production design in movie esakal
साप्ताहिक

चित्रपटांसाठी ‘प्रॉडक्शन डिझाईन’ एवढे महत्वाचे का?

चित्रपटातील प्रसंग जिथे घडणार आहे ती जागा, त्या स्थळी असणाऱ्या वस्तू, वेशभूषा, सेटचा रंग, रंगाचा गडदपणा (टोन) आणि सेटचे इंटिरियर हे सर्व मिळून प्रॉडक्शन डिझाईन तयार होत असते

साप्ताहिक टीम

सुहास किर्लोस्कर

दिल चाहता है चित्रपटातील एका प्रसंगामध्ये सिद्धार्थ ऊर्फ ‘सिद’ (अक्षय खन्ना) तारा जयस्वालची (डिम्पल कपाडिया) ओळख झाल्यानंतर तिच्या घरी जातो. सिद खुर्चीवर बसला आहे. तारा उभी राहून काही काम करता करता गप्पा मारते आहे.

असा प्रसंग घडताना तारा जयस्वालच्या खोलीमध्ये तिच्या मागे-आजूबाजूला काय दिसते? तारा जयस्वाल आर्किटेक्ट आहे.

त्यामुळे ती काम करते त्या टेबलवर आर्किटेक्ट, डिझायनरला आवश्यक वस्तू दिसतात. मोठा कागद टेबलवर ठेवला आहे, क्लोज-अप शॉटमध्ये त्यावर आर्किटेक्चरल टेम्प्लेट, पेपर रोल, पेन्सिल, छोटी आणि मोठी कात्री, खोडरबर, फुटपट्टी दिसते.

पाच सेकंदात शॉट बदलतो आणि समोरच्या बाजूने ताराच्या मागच्या बाजूला पुस्तकाचा रॅक दिसतो. त्याशेजारी ताराचा तिच्या मुलीबरोबरचा फोटो दिसतो.

पुस्तकाच्या वरच्या बाजूला दारूच्या बाटल्या लावलेल्या दिसतात. त्या बाटल्याच्या मागे ताराच्या मुलीचा लहानपणीचा फोटो दिसतो. म्हणजेच तारा तिच्या मुलीबरोबर वास्तव्य करत नाही.

रॅक शेजारी एक आरसा आहे. त्यामध्ये ताराची मुलगी लहानाची मोठी झाल्याचे अनेक फोटो लावल्याचे दिसते. तारा डिझाईन करताना ड्रिंक घेत आहे. पुढच्या शॉटमध्ये ताराच्या समोर बसलेला सिद दिसतो.

त्याच्या मागे आरसा आहे, एक फोटो फ्रेम आहे. फोटो फ्रेममधून ताराची सौंदर्यदृष्टी दिसते. पुढील शॉटमध्ये तारा आणि सिद एकाच शॉटमध्ये (टू शॉट) दिसतात. आता आपल्याला तिसरी भिंत दिसते, ज्यावर ताराच्या मुलीचे लहानपणापासूनचे अनेक फोटो लावलेले आहेत.

सिद ताराला विचारतो, हे फोटो कोणाचे आहेत. एकूणच ताराच्या घरातील तीन भिंती बोलक्या आहेत, ३० सेकंदामध्ये त्यांनी बरेच काही सांगितले आहे.

त्या भिंती कशा सजवायच्या ही एक कला आहे, दिल चाहता हैमध्ये ते काम सुझान मेरवानजी यांनी केले आहे.

चित्रपटाच्या श्रेयनामावलीमध्ये पटकथा लेखक, दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर, अभिनेते या नावांच्याबरोबर प्रॉडक्शन डिझायनर हे नाव प्रामुख्याने दिसते. प्रत्येक चित्रपटाला एक थीम असते, एक रंग असतो हे यापूर्वीच्या लेखामध्ये सविस्तर लिहिले आहे.

ज्याप्रमाणे चित्रपटातील कथेला अनुसरून पात्र रचना केली जाते त्याप्रमाणेच चित्रपटाचा सेट त्या पटकथेला आणि थीमला साजेसा असेल अशा पद्धतीने केला जातो.

कोणत्याही चित्रपटाची कथेमधील प्रसंग घडताना आजूबाजूला जो ‘माहोल’ तयार केला जातो, त्या दृश्यात्मकतेला ‘प्रॉडक्शन डिझाईन’ म्हणतात.

बाबूराव मिस्त्री ज्यांना आपण बाबूराव पेंटर या नावाने ओळखतो, त्यांनी सिंहगड (१९२३), सावकारी पाश (१९२५) सारखे चित्रपट निर्माण केले त्यावेळी दिग्दर्शनाबरोबर कला दिग्दर्शनामध्ये मोलाचा वाटा उचलला.

भालजी पेंढारकर यांनी नेताजी पालकर (१९३९), छत्रपती शिवाजी (१९५२) यांसारख्या चित्रपटातून इतिहासाचे चित्र उभे करताना सत्याचा अपलाप होणार नाही याची काळजी घेतली. गणपतराव वडणगेकर (कला), हिंदुराव मिस्त्री (रचना), विष्णुपंत भोसले (सजावट) अशी नावे छत्रपती शिवाजी चित्रपटाच्या श्रेयनामावलीमध्ये ‘कला दिग्दर्शक’ म्हणून दिसतात.

चित्रपटामध्ये तो काळ दिग्दर्शकाच्या ‘व्हीजन’नुसार उभा करण्याचे काम कला दिग्दर्शक /प्रॉडक्शन डिझाइनर टीमला करावे लागते.

तुंबाड चित्रपट घडतो तो काळ पूर्वीचा म्हणजे १८व्या – १९व्या शतकातील आहे, ज्यावेळी घराघरांमध्ये वीज नसायची.

ही कथा घडते एका कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबामध्ये. त्यामुळे नितीन चौधरी आणि राकेश यादव या प्रॉडक्शन डिझाइनर द्वयीने तेव्हाची घरे, पेहराव, दागिने, घरातल्या वस्तू अशा बारीकसारीक गोष्टींचा अभ्यास केला.

वाडा जुना आहे असे वाटावे यासाठी झाडावरचे मॉस काढून ते वाड्यावर लावले. पुण्यातील मार्केटचा सेट तयार करण्याचे काम प्रथमतः स्टोरी बोर्डवर चित्रे काढून तयार केले गेले. साताऱ्यामध्ये नदीकाठी शूटिंग सुरू करण्यापूर्वी सेट लावण्यात आला.

कंदील, माठ, कार्पेट, व्हिंटेज कारचे गॅरेज अशी जवळजवळ चाळीस दुकाने उभी करण्यात आली. त्या वस्तीमध्ये व्हिंटेज कार आणल्या, हिंदुस्थान कंपनीचा जुना ट्रक तिथे आणण्यात आला. त्या काळातली कोठी उभी करण्यात आली.

नायक त्या काळातल्या बसने प्रवास करतो त्या बसच्या टपावर जुनी सायकल, बसच्या मागच्या बाजूला अडगळीतले सामान टाकून ती काळ्या रंगाची पण जुनाट दिसणारी बस तयार करण्यात आली.

सातारा जिल्ह्यातील एका गावात डोंगरावर एक घर शोधून शूटिंगसाठी फायनल करण्यात आले. घरामध्ये पाठलाग करण्यासाठी एक जागा तयार करण्यात आली. त्या काळातले जुने स्वयंपाकघर तयार करण्यात आले, चुलीवर एका लाकडी फळीवर पिठाचा डबा ठेवण्यात आला.

त्यातले पीठ मुलाच्या अंगावर पसरल्यामुळे एक भीतीदायक चित्र उभे करण्यात तुंबाडच्या प्रॉडक्शन डिझाईन टीमला यश मिळाले. एका गर्भाशयामध्ये प्रवेश केल्यावर हस्तर दिसतो. ते गर्भाशय आतून कसे दिसायला हवे.

त्या गर्भाशयामधून हस्तर प्रकट होतो, तो कसा दिसावा याचे डिझाईन स्टोरीबोर्डवर तयार करण्यात आले. नायक त्या गर्भाशयात सोन्याच्या मोहरा मिळवण्यासाठी नेहमी उतरतो असे प्रसंग चित्रपटात आहेत.

चित्रपट बघताना तो भाग ओलसर वाटावा, त्यामध्ये जीव असल्यामुळे त्याची धडधड दिसल्यावर प्रेक्षकांना त्याची भीती वाटावी आणि असे काही खरेच घडले असावे असेही वाटावे (म्हणजेच रामसे बंधूंची फिल्म वाटू नये) असे वातावरण तयार करणे हे कौशल्य दाद देण्यासारखे आहे.

चित्रपटाची कथा समजून घेतल्यावर पटकथा तयार होत असताना प्रॉडक्शन डिझायनर एक संकल्प चित्र तयार करतो/ करते.

सेटचे डिझाईन, आजूबाजूचे वातावरण कसे असेल याची चित्रे काढली जातात, त्याला साजेशा वस्तू (Props) जमविल्या जातात.

ऐतिहासिक चित्रपट असल्यास त्या काळातल्या वेशभूषा, त्या काळातील रस्ते, इमारती उभ्या कराव्या लागतात. त्या काळातील वाहने दाखवणे क्रमप्राप्त ठरते. आताच्या काळातील लिहिण्या-वाचण्याचे टेबल, पन्नास वर्षांपूर्वीचे टेबल आणि शंभर वर्षांपूर्वीचे टेबल यामध्ये फरक ‘दाखवावा’ लागतो.

सेट उभे करणे, ‘प्रॉप्स’ जमवणे आणि वेशभूषा तयार करणे अशा पूर्ण टीमचे संयोजन कला दिग्दर्शक करतात आणि बजेटनुसार तांत्रिक बाबींचा विचार करून ते चित्र प्रत्यक्षात उभे करण्याचा प्रयत्न करतात.

हर (Her) चित्रपटामध्ये पुढे काय होईल याचा विचार करून नायकाची रूम ‘सजवली’ आहे. त्या रूममधील प्रॉप्स बारकाईने बघितल्यास भविष्यकाळातील ऑफिस/ घर डिझाईनचा विचार ‘दिसतो’.

वेस अँडरसन दिग्दर्शित द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल चित्रपटाची कथा ज्या हॉटेलमध्ये घडते तसे जुने हॉटेल शोधण्याचा प्रॉडक्शन टीमने प्रयत्न केला परंतु तसे रिकामे हॉटेल त्यांना युरोपमध्ये मिळाले नाही.

त्यानंतर त्या टीमला एक रिकामे डिपार्टमेंटल स्टोअर मिळाले. त्या शॉपिंग मॉलचे इंटिरियर बदलून ते आतून हॉटेल दिसेल असे बदल करण्यात आले, गुस्ताव क्लिंटची पेंटिंग लावण्यात आली.

दिग्दर्शक वेस आणि प्रॉडक्शन डिझायनर अॅडम स्टॉकहाउस दोघांनी मिळून या हॉटेलची निर्मिती केली.

चित्रपटातील प्रत्येक फ्रेम बघताना रंग, फर्निचर, डिझाईन, प्रत्येक शॉटची डेप्थ लक्षात घेतल्यास त्यामागील मेहनत जाणवते.

द शायनिंग चित्रपटामध्ये नायक (जॅक निकोल्सन) ज्या हॉटेलमध्ये वास्तव्य करतो त्या हॉटेलमधील पॅसेजमधून लहान मुलगा तीन चाकी सायकल फिरवतो त्यावेळी लाल रंगाच्या सतरंजीवरील (मॅट) आकृत्यांमधील डिझाईन जाणीवपूर्वक त्या पद्धतीने तयार केले आहे.

त्या मॅटवर बसून तो मुलगा काही खेळण्यातल्या गाड्या फिरवून खेळतो आहे. त्यातला साचलेला बर्फ उचलणारा ट्रक विनाकारण दाखवलेला नाही, त्याचा संदर्भ चित्रपटाच्या शेवटच्या प्रसंगात आहे.

तो मुलगा खेळत असताना एक बॉल सरळ रेषेत येतो, त्यामागे एक विचार आहे. त्यापुढील शॉटमध्ये दिसणाऱ्या भूमितीय रेषा एक भीती निर्माण करण्यास मदत करतात. चित्रपटातील हॉटेलमधल्या भिंतीवर दिसणाऱ्या प्रत्येक फ्रेमला अर्थ आहे.

चित्रपटाचा शेवट अशा अनेक फ्रेमपैकी एका फ्रेमच्या क्लोज-अपवर संपतो. म्हणूनच प्रेक्षक या नात्याने आपण चित्रपटातील भिंतीवर काय दिसते याकडेही लक्ष देणे अपेक्षित असते.

चित्रपटातील प्रसंग जिथे घडणार आहे ती जागा, त्या स्थळी असणाऱ्या वस्तू, वेशभूषा, सेटचा रंग, रंगाचा गडदपणा (टोन) आणि सेटचे इंटिरियर हे सर्व मिळून प्रॉडक्शन डिझाईन तयार होत असते आणि त्या सर्वांचा प्रेक्षकाच्या मानसिकतेवर परिणाम होत असतो.

काही चित्रपट बघताना त्यातले असे बारकावे बघितल्यास पुढील प्रत्येक चित्रपटामध्ये आपले लक्ष तिकडे वेधले जाते.

पूर्वीच्या चित्रपटांमध्ये स्टील फ्रेम शॉट असायचा म्हणजेच कॅमेरा फार न फिरवता शूटिंग केले जायचे. त्यामुळे चित्रपटातील पात्रांच्या मागच्या बाजूचा सेट नाटकातील सेटप्रमाणे तयार केला जायचा.

चित्रपटाचे तंत्रज्ञान जसजसे बदलत गेले तसतसे कॅमेरा कुठेही फिरवता येऊ लागला. ड्रोन कॅमेरा आता अगदी नियमितपणे वापरला जातो.

त्यामुळे सेटवरील अनेक बारीक-सारिक गोष्टींकडे लक्ष देणे क्रमप्राप्त झाले आहे. ओंकारा चित्रपटातील नायकाच्या घरातील वस्तूंकडे लक्ष दिल्यास समीर चंदा यांनी प्रॉडक्शन डिझाईनमध्ये किती बारकाईने काम केले आहे ते जाणवते.

इन्सेप्शन चित्रपटातील स्फोट होणाऱ्या शॉटमध्ये उडणाऱ्या खुर्च्या, टेबल, रेस्टॉरंटच्या बाहेर रस्त्यावर असणाऱ्या वस्तूंचा कसा विचार केला आहे, ते समजते.

याच चित्रपटातील स्वप्नातील हाणामारीच्या दृश्यामध्ये चित्रपटातील पात्रे भिंतीवर चढूनही एकमेकाला पकडतात, त्यावेळी गुरुत्वाकर्षणाचे नियम लागू होत नाहीत, कारण ते स्वप्न असते. ख्रिस्तोफर नोलनला ते दृश्य व्हीएफएक्स इफेक्टशिवाय चित्रित करायचे होते.

त्यामुळे मोठे वर्तुळ तयार केले गेले. त्यामध्ये चौकोनी सेट बांधला गेला आणि तो सेट चक्राकाररितीने फिरवला गेला.

त्यामुळे ते दृश्य स्वप्नातील असले तरीही ते विलक्षण परिणामकारक आहे. दिग्दर्शकाच्या व्हिजनला अशा प्रकारे सत्यात उतरवण्याचे काम प्रॉडक्शन डिझाईन टीम करत असते.

1942 अ लव्ह स्टोरी चित्रपटात वेगवेगळे सेट उभे करताना त्यामधील तपशील बघितल्यास प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची कलेची जाण, तपशिलात जाऊन काम करण्याची पद्धत दिसते.

हम दिल दे चुके सनममध्ये पाच मजल्यांची हवेली दिसते तो खरे तर स्टुडिओमध्ये लावलेला सेट आहे. त्या हवेलीमधील पारोच्या (ऐश्वर्या राय) राहण्याच्या जागेमधील तपशील बघितल्यावर आपण नितीन देसाई यांच्या कलात्मकतेला दाद देतो.

अर्थात दिग्दर्शकाच्या व्हिजनप्रमाणे कला दिग्दर्शकाला काम करावे लागते, हे लक्षात ठेवल्यास माचिस, मुन्नाभाई एमबीबीएस, देवदास (२००२), बालगंधर्व, लगान, जोधा अकबर, हरिश्चंद्राची फॅक्टरी अशा चित्रपटांतील पडद्यावर दिसणाऱ्या दृश्यातील सेट, त्या जागा चित्रपटाच्या कथेनुसार कशा सजवल्या आहेत हे बघता येईल.

नितीन देसाई यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर, पडद्यावर बरेच वेळा नायक-नायिका नसतात पण कला दिग्दर्शक तुम्हाला नेहमी दिसतो.

नितीन देसाई ज्यांना गुरू मानत त्या नितीश रॉय यांच्या कला दिग्दर्शनाचे वैविध्य मंडी, न्यू दिल्ली टाइम्स, सलाम बॉम्बे, भारत एक खोज, तमस अशा अनेक चित्रपट, मालिकांमध्ये बघता येईल.

चित्रपटातील पात्रांच्या पाठीमागे असलेल्या बोलक्या जागा ‘बघितल्या’नंतर प्रॉडक्शन डिझाइनर काम कसे करतात आणि सेटवरील वस्तू व्यतिरिक्त वेशभूषेचा कसा विचार केला जातो, याबद्दल पुढील लेखामध्ये.

----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT