Gluten esakal
साप्ताहिक

ग्लुटेन बंद केल्याने वजन कमी होते का?

ग्लुटेन टाळण्यापेक्षा, संतुलित पण नियंत्रित आहार आणि पुरेशी हालचाल तसंच व्यायामावर भर द्यायला हवा!

सकाळ डिजिटल टीम

सुकेशा सातवळेकर

ज्या व्यक्तींच्या रिपोर्टमधून ग्लुटेन अस्वीकृती दिसते, त्यांनीच फक्त आहारातून ग्लुटेन टाळावं किंवा वर्ज्य करावं. इतरांनी केवळ वजन कमी करण्यासाठी सोपा मार्ग म्हणून ग्लुटेन टाळण्यापेक्षा, संतुलित पण नियंत्रित आहार आणि पुरेशी हालचाल तसंच व्यायामावर भर द्यायला हवा!

‘ग्लुटेन फ्री डाएट’बद्दल तुम्ही ऐकलंय का हो? हल्ली वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात. इंटरनेटवर बघून ग्लुटेन फ्री डाएट करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. हे प्रयोग यशस्वी होतात की नाही, हा मोठा प्रश्न आहे. पण सध्या आपण हे ग्लुटेन म्हणजे काय, ते समजावून घेऊ. ग्लुटेन म्हणजे गव्हातलं प्रोटीन.

गव्हाच्या पिठाची पोळी फुगते किंवा बेक करताना ब्रेड फुगतो तो ह्या ग्लुटेनमुळेच. बार्ली आणि राय या धान्यांमध्येही ग्लुटेन असतं. ओट पिकवताना त्यात ग्लुटेनचा थोडा अंश मिसळला असण्याची शक्यता असते. गहू आणि राय यांचा संकर करून तयार केलेलेल्या ट्रीटीकेल या धान्यातही ग्लुटेन असतं

प्रक्रियायुक्त पदार्थांमध्ये ग्लुटेन घातलं जातं. ‘रेडी टू ईट’ प्रकारातले खूप प्रक्रिया केलेले पॅकबंद पदार्थ, तयार सूप, सॉस, सॅलड ड्रेसिंग, ग्रेव्ही, कृत्रिम रंग आणि स्वाद, घट्टपणा देणारे तयार पदार्थ, फ्रेंच फ्राइज, चिप्समध्ये ग्लुटेन घातलेलं असतं. पॅकबंद मांसाहारी पदार्थांतही ग्लुटेन घालतात. माल्ट, ब्रुअर्स यीस्टमध्ये ग्लुटेन असतं.

वजन कमी करण्यासाठी माझ्याकडे आलेल्या एका पेशंटनं परवा विचारलं, ग्लुटेन बंद करू का? याचं उत्तर - सरसकट सगळ्यांनी ग्लुटेन बंद केलं आणि शरीरस्वास्थ्य सुधारलं; असं होऊ शकत नाही. हल्ली वजन कमी करण्यासाठी ग्लुटेन बंद करायची लाट आलेली दिसते. ग्लुटेन बंद केल्यावर वजन त्वरेनं कमी होऊन कार्यशक्ती वाढेल, तब्येत सुधारेल, पोटाचं आरोग्य सुधारून पचनशक्ती वाढेल, खेळाडूंचा खेळ सुधारेल असे दावे केले जातात.

पण या दाव्यांना पुरेसा शास्त्रीय आधार नाही, यावर पुरेसं शास्त्रीय संशोधन झालेलं नाही. आहारातून ग्लुटेन बंद केल्यावर शरीरातील चरबी आणि स्नायूंच्या वजनावर होणारा परिणाम तपासण्यासाठी, फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ मिनास गेरासने सखोल शास्त्रीय अभ्यास केला. त्यांना आढळलं की वजनवाढीचा ग्लुटेनशी थेट संबंध नाही.

ग्लुटेन खाल्ल्यावर तुम्ही नक्की लठ्ठ होणार असं अजिबात म्हणता येणार नाही. जास्तीचा खादाडपणा आणि अतिरिक्त कॅलरींमुळे वजनवाढीची दाट शक्यता त्यांनी अधोरेखित केली. आत्तापर्यंत ग्लुटेनमध्ये असा कुठलाही घटक सापडला नाही, ज्यामुळे सिलीअॅक आजार नसणाऱ्यांमध्ये वजन वाढेल.

गहू आणि गव्हाचे पदार्थ, बार्ली, राय, ओटमध्ये ग्लुटेन या प्रोटीनबरोबरच आयर्न, थायमिन, रायबोफ्लेविन, नायसिन ही ‘बी’ व्हिटॅमिन असतात; उपयुक्त फायबर, कॅल्शियम असतं. ग्लुटेन असलेले पदार्थ बंद केल्यावर या अन्नघटकांची कमतरता होऊन तब्येतीवर वाईट परिणाम होऊ शकतो. शाकाहारी लोकांमध्ये बहुतेकदा प्रोटीनची कमतरता दिसून येते. त्यांच्या आहारातून गरज नसताना ग्लुटेन बंद केलं तर प्रोटीन अजूनच कमी पडेल, त्याची भरपाई करणं अत्यंत आवश्यक असेल.

हल्ली बाजारात ग्लुटेन विरहित अनेक तयार पदार्थ उपलब्ध आहेत. ग्लुटेन फ्री जंक फूड सगळीकडे सहज मिळतंय. ग्लुटेन फ्री पिझ्झा, पास्ता, चॉकोलेट, बिअर मिळते. फास्ट फूडच्या चेन स्टोअरमध्ये ग्लुटेन फ्री मेन्यू सुरू झालेत, कारण ३० टक्क्यांपेक्षा जास्त अमेरिकी लोकांनी ग्लुटेन फ्री डाएट घ्यायचा प्रयत्न सुरू केलाय. पण लक्षात घ्या; फक्त ग्लुटेन नाही म्हणून हे पदार्थ विकत घेण्यापेक्षा, आधी या पदार्थांची लेबल वाचायला हवीत.

मग लक्षात येईल, की त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅट्स वापरलेली असतात. त्यामुळे कॅलरीही जास्त असतात. सामान्य पदार्थांच्या किमतीपेक्षा यांची किंमतही जास्त असते. पदार्थांची लेबल वाचण्यावरून एक गमतीदार निरीक्षण आठवलं! सिडनी युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी १८९ अभ्यासशोधांमधून दाखवून दिलंय की ‘तयार पदार्थांच्या लेबलवरील आहारघटकांची माहिती वाचल्यामुळे सुमारे २७ कॅलरी कमी खाल्ल्या जातात’.

काही जणांच्या शरीरात मात्र ग्लुटेनचा अस्वीकार दिसून येतो, ग्लुटेन योग्य पद्धतीनं पचत नाही. जागतिक लोकसंख्येच्या एक टक्का लोक सिलीअॅक आजारानं बाधित असतात, तर जवळजवळ दहा टक्के लोकांच्या शरीरात ग्लुटेनचा अस्वीकार (इन्टॉलरन्स) दिसून येतो. इंडियन काऊन्सिल फॉर मेडिकल रिसर्चनं केलेल्या पाहणीनुसार, उत्तरेकडील राज्यांमध्ये १.२३ टक्के, उत्तरपूर्व राज्यांमध्ये ०.८७ टक्के आणि दक्षिणेकडील ०.१ टक्के व्यक्ती सिलीअॅकग्रस्त आहेत.

ग्लुटेन अस्वीकाराचा विकार असणाऱ्या जवळजवळ ९० टक्के लोकांची तपासणी न झाल्यामुळे निदान होऊ शकत नाही. जनुकीय संरचनेतील दोषांमुळे ग्लुटेन अस्वीकृती आणि सिलीअॅक आजार होतो. या आजारांना कारणीभूत जीन्स जेनेटिक मॅपिंगनं शोधून काढता येतात.

सिलीअॅक आजार हा ग्लुटेन अस्वीकृतीचा अतिशय घातक परिणाम आहे. यात ग्लुटेनचं पचन होत नाही आणि लहान आतड्याचं गंभीर नुकसान होतं. खाल्लेल्या अन्नाचं पचन आणि शोषण व्हायची शक्ती कमी होते. शरीरात इन्फ्लमेशन म्हणजेच दाह होतो. या आजारावर अजून तरी ठोस औषधोपचार उपलब्ध नाहीत. आहारोपचार मात्र काटेकोरपणे पाळावा लागतो. सिलीअॅकच्या रुग्णांना ग्लुटेन पूर्णपणे, १०० टक्के वर्ज्य करावं लागतं. गहू आणि गव्हाचे पदार्थ - गव्हाचं पीठ, रवा, मैदा, दलियाचे पदार्थ बंद करावे लागतात.

सर्व प्रकारचे प्रक्रियायुक्त पदार्थ, बेकरीतले पदार्थ, बार्ली, राय, ओट्सचे पदार्थ पूर्ण बंद होतात. त्यांच्या आहारात फळं, भाज्या, डाळी, कडधान्यं, सोयाबीन, तेलबिया, सुकामेवा, अंडी, प्रक्रिया न केलेले मांसाहारी पदार्थ, दूध आणि दुधाचे पदार्थ यांचा समावेश होतो. गव्हाऐवजी ग्लुटेन नसलेली काही धान्यं म्हणजे तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, इतर भरडधान्यं, राजगिरा, क्विनोआ वापरता येतं. धान्यांच्या पिठांबरोबरच इतर पर्याय म्हणून थोड्या प्रमाणात आरारूट, खोबऱ्याचं पीठ, बदामाचं पीठ, बटाट्याचं पीठ, ग्वारगम वापरता येतं.

आहारात ग्लुटेन वर्ज्य असलं तरी बाकी सर्व अन्नघटकांचा समतोल साधावा लागतो. खाण्यापिण्याचं प्रमाण, कॅलरी आटोक्यात ठेवायला लागतात. सिलीअॅकमध्ये दिसणारी अतिशय गंभीर लक्षणं ग्लुटेन अस्वीकृतीमध्ये सौम्य स्वरूपात दिसतात. शरीरातील जवळजवळ सगळ्या पेशींवर परिणाम होऊ शकतो; अगदी मेंदू, त्वचा, एंडोक्राइन संस्था, पोटातील अवयव, यकृत, रक्तवाहिन्या, स्नायू आणि पेशीकेंद्रक. त्यामुळे अनेक वेगवेगळ्या विकारांशी याचा संबंध आहे. स्किझोफ्रेनिया, एपिलेप्सीपासून टाईप-१ मधुमेहापर्यंत आणि ऑस्टिओपोरोसीसपासून त्वचाविकार, सोरायासिसपर्यंत; ग्लुटेन अस्वीकृतीचा संबंध आहे.

या रुग्णांमध्ये सामान्यपणे काही लक्षणं दिसतात. त्यात पोट जड होतं, फुगतं, पोटात गुब्बारा धरतो, थोडंसं खाल्ल्यावरही पोट तुडुंब भरल्याची भावना होऊन अस्वस्थ वाटतं. अन्नपचनाच्या तक्रारी वारंवार दिसतात. वरचेवर पोटदुखीचा त्रास जाणवतो. अतिसार आणि बद्धकोष्ठाचा त्रास आलटून पालटून होतो. त्यामुळे तब्येतीवर परिणाम होतो. अतिसारामुळे क्षारांची कमतरता होते, डीहायड्रेशन आणि शक्तिपात होऊ शकतो. ॲनिमिया होतो आणि सातत्यानं कमालीचा थकवा जाणवतो; त्यामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम होतो.

ग्लुटेन असलेले पदार्थ खाल्ल्यावर मळमळल्यासारखं होतं. वारंवार डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. काहीवेळा काही जणांना हाडे आणि सांधेदुखी जाणवते, वैचारिक गोंधळ, चिंता, नैराश्य, मानसिक थकवा आणि अस्पष्टता, विचार करण्याची असमर्थता जाणवते. हात, पाय बधीर होणे, हातापायाला मुंग्या येणे अशाही तक्रारी दिसतात.

त्वचाविकार, एक्झिमा (इसब), अतिप्रमाणात तारुण्यपिटिका होतात. सोरायासिसचा त्रास होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वजनवाढ होते किंवा काही जणांमध्ये काही खास कारण नसताना वजन कमी होतं. मधुमेहींमध्ये इन्सुलिनची अस्थिरता किंवा वारंवार बदलणारी इन्सुलिनची पातळी, हे महत्त्वाचं लक्षण दिसतं. खरंतर या सर्व तक्रारी सामान्य माणसांमध्येही कधीतरी जाणवतात, पण ग्लुटेन अस्वीकृती किंवा सिलीअॅक असणाऱ्यांमध्ये त्या वारंवार, सातत्यानं जाणवतात.

ग्लुटेन अस्वीकृतीचं निदान झालेल्या २५ टक्के रुग्णांमध्येच ठरावीक, नेहमीची लक्षणं दिसून येतात. बाकीच्यांमध्ये एकतर काहीच लक्षणं दिसत नाहीत किंवा वेगळीच लक्षणं दिसू शकतात. आहारातील योग्य बदलांमुळे लक्षणांची तीव्रता कमी करून त्रास आटोक्यात ठेवता येतो. जेनेटिक मॅपिंगच्या रिपोर्टमधून लक्षात आलेल्या कारणीभूत जीन्सच्या तीव्रतेनुसार आहारात बदल सुचवले जातात. आहारातून ग्लुटेन कमी-जास्त प्रमाणात वगळून या विकारावर नियंत्रण ठेवता येतं. आरोग्यात अनेक सकारात्मक लाभ मिळतात. पण लक्षात ठेवा; ज्या व्यक्तींच्या रिपोर्टमधून ग्लुटेन अस्वीकृती दिसते, त्यांनीच फक्त आहारातून ग्लुटेन टाळावं किंवा वर्ज्य करावं. इतरांनी केवळ वजन कमी करण्यासाठी सोपा मार्ग म्हणून ग्लुटेन टाळण्यापेक्षा, संतुलित पण नियंत्रित आहार आणि पुरेशी हालचाल तसंच व्यायामावर भर द्यायला हवा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

Sports Bulletin 14th November: एकाच मॅचमध्ये दोघांची त्रिशतकं, गोव्याचा ऐतिहासिक विजय ते चॅम्पियन्स ट्रॉफी अपडेट्स

बुरखा घातल्याने 'मोदीं'च्या सभेत प्रवेश नाकारला; मुस्लीम महिलांनी घेतली आक्रमक भूमिका, शिवाजी पार्कवर काय घडलं?

Lok Poll Survey: मविआला स्पष्ट बहुमत! महायुतीच्या पारड्यात ‘इतक्या’ जागा; लोकपोलचा निवडणूकपूर्व सर्व्हे काय सांगतोय?

Narendra Modi: पंतप्रधान पदासाठी नावाची घोषणा; मोदींनी सांगितली, रायगडावरची 'ती' खास आठवण

SCROLL FOR NEXT