Shiv Jayanti 2024 sakal
पुणे

Shiv Jayanti 2024 : अवघे वातावरण झाले शिवमय ; भव्य सोहळ्यात ९५ स्वराज्यरथांचा सहभाग

आकर्षक सजावट असणारे ९५ स्वराज्यरथ... मर्दानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके अन् ढोल-ताशा पथकांचे स्फूर्तिदायी वादन... पारंपरिक वेशभूषेत नटलेले आबालवृद्ध... ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा जयघोष...

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आकर्षक सजावट असणारे ९५ स्वराज्यरथ... मर्दानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके अन् ढोल-ताशा पथकांचे स्फूर्तिदायी वादन... पारंपरिक वेशभूषेत नटलेले आबालवृद्ध... ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा जयघोष... अग्रभागी मुख्य रथावर असणारी शिवज्योत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा... अशा स्फूर्तिदायी अन् ‘शिवमय’ वातावरणात शिवछत्रपतींना मानवंदना देण्यात आली.

निमित्त होते, शिवजयंती महोत्सव समिती, पुणे यांच्यातर्फे शिवजयंतीनिमित्त आयोजित शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्याचे. लालमहालातील राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आणि शिवज्योत प्रज्वलित करून मिरवणुकीला सुरुवात झाली. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज श्रीमंत मालोजीराजे छत्रपती, सोहळ्याचे संकल्पक आणि समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, पोलिस उपायुक्त संदीप सिंग गिल तसेच सर्व स्वराज्य घराण्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मिरवणुकीचे यंदा १२ वे वर्ष आहे. लालमहालापासून सुरू झालेल्या या मिरवणुकीचे स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराणी ताराराणी शौर्य पथकातील ५१ रणरागिणींनी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. नादब्रह्म ढोल-ताशा पथकाने मिरवणुकीत जल्लोषपूर्ण वादन केले. या प्रात्यक्षिकांना आणि वादनाला वेळोवेळी टाळ्यांच्या उत्स्फूर्त गजरात दाद मिळत होती. ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता.

मिरवणुकीत ‘जिजाऊ माँसाहेब शहाजी महाराज शिवज्योत रथ’ या मानाच्या मुख्य रथाच्या नेतृत्वाखाली सरसेनापती वीर बाजी पासलकर, सरदार कान्होजी नाईक जेधे, सरदार कृष्णाजी नाईक बांदल, सरनौबत सेनापती येसाजी कंक, नरवीर तानाजी मालुसरे, सरदार मानाजी पायगुडे, कान्होजी नाईक कोंडे, श्रीमंत गायकवाड सरकार यांच्यासह अनेक सरदार घराण्यांचे ९५ स्वराज्यरथ आपला गौरवशाली इतिहास मांडत सहभागी झाले होते. सोहळ्याचे आयोजन अमित गायकवाड यांच्यासह सचिन पायगुडे, रवींद्र कंक, शंकर कडू, नीलेश जेधे, गोपी पवार, समीर जाधवराव, प्रवीण गायकवाड, किरण शितोळे, मोहन पासलकर, मयूरेश दळवी आदींनी केले.

अखिल भारतीय मराठा महासंघ, पुणे शहर यांच्यातर्फे या सोहळ्यातील रथांचे स्वागत करण्यासाठी स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. या वेळी महासंघातर्फे ‘पुढचं पाऊल’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले आणि ९५ स्वराज्य रथांच्या प्रमुखांना ही पुस्तिका व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छायाचित्राची फ्रेम भेट देण्यात आली. या प्रसंगी युवक अध्यक्ष युवराज दिसले, महिला अध्यक्ष श्रुतिका पाडळे, सरचिटणीस गणेश मापारी आदी उपस्थित होते.

‘दगडूशेठ’ट्रस्टतर्फे ‘शिवजन्मोत्सव’

‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात पारंपरिक वेशातील महिलांचे पाळण्याचे स्वर निनादले अन् फुलांनी सजविलेल्या पाळण्यात शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात पार पडला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरासमोरील जय गणेश प्रांगण येथे शिवमहोत्सव आयोजित करण्यात आला होता. सोमवारी (ता. १९) या महोत्सवात महिलांनी बाल शिवरायांचा पाळणा म्हणत शिवजन्मोत्सव साजरा केला. तसेच, या वेळी महिलांनी पोवाडा सादरीकरणदेखील केले.

सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, यतिश रासने, मंगेश सूर्यवंशी, अमोल चव्हाण, सचिन आखाडे, तुषार रायकर यांसह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उत्सवाचे आयोजन केले होते. चारदिवसीय महोत्सवात शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान, मंदार परळीकर यांचा ‘अमर आग’ हा सांगीतिक कार्यक्रम, लेखक केतन पुरी यांचे व्याख्यान आणि मयूर थिएटर्स निर्मित व नितीन सूर्याजीराव मोरे प्रस्तुत ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ हे ५० कलाकारांचे भव्य नाटक सादर झाले.

खासदार, आमदार यांचाही सहभाग

खासदार सुप्रिया सुळे यांनीही या सोहळ्यात सहभाग घेतला. दुपारच्या सुमारास मिरवणुकीत सहभागी होत त्यांनी स्वराज्यरथांना भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अन् मावळ्यांच्या वेशभूषेत नटलेल्या चिमुकल्यांसमवेत त्यांनी छायाचित्र काढले. तसेच आमदार दिलीप मोहिते, आमदार संग्राम थोपटे यांनीही मिरवणुकीत काही काळ सहभाग घेतला.

मिरवणुकीची वैशिष्ट्ये

  • स्वयंस्फूर्तीने सहभागी झालेले असंख्य शिवप्रेमी

  • फेटे, धोतर, नऊवारी, नथ अशा पारंपरिक वेशभूषेने वेधले लक्ष

  • तरुणाईचा लक्षणीय सहभाग

  • महिलांनी धरला फुगड्यांचा फेर, गाण्यांवर धरला ताल

  • साहसी खेळांची प्रात्यक्षिके दाखवणाऱ्या व ढोल-ताशा पथकांना प्रोत्साहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

SCROLL FOR NEXT