पुणे - कोरोनाच्या आपत्तीच्या काळात ऑक्सिजनअभावी रुग्ण हवालदिल झाले आहेत. प्रशासन त्यासाठी झगडत आहे. अशा परिस्थितीत शहरातील काही उद्योग आणि रुग्णालये एकत्र आली. अवघ्या ४८ तासांत त्यांनी सुमारे १३ कोटी रुपयांच्या निधीची तजवीज करून ऑक्सिजनचे १४ प्लॅंट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ते उभारण्यात येणार आहेत.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅंड अॅग्रीकल्चरचे (एमसीसीआयए) अध्यक्ष आणि पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्सचे सुधीर मेहता यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. ऑक्सिजनचे हे प्लॅंट पुढील सहा दिवसांत शहरात ८-१० ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. महापालिकेच्या नायडू हॉस्पिटलमध्येही तो उभारण्यात येणार आहे. या सर्व प्लॅंटमधून १४ टन ऑक्सिजन रोज निर्माण होणार आहे. शहर व परिसरातील सहा शासकीय रुग्णालये आणि काही खासगी रुग्णालयांत ते उभारण्यात येतील. त्यासाठी अनेक कंपन्यांनी पाठबळ दिले आहे. याबाबत मेहता म्हणाले, की शहरातील ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असताना, औरंगाबादमध्ये एका कंपनीत १२ प्लॅंट तयार आहेत, असे समजले. एका ग्राहकाने त्याचे पैसे न दिल्यामुळे कंपनीने ते तसेच ठेवले असल्याचे समजले. तातडीने त्या कंपनीशी संपर्क साधला. सर्व प्लॅंट घेण्याची आम्ही तयारी दाखविली. सुरुवातीला त्यांना ते खरे वाटेना. रात्री १०-१२ वेळा त्या कंपनीशी बोलणे झाले.
सकाळी १० वाजता आमचा माणूस तेथे पोचला. त्यानंतर कंपनीला खात्री पटली आणि प्लॅंटची खरेदी झाली. दरम्यान विभागीय आयुक्त सौरभ राव, महापौर मुरलीधर मोहोळ, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल आणि काही उद्योग, रुग्णालयांशी संपर्क साधला. सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला अन् निधीही उभा राहिला. एकूण मागणीच्या तुलनेत आम्हाला उपलब्ध होत असलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी असले तर, खासगी उद्योग, कंपन्या आणि रुग्णालये एकत्र आली तर काय होऊ शकते, हे यातून दिसून आले आहे.
कोरोनाच्या काळात बजाज ऑटो आणि फायनान्सकडून आम्ही अनेक उपक्रम राबवीत आहोत. औरंबागबादमधील चार प्लॅंटची खरेदी आम्ही केली आहे. नारायणगाव, मंचर, खेड आणि मावळमध्ये ग्रामीण रुग्णालयांसाठी आम्ही प्लॅंट उभारून देत आहोत. ग्रामीण भागातील रुग्णांना तेथेच उपचार मिळावेत, ही त्यामागे भूमिका आहे.
- पंकज वल्लभ, उपाध्यक्ष, बजाज, सीएसआर
पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स समाजासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करीत आहे. त्यात आमचाही खारीचा वाटा असावा आणि समाजाला मदत व्हावी, या भूमिकेतून आम्ही तीन ऑक्सिजन प्लॅंट स्पॉन्सर केले आहेत.
- सुजित जैन, संचालक, मायलॅब, नेट सर्फ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.