पुणे - पुणे पोलिसांनी दिल्लीतून ९७० किलो मेफेड्रोनचा साठा (एमडी) जप्त केला आहे. आरोपींनी इतर शहरांतील ‘एमडी’चा साठा लपवून ठेवल्याची आणि नेपाळमार्गे परदेशात पाठविल्याची शक्यता आहे. या ड्रग्ज रॅकेटमध्ये दोन परदेशी नागरिकांसह आणखी सात जणांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयात सांगितले. दरम्यान, मुख्य सूत्रधार सॅम ऊर्फ संदीप धुनिया याच्याविरुद्ध ‘इंटरपोल’मार्फत रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे.
अमली पदार्थ तस्करीच्या प्रकरणात दिल्लीतून आरोपी संदीप राजपाल कुमार (वय ३९), दिव्येश चरणजित भूतानी (वय ३८), संदीप हनुमानसिंग यादव (वय ३२) आणि देवेंद्र रामफुल यादव (वय ३२, सर्व रा. नवी दिल्ली) यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने या चार आरोपींना दोन मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात आले होते. या वेळी त्यांनी आरोपींच्या ताब्यातून जप्त केलेल्या ९७० किलो मेफेड्रोनची पाहणी केली.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आत्तापर्यंत पुण्यासह कुरकुंभ (ता. दौंड), सांगलीतील कुपवाड आणि दिल्ली शहरातून एकूण १ हजार ८३७ किलो ‘एमडी’ जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत ३ हजार ५७९ कोटी इतकी आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. अमली पदार्थांमुळे युवा पिढीचे भवितव्य उध्वस्त होण्याची शक्यता आहे. आरोपींनी इतर शहरांत ‘एमडी’चा साठा लपवून ठेवला आहे का? त्यांनी आणखी कोणाला अमली पदार्थांची विक्री केली?
त्यांना आर्थिक मदत कोणी केली, या सर्व बाबींचा तपास करावयाचा आहे.
त्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी तपास अधिकारी राजेंद्र लांडगे आणि सहाय्यक सरकारी वकील नीलिमा इथापे-यादव यांनी केली. त्यावर बचाव पक्षाकडून आरोपी तीन दिवस दिल्ली पोलिसांच्या कोठडीत होते. त्यांच्या घरी आणि कार्यालयातून अमली पदार्थ जप्त झालेले नाहीत. त्यामुळे आरोपींना पोलिस कोठडीची गरज नसल्याचा दावा करण्यात आला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपींना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
हा देशाच्या विरोधातील गुन्हा
‘अमली पदार्थ निर्मिती आणि तस्करीचे धागेदोरे पुण्यातील सोमवार पेठेपासून थेट राजधानी दिल्लीपर्यंत पोचले आहेत. दररोज मेफेड्रोनचा नवीन साठा हस्तगत होत आहे. अमली पदार्थ तस्करांकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. तरुण पिढी उध्वस्त झाल्यास तो देशासाठी वाईट दिवस असेल. त्यामुळे हा देशाच्या विरोधातील गुन्हा आहे,’ असे नमूद करत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी आरोपींना पोलिस कोठडी सुनावली.
संदीप धुनिया ‘मोस्ट वाँटेड’च्या यादीत
अमली पदार्थ तस्कर प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप धुनिया हा कुवेतमध्ये पसार झाला आहे. त्याच्याविरुद्ध ‘इंटरपोल’द्वारे ‘रेड कॉर्नर’ नोटीस बजावण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘मोस्ट वाँटेड’ आरोपींच्या यादीत धुनियाचा समावेश करण्यात आला आहे. ‘इंटरपोल’कडून संबंधित देशांमध्ये त्याचा शोध घेण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.