म्हणजे मलासुद्धा शाळेत कामत बाईंकडून बक्षीस मिळेल. चला, आपल्या कामाला आजपासून, नाही नाही, आत्तापासूनच सुरुवात करूया. म्हणतात ना, शुभस्य शीघ्रम्...!”

------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT