पुणे - विद्यार्थ्यांमधील नवसंशोधन, सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी पायाभूत सुविधा पुरवून इकोसिस्टीम तयार करणे, देशातील सर्व विद्यापीठे, तंत्रज्ञान, संशोधन व शैक्षणिक संस्थांमध्ये नवकल्पनांच्या (इनोव्हेशन) समन्वयासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाद्वारे "नॅशनल इनोव्हेशन सेल'ची स्थापना केली आहे. याद्वारे सर्व विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांना "इनोव्हेशन रॅंकिंग' देणार असल्याचे "नॅशनल इनोव्हेशन सेल'चे मुख्य इनोव्हेशन अधिकारी डॉ. अभय जेरे यांनी "सकाळ'शी संवाद साधताना सांगितले.
प्रश्न - नॅशनल इनोव्हेशन सेलची स्थापना कशी झाली?
डॉ. जेरे - देशातील सर्व विद्यापीठे, संशोधन व शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, नवसंशोधन क्षमतेसाठी पायाभूत सुविधांची इकोसिस्टीम तयार केली आहे. त्यासाठी अटल टिंकरिंग लॅब, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन कार्यरत आहे. तरीही शिक्षण संस्थांमध्ये सर्वांगीण समन्वयासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नॅशनल इनोव्हेशन सेलची मार्चमध्ये स्थापना केली.
प्रश्न - नॅशनल इनोव्हेशन सेलचे उद्दिष्ट काय?
- विद्यार्थ्यांना उद्योजक बनवून नोकऱ्या देणारे बनविणे हाच आमचा उद्देश आहे. देशाला "वैश्विक नवकल्पनांचे मध्यवर्ती केंद्र' (ग्लोबल इनोव्हेशन हब) बनविण्याचे ध्येय आहे. विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांवर वाया जाणारा वेळ देशाच्या प्रगतीसाठी वापरून सर्व विद्यापीठे, तंत्रज्ञान, संशोधन व शैक्षणिक संस्था आणि उद्योग समूहांमध्ये समन्वय घडवून आणण्याचे उद्दिष्ट आहे.
प्रश्न - इनोव्हेशनसाठी कोणत्या बाबींवर लक्ष केंद्रित करावे?
- बहुतांश इनोव्हेशन प्रोजेक्ट जुन्या कल्पनांवर आधारित असल्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. दैनंदिन समस्यांवर, चालू तंत्रज्ञानावर आपण "इनोव्हेटिव्ह' काम करत नाही, त्यासाठी उद्योगांची गरज ओळखून त्यावरील नवकल्पनांना वाव देण्यावर भर असला पाहिजे. एखादी नवकल्पना निर्माण करणे, तिची वास्तविकता पडताळणे, संभाव्य बाजारपेठ उपलब्ध कशी होईल, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
प्रश्न - नॅशनल इनोव्हेशन सेलचा महत्त्वाकांक्षी उपक्रम कोणता?
- काही दिवसांपूर्वी सेलद्वारे जागतिक नियमावलीच्या धर्तीवर "अटल रॅंकिंग फॉर इन्स्टिट्यूशन ऑफ इनोव्हेशन ऍचिव्हमेंट'च्या (अरिया) नियमावलींची चौकट तयार केली आहे. त्यानुसार सर्व विद्यापीठे, तंत्रज्ञान, संशोधन व शैक्षणिक संस्थांना "इनोव्हेशन रॅंकिंग' दिले जाणार आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे. त्यामध्ये संबंधित संस्थांनी किती पेटंट घेतले, त्यातून किती उद्योगसमूह जोडले गेले, इनोव्हेशनसाठी किती पुरस्कार मिळाले, तसेच संस्थेचे प्राध्यापक किती स्टार्टअप व्यवस्थापकीय मंडळांवर आहेत, हे पाहिले जाईल. गरज भासल्यास प्रत्यक्ष संस्थाभेटी देऊन पडताळणी केली जाईल. एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृती दिनापासून या कामाला सुरवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात सर्वोत्तम दहा शिक्षण संस्थांना पुरस्कार जातील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.