tennis player sumit nagal esakal
साप्ताहिक

सुमितचा सिंगल्सचा संघर्ष! गुणवत्ता भरपूर मात्र निराश करतय भारतीय टेनिस वर्तुळ?

ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थिएमविरुद्ध तो पराभूत झाला, परंतु त्याने टेनिस जगताला आपली दखल घेण्यास भाग पाडले..

साप्ताहिक टीम

किशोर पेटकर

ऑस्ट्रेलियन ओपनमधील समाधानकारक कामगिरीने आत्मविश्वास उंचावलेला सुमीत वर्षातील बाकी ग्रँडस्लॅम स्पर्धांत आपली कामगिरी सुधारण्यासाठी निश्चितच प्रयत्नशील राहील.

क्रीडाक्षेत्रात यशोशिखरावर स्वार होण्यासाठी अखंड मेहनतीबरोबरच लक्ष्मीचा वरदहस्तही आवश्यक असतो.

सध्याच्या अतिप्रगत युगात प्रशिक्षणाची व्याख्याच बदलेली आहे, परिणामी खर्चही भरपूर होतो. त्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल करावी लागते. गुणवत्ता असूनही पैशांअभावी बऱ्याच क्रीडापटूंच्या वाटचालीत गतिरोधक येतात.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये देशातील अव्वल मानांकित टेनिसपटू सुमीत नागलने या प्रश्नाकडे अंगुलिनिर्देश करताना आर्थिक चणचण जाहीर केली होती. टेनिसमधील एटीपी टूरवर कार्यरत राहण्यासाठी पुरस्कर्त्याची अत्यावश्यकता त्याने स्पष्ट केली होती.

आपल्या खाती फक्त ऐंशी हजार रुपये शिल्लक असून जर्मनीतील नामांकित टेनिस अकादमीत प्रशिक्षणासाठी ते पुरेसे नसल्याचे त्याचे म्हणणे होते.

पण, आर्थिक ओढाताण असूनही सुमीतने संघर्ष कायम राखला. कामगिरी उंचावण्यावर लक्ष एकाग्र केले.

मैदानावर सफलता कायम राखताना आर्थिक प्रश्न खेळाडूंना टोचतात. गतवर्षी खेळ उंचावत असताना आर्थिक चणचण जाणवूनही सुमीतचा दृढनिश्चय कायम राहिला, त्यामुळेच हा जिगरबाज टेनिसपटू २०२४च्या प्रारंभीच प्रकाशझोतात आला.

ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य फेरीत त्याला खेळायचे होते. त्यासाठी त्याला वाइल्ड कार्डची आवश्यकता होती. ऑस्ट्रेलियन ओपनपूर्वी जागतिक क्रमवारीत १३७व्या क्रमांकावर असलेला सुमीत आणि अखिल भारतीय टेनिस संघटनेत मतभेद झाले.

डेव्हिस कप लढतीसाठी त्याने भारतीय संघातून माघार घेतली. सुमीतला मेलबर्नमधील ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेसाठी वाइल्ड कार्ड मिळाले नाही, त्यामुळे खडतर अशा पात्रता फेरीत खेळावे लागले.

या टप्प्यात सलगपणे जिंकत तो मुख्य फेरीत दाखल झाला आणि पहिल्या फेरीत मानांकित खेळाडूस धक्का दिला. सुमीतचा संघर्ष परिणामकारक ठरला.

मेलबर्नला जिगरबाज खेळ

मूळचा हरियाणातील झज्जरचा असलेल्या सुमीतने मेलबर्न येथे कमाल केली. ऑस्ट्रेलियन ओपनच्या पात्रता फेरीत या २६ वर्षीय टेनिसपटूने तिघा प्रबळ प्रतिस्पर्ध्यांचा पाडाव केला.

मुख्य फेरीत जागतिक क्रमवारीत २७व्या स्थानी असलेल्या स्पर्धेतील ३१वा मानांकित कझाखस्तानचा अॅलेक्झांडर बुबलिक याला हरविले.

भारतीय टेनिस विश्वाच्या दृष्टीने ही कामगिरी ऐतिहासिक ठरली. १९८९ साली रमेश कृष्णनने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जागतिक क्रमवारीत तेव्हा अग्रस्थानी असलेल्या मॅट्स विलँडरला हरविले होते.

त्यानंतर ३५ वर्षांनी ग्रँडस्लॅम स्पर्धेतील मुख्य फेरीच्या एकेरीत भारतीय पुरुष टेनिसपटूने मानांकित खेळाडूला हरविले. सुमीत नागलने पराक्रमी विजय नोंदविताना बुबलिकविरुद्ध सेट गमावला नाही.

अकरा वर्षांनंतर भारतीय टेनिसपटू ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसऱ्या फेरीत खेळताना दिसला. २०१३ साली सोमदेव देववर्मनने ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्या फेरीत विजय मिळविला होता. सुमीतने मेलबर्नमधील स्पर्धेत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला, पण वाइल्ड कार्ड प्रवेश मिळालेल्या चीनच्या १८ वर्षीय जुनचेंग शँगने सुमीतची वाटचाल रोखली.

सुमीतचे आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात आले, मात्र अर्थप्राप्तीच्या बाबतीत ऑस्ट्रेलियन स्पर्धेतील कामगिरी त्याच्यासाठी लाभदायी ठरली.

जर्मनीतील साशा नेन्सेल यांच्या टेनिस अकादमीत तो प्रशिक्षण घेतो. मुख्य प्रशिक्षक, साहाय्यक प्रशिक्षक, डॉक्टर, फिजिओ, इतर सपोर्ट स्टाफ, तसेच प्रवास मिळून खर्चाचा आकडा कोट्यवधी रुपयांच्या घरात जातो.

ऑस्ट्रेलियन ओपनची पहिली फेरी जिंकल्यामुळे सुमीतच्या तिजोरीत घसघशीत भर पडलेली आहे. आगामी कारकिर्दीत सुमीत खंबीर पुरस्कर्त्याच्या शोधात आहे.

ऑस्ट्रेलियन ओपनमधील चमकदार खेळानंतर सुमीत चेन्नई, बंगळूर आणि पुण्यात होणाऱ्या चॅलेंजर्स स्पर्धेत खेळणार आहे. शिवाय दुबईतील एटीपी ५०० स्पर्धेतही नशीब आजमावणार आहे.

सारे काही योग्यपणे जुळून आल्यास तो कारकिर्दीतील सर्वोत्तम मानांकन नोंदवू शकेल. जागतिक क्रमवारीतील शंभर खेळाडूंत स्थान मिळविण्याच्या दृष्टीने त्याला प्रयत्न करता येतील.

ऑस्ट्रेलियन ओपनमधील मोहिमेनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना देशातील टेनिसचा दर्जा उंचावण्याची गरज त्याने व्यक्त केली.

देशात केवळ तीन-चार चॅलेंजर्स स्पर्धा होतात, भारतीय टेनिसपटूंसाठी त्या पुरेशा नाहीत असे सुमीतचे म्हणणे आहे. देशात टेनिससाठी चांगल्या साधनसुविधा, दर्जेदार प्रशिक्षक यासाठी, तसेच योग्य आर्थिक पाठबळ व्यवस्था यासाठी तो आग्रही आहे.

सुमीतची प्रेरणादायी वाटचाल

सुमीत भारताचा महान टेनिसपटू लिअँडर पेसला प्रेरणास्रोत मानतो. त्याचे वडील शालेय शिक्षक. खरंतर लहानपणी त्याचा

ओढा क्रिकेटकडे होता, परंतु वडिलांना त्याला टेनिस कोर्टवर नेले. साधारणतः सातव्या वर्षापासून त्याने टेनिस खेळण्यास सुरुवात केली.

या खेळात पारंगतता मिळविताना वयोगट स्पर्धेत त्याने आपल्यापेक्षा किंचित मोठ्या वयाच्या खेळाडूंना पराभूत केले. सुमीत बंगळूरस्थित महेश भूपती ट्रेनिंग अकादमीत दाखल झाला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.

कालांतराने तो कॅनडात गेला आणि नंतर प्रशिक्षणासाठी त्याने जर्मनीला प्राधान्य दिले. या प्रवासात त्याचा खेळ बहरला. २०१५ साली विंबल्डन टेनिस स्पर्धेत व्हिएतनामच्या ली होआंग नाम याच्यासह मुलांच्या दुहेरीत विजेतेपद पटकावून सुमीत सर्वप्रथम प्रकाशझोतात आला. व्यावसायिक टेनिसपटू झाल्यानंतर त्याने मोठे स्वप्न पाहत भरारी घेण्यासाठी पंख फाकले.

मात्र दुखापतींमुळे त्याला काही काळ झेप रोखावी लागली. शारीरिक व्याधींवर मात करून नव्या उमेदीने तो टेनिस कोर्टवर उतरला. २०१९मध्ये अमेरिकन ओपनद्वारे त्याने ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये पदार्पण केले.

महान टेनिसपटू रॉजर फेडररविरुद्ध तो पहिल्या फेरीत पराभूत झाला असला तरी, फेडररविरुद्ध पहिला सेट जिंकून सुमीत लक्षवेधी ठरला.

२०२० साली सुमीतने अमेरिकन ओपनची दुसरी फेरी गाठली. २०१३ साली सोमदेव देववर्मनने अमेरिकन ओपनची दुसरी फेरी गाठली होती, त्यानंतर सुमीतने अशी किमया साधली.

ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थिएमविरुद्ध तो पराभूत झाला, परंतु त्याने टेनिस जगताला आपली दखल घेण्यास भाग पाडले. ऑगस्ट २०२०मध्ये कारकिर्दीतील सर्वोत्तम एकेरी मानांकन नोंदविताना सुमीतने १२२वा क्रमांक प्राप्त केला.

२०२१मध्ये वाइल्ड कार्डद्वारे सुमीत ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य फेरीत खेळला, परंतु तेव्हा पहिली फेरी पार करता आली नव्हती.

कारकीर्द योग्य दिशेने घडत होती; पण २०२१मधील मोसम संपत असताना त्याला दुखापतींनी पुन्हा दगा दिला, त्यामुळे फॉर्म हरपला आणि त्याचे मानांकनही दीडशेच्या पुढे गेले. २०२२ वर्ष त्याच्यासाठी खराब ठरले.

जिगरी सुमीतने २०२३ साली मुसंडी मारली. दोन चॅलेंजर्स स्पर्धा जिंकल्या. दोन चॅलेंजर्स स्पर्धांत उपविजेतेपद मिळविले. या कामगिरीने पुन्हा त्याला दीडशे खेळाडूंच्या आत क्रमांक मिळविणे शक्य झाले. सुमीत बेसलाईवरील भक्कम खेळासाठी ओळखला जातो.

ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन ओपनमध्ये तो आतापर्यंत दोन वेळा मुख्य फेरीत खेळला आहे, मात्र फ्रेंच ओपन व विंबल्डनमध्ये त्याला पात्रता फेरी पार करता आलेली नाही.

यावेळच्या ऑस्ट्रेलियन ओपनमधील समाधानकारक कामगिरीने आत्मविश्वास उंचावलेला सुमीत वर्षातील बाकी ग्रँडस्लॅम स्पर्धांत आपली कामगिरी सुधारण्यासाठी निश्चितच प्रयत्नशील राहील. तसे त्याने संकेत दिले आहेत.

--------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT