pearl jewellery sakal
साप्ताहिक

Marathi actress jewellery : थाट मोत्यांचा!

pearl jewellery lovers: आजच्या आघाडीच्या अभिनेत्रींनाही मोत्यांच्या दागिन्यांविषयी विशेष प्रेम

साप्ताहिक टीम

वेगवेगळ्या धातूंचे दागिने बाजारात मिळत असले तरी मोत्यांच्या दागिन्यांना एक वेगळंच महत्त्व असतं. कोणत्याही समारंभात, कोणत्याही प्रकारच्या पेहरावावर घालता येणारे आणि साधा तरीही राजेशाही लूक देणारे मोत्याचे दागिने अक्षरशः भुरळ घालतात. आजच्या आघाडीच्या अभिनेत्रींनाही मोत्यांच्या दागिन्यांविषयी विशेष प्रेम आहे. मोत्यांच्या दागिन्यांबद्दल त्यांच्या भावना त्यांच्याच शब्दांत…

लहानपणापासूनच मोत्यांची आवड

आजकाल बहुतेक मुलींना डायमंड्स आवडतात, पण मला मोती मनापासून आवडतात. आपल्या पारंपरिक मराठमोळ्या ज्वेलरीमध्ये मोत्याचे दागिन्यांना महत्त्वाचं स्थान आहे. मला मोत्याचे छोटे डूल किंवा झुमके खूप आवडतात. माझ्या लग्नातही मोत्यांचीच ज्वेलरी होती.

लहानपणापासूनच मला मोत्यांचे दागिने घालायला आवडत असे. कोणत्याही ड्रेसवर वा साडीवर ते छान दिसायचे. एकदा आईने माझ्यासाठी मोत्यांची माळ आणली होती. ती माझी पहिली मोत्याची माळ. मला ती खास कार्यक्रमांमध्ये, कुठल्याही पेहरावावर घालायला आवडायची.

माझा तो पेहराव पाहून बाबा कौतुकानं म्हणायचे की, “तू खूप सुंदर दिसतेस मोत्यांमध्ये. अगदी जयपूरच्या महाराणी गायत्री देवींसारखी.” अशा कौतुकाच्या शब्दांमुळे तर मला मोत्यांचे दागिने आणखी आवडू लागले.

माझ्या व्यक्तिमत्वाला मोत्यांचे दागिने खूप जास्त खुलून दिसतात, असं मला वाटतं. त्यामुळे, मोत्यांच्या दागिन्यांशी माझं एक खास नातं आहे आणि ते मला खूप प्रिय आहेत.

- प्रार्थना बेहेरे

---------------------------

सौंदर्य खुलवणारे शिंपल्यातले मोती

मोती शिंपल्यांतून तयार होतात, त्यामुळे ते नैसर्गिक असतात. लहानपणी मला शिंपल्यांतल्या मोत्यांविषयी खूप आकर्षण आणि कुतूहल वाटायचे. थोडी मोठी झाल्यावर जिवंत शिंपल्यात मोती कसे तयार होतात, त्याची गुणवत्ता कशी ठरते अशा सर्व गोष्टी उलगडत गेल्या.

मोत्यांचे दागिने हा असा एक पर्याय आपल्याकडे असतो, की आपण ते कुठल्याही पोशाखावर घालू शकतो. उदाहरणार्थ, तन्मण्याबद्दल बोलायचं झालं तर वेस्टर्न, ऑफ-शोल्डर पोशाखावर चोकरसारखा नेकलेस जरी घातला तरी तो चांगला दिसतो.

माझ्या नवऱ्याला मला गिफ्ट्स द्यायला आवडतात. हल्लीच त्याने मला ‘पर्ल ऑफ लव्ह’ नावाचा नेकलेस गिफ्ट केला. त्यामध्ये एक नैसर्गिक मोती होता. आणि त्यात एक पिंजऱ्यासारखं लॉकेट होतं. त्या पिंजऱ्यात मोती घालून ते लॉकेट तयार केलं जातं.

मोत्यांच्या दागिन्यांची गुणवत्ता आणि त्यांचं नैसर्गिक सौंदर्य मला नेहमीच आकर्षित करतं. ते दागिने कुठल्याही पोशाखावर सुंदर दिसतात आणि व्यक्तिमत्त्व खुलून येतं. मोत्यांचे दागिने मला नेहमीच प्रिय आहेत.

- अमृता देशमुख

-------------------------

राजेशाही थाट देणारे मोती

मोत्यांविषयी माझ्या मनात अत्यंत प्रेम आहे. तुम्हाला रॉयल दिसायचं असतं, तेव्हा तुम्हाला मोतीच परिधान करावे लागतात. कुठल्याही राजघराण्यातील व्यक्तींचे फोटो पाहिले तर तुम्हाला जाणवेल, की ते मोत्यांचे अलंकार जास्त परिधान करतात.

श्रीमंती सोन्याने झळकते, पण रॉयलनेस मोत्यांमुळे येतो. त्यामुळे मला मोत्यांचे दागिने आवडतात. मोती खरंतर आपण तयार करू शकत नाही, ते आपल्याला नैसर्गिकरित्याच मिळतात. मोती तयार होण्याची प्रक्रियाच अफलातून आहे. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण सौंदर्याला आणि घडणीला तोडच नाही.

मोती आपल्या शरीरावर चांगले परिणाम करतात. एखादी व्यक्ती तापट असेल किंवा सतत चिडचिड होत असेल तर तिला मोती घालण्याचा सल्ला दिला जातो. माझ्या ज्वेलरी ब्रॅण्डच्या निमित्ताने आम्ही मोत्यांच्या दागिन्यांत खूप प्रयोग केले आहेत.

त्यामुळे तो सगळा काळ माझ्या आठवणीत राहील. माझ्या खास आठवणींपैकी एक म्हणजे आईने मला दिवाळीत गिफ्ट केलेली मोत्याची नथ. त्यानंतर, एका ज्वेलरने मला शंभर वर्षे जुनी मोत्यांची पारंपरिक नथ गिफ्ट केली होती. ती आजही माझ्या संग्रही आहे.

- प्राजक्ता माळी

---------------------------------

फ्रेश, यंग आणि रिच लूक देणारे मोती

मोत्यांचे दागिने मला सोन्याच्या दागिन्यांपेक्षा जास्त प्रिय आहेत, कारण ते वेस्टर्न आणि एथनिक दोन्ही प्रकारच्या पोशाखांवर सुंदर दिसतात. मोत्यांमुळे आपल्याला एक फ्रेश आणि यंग लुक मिळतो, तसेच रिच लुकदेखील येतो.

जेव्हा तुम्ही एखाद्या खोलीत प्रवेश करता, तेव्हा लोकांना बऱ्याचदा तुम्ही कोणते मोती परिधान केले आहेत, हे पाहण्याची उत्सुकता असते. मोत्यांचे दागिने परिधान केल्याने व्यक्तिमत्त्व अधिक खुलून दिसतं. मोत्यांचे विविध आकार असतात. छोटे मोती नाजूकपणा दर्शवितात तर मोठे मोती, जे सध्या फॅशन इंडस्ट्रीत लोकप्रिय आहेत, बोल्ड स्टेटमेंट करतात.

त्यामुळे मोती तुमच्या व्यक्तिमत्त्वाला आणि लुकला एका वेगळ्या उंचीवर नेतात. मोत्यांबद्दल बोलायचं झालं तर, मोत्यांची नथ तुमचे सौंदर्य दहापट वाढवते. मोती नथीमध्ये सर्वाधिक शोभून दिसतात आणि मोत्यांची नथ घातल्यानंतर कोणतीही स्त्री अतिशय सुंदर दिसते.

मोत्यांशी जोडलेली माझी एक खास आठवण म्हणजे लहानपणी आई-बाबांसोबत केलेल्या प्रवासाची आहे. विमानप्रवासात आम्ही एक स्क्रॅच कार्ड जिंकले होते, आणि आम्हाला मोत्यांचा एक सुंदर हार भेट म्हणून मिळाला होता. तो कुठल्याही पोशाखावर सुंदर दिसायचा.

- प्रियदर्शनी इंदलकर

--------------------

आठवणींच्या गाठोड्यातले मोती

मोत्यांच्या दागिन्यांशी माझं खूप घट्ट नातं आहे. माझ्या लहानपणाच्या अनेक आठवणी मोत्यांच्या दागिन्यांशी जोडल्या गेलेल्या आहेत. लहानपणी आमच्या गावात यात्रा भरायच्या, आणि जालन्याची दुर्गा मातेची यात्रा विशेष होती.

आम्हा चार-पाच बहिणींना आईला नटवायला खूप आवडायचं. दरवर्षी नवरात्रात ती यात्रा भरायची आणि त्यात मोत्यांच्या माळांची माळ असायची. त्या माळेत लाल मणी असायचा, ज्यामुळे ती अतिशय आकर्षक दिसायची.

पांढरे मोती आणि ते लाल खडे एकत्रितपणे फार सुंदर दिसायचे. जत्रेत मिळणाऱ्या माळा कृत्रिम मोत्यांच्या असल्या तरी लहानपणी त्यांनी आम्हाला खऱ्या मोत्यांइतकाच आनंद दिला.

मोती मुळातच इतके सुंदर असतात, की पाहताक्षणी आपण मोत्यांच्या प्रेमात पडतो. त्यातही तो नैसर्गिकरित्या तयार झालेला असेल तर त्याचा छानसा गुळगुळीत गोलाकार आणि त्यावरची ती चमक पाहूनच आपण हरवून जातो.

समुद्राच्या तळाशी, शिंपल्यात सापडलेले हे मोती तयार कसे झाले, याचा विचार केला तर आपण आश्चर्यचकित होतो. मोत्यांचे दागिने मुळातच सुंदर असतात आणि ते परिधान केल्यानंतर आपल्या सौंदर्यातही भर पडते. मला मोत्यांचे दागिने प्रचंड आवडतात आणि माझ्या आयुष्यात त्यांना एक वेगळं स्थान आहे. आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीतही मोत्यांच्या दागिन्यांना विशेष महत्त्व आहे.

- मीनाक्षी राठोड

--------------------------

साधेपणातला गोडवा देणारे मोती

मोत्यांचे दागिने मला प्रचंड आवडतात, त्यातही कानातले आणि गळ्यातले दागिने अधिकच. मोत्यांमध्ये एक साधेपणा, गोडवा आणि ग्रेस आहे, असं मला वाटतं. कोणत्याही ड्रेसवर, म्हणजे वेस्टर्न असो की इंडियन, मोत्यांचा एक सर घातला की तो खूपच खुलून दिसतो. मोत्यांच्या दागिन्यांत मला पारंपरिक कोल्हापुरी साज, ठुशी आणि तन्मणी खूप आवडतात.

त्यातही सर्वांत जास्त आवडतो तो तन्मणी. तन्मण्यामध्ये मोत्यांचे पाच ते सहा सर असतात आणि त्याचे पदकसुद्धा मोत्यांचे असते. हल्ली तर तन्मण्यांत अनेक वेगवेगळे प्रकार आणि डिझाईन बघायला मिळतात. त्यात कुंदनसारखे पांढरे, लाल आणि हिरवे खडेही असतात आणि कोणत्याही रंगांच्या पारंपरिक साडी किंवा ड्रेससोबत ते उठून दिसतात.

मोत्यांची नथही मला फार आवडते. नथीमध्ये मोती असायलाच हवा. इतर नथी मला तितक्याशा आवडत नाहीत. मोत्यांच्या दागिन्यांची एक खास आठवण म्हणजे माझ्या आईने मला दिलेल्या रिंगा. माझ्या आजीने त्या आईला दिलेल्या होत्या. त्या रिंगांमध्ये एक कडी आणि त्यात तीन छोटे मोती आहेत. कानात घातल्यावर ते जणू लुकलुकत असतात. साध्या रिंगांपेक्षा मोत्यांच्या रिंगांचा गोडवा फारच सुंदर आहे.

- सोनाली कुलकर्णी

शब्दांकन: आकांक्षा पाटील

------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT