ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांची प्रॉडक्टिव्हिटी वाढविणे आणि रिटेल स्टोअरमध्ये ग्राहकांना आकर्षित करीत खिळवून ठेवणे, यासाठी लोकेशन जितके महत्त्वाचे आहे, तितकेच इंटिरिअरही! ऑफिस आणि रिटेल इंटिरिअरमध्ये कोणत्या बाबींचा प्रामुख्याने विचार करायला हवा, या विषयीचा हा ऊहापोह.
कोरोनानंतर आता बरीचशी ऑफिसेस पूर्वीसारखी सुरू झाली आहेत. जवळपास तीन वर्षांच्या खंडानंतर कर्मचारी नेमाने ऑफिसमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. म्हणूनच त्यांच्यासाठी घरासारखे वातावरण निर्माण करून देणे महत्त्वाचे बनले आहे. विचारपूर्वक केलेल्या इंटिरिअरचा कर्मचाऱ्यांवर सकारात्मक परिणाम होतो, हे संशोधनांतून सिद्ध झाले आहे. याच पद्धतीने ऑनलाईनच्या जमान्यात ग्राहकांना दुकानांत येण्यासाठी उद्युक्त करताना त्यांना मिळणाऱ्या एक्स्पिरिअन्सचा विचार करावा लागतो. ऑफिस आणि रिटेल या दोन्ही गटांसाठी काही उपयुक्त टिप्स.
ऑफिस इंटिरिअरमधील ट्रेंड्स
गेल्या काही वर्षांत ऑफिसमधील इंटिरिअरमध्ये कालानुरूप बदल झालेले पाहायला मिळतात. कर्मचाऱ्यांमधील सहकार्याची भावना वाढीस लागावी, प्रॉडक्टिव्हिटी वाढावी आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राहावे, या हेतूने डिझाईनमध्ये मूलभूत बदल झाले आहेत. ऑफिस इंटिरिअरमध्ये लोकप्रिय असणारे ट्रेंड्स -
1) फ्लेझिबल जागा
स्टार्टअप संस्कृतीत फ्लेझिबल ऑफिसचा ट्रेंड पाहायला मिळतो. कर्मचाऱ्यांनी एकाच ठिकाणी बसावे, असे बंधनही आता घातले जात नाही. या दृष्टिकोनातून इंटिरिअरच्या बाबतीत फ्लेझिबिलिटी पाहायला मिळते. मॉड्युलर फर्निचर, सहज हलविता येणारी पार्टिशन्स, मल्टीपर्पज एरिया यांना प्राधान्य दिले जाते.
2) घरासारखे वातावरण
‘वर्क फ्रॉम होम’ आणि हायब्रिड कल्चरच्या आजच्या जगात कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्येही घरासारखे वातावरण अनुभवता यावे, यासाठी अनेक संस्था प्रयत्नशील असतात. रेसिडेन्शियल आणि कमर्शियल यांचे मिश्रण असणाऱ्या या प्रकारास ‘रेसिमर्शियल’ असे संबोधले जाते. यात कम्फर्टकडे सर्वाधिक लक्ष दिले जाते. त्यासाठी आरामदायक फर्निचरबरोबरच भरपूर प्रकाश, कमीतकमी ॲक्सेसरीज आणि आकर्षक रचना यांची सांगड घातली जाते.
3) आरोग्यास प्राधान्य
नव्या कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये आरोग्यास सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. ऑफिसची रचना आणि कामाची आखणी आरोग्य जपणारी असेल, याची विशेष काळजी घेतली जाते. त्यासाठी एर्गोनॉमिक फर्निचर, माईंडफुलनेस झोन, ब्रेकआऊट एरिया यांचा ऑफिस इंटिरिअरमध्येसमावेश केला जातो. अनेक ठिकाणी जिम आणि योग सेंटरही पाहायला मिळतात. ऑफिस कँटीनमध्ये आरोग्यदायी पदार्थांचाही आवर्जून समावेश केला जातो.
4) आवाजाचे नियोजन
कोणत्याही नकोशा आवाजाचा कामावर नकारात्मक परिणाम होतो. कधी हे आवाज शेजारी काम करणाऱ्या सहकाऱ्यांचे असतात, तर कधी बाहेरील गोष्टींचे असतात. प्रॉडक्टिव्हिटी वाढविण्यासाठी साऊंड ॲब्सॉर्बिंग मटेरिअल, नॉईझ कॅन्सलिंग तंत्रज्ञान यांचा खुबीने वापर केला जातो. शिवाय झाडांचीही उत्तमप्रकारे मांडणी करून आवाज नियंत्रित केला जातो.
रिटेल इंटिरिअरमधील ट्रेंड्स
वेगाने विस्तारणाऱ्या रिटेल क्षेत्रातील इंटिरिअर करताना आधुनिक तंत्रज्ञान आणि पर्यावरणस्नेही मटेरिअल यांचा वापर केलेला पाहायला मिळतो. ग्राहकांना केवळ आकर्षित करणे एवढा मर्यादित विचार न करता त्यांना स्टोअरमध्ये पुनःपुन्हा येण्यास उद्युक्त करणे आणि आल्यानंतर अधिक काळ खिळवून ठेवणे, यांवर भर दिला जाताना दिसो. रिटेल इंटिरिअरमध्ये लोकप्रिय असणारे ट्रेंड्स -
1) एक्स्पिरिअन्सवर भर
वस्तूविकत मिळते ते दुकान, ही व्याख्या बदलून शॉपिंगचा एक्स्पिरिअन्स मिळतो ते डेस्टिनेशन, अशी करण्याकडे सध्याचा कल आहे. इनस्टोअर इव्हेन्ट्स, वर्कशॉप्ससाठी स्वतंत्र जागा, कोणतीही खरेदी न करता केवळ तेथील वातावरणाचा अनुभव घेत निवांत बसण्याची सोय अशा क्लृप्त्याही ट्रेंडमध्ये आहेत. शॉपिंग मॉल्स किंवा स्टॅंडअलोन शॉपमध्ये व्हर्चुअल रिॲलिटी (व्हीआर) किंवा ऑगमेंटेड रिॲलिटी (एआर) यांचा वापर करून इंटरॅक्टिव्ह डिस्प्लेज केलेले आढळतात.
2) ऑनलाईन-ऑफलाईन इंटिग्रेशन
डिजिटल माध्यमातून खरेदी केलेली वस्तू प्रत्यक्ष दुकानातून कलेक्ट करण्याचा ट्रेंड सध्या दिसतो. याउलट प्रत्यक्ष दुकानात जाऊन एखाद्या वस्तूचा क्यूआर कोड स्कॅन करून त्या विषयीची अधिक माहिती घेत त्या वस्तूची त्याच स्टोअरच्या वेबसाईटवरून ऑर्डर करणे, असाही प्रकार पाहायला मिळतो. रिटेल बाजारपेठेकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी असे प्रयोग करणे गरजेचे झाले आहे. त्यामध्ये इंटिरिअरचा वाटाही मोलाचा ठरतो. त्यासाठी डिजिटल डिस्प्ले, ऑनलाइन रिव्ह्यू देण्याची व्यवस्था केली जाते.
3) पर्सनलायझेशनची गरज
प्रत्येक ग्राहकाला ते ठिकाण आपलेसे वाटेल अशी एक गोष्ट रिटेलच्या इंटिरिअरमध्ये असावी लागते. संबंधित ग्राहकाने पूर्वी केलेल्या खरेदीनुसार त्यास नव्या वस्तू दाखविणारे डिजिटल डिस्प्लेज, इन-स्टोअर कन्सल्टन्ट्स, लाऊंज, डिस्कशन एरिया, सणासुदीनिमित्त विशेष सजावट यांचा इंटिरिअरमध्येसमावेश केल्यास ग्राहक टिकवून ठेवण्यास मदत होते.
4) लोकल इज ग्लोबल
मातीला धरून राहणे, हे व्यवसायवृद्धीसाठी महत्त्वाचे ठरते. म्हणून रिटेल इंटिरिअरमध्ये स्थानिक कलांचा, स्थानिक घटकांचा, तेथील संस्कृतीचा समावेश अवश्य करावा. स्थानिकांच्या लकबी, तेथील मटेरिअल्स, खाद्यसंस्कृती यांचा अभ्यास करून इंटिरिअर अधिक प्रभावी करता येऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.