Society Security: सहकारी गृहरचना संस्थांमध्ये अनेकदा सुरक्षा व्यवस्थेबाबत अनास्था आढळते किंवा सभासद याबद्दल जागृत असल्याचं दिसत नाही.
आपले संकूल Complex सुरक्षित ठेवायचं असेल तर योग्य सुरक्षा असणे आवश्यक आहे. या लेखात पाहुयात सोसायटीची सुरक्षा कशी असावी, याबद्दल....Know about proper Security for your Co operative housing Society
सहकारी गृहसंस्था Co-Operative Housing Society व त्यांची सुरक्षा व्यवस्था Security या प्रश्नाचा विचार करण्यापूर्वी, सहकारी गृहसंस्थांची तीन प्रकारांत विभागणी करणे जरुरीचे आहे.
१) स्वतंत्र बंगल्यांच्या घरबांधणी संस्था.
२) साधारणतः पाच-सहा हजार स्क्वेअर फुटांच्या प्लॉटवर चार-पाच मजली इमारतींमध्ये वीस- पंचवीस सदनिकाधारकांची सहकारी गृहसंस्था व
३) पंधरा-वीस हजार स्क्वेअर फुटांच्या प्लॉटवर चार-पाच किंवा जास्त इमारती बांधून शंभर-दीडशे किंवा अधिक सदनिकाधारकांची गृह सहकारी संस्था.
या सर्व प्रकारच्या सहकारी गृहसंस्थांच्या सुरक्षाविषयक आवश्यक असलेल्या गोष्टी निरनिराळ्या आहेत. स्वतंत्र बंगला धारकांच्या सहकारी गृहसंस्थांना सुरक्षारक्षकांची फिरती गस्त रात्री असणे आवश्यक आहे.
या लेखामध्ये वर उल्लेख केलेल्या दुसऱ्या व तिसऱ्या प्रकारातील सदनिकाधारकांच्या सहकारी गृहसंस्थांचा आपण प्रामुख्याने विचार करणार आहोत.
प्रथमतः हे स्पष्ट करणे आवश्यक आहे, की सुरक्षा व्यवस्था अगदी उत्तम प्रकारची असली, तरी या सुरक्षा व्यवस्थेला छेद देण्याचे मार्ग चोरट्यांनी अवगत केलेले आहेत. एखादा सुरक्षारक्षक चोरट्यांना सामील होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
किंबहुना असे प्रकार घडलेले आहेत. मी व माझे कुटुंब व माझी सदनिका व सदनिकेची सुरक्षा व्यवस्था एवढाच जर संकुचित विचार प्रत्येक सभासद करणार असेल, तर कोणतीही आदर्श सुरक्षा व्यवस्था कोलमडून पडल्याशिवाय राहणार नाही.
या संकुचित वृत्तीचा फायदा चोरट्यांना सहजपणे मिळतो, याची जाणीव अनेक सुजाण सदनिकाधारकांना होत नाही याचे आश्चर्य वाटते.
शेजारच्या सदनिकेमध्ये चोरटे शिरले आहेत, माझी सदनिका सुरक्षित आहे; मग मी कशाला आरडाओरड करू, अशी मानसिकता असणाऱ्या सहकारी गृहसंस्थेला 'असहकारी गृहसंस्था' (Non Co-oprative Housing Society) असेच संबोधणे योग्य ठरेल.
हे देखिल वाचा-
अशा मनोवृत्तीच्या सदनिकाधारकांच्या संस्थेमध्ये हजारो रुपये खर्च करून योग्य ती सुरक्षायंत्रणा निर्माण केली तरी त्याचा अजिबात उपयोग होणार नाही.सहकारी गृहसंस्थांना सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या अनेक संस्था मोठ्या शहरांमध्ये कार्यरत आहेत.
अशा संस्थांच्या फक्त माहितीपत्रकावर विसंबून न राहता सहकारी गृहसंस्थेच्या कार्यकारिणी सभासदांनी त्या संस्थेची स्वतंत्रपणे माहिती गोळा करणे आवश्यक आहे.
सुरक्षारक्षक पुरविणारी संस्था व सहकारी गृहसंस्था यांच्यामध्ये एक कायदेशीर करार केला जातो. साधारणतः अशा प्रकारचा करार एक वर्षापेक्षा जास्त मुदतीचा असू नये. सहकारी गृहसंस्थेला खर्च करावी लागणारी रक्कम व त्या मोबदल्यात मिळणारी त्यांची सेवा याचा गंभीरपणे विचार करणे जरुरीचे आहे.
एक वर्षांचा करार संपल्यावर सर्व सदनिकाधारकांनी याबाबत खुल्या दिलाने चर्चा करून, सुरक्षा व्यवस्थेमधील काही त्रुटी सभासदांना जाणवल्या असतील तर त्यावर उपाययोजना करून पुढील एक वर्षाचा करार करावा.
सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या संस्थांमध्ये बऱ्याच वेळा सैन्यामधून निवृत्त झालेल्या जवानांची नेमणूक केली जाते. कठोर शिस्तीमधून काही वर्षे नोकरी केलेले हे जवान खरोखरच चांगले सुरक्षारक्षक असतात.
सगळ्याच सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या संस्थांना असे लष्करी जवान न मिळाल्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती पाहून अनेकांची या कामाकरता नेमणूक केली जाते. त्यांच्या शारीरिक क्षमतेचा विचार होतो; पण मानसिक क्षमतेचा विचार होत नाही.
अशा व्यक्तींचे पोलिस रेकॉर्ड तपासणे आवश्यक असते. याकरता सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या संस्थांनी त्यांच्याकडील सुरक्षारक्षकांना नोकरी देण्यापूर्वी पोलिस रेकॉर्ड तपासून घेणे जरुरीचे आहे.
सहकारी गृहसंस्थेनेसुद्धा करार करण्यापूर्वी या गोष्टीची खातरजमा सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या संस्थेकडून करून घेणे अत्यंत जरूर आहे. या गोष्टीचा फायदा अनेकांना झाला आहे हे लक्षात घ्यावे.
एकाच इमारतीमध्ये २५-३० सदनिकाधारकांची सहकारी गृहसंस्था असेल, तर दोन-तीन सुरक्षारक्षक नेमून योग्य ती सुरक्षा व्यवस्था करता येते. इमारतीच्या मोकळ्या जागेत छोटा निवारा उभा करणे शक्य असते.
हे देखिल वाचा-
इमारतीमध्ये जाणाऱ्या येणाऱ्यांची नोंद त्यांच्या नावासकट करणे व कोणत्या सदनिकाधारकाकडे बाहेरून आलेली व्यक्ती गेली याची योग्य ती नोंद करणे जरूर आहे.
सुरक्षारक्षक हा चौकस बुद्धीचा, सजग असणारा हवा. बाहेरून आलेल्या व्यक्तीकडे बॅग अगर सुटकेस नव्हती, जाताना सुटकेस किंवा पिशव्या आहेत, हे सुरक्षारक्षकाच्या लक्षात आलेच पाहिजे.
सुरक्षारक्षकाला कोणतीही शंका आली, तर त्याने इमारतीमध्ये आलेल्या लोकांबरोबर सहजपणे सदनिकाधारकापर्यंत जायला हवे. सदनिकाधारकाने त्यांची ओळख पटल्यावर त्यांना आत प्रवेश दिल्यावर सुरक्षारक्षकाने परत यावे.
या साध्या गोष्टीवरून, सुरक्षारक्षकाची तल्लख बुद्धी सदनिकाधारकाला दृष्टोत्पत्तीस पडते व एकूणच त्याचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.
एकाच मोठ्या प्लॉटवर चार-पाच किंवा अधिक इमारती असून शंभर-दीडशे सदनिकाधारकांची एकच गृहसंस्था असेल, तर सुरक्षारक्षकांची संख्या कमीत कमी सहा असणे आवश्यक आहे.
इमारतीमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्यांची नोंद करून, त्यांच्यासमवेत सदनिकाधारकाच्या घरी जाणे आवश्यक आहे. दूरध्वनीवरून सदनिकाधारकाला आलेल्या पाहुण्यांची माहिती देता येते.
योग्य मोबदल्यात चांगल्या प्रकारची सुरक्षा व्यवस्था पुरविणाऱ्या संस्थांची संख्या आज जरी कमी असली, तरी भविष्यात अशा चांगल्या संस्था उदयास येऊ शकतात. कारण काळाची ती गरज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.