Waheeda Rahman  Esakal
साप्ताहिक

कोई ना रोको दिल की उड़ान को.. (वहिदा रेहमान मुलाखत)

यंदाचा दादासाहेब फाळके हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार स्वीकारताना कोई ना रोको दिल की उड़ान को ही गीतओळ मनात जागी करणाऱ्या वहिदा रेहमान यांच्याबरोबर झालेल्या गप्पा....

सकाळ डिजिटल टीम

पूजा सामंत

खलनायिकेपासून नायिकेपर्यंतच्या प्रवासात साठ ते ऐंशीच्या दशकांमध्ये रुपेरी पडद्यावर विविधांगी भूमिका साकारताना कलाकार म्हणून आपल्या तत्त्वांशी तडजोड न करणारी अभिनेत्री म्हणजे वहिदा रेहमान. चित्रपटसृष्टीला पडलेले चैतन्यमय स्वप्न. वहिदा नावाच्या या स्वप्नाचा चाहता नसेल असा चित्ररसिक मिळणे मुश्कीलच!

यंदाचा दादासाहेब फाळके हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार स्वीकारताना कोई ना रोको दिल की उड़ान को ही गीतओळ मनात जागी करणाऱ्या वहिदा रेहमान यांच्याबरोबर झालेल्या गप्पा....

वहिदा रेहमान यांची एक निस्सीम चाहती आणि सिनेपत्रकार म्हणून वहिदा रेहमान यांना भेटावे अशी तीव्र इच्छा गेली अनेक वर्षे मनात होतीच. पण वहिदाजी बऱ्याचदा त्यांच्या बंगळूरच्या फार्महाऊसवर असतात, मुंबईत असल्या तरी परिचित पत्रकारांनाही त्या फार मुश्किलीने भेटतात, असे अनेक मोठ्या कलाकारांकडून आणि त्यांना ओळखणाऱ्या इंडस्ट्री जाणकारांकडून समजले होते.

अनेक वर्षांपूर्वी एका टीव्ही प्रेस कॉन्फरन्सच्यावेळी वहिदा रेहमान यांची भेट झाली होती, पण तेव्हा त्यांच्यांशी मनसोक्त बोलण्याचा आनंद लाभला नव्हता... म्हणूनच त्यांना भेटावं आणि त्यांच्या ब्लॅक अॅण्ड व्हाइट चित्रपटांच्या युगात त्यांचंच बोट धरून फिरून यावं, असं वाटत राहिलं होतं...

दरम्यान प्रख्यात अभिनेत्री आशा पारेख यांच्या मुलाखतींचे योग अधूनमधून येत होते. आशाजींना २०२२मध्ये फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यानिमित्ताने त्यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली तेव्हाही पुन्हा एकदा त्यांना वहिदाजींच्या मुलाखतीची आठवण केली.

पण काहीनाकाही कारणांनी ती हवीहवीशी वाटणारी भेट लांबत होती. एकदा आशा-वहिदा-हेलन या तिघी मैत्रिणी पर्यटनाला गेल्या (वर्षातून किमान दोनदा तरी त्यांचे असे फिरणे होतेच होते) म्हणून भेट राहून गेली.

गेल्या महिन्यात वहिदाजींना फाळके पुरस्कार मिळाल्याची घोषणा झाली त्यादरम्यान एका रात्री नऊच्या सुमारास आशाजींचा फोन आला, आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी वहिदाजींच्या घरी जाऊन त्यांची भेट घ्यावी, असं त्यांनी (अर्थातच वहिदाजींच्या संमतीनेच) सुचवलं. वहिदा रेहमान यांच्याबरोबरची ती मनसोक्त भेट-मुलाखत....

गप्पा सुरू होतात... वहिदाजींना त्यांचं मन भूतकाळात घेऊन जातं...

“माझं फार पूर्वीपासूनच स्वप्न होतं; माझं घर समुद्रासमोर असावं... समुद्राची गाज ऐकत, लाटांच्या खळखळाटात माझा दिवस सुरू व्हावा... सूरज की चमचमाती किरने मेरा दिन बनाऐं... मुंबईत येऊन आता मला साठ वर्षे होऊन गेली आहेत... मुंबईची विविध रूपं मी वेळोवेळी पाहत आलेय... पण मला भुरळ पडली ती इथल्या समुद्राची.

म्हणूनच मुंबईत समुद्रासमोर घर असावं असं नेहमी वाटत राहिलं... सुदैवाने बांद्र्याला थेट समुद्रासमोर हा बंगला मिळाला आणि तो घेतलाही...

माझ्या बंगल्यासमोर असलेल्या या लॉनमध्ये फिरताना माझा दिवस सुरू होतो, समोर सागराचं संगीत साथीला असतं. योगा, प्राणायाम, गार्डनिंग अशी माझ्या दिवसाची सुरुवात असते. इथे मी आउटडोअर प्लान्ट्स आणि बंगल्याच्या आतल्या बाजूला अनेक इनडोअर प्लान्ट्स लावली आहेत. फुलझाडं आहेत. फळझाडं आहेत.

त्यांना खतं, पाणी घालणं, कलमं करणं हा माझा छंद आहे. त्यात माझा वेळ खूप छान जातो. संपूर्ण कोरोना काळात मी माझ्याच घरात होते, कुठे घराबाहेर जाण्याची ती वेळही नव्हती. पण मी घरात अडकून पडले आहे, असं चुकूनही मला माझ्या या घरानं भासू दिलं नाही! गार्डन आणि समुद्र माझ्यासाठी ऑक्सिजन आहेत.”

वहिदाजी बोलत असताना अभिजात आवडीनिवडी जपलेल्या वहिदाजींच्या या बंगल्यालाही एखादा पुरस्कार मिळायला हवा असाही एक विचार मनात येऊन गेला. या बंगल्यात असलेली वहिदा यांची भावनिक गुंतवणूक त्यांच्या बोलण्यातून जाणवत राहते.

१९७०च्या सुमारास विकत घेतलेला हा बंगला वहिदाजींच्या उच्च अभिरुचीची जाणीव क्षणोक्षणी करून देतो. काहीसं मोगलाई थाटाचं पेस्टल शेड्समधील फर्निचर, अतिशय सुंदर; निगुतीने राखलेली इनडोअर प्लान्ट्स, उत्तम कलाकृती, दिवाणखान्यातले त्यांचे ऑइल पेंटमधील सुरेख पेंटिंग.

आवाजातल्या गोडव्यासह आपुलकीने बोलणाऱ्या वहिदाजी जेव्हा स्वतः केलेल्या कॉफीचा मग तुमच्या हातात देतात आणि सोबत असलेली पेस्ट्री खाण्याचा आग्रह करतात, तेव्हा तो क्षण संपूच नये असं वाटत राहतं!

तुम्हाला दादासाहेब फाळके पुरस्कार थोडा उशिराच मिळाला, असं वाटतं का?

नहीं तो! मैं अभी अॅक्टिव्ह हूं । मेरे सामने यह पुरस्कार मुझे मिल रहा हैं यह बड़े सुकून की बात हैं । मला फक्त आनंद वाटतो.

माझे चाहते, माझे माता-पिता, माझ्या तीन बहिणी, माझे निर्माते; दिग्दर्शक, सहकलाकार, सेटवरचे मदतनीस, माझ्या मैत्रिणी, सारे सिनेमॅटोग्राफर अशा अनेकांनी मला वेळोवेळी सहयोग दिला. त्यांच्या शुभेच्छा माझ्यासोबत असल्याचाच हा परिपाक आहे. फाळके पुरस्कारासाठी मी या समस्त जनांची ऋणी आहे.

सध्याचे तुमचे रुटीन कसे आहे? माध्यमांनाही तुम्ही फारसं भेटत नाही?

मी जेव्हा १९६०च्या दशकांत चित्रपटांच्या विश्वात व्यग्र होते तेव्हाही मी फार चित्रपट केले नाहीत. मर्यादित चित्रपट केलेत, लेकिन जो फिल्मे की उनमें जी जान लगा दी । भूमिकांची तयारी करणे, नृत्यांच्या रिहर्सल करणे, कुटुंबाला वेळ देणे...

एक ना दोन अनेक व्यवधानं असायची. माझ्या काळात मीडियाही फार विस्तारलेला नव्हता. जे काही पत्रकार असत त्यांना मी व्यक्तिशः ओळखत असे. पुढे मी लग्न, संसार यात गुरफटले. आणि मधल्या काळात असं काही विशेष घडलं नव्हतं, की मी मुलाखती द्याव्यात. बाकी काही कारण नाही.

अलीकडच्याकाळाबद्दल सांगायचं तर, मधली २०२०-२१ ही दोन्ही वर्षं कोरोना लॉकडाउनमध्ये गेली. त्या काळात मी पूर्णतः घरीच होते. आशा (पारेख) आणि हेलनशी एखाद्या वेळेस भेट व्हायची. माझी मुलगी काशवी अविवाहित आहे.

ती स्क्रिप्ट रायटर आहे, युनिट सुपरव्हायझर आहे. तिचं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे ती माझ्यासोबत असते. माझा मुलगा सोहेल भूतानमध्ये असतो. त्याने तिथल्याच मुलीशी लग्न केले आहे. तो आणि सूनबाई वरचेवर मला भेटण्यास इथे मुंबईत येतात.

अधूनमधून आम्ही सगळे बंगळूरच्या फार्महाऊसवर राहण्यास जातो, गार्डनिंग, पेंटिंग, योगा, प्राणायाम... मी यूट्यूबवर बघून नव्या रेसिपी करते. खूप फिरते, पर्यटनाला जाते तेव्हा फोटोग्राफीबरोबर स्नॉर्केलिंग, पॅरासेलिंग असे सगळे थ्रिलिंग अनुभव घेते. आशा पारेख, हेलन आणि मी आम्ही तिघींनी खूप धमाल केलीय.

मी आणि आशा अलास्काला जाऊन आलोय, जगातील अनेक दुर्मीळ स्थळं पाहिली आहेत. शिवाय वाचन करते. उत्तम आत्मचरित्रं वाचते. नवीन रिलीज झालेले चित्रपट पाहते. आयुष्याचा मनमुराद आनंद घेतेय मी.

वहिदा रेहमान यांच्यावर चित्रित झालेली काही अविस्मरणीय नृत्यं आणि गाणी

Waheeda Rahman song

चित्रपटक्षेत्रात कशा आलात?

माझा जन्म तमिळनाडूमधल्या चिंगूलपेटचा. ३ फेब्रुवारी १९३८. आम्ही एकूण चार बहिणी. जाहिदा, सईदा, शाहिदा आणि मी वहिदा. आमचे वडील मोहम्मद अब्दुर रेहमान प्रशासकीय सेवेतले अधिकारी होते आणि आई मुमताज बेगम गृहिणी होती.

आम्ही सगळ्या मुली अभ्यासात चांगल्या बुद्धिमान होतो. मला तर डॉक्टर व्हायचं होतं. दाक्षिणात्य संस्कृतीनुसार आम्ही सगळ्या बहिणी भरतनाट्यम शिकलो. पुढे अब्बांची बदली विशाखापट्टणमला झाली. आम्ही सगळे त्यांच्यासोबत विशाखापट्टणमला स्थायिक झालो. तिथल्या इथल्या सेंट जोसेफ कॉन्व्हेंटमध्ये आम्हाला त्यांनी प्रवेश घेतला.

मी आठवीत असताना आमचं सगळ्यांचं आयुष्य जणू तिनशेसाठ अंशात फिरलं! अब्बांचं हृदयविकाराने निधन झालं. त्यांच्या अचानक जाण्याने अम्मीनं अंथरूण धरलं! चौघी बहिणी, अम्मी, तिची आजारपणं यात जवळची पुंजी संपली. आता पुढे काय, असा प्रश्न मला, अम्मीला, बहिणींना पडला.

एका सांस्कृतिक कार्यक्रमात मला शास्त्रीय नृत्य करताना पाहून रोजुलु मरायी या चित्रपटाची ऑफर आली. यात माझा एकच डान्स होता, पण तो विशेष गाजला आणि एका तमीळ सिनेमाची ऑफर आली. या दोन्ही सिनेमांना यश लाभलं, आणि मला मेडिकलला जाण्याचा विचार सोडला पाहिजे हे लक्षात यायला वेळ लागला नाही. घर चालवायचं आहे तर अभिनय हाच पर्याय होता.

तुमच्या अनेक व्यक्तिरेखा अविस्मरणीय ठरल्या आहेत. पण तुम्ही स्वतः कुशल नृत्यांगना असूनही तुमच्या नृत्याला प्रोत्साहन मिळेल अशा फार कमी भूमिका तुमच्या वाट्याला आल्या, नाही का?

सही फरमा रही हैं आप । मेरे हिस्से ऐसी फिल्में, ऐसे किरदार नहीं आए जहां मैं कुछ क्लासिकल परफॉर्मन्स दे सकू । गाइड चित्रपटात मोसे छल, पिया तोसे नैना लागे रे किंवा प्रेमपुजारीमधील रंगीला रे. १९७३मध्ये रिलीज झालेल्या फागुन चित्रपटात माझा एक डान्स होता- पिया संग खेलो होली, फागुन आयो रे... नृत्याच्या अशा मोजक्याच संधी मला मिळाल्या.

पण त्याला कलाकारांचा नाइलाज असतो. कथा जशी असते त्याला तशी ट्रीटमेंट दिग्दर्शकाकडून मिळते. पण पडद्यावर मला जी नृत्य करायला मिळाली त्यात मी माझं सर्वस्व ओतलं आहे. माझ्या तुलनेत वैजयंती (माला ) भाग्यवान, तिचे डान्स स्किल्स दाखवणाऱ्या काही चांगल्या भूमिका तिला वेळोवेळी मिळाल्यात. याबाबत मला तिचा हेवा वाटतो.

गुरुदत्त यांच्या सीआयडी फिल्मची ऑफर तुम्हाला कशी आली?

साऊथमध्ये तेलुगू भाषेतील रोजुलु मरायी , जयसिम्हा या चित्रपटांमधील माझ्या अभिनयाचा -डान्सचा बोलबाला झाला. या चित्रपटांच्या सक्सेस पार्टीत गुरुदत्त आले होते. त्यांच्याशी माझा परिचय करून दिला गेला, त्यांनी मला मुंबईत यायचे आमंत्रण दिले.

त्यावेळी आमच्यासाठी मुंबई म्हणजे फॉरेनला जाण्यासारखेच होते! मी माझ्या आईशिवाय एक पाऊलही कुठे टाकत नाही, असं मी गुरुदत्त यांना ठामपणे सांगितलं. त्यावर ते म्हणाले, तुझ्यासोबत आम्ही तुझ्या आईचेही ट्रेनचे तिकीट देतो आहोत. गुरुदत्त यांनी मला आणि अम्मीला मद्रास (आता चेन्नई) ते मुंबई असं ट्रेनचं तिकीट दिले.

ही गोष्ट साधारण १९५५मधली. मुंबईपर्यंतच्या प्रवासात माझ्या जिवाची अतिशय घालमेल चालू होती. मनात भाव-भावनांची तीव्र आंदोलनं चालू होती. पुढे काय होईल? मला हिंदी भाषा नीटशी अवगत नव्हती. गुरुदत्त यांनी स्टेशनवर प्रॉडक्शनच्या एका व्यक्तीला पाठवलं होतं. त्याने एका हमालाकडून आमचं सामान एका टॅक्सीत ठेवून घेतलं आणि टॅक्सी रिट्झ हॉटेलच्या दिशेने निघाली. माझ्या आणि अम्मीच्या राहण्याची व्यवस्था तिथे करण्यात आली होती.

मुंबईत सतत धावपळीत असणारे माणसांचे लोंढे, अनेक गाड्या, ट्राम यांचे कर्कश्श आवाज ऐकून-बघून माझी छाती दडपली. यापूर्वी इतकी गर्दी, कोलाहल मी कधीच ऐकला-पाहिला नव्हता.

तुमच्या पहिल्यावहिल्या (डेब्यू) चित्रपटात खलनायिकेची व्यक्तिरेखा करण्यास तुम्ही होकार कसा दिलात?

माझा पहिला हिंदी सिनेमा सीआयडी १९५६मध्ये रिलीज झाला. निर्माते गुरुदत्त तर दिग्दर्शक राज खोसला होते. त्यांनी देव आनंदच्या नायिकेच्या भूमिकेसाठी शकिला या अभिनेत्रीची निवड आधीच केली होती.

राज खोसला यांनी सीआयडीमधील खलनायिका कामिनी हिच्या भूमिकेविषयी मला समजावून सांगितले. मी एकूणच चित्रपटसृष्टीत नवखी होते. इथली भाषा, फिल्मी माणसं, स्क्रिप्ट, भूमिका, संवादफेक, कॅमेरा अँगल कशाचेच मला ज्ञान नव्हते. माझ्या खलनायिकेच्या भूमिकेचा माझ्या कारकिर्दीवर कुप्रभाव पडेल याचा विचारही त्यावेळी मी केला नाही.

मला तसं सांगणारंही कोणी नव्हतं. तो काळ तसा होता. एकदा खलनायक, हास्यनायक, नर्तक अशा भूमिका केल्या की पुन्हा पुन्हा त्याच भूमिकांच्या ऑफर येत. बहुतेक कलाकार विविध भूमिका करू शकतात याची जाण असलेल्या दिग्दर्शकाला याची कल्पना असे, पण अनेकदा कलावंतही स्टिरिओटाईप भूमिकांच्या साच्यात अडकत. मग तोच शिक्का त्यांच्यावर बसे. पण असा विचार मी केला नाही...

कहीं पे निगाहें... हे माझे या फिल्ममधील गाणे ,माझा परफॉर्मन्स खास ठरले. सीआयडी हीट झाला, आणि त्यानंतर अनेकांनी मला म्हटलं, तुम्हे अपनी पहली ही फिल्म में निगेटिव्ह रोल करना नहीं चाहिये था । संभावना थी, की आगे चलकर वैसेही रोल मिलते । असो. पण माझी पहिलीच व्यक्तिरेखा खलनायिकेची होती, याची मला आजही खंत वाटत नाही.

निर्माता-दिग्दर्शक गुरुदत्त यांच्याशी तुमची वर्किंग केमिस्ट्री उत्तम होती. त्यांनी तुमच्या प्रतिभेचा सुयोग्य उपयोग केला. त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल तुमचे मत काय? दिग्दर्शक म्हणून ते कसे होते? एक व्यक्ती म्हणून कसे होते?

गुरुदत्त यांना मी माझे मेंटॉर मानते, कायम मानेन. त्यांनी बोलावल्यामुळेच मी या मायानगरीत आले. त्यांनी मला ब्रेक दिला आणि माझी कारकीर्द सुरू झाली, मी इथवर आले. त्यांच्याबद्दल माझ्या मनात असलेली कृतज्ञता कायम आहे, नेहमीच असेल.

काळाच्या पुढे विचार करणारा असा सर्जनशील, बुद्धिमान दिग्दर्शक म्हणजे गुरुदत्त. त्यांच्या काळात मी त्यांची आवडती नायिका होते. सीआयडी, प्यासा, कागज के फूल, साहेब बीबी और गुलाम, चौदहवी का चांद असे चित्रपट मी त्यांच्यासोबत केले. हे चित्रपट पुढे कल्ट-क्लासिक चित्रपट ठरले.

अशा प्रतिभासंपन्न, चतुरस्र मेकरमध्ये एकच दुर्गुण होता, तो म्हणजे ते अतिशय निराशावादी होते. नकारात्मक विचारांनी ते फार लवकर खचून जात. कागज के फूल या त्यांच्या चित्रपटाच्या अपयशाने ते अतिशय खचले. त्यांच्या कुटुंबाने, निकटवर्तीयांनी त्यांना या निराशेच्या गर्तेतून बाहेर काढण्याचा अनेकदा प्रयत्न केला पण तरीही त्यांच्यावर निराशा, नकारात्मकतेने मात केलीच...

जीवन आणि चित्रपटांमधून अतिशय बुद्धिमान असलेल्या या अवलिया दिग्दर्शकानं अकाली एक्झिट घेतली. त्यांचे सगळेच चित्रपट ‘मास्टरपीस’ होते, पण त्यांच्या यशाचं योग्य मूल्यमापन त्यांच्या हयातीत झाले नाही, हे मोठं दुर्दैव! गुरुदत्त यांना जशी त्याची जाणीव झाली ते अधिकच निराशावादी होत गेले.

सीआयडी या तुमच्या पहिल्याच सिनेमावेळी गुरुदत्त यांनी तुम्हाला तुमचे नाव बदलण्यास सांगितले होते. त्याला तुम्ही ठामपणे नकार दिलात. अवघ्या १६व्या वर्षी इतका धीटपणा, साहस कुठून आलं तुमच्याकडे?

गुरुदत्त यांनी दिग्दर्शक राज खोसला यांच्याशी परिचय करून दिला. त्यांनी माझं नाव विचारलं. मी ‘वहिदा रेहमान’ असं म्हटल्यावर ते म्हणाले, हे नाव तुला बदलावं लागेल. वहिदा रेहमान हे नाव खूप लांबलचक, काहीसं ओल्ड फॅशन्ड आहे.

मी त्यांना नम्रपणे म्हटलं, माझ्या आई-वडिलांनी माझं हे नाव ठेवलं आहे. ते मी बदलणार नाही. त्यावर ते म्हणाले, अभिनयाच्या क्षेत्रात भल्या-भल्यांनी आपली खरी नावं बदलली आहेत. युसूफखान- दिलीपकुमार, महजबीन -मीना कुमारी, मुमताज जहान -मधुबाला, फातिमा -नर्गीस अशा अनेक ऑफ स्क्रीन -ऑन स्क्रीन नावांमागचा इतिहास त्यांनी मला सांगितला.

See practically Waheeda, everyone has changed their real names. अत्यंत शांतपणे मी त्यांना म्हटलं,

Sir, I am not everyone!

राज खोसला यावर निरुत्तर झाले आणि मी माझे नाव बदलण्यास तयार नाही, अशी कैफियत त्यांनी गुरुदत्त यांच्याकडे मांडली. गुरुदत्त यांनीही मला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मी बधत नाही हे ध्यानात आल्यावर तो विचार गुरुदत्त यांनीही सोडून दिला.

आता जे माझं साहस वाटतंय ते मला स्वतःला साहस वगैरे वाटलं नाही तेव्हा. माझ्या अम्मी-अब्बूनी माझं नाव ठेवलंय, मग मी ते आता का बदलावं? अशी त्यामागची प्रामाणिक भावना होती.

आपलं नाव न बदलण्याचा तुमचा निर्णय. पण पुढेही तुम्ही तुमच्या तत्त्वांवर ठाम राहिलात. आपल्या तत्त्वांशी तडजोड न करणं आजच्या काही नामांकित अभिनेत्रींनाही जमत नाही. या तुमच्या कन्व्हिक्शनचं कौतुक वाटतं...

माझं रियल नेम न बदलणं असो किंवा माझा रोल कितीही ग्लॅमरस असला तरी मी स्लिव्हलेस ब्लाऊज घालणार नाही; अंगप्रदर्शन तर शक्यच नाही, ही माझी काही तत्त्वं होती. मी त्या तत्त्वांशी कधीही फारकत घेतली नाही.

मला आठवतंय राज खोसलांनी दिग्दर्शित केलेल्या सोलवा साल चित्रपटात माझा नायक देव आनंद होता. १९५६मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाच्या कथेतल्या एका प्रसंगात नायिकेचे म्हणजे माझे कपडे ओले होतात. एका धोबीघाटाकडे निर्देश करत देव आनंद मला सांगतो, की माझे ओले कपडे मी इथे बदलावेत. या प्रसंगात राज खोसला यांनी चतुराई करत मला एक पारदर्शी ब्लाऊज दिला.

नायिकेला अचानकपणे धोबी घाटावर कुठले कपडे मिळणार? मग ती ही पारदर्शी चोळी वापरते, असे त्यांचे म्हणणे होते. तो झिरझिरीत ब्लाऊज वापरण्यास मी स्पष्ट नकार दिला. राज खोसला आडून बसले. त्यांनी मला तो ब्लाऊज घातलाच पाहिजे, असं ठणकावून सांगितलं. शूटिंग थांबून राहिलं. देव आनंदने माझी मनधरणी केली. आज सूर्यास्ताअगोदर हा शॉट पूर्ण झाला पाहिजे, दुसऱ्या दिवशी त्याला दुसऱ्या फिल्मच्या शूटिंगसाठी जायचे होते.

मी ऐकत नाहीये असं पाहून राज खोसला ओरडले, अभी अभी तुम साऊथ से बम्बई आयी हो, इतनी जल्दी तुम्हारे पर निकल आए! सगळं युनिट खोळंबून बसलं. शेवटी मी एक ओढणी त्या पारदर्शी चोळीभोवती घट्ट लपेटून घेतली. शॉट पूर्ण झाला पण राज खोसला भयंकर चिडले माझ्यावर. कसंबसं सोलवा सालचं ते चित्रण पूर्ण झालं. माझ्या तत्त्वाशी मी तडजोड केली नाहीच. मात्र राज खोसला यांच्याबद्दल एक सूक्ष्म अढी मनात निर्माण झाली..

तुम्ही विजय आनंद दिग्दर्शित गाइड चित्रपट करणार नव्हता, हे खरं का?

देव और मेरी फिल्म सोलवा साल पुरी हुई, लेकिन राज खोसला और मेरे बीच मतभेद निर्माण हुए थे । देवने गाइड फिल्म सुरू केली आणि त्यातली रोझीची भूमिका मला दिली. गाइडच्या दिग्दर्शनाची सूत्रे राज खोसला यांच्याकडेच होती.

त्यांच्या दिग्दर्शनात मी पुन्हा काम करण्यास उत्सुक नव्हते. त्यातून रोझी ही नायिका माझ्या मनाला पटत नव्हती, म्हणूनही मी गाइड फिल्म करण्यास उत्सुक नव्हते. लिव्ह इनमध्ये राहणारी नायिका (१९६५मध्ये) आपल्या समाजाला कशी रुचेल, अशी माझी भावना होती... पण मीच रोझी असायला हवी यासाठी देव आग्रही होता.

देवने माझी समजूत घातली, ‘देखो वहिदा, हर फिल्म के सेट पर कलाकार और डायरेक्टर के दरमियान क्रिएटिव्ह डिफरन्सेस होना बहुत नॉर्मल बात हैं । ऐसी बातों को बहुत सिरियसली लेना नहीं चाहिए । कम ऑन वहिदा. जॉईन द टीम ऑफ गाइड.’ तरीही मी फार उत्सुक नव्हतेच.

पण नंतर काही घडामोडी अशा घडल्या, की देव आनंद आणि राज खोसला यांचे काही तात्त्विक मतभेद झाले. राज खोसला यांनी गाइड सोडला आणि चेतन आनंद यांनी दिग्दर्शन हातात घेतलं. गाइडमधील रोझी ही माझ्यासाठी सर्वोत्तम भूमिका असेल, असं मला अनेकांनी सांगितलं. मग मी स्वतःला रोझी होण्यासाठी तयार केलं.

मग चेतन आनंदही या प्रोजेक्टमधून बाहेर पडले आणि विजय आनंद ऊर्फ गोल्डी आनंदने दिग्दर्शन स्वतःकडे घेतलं. गाइड त्याच्याकडे घेतल्यावर गोल्डीनं मला भेटून मी रोझी साकारावी, अशी गळ घातली... मी होकार दिला.

अनेक चित्रपट मी केले पण गाइड माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट भूमिका आहे असं मला वाटतं. गाइडचं शूटिंग भारतात ठिकठिकाणी केलं गेलं. रोझी या व्यक्तिरेखेने माझ्या कारकिर्दीला एक कलात्मक उंची दिली, हे निर्विवाद.

बायोपिक अर्थात चरित्रपटांची हल्ली क्रेझ आहे. वहिदाजी, तुमचं अवघं जीवनच खूप प्रेरणादायी आहे. तुमच्यावर बायोपिक करायचा झाल्यास तुमची भूमिका हल्लीच्या काळातल्या कुणी करावी. असं तुम्हाला वाटतं ?

बायोपिक हा हल्लीच्या फिल्मचा नवा ट्रेंड आहे. मला असं वाटतं ज्या व्यक्तींनी आपल्या देशासाठी मोलाचे योगदान दिले त्यांच्या आयुष्यावर चित्रपट काढावा. आपली पुढली पिढी त्यातून प्रेरणा घेईल, बोध घेईल.

माझं जीवन प्रेरणादायी आहे, मी समाजासमोर फार मोठा आदर्श निर्माण केला आहे, युवा पिढीने माझ्यापासून काही बोध घ्यावा असं काही सामाजिक कार्य मी केलं आहे, असं काय आहे; चित्रपटांतील भूमिकाही तशा सामाजिक आशयसंपन्न नाहीत, माझ्यावर बायोपिक निर्माण करून काय साध्य होणार? पण अगदीच जर माझ्या जीवनावर बायोपिक झालाच तर माझ्या भूमिकेला विद्या बालन न्याय देईल असं मला वाटतं.

विवाह के बाद आप फिल्मों से दूर होती गयी, आपने बारा वर्षों का ब्रेक भी लिया था?

अभिनेता आणि हॉटेलिअर कमलजीत ऊर्फ शशी रेखी यांनी माझ्यासोबत शगुन चित्रपट केला होता. आम्ही दोघे यात नायक नायिका होतो.

हा चित्रपट अपयशी ठरला. को-अॅक्टर म्हणून आमच्यात कसलं बॉण्डिंग निर्माण झालं नाही. होणार तरी कसं? आम्ही दोघंही संकोची, लाजरेबुजरे... नंतर काही वर्षांनी कमलजीत मला म्हणाले, ‘वहिदा, प्रथमदर्शनीच मला तू आवडली होतीस...’ तसं तर आमचं लग्न १९६४मध्येच झालं असतं. पण तेव्हा तो योग नव्हता.

त्यांच्या मनातील भावना माझ्याकडे त्यांनी व्यक्त केल्या नाहीत... कधीतरी यश जोहर यांच्याशी बोलताना त्यांनी माझ्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. यश जौहर से हमारा पारिवारिक स्नेह था । यश जोहर यांनी मला फोन केला. ते म्हणाले, ‘कमलजीत यांचे तुमच्याकडे काही काम आहे ..भेटाल का त्यांना?’

कमलजीत त्या काळात पॅरिसला हॉटेल सुरू करण्याच्या प्रयत्नात होते. मला वाटलं, बहुतेक कमलजीत यांना हॉटेल सुरू करण्यासाठी माझ्याकडून मार्गदर्शन, कदाचित अर्थसाहाय्य हवं असेल. मला स्वयंपाकाची आवड असल्याने अनेकांनी मला खासगीत, ‘वहिदा, तुम्हे तो हॉटल शुरू करना चाहिये...’ असंही सांगितलं होतं. कदाचित कमलजीत यांना याच कारणाने मला भेटायचे असेल, असं मला वाटलं.

