फुरसुंगी आणि उरुळी देवाची या दोन गावांसाठी, कचरा डेपो सुधारणेसाठी गेल्या पाच वर्षात महापालिकेने सुमारे २०० कोटी रुपये खर्च केले आहेत.
पुणे - फुरसुंगी आणि उरुळी देवाची या दोन गावांसाठी, कचरा डेपो सुधारणेसाठी गेल्या पाच वर्षात महापालिकेने सुमारे २०० कोटी रुपये खर्च केले आहेत. तर या गावातून १४० कोटी रुपये मिळकतकर आणि बांधकाम विकास शुल्कातून २५ कोटी २० लाख असे एकूण १६५ कोटी २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर जवळपास मिळकतकराची २०० कोटीची थकबाकी आहे, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३४ गावांमध्ये पायाभूत सुविधा उभारण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. ११ गावात मिळकतकर वसुलीची प्रक्रिया सुरू झाली आहेत. तर २३ गावांमध्ये अद्याप कर वसूल करण्यास सुरवात झालेली नाही. फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावाने मिळकतकर जास्त वसूल होत असल्याची तक्रार करत महापालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यास मंगळवारी मान्यता दिली. पुढील १५ दिवसात याचे लेखी आदेश काढले जाणार आहेत.
महापालिकेने या गावात विकास केला नाही. नवे रस्ते, मलःनिसारण व्यवस्था, स्वच्छता यासह इतर पायाभूत सुविधा पुरविल्या नाहीत. फुरसुंगी येथे १३० तर उरुळी येथे ७० असे या दोन गावात रोज २०० टँकरच्या फेऱ्या करून पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले गेले, पण जवळच असलेल्या जलवाहिनीला इतर जलवाहिनी जोडून पाण्याची व्यवस्था केली नाही अशी टीका ग्रामस्थांकडून केली जात आहे.
दरम्यान, यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडून माहिती घेतली असता या दोन गावात व तेथील कचरा डेपोतील कचऱ्यामुळे नागरिकांना त्रास होऊ नये या कामासाठी सुमारे २० कोटी रुपये खर्च झाला आहे. टँकरसाठी दरवर्षी १० कोटीचा खर्च होतो. त्याच प्रमाणे रस्ते दुरुस्ती, मलःवाहिन्यांची देखभाल, विद्युत व्यवस्था, क्षेत्रीय कार्यालयांकडून केली जाणारी देखभाल दुरुस्तीचे काम, सार्वजनिक स्वच्छता यासह इतर कामांसाठी सुमारे २०० कोटी रुपयांचा खर्च झाला असल्याचे लेखा व वित्त विभागातर्फे सांगण्यात आले आहे. यामध्ये घनकचरा विभागातर्फे कचरा डेपोच्या भागात सुमारे १२७ कोटीची कामे गेल्या पाच वर्षात केली आहेत.
फुरसुंगी गावात २०१७ ते २०२२ या काळात ३८ हजार मिळकती आहेत. त्यांच्याकडून २५३ कोटी रुपयांचा मिळकतकर मिळणे अपेक्षीत होते, त्यापैकी १२३ कोटी रुपये वसूल झाले आहेत. वसूल झालेल्या रकमेत २३ कोटी दंडाची रक्कम आहे. तर उरुळी गावात ८ हजार मिळकती असून, ८१ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षीत होते. त्यापैकी केवळ १७ कोटी रुपये कर जमा झाला आहे. या पाच वर्षात या दोन गावातून १४० कोटी रुपये कर वसूल झाला पण १९४ कोटी रुपये मिळकतकराची थकबाकी आहे, असे मिळकतकर विभागाने सांगितले.
बांधकाम विभागाने फुरसुंगीमध्ये २३ कोटी २४ लाख आणि उरुळी देवाची मधून १ कोटी ९५ लाख रुपयांचे विकसन शुल्क घेऊन एकूण २५कोटी २० लाखाचे उत्पन्न मिळवले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
फुरसुंगीचे क्षेत्रफळ - १७६६ हेक्टर
उरुळी देवाचीचे क्षेत्रफळ -१०१८ हेक्टर
दोन्ही गावात झालेला खर्च - २०० कोटी
मिळालेले उत्पन्न - १६५ कोटी
या गावासाठी रोजच्या टँकरच्या फेऱ्या - २००
फुरसुंगीची लोकसंख्या (२०११) -६६०६२
उरुळी देवाची लोकसंख्या (२०११) - ९४०३
सध्याची दोन्ही गावांची लोकसंख्या - सुमारे २.५ लाख
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.