पुणे - महापालिकेने नियमीत मिळतकर भरणाऱ्या नागरिकांकडून कर वसुली केली जात असताना थकबाकीदार मिळकतधारकांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. २० दिवसात २५९ मिळकती सील केल्या आहेत. येत्या वर्षभरात उत्पन्न वाढीसाठी हा कारवाईचा जोर कायम ठेवला जाणार आहे.
राज्य सरकारच्या निर्णयानुसार पुणेकरांना चाळीस टक्के सवलत पुन्हा द्यावी लागणार आहे. यामुळे मिळकतदारांना परतावा द्यावा लागेल, तसेच मिळकत कराचे सुमारे २५० कोटी रुपये उत्पन्न ही कमी होणार आहे. हे उत्पन्न भरून काढण्यासाठी थकबाकी वसुल करण्यावर भर दिला जात आहे. शहरातील सुमारे १२ हजार ५०० मिळकतीची साडेनऊ हजार कोटींची थकबाकी आहे. यामध्ये काही न्यायालयीन प्रकरणे असल्याने त्यांची थकबाकी वसुल होऊ शकत नाही. पण ज्यांना न्यायालयीन खटला सुरू नाही अशी मिळकतींची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे.
पहिल्या टप्प्यात एक वर्षांहून अधिक काळ कराची थकबाकी असलेल्या मिळकतींवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे. त्याचप्रमाणे मिळकतीच्या वापरातील बदल करणाऱ्यांवर देखील कारवाई करून त्यांच्याकडून तीन पट कर आकारणी केली जाणार आहे. त्याबाबतचे परिपत्रक नुकतेच काढण्यात आले आहे.
मिळकतकराची थकबाकी ९५०० कोटी असली तरी त्यामध्ये ३ हजार ३० कोटी रुपये ही मुळ कराची रक्कम आहे. तर ६६०० कोटी रुपये ही शास्तीची रक्कम आहे. सर्वांत जास्त २ हजार २०० कोटी रुपये इतकी थकबाकी मोबाईल टॉवरची असून, त्यांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहे. सरकारी कार्यालयांकडे १०६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. १९४ मिळकतींसंदर्भात न्यायालयात दावा चालू आहेत. त्यांच्याकडे ८८१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ४४०० प्रकरणे ही दुबार कर आकारणीची आहेत. तसेच सुमारे सातशे मिळकतदारांनी न्यायालयाने वसुलीला स्थगिती दिली आहे.
शहरात हजारो मिळकती, मोकळ्या जागा, व्यावसायिक मिळकतींची थकबाकी आहे. ते न्यायालयात देखील गेले नाहीत अशा एक वर्षाहून अधिक काळ स्थगिती असलेल्या मिळकतीचे प्रमाण मोठे आहे. त्यांना वारंवार नोटिसा देऊनही त्यांच्याकडून थकबाकी भरली जात नाही. अशा मिळकतदाराकडे ५४२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यांच्यावर १५ मे पासून कारवाई सुरू केली आहे.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, ‘नियमीत कर भरणाऱ्या नागरिकांना आम्ही बक्षीस देणार आहोतच. पण थकबाकीदारांनावर जप्तीची कारवाई करत आहोत. १५ मे ते ७ जून या कालावधीत शहरातील २५९ व्यावसायिक मिळकती जप्त केल्या आहेत. त्यांच्याकडून १५ कोटी ९३ लाख रुपयांची थकबाकी येणे आहे, त्यापैकी केवळ १ कोटी २७ लाख रुपये भरले आहेत. ही कारवाई वर्षभर सुरू असणार आहे.
गेल्यावर्षी २५०० मिळकती सील
गेल्यावर्षी नोव्हेंबर २०२२ मध्ये कारवाई सुरू करून थकबाकी असलेल्या अडीच हजार मिळकती सील केल्या होत्या. त्यातून सुमारे १८० कोटी रुपये मिळकत कर वसुल केला होता. यंदा मे महिन्यांपासून ही थकबाकी वसुली सुरू केल्याने चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.
१५ मे ते ७ जून पर्यंतची कारवाई
भेटी दिलेल्या मिळकती - ५४३
सील केलेल्या मिळकती - २५९
थकबाकी वसूलीसाठी अपेक्षीत रक्कम -१५.९३ कोटी
कारवाई दरम्यान वसुली - १.२७ कोटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.