यश जोहर यांच्या सांगण्यावरून मी कमलजीत यांना घरी भेटण्यास सांगितले. ते घरी आले, फॉर्मल चहा झाल्यानंतर उन्होंने कहा, मैं कुछ कहना चाहता हूं । मैंने यह समझ लिया की वे हॉटल की बात कह रहे हैं ।

मैंने जवाब दिया, आय एम लॅकिंग फंड्स । सॉरी । नो इंट्रेस्ट । उन्होंने कहाँ, शादी के प्रपोजल में पैसे की कमी होने का क्या वास्ता? वहिदा? जब उन्होंने मुझे सीधे शब्दों में पूछा क्या हम आपसे शादी कर शकते हैं? मैंने हां कर दी । कमलजीत, मेरे शौहर निहायत शरीफ, दिल के सच्चे इन्सान थे । हमारी गृहस्थी जितनी थी हम बहुत खुश थे ।

विवाह के बाद दो बच्चे हुए । उनकी परवरिश के लिए मैं फिल्मोंसे दूर हुई, ब्रेक लिया । हम उस समय बंगलोर में रहते थे ।

हे सांगताना वहिदाजींच्या डोळ्यांमध्ये सुखी संसाराच्या आठवणींचे तरंग उमटले असतात....

लग्नानंतर, मातृत्वानंतरही तुम्ही यश चोप्रा यांचे चित्रपट स्वीकारलेत !

फिल्म इंडस्ट्रीमधील दोन यश, यश जोहर आणि यश चोप्रा यांच्याशी माझं आदराचं -स्नेहाचं नातं कायम राहिलंय. मी यश चोप्रा यांचे काही चित्रपट मशाल, कभी कभी, चांदनी, लम्हे केले आहेत. हे चित्रपट केलेच पाहिजेत अशी यश चोप्रा यांनी मला गळच घातली होती.

अच्छे रोल थे । कभी ख़ुशी कभी गम फिल्म में जो रोल बाद में जयाजी ने किया वो उन्होंने मुझे ऑफर किया था । मी मुंबईत येऊन कभी ख़ुशी कभी गमचं शूटिंग सुरू केलं आणि अकस्मात बंगळूरला कमल यांना ब्रेन हॅमरेजचा तीव्र अॅटॅक आला. मी त्वरित बंगळूरला गेले. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी मी दिल्ली ६, रंग दे बसंती, विश्वरूपम असे निवडक चित्रपट केले.

अब अभिनय के प्रति मुझे कोई आकर्षण नहीं हैं । जिंदगी का लुत्फ पर्यटन, फोटोग्राफी में लेती हूँ । आशा पारेख, हेलन के साथ मिलना जुलना होता हैं । कभी हमारे ग्रुप में नंदा ,साधना और शम्मी थी । अब यह तीनो नहीं रही।

माझा मुलगा, मुलगी, माझे कुटुंब, माझ्या या सख्या, माझं पर्यटन, वाचन, गार्डनिंग, वाईल्डलाईफ फोटोग्राफी यात माझा वेळ छान

जातो. मला नव्याने स्फूर्ती मिळते. मी माझं आयुष्य आणि करिअर यात समाधानी आहे, तृप्त आहे. अभिनय

मी काया-वाचा-मने स्वीकारला

आणि कुठल्याही तडजोडींशिवाय पुढे नेला, याचं मला तितकंच समाधान आहे.

वहिदा रेहमान! लौकिकार्थाने बंडखोर वगैरे नसलेल्या या साध्याशा अभिनेत्री स्त्रीने जगाला सर्वार्थाने दाखवून दिलं १९५५ मध्येदेखील नाव न बदलता अभिनयात शिखरावर जाता येतं, ग्लॅमरस जगात राहूनही अंगभूत साधेपणा जपता येतो, स्वतःच्या तत्त्वांना मुरड न घालता; तडजोडी न करता स्वतःचं अस्तित्व टिकवता येतं, चाहत्यांच्या मनांवर अधिराज्य गाजवता येतं, अनेक सन्माननीय पुरस्कारही मिळवता येतात.

वहिदा रेहमान यांच्या सर्वांग सुंदर भूमिकांचे गारुड रसिकांच्या मनावर कायम राहणार आहे हे निश्चित!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल; शिवसेनेच्या (UBT) नेत्याचा दावा

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT